निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्षा )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
1. अर्जदार हा ट्रक क्र. एम.एच. 04 पी 3783 चा मालक व चालक आहे. अर्जदाराने सदरील ट्रकसाठी गैरअर्जदार यांच्याकडून नोव्हेबर 2011 मध्ये रु. 1,25,000/- कर्ज घेतलेले आहे. गैरअर्जदाराने कर्ज घेतेवेळेस विमा व करार चार्जेससाठी रु. 15,000/- कपात करुन उर्वरीत कर्जाची रक्कम रु. 1,10,000/- अर्जदारास दिले. अर्जदाराने आतापर्यंत एकूण रक्कम रु. 75,360/- इतकी रक्कम कर्ज परतफेड केली आहे. अर्जदाराचा मुलगा गौतम वय 16 दिनांक 22.10.2012 रोजी आसना नदीत बुडून मरण पावल्यामुळे अर्जदारास दुःख झाले. त्यामुळे अर्जदाराने ट्रक चालविणे बंद केले व अर्जदाराचे उत्पन्न बुडाले. त्यामुळे अर्जदार कर्ज हप्त्याची रक्कम भरु शकलेला नाही. गैरअर्जदार यांनी दिनांक 26.3.2013 रोजी धमकी दिली की, रु. 40,000/- एकमुस्त रक्कम भरावी अन्यथा अर्जदारो वाहन जप्त करुन विकून टाकण्यात येईल. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा ट्रक बेकायदेशीर जप्त करुन विक्री केल्यास अर्जदाराचे अतोनात नुकसान होईल. अर्जदार यांच्याकडे एवढी रक्कम उपलब्ध नाही. अर्जदारास नियमितपणे कर्जाचे हप्ते भरण्यास पुरेसा अवधी हवा आहे. अर्जदार कर्जाचे हप्ते भरण्यास तयार आहे. परंतू गैरअर्जदार यांनी अर्जदारास वाहन जप्त करुन विक्री करण्याची धमकी दिल्यामुळे अर्जदाराने सदरील तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदाराने गैरअर्जदार यांना आदेश देण्यात यावेत की, त्यांनी अर्जदाराचा ट्रक क्र. एम.एच. 04 पी 3783 हा तकारीचा निकाल लागेपर्यंत जप्त न करता नियमाप्रमाणे कर्जाचे हप्ते सवलतीत भरुन घ्यावेत. अर्जदारास होणा-या त्रासासाठी रक्कम रु. 2,000/- व दावा खर्च रक्कम रु. 5,000/- अर्जदारास देण्याचे आदेश दयावेत, अशी मागणी तक्रारीद्वारे केलेली आहे.
गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले.
गैरअर्जदार यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणे आहे.
2. अर्जदाराने तथ्य लपवून खोटे कारण दाखवून तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदार ग्राहकाच्या व्याख्येमध्ये बसत नाही. अर्जदाराने कर्ज घेत असतांना गैरअर्जदाराच्या हक्कात लोन कम हायपोथिकेशन अॅग्रीमेंट करुन दिलेले आहे. सदरील करारनाम्यानुसार अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात वाद उपस्थित झाल्यास तो लवादाकडे नेवून निर्णय घेण्याचे मान्य केले आहे. अर्जदाराने सदरचा ट्रक व्यवसायाकरिता म्हणून विकत घेतला आहे त्यामुळे सदर व्यवहार कमर्शियल असल्याने अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात यावी.
3. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून ट्रक खरेदी करण्याकरिता रक्कम रु. 1,25,000/- चे कर्ज घेतले होते व कर्जाची रक्कम 24 हप्त्यामध्ये परत करावयाची होती. पहिला हप्ता रक्कम रु. 7,937/- एवढया रक्कमेचा होता व उर्वरीत हप्ता रक्कम रु. 7,315/- प्रतिमहा होता. कराराप्रमाणे अर्जदारास रक्कम रु. 1,76,182/- एवढी रक्कम परत करणे होते. अर्जदाराने ठरलेल्या वेळेवर हप्ता भरलेला नाही म्हणून कराराप्रमाणे दिनांक 20.2.2013 पर्यंत गैरअर्जदारास अर्जदाराकडून रक्कम रु. 1,20,676/- एवढी रक्कम येणे बाकी आहे परंतू अर्जदाराने फक्त रक्कम रु. 75,360/- कर्जापोटी जमा केलेले आहे. सदरची तक्रार दाखल केल्यानंतरही अर्जदाराने आजपर्यंत गैरअर्जदाराकडे एकही रुपया जमा केलेला नाही. गैरअर्जदाराच्या कर्जाची रक्कम परतफेड करण्याची गरज पडू नये या एकाच उद्देशाने अर्जदाराने सदरची खोटी तक्रार दाखल केलेली आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास कधीही ट्रकचा ताबा घेवून विक्री करण्याची धमकी दिलेली नाही. करारनाम्याप्रमाणे थकीत रक्कमेवर गैरअर्जदारास 3 % प्रतिमहा प्रमाणे दंड आकारण्याचा अधिकार आहे. त्या अनुषंगाने गैरअर्जदारास अर्जदाराकडून दिनांक 20/11/2013 पर्यंत एकूण रक्कम रु. 1,54,158/- एवढी रक्कम येणे बाकी आहे. तरी अर्जदाराची तक्रार नामंजूर करण्यात यावी अशी विनंती लेखी जबाबाद्वारे अर्जदार यांनी केलेली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याचे पुष्टयर्थ आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील बाबी स्पष्ट होतात.
4. अर्जदाराने ट्रक खरेदीसाठी गैरअर्जदार यांच्याकडून कर्ज पुरवठा घेतलेला असल्याचे दोन्ही बाजूस मान्य आहे. अर्जदार यांची प्रमुख तक्रार अशी आहे की, अर्जदार यांचा मुलगा अपघातामध्ये मृत्यु पावल्यामुळे अर्जदार कर्जाचे हप्ते गैरअर्जदार यांच्याकडे नियमित भरु शकलेला नाही त्यामुळे गैरअर्जदार यांनी अर्जदारास ट्रक जप्त करुन विक्री करण्याची धमकी दिलेली आहे. गैरअर्जदार यांनी लेखी जबाबामध्ये अर्जदारास कधीही धमकी दिलेली नाही परंतू अर्जदाराकडून गैरअर्जदारास रक्कम रु. 1,54,158/- दिनांक 20.11.2013 पर्यंत येणे बाकी आहे असे नमूद केलेले आहे. त्यासाठी गैरअर्जदार यांनी लोन कम हायपोथिकेशन अॅग्रीमेंट, रिपेमेंट शेडयुल, खाते उतारा दाखल केलेला आहे. दाखल खाते उता-याचे अवलोकन केले असता अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे अनियमित हप्ते भरलेले असल्याचे दिसून येते व अर्जदाराने भरलेले अनियमित हप्ते गैरअर्जदार यांनीही स्वीकारलेलेही आहेत. अर्जदाराने तक्रारीमधील परिच्छेद क्र. 4 मध्ये अर्जदार हा कर्जाचे हप्ते भरण्यास तयार आहे असे म्हटले आहे. यावरुन अर्जदार कर्जाची परतफेड करण्यास तयार असल्याचे दिसते. करारानुसार अर्जदाराच्या कर्ज कराराची मुदत दिनांक 20.11.2013 रोजी संपलेली आहे. गैरअर्जदार यांनी दाखल केलेला खाते उतारा बघितला असता अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे कर्ज परतफेडी पोटी रक्कम रु. 75,360/- जमा केलेले असून दिनांक 20.11.2013 पर्यंत अर्जदाराकडे रक्कम रु. 1,54,158/- एवढी रक्कम बाकी आहे. अर्जदार कर्जाची परतफेड करण्यास तयार आहे त्यामुळे मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. अर्जदाराने कर्जाच्या थकबाकीची रक्कम रु. 1,54,158/- गैरअर्जदार यांच्याकडे आदेश
तारखेपासून एक महिन्याच्या आत दोन समान हप्त्यामध्ये भरावी.
3. अर्जदाराने सदरील रक्कम मुदतीत भरली नाही तर गैरअर्जदार थकीत रक्कम
करारानुसार वसूल करण्यास पात्र राहतील.
4. खर्चाबाबत आदेश नाही.
5. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल
करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
6. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.