नि. 14 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 7/2011 नोंदणी तारीख - 17/1/2011 निकाल तारीख - 22/3/2011 निकाल कालावधी - 65 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री मकरंद परशुराम पालकर रा.372/3, शाहुपूरी, करंजे तर्फ सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री दिपक पवार) विरुध्द श्रीराम सिटी युनियन फायनान्स लि. तर्फे माहितगार इसम, शाखाप्रमुख श्री किरण कुलकर्णी रा.फलॅट नं.1, पहिला मजला, सदगुरु चेंबर्स, पुष्कर हॉलसमोर, सातारा-कोरेगाव रस्ता, सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री रविंद्र क्षीरसागर) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांचा टीव्ही व पंखे विक्रीचा व्यवसाय आहे. अर्जदार यांना कर्जाची आवश्यकता असल्याने त्यांनी जाबदार यांचेकडून रु.50,000/- चे कर्ज घेतले. जाबदार यांनी सदर रकमेतून आगाऊ हप्ता रु.2,333/- वजावट करुन कर्ज दिले. सदरचे कर्ज 36 हप्त्यात फेडणेचे होते. त्यासाठी अर्जदार यांचेकडून जाबदार यांनी आगाऊ चेक सही करुन घेतले होते. यापैकी एकूण 9 चेक रितसर हप्त्यापोटी वटलेले आहेत. तदनंतर सदरचे खाते बंद करण्यात आले. त्यावेळी श्रीराम चीटस या जाबदार यांचे सहकंपनीत जमा असलेल्या अर्जदारचे रक्कम रु.60,000/- पैकी रक्कम रु.46,715/- जाबदार यांनी कर्जखात्यात वर्ग करुन घेतली. परंतु अर्जदार यांनी हि शोब केला असता जाबदार यांनी अर्जदारकडून रु.12,353/- जादा रक्कम घेतल्याचे दिसून आले. याबाबत अर्जदार यांनी विचारणा केली असता जाबदार समाधानकारक उत्तर देवू शकले नाहीत. तसेच कोरे चेकही परत दिलेले नाहीत. सबब सदरची जादा रक्कम परत मिळावी, कोरे चेक परत मिळावेत, आर्थिक व मानसिक त्रासापोटी रक्कम मिळावी यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार यांनी नेमलेल्या तारखेस म्हणणे दाखल केले नाही म्हणून त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. परंतु तदनंतर जाबदार हे याकामी हजर झाले व त्यांनी म्हणणे दाखल करुन घेण्यासाठी अर्ज दिला. सदर अर्जावर रु.2,000/- दंडाची रक्कम भरलेस म्हणणे दाखल करुन घेण्यात यावे असा आदेश झाला. परंतु सदरची दंडाची रक्कम भरल्याचे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येत नाही. सबब जाबदार यांनी दाखल केलेले म्हणणे विचारात घेण्यात आलेले नाही. तसेच दि.8/3/11 रोजी जाबदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे ही झेरॉक्सप्रती असल्याने सदरची कागदपत्रे याकामी विचारात घेण्यात आलेली नाहीत. 3. अर्जदारतर्फे व जाबदारतर्फे अभियोक्त्यांनी केलेला युक्तिवाद ऐकला. तसेच दाखल कागदपत्रे पाहिली. 4. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? होय. अंशतः क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. कारणे 5. याबाबत निर्विवाद गोष्टींची पाहणी केली असता असे दिसून येते की, अर्जदार यांनी जाबदारकडून रक्कम रु.50,000/- चे कर्ज घेतलेले होते. सदरचे कर्जाचे परतफेडीपोटींचे हप्त्यांपोटी 9 चेक वटलेले आहेत. त्यानंतर अर्जदार व जाबदार यांचेमध्ये चर्चा होवून उर्वरीत कर्जाची रक्कम श्रीराम चीट यांचेकडील अर्जदार यांचे रकमेतून वर्ग करण्यात येवून कर्जखाते बंद करण्यात आले. त्याबाबत दि.16/12/2010 रोजी जाबदारने अर्जदार यांना ना हरकत दाखला दिलेला आहे. परंतु 36 चेकपैकी 28 कोरे चेक अद्यापही जाबदारने अर्जदारास परत केलेले नाही. सदरची बाब अर्जदार व जाबदार यांना मान्य आहे. 6. अर्जदार यांचे कथनानुसार अर्जदार यांनी कर्ज रक्कम व व्याजदर यांचा हिशोब केला असता रक्कम रु.12,353/- अशी जादा रक्कम जाबदार यांचेकडे भरल्याचे कथन केले आहे तसेच सदरहू जादा रकमेबाबत जाबदार यांनी हिशोब दिलेला नाही. परंतु अर्जदार यांनी जाबदार यांचेबरोबर चर्चा करुन कर्जाची रक्कम पूर्ण परतफेड केलेली आहे व जाबदारकडून त्याबाबत ना हरकत दाखलाही घेतलेला आहे. अशा परिस्थितीत अर्जदार यांनी जादा रक्कम दिली हे शाबीत करण्यासाठी अर्जदार यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त चार्टर्ड अकाऊंटंट अगर वित्तीय क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीचा अहवाल अगर मत याकामी दाखल केलेले नाही. सबब पुराव्याअभावी अर्जदारचे कथनावर विश्वास ठेवता येणार नाही. 7. अर्जदारचे कर्जापोटी परतफेड केलेल्या रकमेचा हिशोब करुन त्याबाबत निर्णय देण्याचे अधिकारक्षेत्र या मंचास नाही असे या मंचाचे मत आहे. सबब अर्जदार यांचे जादा रकमेबाबतच्या मागणीचा याकामी या मंचास विचार करता येत नाही. 8. अर्जदार यांनी अशीही मागणी केली आहे की, त्यांनी जाबदार यांना दिलेले कोरे चेक कर्जाची परतफेड होवूनही परत दिलेले नाहीत. कर्जाची परतफेड करुनदेखील स्वतःचे ताब्यात कोरे चेक ठेवणे ही बाब अयोग्य आहे. सबब कर्जफेड करुनही अर्जदारास चेक परत न देवून जाबदार यांनी सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे असे या मंचाचे मत आहे. 9. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार यांनी अर्जदार यांना अर्जदारकडून कर्जाचे परतफेडीपोटी घेतलेले उर्वरीत कोरे चेक परत द्यावेत. 3. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार यांनी अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. अ. मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 500/- द्यावेत. ब. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 500/- द्यावेत. 4. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 22/3/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |