नि. २३
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा. अध्यक्ष - श्री अनिल य. गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ४४/२०१०
-----------------------------------------------
तक्रार नोंद तारीख: - २०/१/२०१०
तक्रार दाखल तारीखः - २१/१/२०१०
निकाल तारीखः - २०/९/२०११
-------------------------------------
श्री सतिश जयकुमार देशींगे
वय वर्षे – ४५, धंदा – वाहतूक
रा.महावीर चौक, कचेरी रोड, इस्लामपूर
ता.वाळवा जि.सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स कंपनी लि.
पत्ता – जिल्हा परिषदेसमोर, सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फे – +ìड.एन.एम.ओतारी, एस.जे पाटील
जाबदार – नो से
नि का ल प त्र
द्वारा- मा. सदस्या- गीता घाटगे.
तक्रारदारांनी जाबदार फायनान्स कंपनीकडून आर्थिक सहाय्य घेवून वाहन खरेदी केले होते. या वाहनाचे हप्ते वेळेवर तक्रारदार भरत होते परंतु काही कारणामुळे काही हप्ते तक्रारदारांकडून जमा न केले गेल्याने जाबदारांनी तक्रारदारांचे वाहन तक्रारदारांना कोणतीही पूर्वसूचना न देता ओढून नेले. त्याकरिता तक्रारदारांनी सदरहू तक्रारअर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे -
१. तक्रारदार यांनी ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय करण्याकरिता जाबदार फायनान्स कंपनीकडून आर्थिक सहाय्य घेवून वाहन खरेदी केले. तक्रारदारांनी जाबदार कंपनीकडून रक्कम रु.४,५०,०००/- चे वाहन कर्ज घेतले. तत्पूर्वी त्यांनी जाबदार यांच्याकडे रक्कम रु.१,१०,०००/- इतकी रोख रक्कम देखील जमा केली. वाहन खरेदी करतेवेळी या वाहनाची काही डागडुजी करणे आवश्यक होते. त्याप्रमाणे वाहनाची दुरुस्ती तक्रारदारांनी केली त्याकरिता तक्रारदारांना रक्कम रु.१,५०,०००/- इतका खर्च आला. तक्रारदारांनी सदरहू वाहन भाडेतत्त्वावर लावणेसाठी व फिरणेसाठी योग्य करुन घेतले. सदरहू वाहनाचे पूर्वीच्या मालकांनी या वाहनाचे कोणतेही टॅक्सेस भरलेले नव्हते तसेच परमिटची फीदेखील जमा केलेली नव्हती. जाबदारांनी या रकमादेखील संबंधीत अधिका-यांकडे अदा केल्या. हे वाहन खरेदी करण्यापूर्वी जाबदारांच्या सांगली येथे गोडाऊनमध्ये ठेवण्यात आले होते. या गोडाऊनची फीदेखील तक्रारदारांनी जाबदारांकडे जमा केली. तक्रारदारांनी जाबदारांकडून जे कर्ज घेतले होते त्याचा हप्ता प्रतिमाह रु.१६,५९२/- असा होता.
तक्रारदारांनी वाहनाची योग्य ती दुरुस्ती करुन सदरहू वाहनाची भाडेवाहतूक करण्यास सुरुवात केली. हे वाहन भाडे घेवून येत असताना या वाहनास अपघात झाला. अपघातामुळे वाहनाचे प्रचंड नुकसान झाले. वाहनाची दुरुस्ती करण्याकरिता तक्रारदारांना पुन्हा रक्कम रु.२,८०,०००/- इतका खर्च करावा लागला. पैकी रक्कम रु.७३,८००/- इतकी रक्कम तक्रारदारांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाईपोटी मिळाली मात्र त्यातील रक्कम रु.२०,०००/- जाबदार कंपनीने त्यांचेकडून ठेवून घेतले. अपघातावेळी या गाडीमध्ये जे काही साहित्य होते त्या साहित्याचेही नुकसान झाले ती नुकसान भरपाईदेखील तक्रारदारांना साहित्याच्या मालकास द्यावी लागली. अशा रितीने एकूणच तक्रारदारांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले. असे असताना देखील त्यांनी रक्कम रु.१६,९००/- व रक्कम रु.२५,०००/- अनुक्रमे दि.२०/४/०९ व १८/१२/०९ रोजी जाबदारांकडे हप्त्यापोटी म्हणून जमा केले व जे काही हप्ते त्यांना भरता आले नाहीत, त्याचे कारण देखील त्यांनी जाबदारांना सांगितले. परंतु ज्यावेळी तक्रारदार जाबदारांकडे रक्कम रु.२०,०००/- घेवून जमा करण्यासाठी गेले होते तेव्हा जाबदार कंपनीच्या संबंधीत अधिका-यांनी सदरहू वाहन कोठे आहे याबाबतची माहिती घेवून सांगली-कोल्हापूर रोडवर वाहन असताना त्याचा जबरदस्ती ताबा घेतला अशी तक्रारदारांची जाबदारांविरुध्द तक्रार आहे.
तक्रारदार पुढे असेही कथन करतात की, ही बाब तक्रारदारांना कळल्यावरती तक्रारदारांनी रक्कम रु.२०,०००/- भरुन वाहन परत द्यावे अशी विनंती जाबदारांना केली व थकीत हप्त्याबाबत जास्तीचा हप्ता पुढील महिन्यापासून घ्यावा अशी विनंतीदेखील त्यांनी केली तथापि तक्रारदार देवू करीत असलेली रक्कम जाबदारांनी स्वीकारली नाही व वाहनाची विक्री लिलावात करणार असल्याचे तक्रारदारांना सांगितले. आणि म्हणून सदरहू वाहनाचा ताबा मिळावा व वाहन अन्य कोणास विक्री करु नये याकरीता तक्रारदारांना सदरहू मंचाकडे दाद मागण्यासाठी धाव घ्यावी लागली. तक्रारदारांनी तक्रारअर्जामध्ये तक्रारदारांचा तक्रारअर्ज खर्चासह मान्य करावा तसेच जाबदारांनी जी दूषित सेवा दिली त्याकरिता म्हणून रक्कम रु.२५,०००/- मिळावेत अशीही विनंती तक्रारअर्जामध्ये केली आहे. तक्रारअर्जाचे पुष्ठयर्थ तक्रारदारांनी नि.३ अन्वये प्रतिज्ञापत्र दाखल करुन नि.५ अन्वये एकूण ११ कागदपत्रे दाखल केले आहेत.
तक्रारदारांनी त्यांचे तक्रारअर्जासोबत नि.७ अन्वये तूर्तातूर्त मनाईचा अर्ज देखील प्रतिज्ञापत्रासह दाखल केलेला आहे.
२. मंचाच्या नोटीशीची बजावणी जाबदार यांचेवर झाल्यावर ते विधिज्ञांमार्फत हजर झाले मात्र त्यांचे म्हणणे त्यांनी दाखल न केलेने त्यांचेविरुध्द नि.१ वर नो से आदेश करण्यात आला. मात्र त्यांनी नि.१२ अन्वये सदरहू अर्ज या मंचामध्ये चालणेस पात्र नाही असा प्राथमिक मुद्दा काढून त्यावर प्रथम निर्णय व्हावा अशी विनंती करणारा अर्ज प्रस्तुत प्रकरणी दाखल केला. या अर्जात त्यांनी तक्रारदारांनी वाहन व्यापारी उद्देशासाठी (Commercial Purpose) खरेदी केल्याने तक्रारदार हे ग्राहकाच्या व्याख्येच्या अंतर्गत येत नाहीत आणि म्हणून सदरहू तक्रार अर्ज या मंचाच्या कार्यक्षेत्रात येत नाही असा आक्षेपाचा मुद्दा उपस्थित केला व त्या अनुषंगे अधिकार क्षेत्राचा प्राथमिक मुद्दा काढून त्याची प्रथम सुनावणी घेण्यात यावी अशी विनंती केली. परंतु जाबदारांचा सदरहू अर्ज नामंजूर करुन मंचाने पुढील आदेश होईपर्यंत वादग्रस्त वाहन तक्रारदार सोडून अन्य व्यक्तिस विल्हा करु नये असे जाबदार कंपनीस निर्देश दिले.
त्यानंतर सदरहू प्रकरण तडजोडीसाठी अर्जदारांच्या तोंडी विनंतीनुसार लोकअदालतमध्ये ठेवणेत आले. त्यानंतर नि.१९ अन्वये जाबदारांतर्फे प्रस्तुत प्रकरणी अर्ज दाखल करणेत आला. या अर्जामध्ये सदरहू वाहन रक्कम रु.५०,०००/- स्वीकारुन अर्जदाराच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच अर्जदार व जाबदार यांचेत तडजोड झाली असल्याचे देखील या अर्जात नमूद करण्यात आले व पुढील कार्यवाहीसाठी सदरहू प्रकरण लोकअदालतमध्ये ठेवण्यात यावे अशी विनंतीही करण्यात आली. सदरहू अर्ज प्रस्तुत प्रकरणी दाखल करुन घेण्यात आला. त्यानंतर प्रस्तुत प्रकरणी अनेक तारखा नेमण्यात आल्या परंतु या सर्व तारखांना तक्रारदार सातत्याने गैरहजर राहिले. त्यामुळे तक्रारअर्जातील तक्रारदारांची वाहनाच्या अनुषंगे असलेली मागणी व नि.१९ अन्वये जाबदारांमार्फत दाखल करण्यात आलेल्या अर्जातील कथने लक्षात घेता मंचाचा असा निष्कर्ष निघतो की, प्रस्तुत प्रकरणी तक्रारअर्जात तक्रारदारांनी वादग्रस्त वाहनासंदर्भात जी मागणी केलेली आहे त्याबाबत आदेश करणे सद्य परिस्थितीमध्ये तथ्यहीन ठरेल. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणी याबाबत कोणतेही आदेश न करता तक्रारदारांना सदरहू प्रकरण पुढे चालविण्यात स्वारस्य नसल्याचे लक्षात घेवून प्रस्तुत प्रकरण काढून टाकणे योग्य व न्याय्य ठरेल असे मंचाचे स्पष्ट मत पडते व त्यास अनुसरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
दि.१९/९/११ रोजी जाबदारांनी प्रकरण बोर्डावर घेणेचा अर्ज देवून त्यासोबत नि.२२/१ ते २२/३ अन्वये शपथपत्रे दाखल केली. तथापी शपथपत्रांच्या त्या झेरॉक्सप्रती असल्याने निकालपत्राचे वेळी ही शपथपत्रे विचारात घेणेत आलेली नाहीत.
सबब, मंचाचा आदेश की,
आ दे श
१. तक्रारदारांचा तक्रारअर्ज काढून टाकणेत येत आहे.
२. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
सांगली
दि. २०/९/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रतः-
तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११