निकालपत्र :- (दि.08/07/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (01) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला वकीलांमार्फत सदर मंचापुढे उपस्थित राहिले. त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. उभय पक्षकारांचे वकीलांचा अंतिम युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार कायदेशीर प्रक्रियाशिवाय बळाचे जोरावर सामनेवाला यांनी वाहन ओढून नेऊ नये व वाहनाची एन.ओ.सी.मिळणेसाठी दाखल केलेली आहे. (02) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- तक्रारदार हे सोगने ता.कागल जि.कोल्हापूर येथील कायम रहिवाशी आहेत. तक्रारदार हे कमी शिकलेले व भोळसट स्वभावाचे आहेत. तक्रारदार यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान नाही. सामनेवाला कंपनीचे फिल्ड ऑफिसर यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून सामनेवाला कंपनी ट्रककरिता सुलभ व कमी व्याज दराने म्हणजे द.सा.द.शे.12% सरळ व्याजाने कर्ज देतो अशी माहिती तक्रारदारांना सांगितली. त्याप्रमाणे सामनेवाला क्र.2 यांचे हमीवर विश्वास ठेवून तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून टाटा ट्रक(एलपीटी 1613) रजिस्ट्रेशन नं. MH-09-L-7311 खरेदी करणेकरिता दि.11/09/2008 रोजी रक्कम रु.4,25,000/- इतके हायपोथीकेशन कर्ज 36 महिन्याचे मुदतीकरिता घेतलेले होते. सदर कर्जाची मुदत दि.11/09/2011 रोजी संपते. सदर कर्जाचे रक्कम रु.21785/- चे 12 मासिक हप्ते, रु.17,055/- चे 12 मासिक हप्ते, रु.10,175/- चे 11 मासिक हप्ते व रक्कम रु.10,195/- चा 1 मासिक हप्ता असे एकूण 36 हप्ते भरणेस सांगितले होते. सदर मासिक हप्त्यांची एकूण रक्कम रु.5,88,200/- इतकी रक्कम रु.11/09/2011 रोजी मुदतीपर्यंत होते. सदर हप्त्यांच्या माहितीकरिता सामनेवाला यांनी तक्रारदारास हायर लिजरची प्रत दिलेली आहे. सदर प्रमाणे सामनेवाला यांनी मजकूर भरण्यास रिकाम्या जागा असलेल्या इंग्रजी कागदपत्रांवर सहया करुन घेतल्या. सदर इंग्रजी मजकूराबाबत कोणतीही माहिती तक्रारदारास सामनेवालांच्या संबंधीत अधिका-यांनी विश्लेषीत करुन सांगितलेली नाही. तक्रारदार यांना डिझेल दरवाढीमुळे ट्रकमधून कमी प्रमाणात उत्पन्न मिळूनही प्रामाणिकपणे रक्कम रु.3,42,000/- इतकी रोखरित्या भरलेली होती व आहे. त्याबाबतच्या पावत्याही सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेल्या आहेत. तक्रारदार हे सामनेवालांकडे एकरकमी भरणेकरिता दि.23/03/2011 रोजी गेले असता सामनेवाला यांनी सदर रक्कम भरुन घेणेस टाळाटाळ केली व तक्रारदार यांचे कर्जाची दि.23/03/2011 अखेर येणेबाकी रक्कम रु.5,28,000/- असलेबाबत कथन केले. सदर रक्कमेबाबत कागदपत्रांची व खातेउता-याची मागणी केली असता टाळाटाळ करुन देणेस स्पष्टपणे नकार दिलेला आहे. तक्रारदारास ‘’ आम्ही संपूर्ण कर्ज कालावधीचे व्याज भरुन घेतोच त्यामध्ये पुढील व्याज न घेणेचा प्रश्नच येत नाही.’’ असे ठणकावून सांगितले. तसेच पैसे भरायला जमत नसेल तर ट्रक जप्त करुन विक्री करणार असलेची धमकी सामनेवाला यांनी दिलेली आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराचे कर्जावर भरमसाठ व्याज तसेच चक्रवाढ व्याज व अधिकारबाहय पध्दतीने बेकायदेशीरपणे व्याज आकारणी केलेची दाट शंका तक्रारदार यास जाणवत आहे.सामनेवालांचे सदरचे गैरकृत्यामुळे तक्रारदार यांना आर्थिक नुकसानीत जाऊन त्यांच्या कुटूंबियावर उपासमारीची वेळ येणार आहे. तक्रादाराची कायदेशीररित्या ठरलेप्रमाणे कर्ज परतफेड करणेची प्रामाणिक इच्छा असताना सामनेवाला हे कोणत्याही कायदेशीर मार्गाचा अवलंब न करता निव्वळ अंगबळाचे जोरावर तसेच कोणत्याही मे. कोर्टाचा आदेश नसताना तक्रारदार यांचा ट्रक जप्त करुन विक्री करण्याच्या तयारीत असलेची साधार भिती वाटू लागलेने तक्रारदारास सदरची तक्रार मे. मंचात दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करणेत यावी व तक्रारदाराचा ट्रक (एलपीटी 1613) रजिस्ट्रेशन नं. MH-09-L-7311जप्त करुन विक्री करु नये म्हणून सामनेवाला कंपनी अगर तर्फे इसमांना कायम मनाई ताकीद व्हावी.तसेच सामनेवाला कंपनीने तक्रारदाराकडून देय असणारी कर्जाची रक्कम द.सा.द.शे.12 टक्के सरळ व्याजदराने एकरक्कमी होणारी रक्कम भरुन घेऊन तक्रारदारास नाहरकत दाखला देणेबाबत आदेश व्हावा. तसेच मानसिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/-सामनेवालांकडून वसुल होऊन मिळणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (03) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टीप्रित्यर्थ तक्रारदार यांच्या ट्रक क्र. MH-09-L-7311 चे आर.सी.बुक, सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेली हप्त्याची प्रत, तक्रारदार यांनी सामनेवालांकडे भरलेल्या रक्क्मांच्या एकूण 17 पावत्या इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (04) सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार परिच्छेद निहाय नाकारलेली आहे. सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, तक्रारदाराची तक्रार मे. मंचात चालणेस पात्र नाही. तक्रारदाराने त्याचे शेती असून सदर वाहन ट्रान्सपोर्ट धंदयाकरिता वापरणार असलेचे सांगितले.त्यामुळे प्रस्तुतचे वाहन हे एकमेव उपजिवीकेचे साधन नाही. सामनेवाला फायनान्स कंपनी हेव्ही कमर्शिअल मोटर व्हेईकल करिताच फक्त वित्त पुरवठा करते.नियमाबद्दल तक्रारदारास माहिती दिली होती.सदर कंपनीचे मुख्य कार्यालय चेन्नई, क्षेत्रिय कार्यालय, बेलापूर नवी मुंबई व शाखा कार्यालय रत्नागिरी येथे आहे. तक्रार अर्जातील कलम 2 ते 14 मधील मजकूर नाकबूल केलेला आहे. प्रस्तुत तक्रारीस ग्राहक संरक्षण कायदा कलम 11 अन्वये व सेक्शन 2(1)(डी) चा बाधा येतो त्यामुळे प्रथमदर्शनी तक्रार फेटाळणेस पात्र आहे. सामनेवाला यांनी स्वतंत्ररित्या दिलेल्या दि.30/04/2011 रोजी दाखल केलेल्या अर्जानुसार तक्रारदाराला दिलेले कर्ज हे रत्नागिरी शाखेकडून आहे. तसा लेखी करार झालेला आहे. त्यामुळे काही वाद उपस्थित झालेस रत्नागिरी कोर्टाला अधिकार प्राप्त होत असलेने प्रस्तुतची तक्रार कोल्हापूर येथील मंचासमोर चालणेस पात्र नाही असे नमुद केले आहे. (05) सामनेवाला यांनी आपले म्हणणेच्या पुष्टयर्थ कर्ज करारपत्र दाखल केलेले आहे. (06) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्हणणे दाखल कागदपत्रे उभय पक्षकारांच्या वकीलांचा अंतिम युक्तीवाद इत्यादीचे साकल्याने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. प्रस्तुतची तक्रार मे. मंचात चालणेस पात्र आहे का? --- होय. 2. सामनेवाला यांनी सेवात्रुटी केली आहे काय? --- होय. 3. काय आदेश? --- शेवटी दिलेप्रमाणे. मुद्दा क्र.1 :- सामनेवाला फायनान्स कंपनीचे मुख्य कार्यालय चेन्नई येथे असून क्षेत्रिय कार्यालय बेलापूर नवी मुंबई येथे व शाखा कार्यालय रत्नागिरी येथे असलेचे त्यांचे लेखी म्हणणेत नमुद केलेले आहे. तसेच तक्रारदार व सामनेवाला फायनान्स कंपनी यांचेमध्ये झालेला कर्ज करार हा रत्नागिरी येथे झालेला आहे. रत्नागिरी शाखेकडून तक्रारदारास कर्ज दिलेले आहे. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार चालवणेचे क्षेत्रिय अधिकारीता मे. मंचास नसलेचा आक्षेप घेतलेला आहे. सदर बाबींचा विचार करता तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 म्हणून समाविष्ट केलेले प्राधिकृत अधिकारी रिजनल ऑफिस जेम्स स्टोन बिल्डींग, दुसरा मजला, आर.एल.ज्वेलर्ससमोर,सी.बी.एस.स्टॅन्डजवळ कोल्हापूर नमुद केलेला आहे.तसेच सामनेवाला क्र.2 ही रत्नागिरीची शाखा आहे व सामनेवाला क्र.3 हे मॅनेजर देवेंद्र भवन युको बँकेवर, उषा टॉकीजचे मागे कोल्हापूर नमुद केलेले आहे. सदर पत्तयावर सामनेवाला यांना नोटीस पाठवलेल्या आहेत व सामनेवाला क्र.1 ते 3 वकीलांमार्फत हजर झालेले आहेत. सबब सामनेवालांचे रिजनल ऑफिस व व्यवस्थापक हे कोल्हापूर येथे कार्यरत असलेने तसेच तक्रारदार यांने काही हप्त्याच्या रक्कमा कोल्हापूर येथून भरले असलेने क्षेत्रिय अधिकार मे. मंचास येत असलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. ब) प्रस्ततचे कर्ज हे वाहन खरेदीसाठी दिलेले आहे व प्रस्तुत वाहन हे ट्रक असून त्यामधून येणा-या उत्पन्नावर तक्रारदाराचा उदरनिर्वाह चालत असलेचे तक्रारदाराने तक्रारीत कथन केले आहे. सामनेवाला यांनी त्यास आक्षेप घेऊन तक्रारदाराची शेती असलेने प्रस्तुत वाहन हे त्याचे एकमेव उपजिवीकेचे साधन नाही. तसेच प्रस्तुतचे कर्ज हे वाणिज्य हेतूने घेतलेले आहे. त्यामुळे तो ग्राहक नाही असा आक्षेप घेतलेला आहे. मात्र त्या संदर्भातील कोणताही पुरावा दिलेला नाही. तसेच फायनान्स कंपनी यांनी केलेला वित्त पुरवठा हा वाहन खरेदीसाठी आहे. प्रस्तुतचे वाहन हे एकतर स्वत: वापरासाठी अथवा व्यवसायाकरिता उपयोग केला जातो. त्यामुळे प्रत्येक वाहन हे वाणिज्य हेतूने घेतलेले आहे असे म्हणता येणार नाही. याबाबत मा. राष्ट्रीय आयोग,दिल्ली यांचे कितीतरी पूर्वाधार आहेत. तक्रारदार हा सामनेवाला यांचा कर्जदार ग्राहक आहे. त्यामुळे सदरचा वाद हा ग्राहक वाद असलेने प्रस्तुतची तक्रार मे. मंचात चालणेस पात्र आहे. मुद्दा क्र.2 :- सामनेवाला यांनी दाखल केलेल्या कर्ज करारपत्रा क्र.RANTA0809110002 दि.11/09/2008 नुसार सामनेवाला यांनी तक्रारदारास रक्कम रु.4,25,000/- इतका कर्ज पुरवठा केलेला आहे. त्यासाठीचा व्याजदर 12 टक्के असून तो दर महिन्याच्या शिल्ल्क रक्कमेवर आकारला जातो. तसेच धनादेशाचा अनादर झालेस रु.300/-प्रतिधनादेशामागे आकार आहे.प्रस्तुतचे कर्ज प्रकरण रत्नागिरी येथे झालेले आहे. एकूण 36 हप्त्या मध्ये कर्जाची परतफेड दि.15/10/2008 ते 15/06/2011 अखेर करणेची आहे. शेडयूल 3 प्रमाणे दर महिन्याचे 15 तारखेस हप्ता रक्कम भरणेची आहे. पहिले 1 ते 12 हप्ते रु.21,785/- चे, 13 ते 24 हप्ते रु.17,055/- चे, 25 ते 35 हप्ते रु.10,175/- चे व 36 वा हप्ता रु.10,195/- प्रमाणे देणेचे आहे. प्रस्तुतचा कर्जपुरवठा हा टाटा ट्रक(एलपीटी 1613) रजिस्ट्रेशन नं. MH-09-L-7311 या वाहनासाठी केलेला आहे. कर्ज रक्कम रु.4,25,000/- बरोबर फायनान्स चार्जेस रु.1,63,200/-मिळून कराराची किंमत रु.5,88,200/-असलेची दिसून येते. तक्रारदाराने हप्ता भरणा केलेल्या पावत्यांच्या सत्यप्रती तसेच अस्सल प्रती दाखल केलेल्या आहेत.तक्रारदाराने दाखल केलेल्या हप्त्या भरलेल्या पावत्यांच्या अस्सलप्रतीवरुन दि.06/01/2010 रोजी रु.30,000/-, दि.07/01/010 रोजी रु.20,000/-, दि.21/05/2010 रु.10,000/-, दि.19/07/2010 रोजी रु.40,000/-, दि.10/9/2010 रोजी रु.15,000/-, दि.23/8/010 रोजी रु.15,000/-, दि.04/3/010 रोजी रु.10,000/-, दि.18/5/2010 रोजी रु.20,000/-, दि.20/3/2010 रोजी रु.10,000/-, दि.15/01/2010 रोजी रु.15,000/-, दि.27/11/009 रोजी रु.20,000/-, दि.11/11/2009 रोजी रु.30,000/-, दि.30/03/2009 रोजी रु.10,000/-, दि.19/11/2008 रोजी रु.22,000/-भरलेचे निदर्शनास येते. तसेच दि.19/11/2008 रोजीची रु.22,000/- दि.20/01/2009 रोजीची रु.21,500/- व दि.21/2/2009 ची रु.21,500/-या वरुन निदर्शनास येते. यामधील काही रक्कमा या रत्नागिरीत भरलेल्या आहेत तर काही रक्कमा कोल्हापूर येथून भरणा केलेल्या आहेत व तशा नोंदी त्या त्या पावत्यांवर आहेत. तक्रारदाराने त्याचे तक्रारीतील कलम 7 मध्ये रु.3,42,000/- इतकी रक्कम भरलेचे नमुद केले आहे व त्याप्रमाणे त्याने वरीलप्रमाणे पावत्या दाखल केलेल्या आहेत. तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये झालेले करारपत्र हे इंग्रजीमध्ये झालेले आहे. सदर इंग्रजी मजकूराबाबतची माहिती तक्रारदारास संबंधीत अधिका-यांनी विश्लेषीत करुन सांगितलेली नाही. तसेच कागदपत्रे व खाते उतारा मिळणेची हमी व खात्री तक्रारदारास सामनेवाला यांनी दिलेली होती. मात्र त्याप्रमाणे सामनेवालांनी कोणतीही माहिती तक्रारदारास दिलेली नाही. तक्रारदार कर्जाची परतफेड करणेस तयार होते व आहेत. दि.23/03/2011 रोजी तक्रारदार सामनेवालांकडे कर्जाची एकरकमी रक्कम भरुन घेणेस गेले असता त्यांनी टाळाटाळ केलेली आहे. तसेच दि.23/03/2011 अखेर येणे बाकी रु.5,28,000/- असलेचे कथन केलेले आहे. सदर येणेबाकी बाबत तक्रारदाराने कागदपत्रे व खातेउता-याची मागणी केली असता त्यास स्पष्टपणे नकार दिलेला आहे. तसेच संपूर्ण कर्ज कालावधीचे व्याज भरुन घेतोच. तसेच रक्कम भरावयास जमत नसेल तर ट्रक जप्त करणेची धमकी दिलेली आहे. सामनेवाला यांनी भरमसाठ व्याज, चक्रवाढ व्याज, अधिकारबाहय व बेकायदेशीरपणे अकारणी केलेली आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या शंकाचे निरसन करणेबाबत कोणतेही कागदपत्रे तक्रारदारास दिलेली नाहीत. तसेच बळाचे जोरावर वाहन जप्त करुन नेणेची धमकी दिलेली आहे. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. सदर तक्रारदाराचे कथनाचा विचार करता तक्रारदारास सामनेवाला यांनी खाते उतारा व कर्ज करारपत्राच्या प्रती दिले नसलेचे दिसून येते.सामनेवाला यांनी तक्रारदार कर्जदारांच्या सोईसाठी कोल्हापूर येथून कर्ज रक्कमा भरणेची सोय करुन दिलेली आहे. मात्र त्यासंबंधीची खाते उतारे व नोंदी तक्रारदारास देणेबाबतची जबाबदारी पार पाडलेली नाही ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तसेच तक्रारदारास इंग्रजी भाषेचे ज्ञान नाही. त्यामुळे प्रस्तुतचे करारपत्र त्याला त्याचे मातृभाषेत समजावून देऊन करारपत्र करुन घेतलेचे दिसून येत नाही. तसेच तक्रारदार हा एकरक्कमी कर्ज भरणेस तयार असतानाही त्याला सहकार्य केलेले नाही. तक्रारदाराचे कर्ज खातेचे कागदपत्रे, हिशोब याबाबतची माहिती घेणे व ती माहिती सामनेवालांनी देणे हा त्याचा ग्राहक हक्क आहे. सदर हक्कास सामनेवाला यांनी बाधा आणलेली आहे ही सामनेवाला यांचे सेवेतील गंभीर त्रुटी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार कर्जदार ग्राहकाला ग्राहकाभिमुख सेवा देणेबाबत अक्षम्य त्रुटी केलेली आहे. सामनेवाला यांनी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेले हायर लेजर दि.28/04/2011 चे दोन हायर लेजर प्रतीचे अवलोकन केले असता प्रस्तुत प्रकरणी दि.15/04/2011 अखेर रु.2,23,987/- तसेच दि.15/01/2011 अखेर रु.6,052/- इतकी रक्कम येणे दिसते. तसेच प्रस्तुत खातेउता-याचे अवलोकन केले असता प्रथमदर्शनी सदर कागदपत्रांचा कोणताही बोध होत नाही. यामध्ये काही रिसीट नंबर व रक्कमा मिळाल्याबाबतची नोंद दिसून येते. यामध्ये काही रिसीट या रत्ना व काही केएलपीआर अशा दिसून येतात. सदर रक्कमा रोखीत मिळाल्या चेकव्दारे मिळाल्या वर्ग करुन आल्या याचा कोणताही बोध प्रथमदर्शनी सदर खातेउता-यावरुन दिसून येत नाही. सबब दोन हायर लेजर दाखल करुन सामनेवाला काय दर्शवू इच्छितात याबाबत त्यांनी मौन बाळगलेले आहे. तसेच प्रचलित बुक किपींग अन्ड अकौन्टींग पध्दतीप्रमाणे कर्ज खातेउता-याच्या नोंदी दिसून येत नाहीत. त्यामुळे तक्रारदारास योग्य पध्दतीचा कर्ज खातेउतारा योग्य हिशोबासहीत देणे क्रमप्राप्त असताना सामनेवाला यांनी दिलेला नाही. केवळ आपल्या लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराचे कथन मान्य नाही असे सांगून सामनेवाला यांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही. प्रस्तुत सामनेवाला कंपनीबाबत सदर अनाकलनीय हिशोब पध्दती व बेकायदेशीर रक्क्मांच्या आकारणीमुळे तसेच खाते उतारे न देणे ग्राहकाच्या शंकाचे निरसन न करणे ग्राहक एकरकमी कर्ज रक्कम फेड करणेस तयार असतानाही सहकार्य न करणे. बळाचे जोरावर वाहन जप्तीबाबत धमक्या देणे अशा प्रकारच्या तक्रारी वाढत आहेत. याबाबत सदर सामनेवाला कंपनीस सदर मंचाने पारीत केलेल्या आदेशामध्ये वेळोवेळी कर्जखातेउता-याच्या नोंदीबाबत ब-याचवेळेला मार्गदर्शक सुचना दिलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी सामनेवाला कंपनीकडून होत नाही. सामनेवाला कंपनीने ग्राहकाभिमुख सेवा देण्यात अक्षम्य त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. प्रस्तुत कर्जाची मुदत दि.15/9/2011 पर्यंत आहे. अशा परिस्थितीत तक्रारदाराने एकरकमी कर्ज फेड करणेची तयारी दर्शवूनही त्यास सहकार्य केलेले नाही, खातेउतारा दिलेला नाही, हिशोबाचे संकलन केलेले नाही. याउलट रक्कम रु.5,28,000/- इतकी रक्कम भरणा करणेबाबत तोंडी सांगून सदर रक्कमा भरणा न केलेस वाहन जप्त केले जाईल अशी धमकी दिलेली आहे. वरील उपरोक्त विवेचनाचा विचार करता सर्वसामान्य माणूस हा सहजासहजी कोर्टाची पायरी चढत नाही. त्याचेवर अन्याय झालेखेरीज तक्रारदार मे. मंचात तक्रार दाखल करणार नाही हे वरील वस्तुस्थितीवरुन निर्विवाद आहे. सबब सामनेवाला यांनी तक्रारदारास कोणतेही दंड, जादा व्याज आकार न घेता नमुद व्याजदराप्रमाणे कायदेशीर देय रक्कम भरणा करुन घ्यावी. सदर रक्कमा भरणा केलेनंतर ना हरकत सामनेवाला यांनी दयावा. प्रस्तुत रक्कम भरणा करेपर्यंत तक्रारदाराचे नमुद वाहन जप्त अथवा विक्री करु नये या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवालांचे सेवात्रुटीमुळे तक्रारदार झालेल्या मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला यांनी तक्रारदारास कोणतेही दंड, जादा व्याज आकार न घेता कर्जकरारपत्राप्रमाणे नमुद व्याजदराप्रमाणे कायदेशीर कर्जाची देय रक्कम भरणा करुन घ्यावी व सदर रक्कमा भरणा केलेनंतर सामनेवाला यांनी तक्रारदारास ना-हरकत प्रमाणपत्र दयावे. 3) तक्रारदार यांनी सदर कर्जाची रक्कम भरणा करेपर्यंत तक्रारदाराचे वर नमुद वाहन जप्त अथवा विक्री करु नये. 4) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/-(रु. पाच हजार फक्त) तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावी. 5) उभय पक्षकारांनी आदेश प्राप्त झालेपासून 60 दिवसांचे आत वरील आदेशाची पूर्तता करावी.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |