निकालपत्र :- (दि.27/03/2012) ( सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या)
(1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला वकीलांमार्फत सदर मंचापुढे उपस्थित राहिले. त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. उभय पक्षकारांचे वकीलांचा अंतिम युक्तीवाद ऐकणेत आला.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- तक्रारदार हा व्यवसायाने ट्रक चालक आहे. ट्रक चालवून येणा-या भाडयातून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. तक्रारदाराने ट्रक खरेदीसाठी सामनेवाला फायनान्स कंपनीकडून रक्कम रु.1,35,000/-इतके कर्ज घेतले. तसा उभय पक्षांमध्ये लेखी करार झालेला आहे. प्रस्तुत कर्ज टाटा एलपी ट्रक 1210 मॉडेल वाहनाचा चेसेस नं.364052514776, इंजिन नं.692डी02965629, रंग-लाल आणि पांढरा, रजिस्टर नं.MH-09-BC-5288,रजिस्टर दि.27/09/07 या वाहनासाठी घेतले होते. प्रस्तुत कर्जाची मुदत ही दि.05/09/09 पासून 36 महिने म्हणजेच दि.05/07/12पर्यंत आहे. तक्रारदाराने 20 हप्ते नियमितपणे रु.5,000/- पेक्षा जास्त रक्कमेने भरुन एकूण रक्कम रु.1,14,000/- प्रस्तुत कर्ज खाती जमा केलेले आहेत. अशी वस्तुस्थिती असतानाही सामनेवाला कंपनीने रु.39,000/- ची थकबाकी भरली नाही तर गाडी ओढून नेऊ अशी धमकी दिलेली होती व आहे.तक्रारदाराने सामनेवालांकडे खातेउतारा व कराराच्या सहीशिक्क्याची मागणी केली असता दोन वेगवेगळया पध्दतीच्या हप्त्यांची चुकीच्या पध्दतीने स्टेटमेंट देणेत आली आहेत. त्यामुळे प्रस्तुत खातेउता-यामधील तफावत व चुकीबाबत दि.14/02/11 रोजी सामनेवालांचे मुख्य शाखेतील शाखाअधिकारी सचिन कुसाळे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचेकडे अर्ज देऊन खातेउता-याची मागणी केली सदर अर्ज स्विकारुन 4-5 दिवसांत स्टेटमेंट देतो असे त्यांनी सांगितले. मात्र आजअखेर खातेउतारा दिलेला नाही. याउलट गडहिंग्लज शाखेकडून वाहन जप्तीविषयी नोटीस पाठवली आहे. सदर शाखेत दि.14/02/11 रोजी रजिस्टर अर्ज देऊन खातेउता-याची मागणी केलेली आहे. तसेच हिशोब पाहून फरक रक्कम भरणेस तयार असतानाही दि.23/2/11 रोजी वाहन जप्तीची नोटीस पाठवली आहे. सदर वाहनावर उपजिवीका चालू असलेने तसेच तक्रारदाराची कोणतीही चुक नसताना त्याचे कुटूंब उघडयावर पडत असलेने प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. सबब सामनेवाला यांनी तक्रारदाराचा ट्रक बेकायदेशीरपणे, अनाधिकाराने, जबरदस्तीने, स्वत: किंवा तर्फे इसमांचे मार्फत ओढून नेऊ नये. प्रस्तुत तक्रार अर्जाचे निकालेपावेतोपर्यंत मनाई ताकीद व्हावी सामनेवालांकडून खातेउतारा व कराराची प्रत मिळावी. हप्ते भरणेची निश्चित रकक्म ठरवून मिळावी. तक्रार अर्जाचा खर्च व नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.25,000/- मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
(03) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टीप्रित्यर्थ रक्कम जमा केलेल्या पावत्यांच्या सत्य प्रती, वाहनाचे आरसी बुक, सामनेवाला कंपनीचे दोन खातेउतारेचे प्रती, सामनेवाला कंपनीस दिलेल्या अर्जाची सत्यप्रत, पोष्टाची पेाहोच पावती, सामनेवालांनी तक्रारदारास दिलेल्या नोटीसी इत्यादी कागदपत्रांच्या सत्यप्रती दाखल केलेल्या आहेत.
(04) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार परिच्छेद निहाय नाकारलेली आहे. सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, तक्रारदार यांनी बिनबुडाचे आरोप करुन मे.मंचाची दिशाभूल करणेचा प्रयत्न केलेला आहे. प्रस्तुत तक्रार अर्जातील विधाने चुकीची असून ती सामनेवाला यांना मान्य व कबूल नाहीत.तक्रारदाराने केलेल्या विधानाबाबत सबळ पुरावा देणेचे सामनेवाला हे आव्हान करतात. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, प्रस्तुत वाहन हे तक्रारदाराचे एकमेव उपजिवीकेचे साधन आहे असे कर्ज घेणेकरिता आले असता सांगितले. मात्र तक्रारदाराची शेती असून प्रस्तुत वाहन ट्रान्सपोर्ट धंदयाकरिता वापरणार आहे. असे सांगितले. सामनेवाला कंपनीचे मुख्य कार्यालय चेन्नई येथे असून क्षेत्रिय कार्यालय बेलापूर नवी मुंबई येथे आहे.तसेच शाखा कार्यालय गडहिंग्लज येथे आहे. सामनेवाला यांनी कंपनीचे नियमावलीबद्दल तक्रारदारास सांगितले होते. तसेच सामनेवाला कंपनी हेवी कमर्शिअल मोटरकरिता वित्त पुरवठा करते हे उर्वरित अटी या तक्रारदाराने सामनेवाला कंपनीस लिहून दिलेला करार हा KLPR0936300005 लिहून दिलेला आहे. यावर तक्रारदार व त्यांचे जामीनदार संजय भिकाजी भोगम रा.तिरसवाडी यांनी स्वाक्षरी केलेल्या आहेत. तक्रार अर्ज कलम 2, 3 मधील काही अंशी मजकूर मान्य आहे. अन्य मजकूर अमान्य केलेला आहे. प्रस्तुत कर्जकरारप्रमाणे तक्रारदाराने कर्जाची रक्कम उचल केली आहे. मात्र आजमितीस सदर रक्कम भरणेस तक्रारदार टाळाटाळ करीत आहे. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, एका बाजूस तक्रारदार खाते उतारा दिला नाही असे म्हणतात तसेच करार दिला नाही असे म्हणतात. वस्तुत: सुरुवातीसच सदर कागदपत्रे दिलेली आहेत. पुन्हा सदर कागदपत्रे मिळणेबाबत तक्रारदार मे. मंचासमोर विनंती करतात. प्रस्तुत कर्जाचा करार हा चेन्नई येथे पाठविणेत येतो व तेथेच तो सेफ कस्टडीमध्ये राहतो. हे तक्रारदारास माहित असून तसेच त्याची एक प्रत प्राप्त करुनदेखील तक्रारदाराने खोटी विधाने केलेली आहेत. तक्रारदाराने हप्ते भरणेची रक्कम निश्चित करुन मिळावी म्हणून मागणी केलेली आहे. वस्तुत: ठरले करारानुसार तक्रारदाराने नियमित हप्ते वेळेत व तारखेला भरलेले नाहीत. कर्ज देतेवेळी कराराच्या अटीप्रमाणे Condition to grant Loan अशी असते की कर्जदाराने नियमितपणे ठरलेल्या तारखेला व्याज व मुद्दल भरणेचे आहे. मात्र तक्रारदाराने सदर रक्कमा वेळेवर न भरता सामनेवालांना नाहक त्रास देणेचे हेतूने स्वत:ची चुक सामनेवालांचे माथी मडवून व तसे भासवून मंचाची दिशाभूल करणेचे हेतूने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे सामनेवाला यांना मान्य व कबूल नाही. सामनेवाला तक्रारदारास तोंडी व लेखी पुरावा हजर करणेचे आव्हान करतात.
(05) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ दि.05/11/11 रोजी कर्ज करारपत्र, कर्जखातेउतारा इत्यादी कागदपत्रांच्या प्रती दाखल केल्या आहेत. तसेच दि.22/12/11 रोजी
(06) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्हणणे दाखल कागदपत्रे उभय पक्षकारांच्या वकीलांचा अंतिम युक्तीवाद इत्यादीचे साकल्याने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात.
1. सामनेवाला यांनी सेवात्रुटी केली आहे काय? --- नाही.
2. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे.
मुद्दा क्र.1 व 2:- सामनेवाला यांनी दाखल केलेल्या कर्जकरारपत्र शेडयूल-I नुसार तक्रारदाराने सामनेवालांकडून रु.1,35,000/- कर्जाऊ रक्कम घेतलेली आहे. सदर कर्जाची परतफेड 36 महिन्यामध्ये करणेची आहे. सदर हप्ते हे शेडयूल III प्रमाणे ठरवलेले आहेत. शेडयूल II प्रमाणे टाटा-12-10-1990 रजिस्टर क्र. MH-09-BC-5288,चेसेस नं.364052514776, इंजिन नं.692डी02965629 या वर्णनाचे वाहन प्रस्तुत कर्जासाठी सामनेवालांकडे हायपोथीकेटेड केलेले आहे. प्रस्तुत कर्जाचा कर्जकरार क्र.KLPR0936300005 आहे. नमुद कराराच्या शेडूयल III प्रमाणे कर्ज रक्कम रु.1,35,000/- द.सा.द.शे.25.50टक्के व्याजाने असून व्याजाची आकारणी दर महिन्याचे शिल्लक देय रक्कमेवर करणेची आहे.धनादेशाचे अनादरासाठी रु.300/- आकाराची नोंद आहे. एकूण 36 हप्त्यामध्ये रक्कमेची परतफेड करणेची आहे. प्रस्तुत हप्ता कालावधी हा दि.05/08/09 ते 05/07/12 अखेर असून दर महिन्याचे 5 तारखेस हप्ता क्र. 1 ते 35 प्रत्येकी रु.6,619/-प्रमाणे तर हप्ता क्र.36 हा रु.6,610/- प्रमाणे भरणेचा आहे. प्रस्तुत कर्जकरारावर तक्रारदाराची तसेच तक्रारदारास जामीनदार राहिलेल्या संजय भोगम या जामीनदाराची सही आहे. प्रस्तुत करारपत्र दि.30/06/09 रोजी झालेले आहे. सदर करारपत्रासोबत जोडलेल्या खातेउता-यावरुन रु.1,35,000/- इतकी कर्ज रक्कम फायनान्सीअल चार्जेस रु.1,03,275/- असून एकूण करार मुल्य हे रक्कम रु.2,38,275/- इतके आहे. प्रस्तुत कर्ज क्र.KLPR0936300005वर नमुद वाहन क्रमांकाची नोंद आहे. प्रस्तुत कर्जखातेउता-याचे अवलोकन केले असता तक्रारदाराने वेळोवेळी कर्ज रक्कमांचा भरणा केलेचा दिसून येतो. तदनंतरचे काही हप्ते ठरले वेळापत्रकाप्रमाणे भरलेले आहेत. मात्र बरेचसे हप्ते हे विलंबाने भरलेचे दिसून येते. तसेच तक्रारदाराने तक्रार तारखे पर्यंत म्हणजेच दि.03/03/11 अखेर 20 हप्ते भरणेचे होते.
तक्रारदाराने दाखल केलेल्या भरणा रक्कम पावत्यांचे अवलोकन केले असता तक्रारदाराने रक्कम रु.1,14,000/-भरले असलेचे दिसून येते. शेडयूल-3 प्रमाणे तक्रारदाराने दि.05/03/11अखेर रु.6,619/-प्रमाणे 20 हप्ते अदा करणेचे होते. त्यानुसार 20 हप्त्याची रक्कम रु.1,32,380/- अदा करणेचे होते. प्रस्तुत रक्कम ही केवळ व्याज व मुद्दलाची आहे. तक्रारदाराने त्याचे तक्रार अर्जातील कलम 3 मध्ये दि.05/09/09 पासून एकूण 20 हप्त्याची रक्कम रु.1,14,000/-भरलेचे प्रतिपादन केलेले आहे. सदर तारखेपर्यंत ठरले कराराप्रमाणे तक्रारदार रु.16,380/- देय लागतो. तसेच ठरले वेळापत्रकाप्रमाणे नमुद हप्ता रक्कमा वेळेत भरलेले नाहीत. त्यामुळे जरी तक्रारदाराने रक्कम रु.1,14,000/- भरले असले तरी तो थकबाकीदार असलेचे दिसून येते.
तसेच तक्रारदाराने खातेउतारा, कर्जकरारपत्राची प्रत मिळाली नसलेचे तक्रारीत कथन केले आहे. मात्र सामनेवाला यांचे वकीलांनी युक्तीवादाच्या वेळेस तक्रारदारास कर्ज खातेउतारा व अग्रीमेंटची प्रत दिलेचे प्रतिपादन केलेले आहे. तसेच तक्रारदाराने त्यांचे तक्रारीसोबत खातेउता-याची प्रत दाखल केलेली आहे. यावरुन तक्रारदारास सदर कागदपत्रे मिळालेचे दिसून येते.
वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदाराने नियमितपणे कर्ज हप्ते भरलेले नाहीत. सामनेवाला यांनी तक्रारदारास ट्रक जप्त करणेबाबत धमकी दिली आहे तर त्यासाठी तक्रारदार हा सामनेवालांविरुध्द फौजदारी कारवाई करु शकला असता मात्र तसे तक्रारदाराने केलेले नाही. मात्र हप्ते भरणेस तक्रारदारास काही अडचणी निर्माण झाल्या असतील तरी ठरले करारप्रमाणे कर्ज फेड करणे ही तक्रारदाराची कायदेशीर जबाबदारी आहे. ती पार न पाडता सामनेवाला विरुध्द कोणत्याही आधाराशिवाय प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे असे प्रतिपादन केले. वस्तुत: सामनेवाला यांनी बेकायदेशीरपणे वसुली केलेचे दिसून येत नाही अथवा तशी प्रक्रियाही राबवलेली नाही. तक्रारदाराचा ट्रक सामनेवाला यांनी बेकायदेशीररित्या ताब्यात घेतलेला नाही ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे.वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता सामनेवाला यांनी कोणत्याही अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. तसेच कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करणेत येते.
2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.