मंचाचे निर्णयान्वये श्री. मिलिंद केदार, सदस्य - आदेश - (पारित दिनांक – 19/04/2011) 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, उदरनिर्वाहाकरीता TATA 2515 EX मॉडल 2005 चा दहा चाकी ट्रक, ज्याचा नोंदणी क्र. CG 04/J 4657 होतो, तो रु.9,25,000/- मध्ये विकत घेण्याचा दि.28.10.2007 रोजी सौदा केला. त्यापैकी रु.2,25,000/- स्वतः भरले व उर्वरित रकमेकरीता गैरअर्जदार क्र. 1 व 2 कडून कर्ज घेतले. गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने रु.7,00,000/- कर्ज व त्यावर व्याज रु.3,41,450/- आणि विमा पॉलिसी रु.42,000/- असे एकूण रु.10,83,450/- दि.20.09.2008 पासून 20.06.2011 पर्यंत एकूण 42 मासिक हप्त्याने देण्याचे ठरले. तक्रारकर्त्याचे नावाने वाहन नोंदणीकृत झाल्यावर विमा पॉलिसीही तक्रारकर्त्याचे नावे निर्गमित करुन घेण्यात आला. तसेच गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने गैरअर्जदार क्र. 3 व 4 कडे रु.24,193/- विमा हफ्ता भरुन पॅकेज पॉलिसी दि.30.10.2008 ते 29.10.2009 करीता घेतली होती. तक्रारकर्त्याने वाहन घरासमोर पार्क करुन ठेवले असतांना दि.09.11.2008 रोजी सकाळी सदर वाहन आढळून आले नाही. म्हणून त्यांनी गैरअर्जदार क्र. 2 ला वाहन नेले काय याबाबत विचारणा केली, त्यांनी नकार दिल्याने, गैरअर्जदार क्र. 3 व 4 ला वाहन चोरीची सुचना दिली. वाहनाचा शोध घेतल्यावरही वाहन न सापडल्याने तक्रारकर्त्याने पोलिस स्टेशनला एफ आय आर नोंदविला. गैरअर्जदार क्र. 2 च्या कर्मचा-याने तक्रारकर्त्याचे घरी येऊन विमा रक्कम देण्याकरीता अनेक ठिकाणी को-या विमा दाव्याच्या पपत्राावर सह्या घेतल्या, तसेच नंतर लेटर ऑफ सब्रागेशनवर सह्या घेऊन त्यातील रीकाम्या जागा भरल्या नव्हत्या. तक्रारकर्त्याने पोलिस स्टेशनचा अंतिम अहवाल गैरअर्जदार क्र. 2 ला सादर केला. तसेच वारंवार विमा रक्कम मिळण्याबाबत चौकशी केली असता गैरअर्जदार क्र. 4 ने असे कळविले की, गैरअर्जदार क्र. 1 व 2 च्या खात्यात रु.8,68,500/- इतकी रक्कम जमा करण्यात आलेली आहे. तक्रारकर्त्याने रकमेची मागणी केली असता त्याला रक्कम देण्यास नकार देण्यात आला. तक्रारकर्त्याच्या मते त्याला रु.7,00,000/- कर्जावर व्याजाची रक्कम रु.1,70,725/- म्हणजे एकूण रु.8,70,725/- देणे होते व त्यापैकी रु.1,40,931/- चा भरणा त्याने केलेला आहे. म्हणजे तक्रारकर्ता रु.7,29,793/- गैरअर्जदार क्र. 1 व 2 ला देणे लागत होता. विम्याची रक्कम ही 8,68,500/- गैरअर्जदार क्र. 1 व 2 ला मिळालेली आहे. त्यातून भरणा केलेली रक्कम व उर्वरित कर्जाची रक्कम वजा जाता उर्वरित रक्कम रु.1,38,706.59 गैरअर्जदार क्र. 1 व 2 तक्रारकर्त्याला देणे लागतो. परंतू गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने सदर रक्कम तक्रारकर्त्याला परत केलेली नाही. तसेच कराराची प्रत व अमोर्टायझेशन शेडयुलर मागणी करुनही तक्रारकर्त्याला गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने पुरविले नाही. म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार दाखल करुन गैरअर्जदार क्र. 1 व 2 ला प्राप्त झालेल्या विमा रकमेतून कर्जाची रक्कम वजा जाता उर्वरित रक्कम रु.1,38,706.59 व्याजासह मिळावी, मानसिक व शारिरीक त्रासाबाबत भरपाई मिळावी, प्रकरणाच्या खर्चापोटी रक्कम मिळावी अशा मागण्या केलेल्या आहेत. 2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना पाठविण्यात आली असता गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने संयुक्तपणे व गैरअर्जदार क्र. 3 व 4 ने संयुक्तपणे लेखी उत्तर दाखल केले. 3. गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने लेखी उत्तरात तक्रारकर्त्याने त्यांच्याकडून वाहन विकत घेण्याकरीता रु.700,000/- चे कर्ज घेतल्याची बाब मान्य करुन, रु.18,000/- टायर्स घेण्याकरीता तक्रारकर्त्याला कर्ज दिले होते ही बाबही नमूद केलेली आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 नुसार तक्रारकर्त्याने रु.7,00,000/- वाहन कर्ज त्यावर व्याज रु.3,41,306/- आणि विमा ठेव रु.42,000/- असे एकूण रु.10,83,450/- ही रक्कम दि.20.01.2008 पासून 42 महिने द्यावयाची होती. तसेच तक्रारकर्त्याच्या वाहनाचा विमा हा गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने 30.10.2008 ते 29.10.2009 पर्यंत काढला होता. तक्रारकर्त्याने त्यांना रु.1,44,214/- दिलेले आहेत. तक्रारकर्त्याचे वाहन चोरीला गेल्यानंतर त्याच्या विम्याची रक्कम गैरअर्जदार क्र. 3 व 4 ने रु.8,68,500/- गैरअर्जदार क्र. 1 व 2 ला दिले. गैरअर्जदार क्र. 1 व 2 च्या मते तक्रारकर्त्याला ते रु.14,236/- देणे लागतात. परंतू तक्रारकर्त्याला सदर रक्कम देण्यास तयार असूनही तक्रारकर्ता सदर रक्कम घेऊन गेला नाही व सदर खोटी तक्रार दाखल करीत आहे, म्हणून त्याच्या सर्व मागण्या त्यांनी फेटाळून लावलेल्या आहे, तसेच तक्रारकर्त्याचे इतर म्हणणे नाकारले आहे आणि सदर तक्रार खारीज करण्याची मागणी केलेली आहे. 4. गैरअर्जदार क्र. 3 व 4 ने संयुक्तपणे दाखल केलेल्या लेखी उत्तरात त्यांनी प्राथमिक आक्षेप उपस्थित करुन सदर तक्रार ही गैरअर्जदार क्र. 1 व 2 विरुध्द असून त्यांचा या वादाची काहीही संबंध नाही. विमा दावा हा मुदतीच्या आत निकाली काढल्याने त्यांची सेवेत कोणतीही त्रुटी नाही. विमापत्राची छाननी व पडताळणी केल्यावर विमाकृत वाहन हे गैरअर्जदार क्र. 1 व 2 कडे गहाण असल्याने विमा रक्कम त्यांना देण्यात आली. त्यामुळे सदर तक्रार ही तथ्यहीन असून खर्चासह खारीज करण्याची मागणी गैरअर्जदार क्र. 3 व 4 ने केलेली आहे. 5. सदर तक्रार मंचासमोर युक्तीवादाकरीता दि.08.04.2011 रोजी आली असता मंचाने उभय पक्षांचा युक्तीवाद त्यांच्या वकिलांमार्फत ऐकला. तसेच तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांनी दाखल केलेली कथने, शपथपत्रे व दस्तऐवज यांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 6. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र. 1 व 2 कडून वाहन खरेदी करण्याकरीता कर्ज घेतल्याची बाब दस्तऐवज क्र. 1 वरुन स्पष्ट होते. तसेच तक्रारकर्त्याचे वाहन क्र. CG 04/J 4657 हे गैरअर्जदार क्र. 3 व 4 कडे विमाकृत होते. त्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदार क्र. 1 ते 4 चा ग्राहक ठरतो असे मंचाचे मत आहे. 7. उभय पक्षांच्या कथनावरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदार क्र. 1 व 2 कडून सदर वाहन खरेदी करण्याकरीता रु.7,00,000/- एवढे कर्ज घेतले होते. उभय पक्षांच्या कथनावरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याचे वाहन दि.08.11.2008 च्या रात्री चोरीला गेले व त्याकरीता तकारकर्त्याने गैरअर्जदार क्र. 1 व 2 मार्फत विमा दावा गैरअर्जदार क्र. 3 व 4 कडे दाखल केला होता. त्यानुसार गैरअर्जदार क्र. 3 व 4 ने विमा राशी रु.8,68,500/- ही गैरअर्जदार क्र. 1 व 2 ह्यांचेकडे वाहन गहाण असल्यामुळे जमा केले ही बाबसुध्दा उभय पक्षांच्या कथनावरुन स्पष्ट होते. 7. सदर तक्रारीतील मुळ वादाचा मुद्दा असा आहे की, तक्रारकर्त्यानुसार त्याला गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी विमा दाव्याची राशी स्विकारल्यामुळे अधिकची रक्कम परत करावयास पाहिजे होती व तक्रारकर्त्याचे नुसार ती रक्कम रु.1,38,706.59 एवढी होती. याउलट, गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी असे नमूद केले आहे की, त्यांना फक्त रु.14,236/- देणे आहे. तक्रारकर्ता व गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे कथनात काही बाबींमध्ये साम्य आढळून येते, ते म्हणजे तक्रारकर्त्याला गैरअर्जदार क्र. 1 व 2 कडून रु.7,00,000/- एवढे कर्ज दि.20.12.2007 रोजी दिले होते. तक्रारकर्त्याचे नुसार त्याला प्रत्यक्षात रु.6,58,000/- कर्ज दिल्या गेले होते. परंतु मंचाचे असे मत आहे की, विमा ठेवीची रक्कम खरेदीदाराकडे असते व गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी विम्याचे प्रीमीयमकरीता त्यातून रु.24,193/- त्यातून वापरले होते व ती रक्कम कर्जाच्या रकमेतून असल्यामूळे त्यावर व्याज आकारण्याचा गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना अधिकार आहे. त्यानुसार गैरअर्जदाराने केलेल्या व्याजाच्या आकारणीनुसार रु.7,00,000/- वर 20.01.2009 पर्यंतचे व्याज रु.1,70,646/- एवढे व्याज होते. त्यामुळे गैरअर्जदाराने विमा प्रीमीयमकरीता रु.24,193/- जो 26.09.2008 ला दिले, ती परत मुळ कर्जाच्या रकमेच्या दराने आकारणी हे चुकीचे असल्याचे मंचाचे मत आहे. तसेच गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याचे क्रेडीट कार्डचा वापर केला व त्याकरीता रु.26,306/- ची मागणी केली. क्रेडीट कार्डचा वापर केला, म्हणून तक्रारकर्त्याचे कर्ज खात्यात जमा केले, ती कशाच्या आधारे केली याबाबतचे कोणतेही दस्तऐवज नाही. फक्त त्यांनी तक्रारकर्त्याने वापर केलेला क्रेडीट कार्डच्या वापरासंबंधी दस्तऐवज दाखल केले. कर्जाच्या करारनाम्यात सुध्दा अशा कोणत्या रकमांचा व केडीट कार्डद्वारा वापराच्या केलेल्या रकमांचा कर्जाच्या रकमेत समावेश करण्याबाबत उल्लेख नाही. गैरअर्जदार क्र. 2 यांनी बी डिस्काउंटींग बद्दल रु.3,333/- ची आकारणी केलेले आहे. त्याबद्दलसुध्दा करारनाम्यात कुठेही उल्लेख नाही. तसेच तक्रारकर्त्याला रु.18,000/- टायर लोनकरीता दिल्याचे गैरअर्जदाराने नमूद केले आहे. त्याबद्दल त्यांनी दस्तऐवज क्र. 2 तक्रारीचे पृष्ठ क्र. 59, 60 वर दाखल केले आहे. सदर दस्तऐवजावर प्राधिकृत अधिका-याची सह्या असून सर्टिफिकेट अंडर बँकर्स बुक इव्हीडंस एक्टचा शिक्का मारला आहे. असे जरीही असले तरीही तक्रारकर्त्याने टायर लोनकरीता कर्ज कधी घेतले होते, याबाबतचा स्पष्ट उल्लेख सदर दस्तऐवजांमध्ये नाही. त्यामुळे त्यावर केलेली व्याजाची आकारणीसुध्दा केव्हापासून केली, याबाबत स्पष्ट खुलासा होणे आवश्यक आहे. मंचाचे मते सदर कर्ज हे तक्रारकर्त्यास दिले गेले आहे. वाहन खरेदी करण्याकरीता दिलेल्या कर्जाचा वेगळा भाग आहे काय ? व तसे असल्यास त्याबाबत वेगळे सह करार पत्र करणे हे गैरअर्जदाराचे कर्तव्य होते. तेव्हाच त्या कर्जाची मागणी ही वाहन कर्जामध्ये जोडून मागता येते. तसे गैरअर्जदाराने केलेले नाही. याउलट, तक्रारकर्त्याने केलेल्या आपल्या प्रतिउत्तरामध्ये सदर टायर खरेदी करण्याकरीता कर्ज करारनाम्यानंतर सात महिन्यानंतर दिल्याचे नमूद केले आहे व त्या कर्जाची रक्कम रु.17,200/- त्याने गैरअर्जदारांना वेळोवेळी दिल्याचे नमूद केले. परंतू त्याबाबतच्या पावत्या गैरअर्जदाराने दिल्याचे नमूद केले आहे. गैरअर्जदाराने रु.56,000/- ओव्हर डयू चार्जेस कशाच्या संदर्भात आहे याबाबतचा खुलासा दस्तऐवजांवरुन स्पष्ट होत नाही. परंतू सदर ओव्हर डयू चार्जेस ज्या दस्तऐवजाद्वारे दर्शविला आहे, ते अस्पष्ट असून त्यावर कोणत्याही अधिकृत अधिका-याची स्वाक्षरी नसल्यामुळे ते विचारात घेण्यात येत नाही व या सर्व बाबींचा विचार करता गैरअर्जदार ह्यांचेनुसार त्यांनी तक्रारकर्त्यांकडून कर्जाच्या रकमेपैकी रु.1,44,214/- प्राप्त झालेले आहेत. यासर्व बाबींचा विचार करता गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यांकडून कर्जाची मुळ रक्कम रु.7,00,000/- अधिक 21.01.2009 पर्यंतचे व्याज रु.1,70,646/-, टायर खरेदी करण्याकरीता घेतलेले रु.18,000/- म्हणजे एकूण रक्कम रु.8,88,646/- घेणे होते. त्याबाबत तक्रारकर्त्याने गैरअर्जदार ह्यांचेनुसार रु.1,44,214/- भरलेले आहेत. म्हणजे फक्त गैरअर्जदार क्र. 1 व 2 रु.7,44,432/- इतकी रक्कम घेणे होते व त्यांना विमा दाव्या रक्कम रु.8,68,500/- एवढी प्राप्त झालेली आहे. अशा परिस्थितीत त्यांनी तक्रारकर्त्यांना रु.1,24,068/- परत करणे आवश्यक होते. वरील सर्व परिस्थीतीत तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या 18.03.2011 व गैरअर्जदाराने दाखल केलेल्या 08.04.2011 या रोजीच्या तक्त्यावरुन स्पष्ट होत आहे. 8. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी आपल्या उत्तरात नमूद केले आहे की, रु.14,236/- देणे होते व ते घेऊन जाण्याकरीता त्यांनी तक्रारकर्त्याला बोलाविले होते. तर त्यांनी ती रक्कम रु.14,236/- तक्रारकर्त्यांना द्यावयाची होती तर त्याबद्दलचा धनादेश द्यावयास पाहिजे होता, तो पाठविला नाही व उलट चुकीचे विवरण सादर केल्याचे स्पष्ट झाले ही त्यांच्या सेवेतील त्रुटी असून अनुचित व्यापार प्रथा आहे. सदर प्रकरणात गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यांना त्यांना प्राप्त झालेल्या विमा रकमेतून त्याचेकडून घेणे असलेली रक्कम वजा करता रु.1,24,068/- देणे लागतात. ती न देणे ही गैरअर्जदार क्र. 1 व 2 च्या सेवेतील त्रुटी आहे. 9. सदर प्रकरणामध्ये तक्रारकर्त्याने शारिरीक व मानसिक त्रासाकरीता एक लाख रुपयांची मागणी केलेली आहे, सदर मागणी ही अवास्तव असल्यामुळे तक्रारकर्ता हा न्यायोचितदृष्टया रु.10,000/- मिळण्यास पात्र ठरतो, तसेच तक्रारीच्या खर्चाबाबत रु.3,000/- मिळण्यास पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. 10. सदर प्रकरणामध्ये मुख्य वाद हा तक्रारकर्ता आणि गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्यामधील आहे. गैरअर्जदार क्र. 3 व 4 विमा कंपनी असून त्यांनी विम्याची रक्कम गैरअर्जदार क्र. 1 व 2 कडे जमा केलेली असल्याने त्यांनी सेवेत कोणतीही त्रुटी दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. वरील निष्कर्षावरुन व उपलब्ध दस्तऐवजांवरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने तक्रारकर्त्याला रु.1,24,068/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत द्यावे अन्यथा, सदर रकमेवर 02.09.2009 पासून रक्कम होईपर्यंतच्या काळाकरीता द.सा.द.शे. 9 टक्के व्याज देय राहील. 3) गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने तक्रारकर्त्याला शारिरीक व मानसिक त्रासाकरीता रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबात रु.3,000/- द्यावे. 4) गैरअर्जदार क्र. 3 व 4 विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. 5) गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी संयूक्तपणे किंवा एकत्रितपणे आदेश पारित झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसाचे आत करण्यात यावी.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |