shri nanaso appa savant filed a consumer case on 28 Aug 2015 against shriram saha sakhar karkhana in the Satara Consumer Court. The case no is CC/15/79 and the judgment uploaded on 05 Sep 2015.
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 79/2015.
तक्रार दाखल दि.15-4-2015.
तक्रार निकाली दि. 28-8-2015.
नानासो. आप्पा सावंत,
रा.फळकोटी, ता.माण,
जि.सातारा. .... तक्रारदार
विरुध्द
1. श्रीराम सहकारी साखर कारखाना लि.
फलटण, ता.फलटण, जि.सातारा.
2. श्रीराम सहकारी साखर कारखाना लि.
फलटण तर्फे चेअरमन,
बाळासाहेब शेंडे.
3. श्रीराम सहकारी साखर कारखाना लि.
फलटण तर्फे संचालक
संजीवराजे विजयसिंह नाईक-निंबाळकर.
क्र.2 व 3 रा. श्रीराम सहकारी साखर कारखाना लि.
फलटण, ता.फलटण, जि.सातारा. .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.ए.आर.कदम.
जाबदार 1 ते 3 तर्फे- अँड.व्ही.एस.खताळ.
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या यानी पारित केला
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986च्या कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
तक्रारदार वर नमूद पत्त्यावर पूर्वीपासून रहात असून ते शिक्षक म्हणून नोकरी करीत होते. सध्या ते सेवानिवृत्त झालेले आहेत. जाबदार कारखाना हा सहकार कायद्याप्रमाणे स्थापन झालेला सहकारी साखर कारखाना असून ग्राहकाकडून ठेवी स्वरुपात रक्कम स्विकारुन मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्वी ग्राहकानी रक्कम मागितल्यास सदर रक्कम त्यांना परत देणे अशा स्वरुपाच्या उद्देशाने जाबदार कारखाना स्थापन झालेला आहे. तक्रारदारानी जाबदार कारखान्यामध्ये मुदतठेव स्वरुपात गुंतविलेल्या रकमांचा तपशील खालीलप्रमाणे आहे-
अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेवीची तारीख | मुदत संपणेची तारीख | ठेवीची रक्कम रु. |
1 | 698 | 28-10-2002 | 27-10-2007 | 10,000/- |
2 | 2131 | 18-12-2003 | 17-12-2008 | 39,000/- |
जाबदारांकडून तक्रारदाराना रक्कम रु.49,000/- आजअखेर पावतीवरील नमूद व्याजासह येणे बाकी आहे. सदरच्या मुदतठेव पावतीच्या मुदत सन 2007-08 साली संपलेल्या आहेत. तक्रारदारांनी सदर रकमा जाबदारांकडे वेळोवेळी मागितल्या असता जाबदारांनी प्रत्येक वेळी रक्कम देणेस टाळाटाळ करुन आजअखेर वेळ मारुन नेली. जाबदार क्र.2 व 3 या फलटण भागातील प्रतिष्ठित व्यक्ती असून सदर जाबदारांना तक्रारदारांनी वारंवार विनंती करुनही ठेवपावतीवरील रक्कम देणेस वेळोवेळी खोटी आश्वासने देऊन आजअखेर वेळ मारुन नेली. वस्तुतः जाबदारांनी सदर ठेवपावत्यांवरील रकमा मुदत संपल्यावर तक्रारदारांना सव्याज देणे बंधनकारक होते. तक्रारदार वयोवृध्द असून त्याना सध्या औषधपाण्यासाठी व वैयक्तिक अडचणीसाठी रकमेची नितांत आवश्यकता आहे. तक्रारदारांनी वेळोवेळी रकमा मागूनही जाबदारांनी ठेव पावत्यांवरील रकमा त्यांना दिल्या नाहीत व खोटी आश्वासने देऊन मुदती मागून घेतल्या. त्यामुळे तक्रारदारांना सदर तक्रार मे.मंचात दाखल करणे भाग पडले आहे. तक्रारदाराना शारिरीक व मानसिक त्रास सोसावा लागलेला आहे, त्यामुळे तक्रारदारांना शारिरीक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई मागणेचा हक्क प्राप्त झालेला आहे. तक्रारीस कारण दि.26-3-2015 रोजी तक्रारदार हे जाबदारांकडे रक्कम मागणेसाठी गेले असता तुमचा व आमचा काहीही संबंध नाही अशी धमकी देऊन तेथून हाकलून दिले, त्यावेळी व त्यासुमारास मे.मंचाचे अधिकार स्थळसीमेत घडले आहे. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक असून जाबदारानी सेवेत त्रुटी व कमतरता केली असल्यानेच सदर तक्रारीची दखल घेणेचा मे.मंचास अधिकार आहे. याशिवाय अन्य कोणत्याही कोर्टात तक्रार दाखल केलेली नाही. तक्रारदारानी मे.मंचाला खालीलप्रमाणे विनंती केली आहे- जाबदारानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदाराना ठेव पावत्यांवरील रक्कम रु.49,000/- एक महिन्याचे आत सव्याज अदा करणेचे आदेश करणेत यावेत. मुदत संपले तारखेपासून रक्कम रु.49,000/- वर प्रत्यक्ष रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे.18% व्याजाने जाबदारानी तक्रारदाराना देणेचे आदेश व्हावेत. शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- तसेच अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- जाबदाराकडून तक्रारदारांस मिळावेत. येणेप्रमाणे तक्रारअर्ज दाखल केला आहे.
2. जाबदार क्र.1 ते 3 यांनी त्यांचे म्हणणे खालीलप्रमाणे दाखल केलेले आहे-
तक्रारदारांच्या तक्रारीमधील संपूर्ण मजकूर खोटा व लबाडीचा असून तो जाबदारांस मान्य व कबूल नाही. जाबदार हा श्रीराम सहकारी साखर कारखाना या नावाने असून ऊसापासून साखर निर्माण करणारी संस्था आहे. शेतकरी, सभासद यांच्या ऊसपिकापासून साखरेचे उत्पादन करणे हा व्यवसाय आहे. शेतकरी, सभासद हे कारखान्याचे मालक असतात. त्यामुळे तक्रारदार व जाबदारांमध्ये ग्राहक असे नाते निर्माण होत नाही. या एकमेव कारणासाठी तक्रारदारांचा अर्ज फेटाळणेत यावा. तक्रारदारानी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन याना जाबदार म्हणून सामील केले आहे, परंतु चेअरमन यांची कोणत्याही कागदपत्रावर सही नाही त्यामुळे चेअरमन यांना या कामी सामील करणे हे चुकीचे असून मान्य व कबूल नाही. तक्रारदारानी जाबदारांकडे दि.26-3-2015 रोजी येऊन रकमेची मागणी केल्याचे म्हणणे खोटे व लबाडीचे असून अशा प्रकारची कोणतीही मागणी केलेली नाही. तक्रारदारांनी जाबदारांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कलम 164 नुसार नोटीस देऊन दोन महिने थांबणेची आवश्यकता होती परंतु तक्रारदारांनी जाबदारांना नोटीस पाठविलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमाचे कलम 164 नुसार सदरचा अर्ज जाबदारांविरुध्द दाखल करता येत नाही याही कारणास्तव तक्रारअर्ज फेटाळणेत यावा. तक्रारदारास तक्रारअर्ज दाखल करणेस कोणतेही योग्य व संयुक्तीक कारण घडलेले नाही. केवळ जाबदार सहकारी साखर कारखान्याची बदनामी करणेचा उद्देश आहे हे स्पष्ट होते. तक्रारदारांनी अर्ज कलम 7 मध्ये केलेली खर्चाची मागणी, मानसिक त्रासापोटी केलेली मागणी व व्याजाची मागणी चुकीची असून ती मान्य व कबूल नाही. याप्रमाणे जाबदारांनी तक्रारअर्जाला म्हणणे दाखल केलेले आहे.
3. नि.2 कडे तक्रारदाराचा अँड.कदम याना तक्रारअर्ज चालवणेस परवानगी मागणी अर्ज, नि.1 कडे तक्रारअर्ज, नि.3 कडे अँड.कदम यांचे वकीलपत्र, नि.4 कडे तक्रारदारांची फेरिस्त, नि.4/1 कडे तक्रारदाराचे नावे असलेली रु.10000/-ची मुदतठेव पावती, नि.4/2 कडे तक्रारदाराचे नावे असलेली रु.39,000/-ची मुदतठेव पावती नि.5 कडे तक्रारदारांचा पत्तामेमो, नि.6 कडे जाबदाराना मंचाने पाठविलेली नोटीस, नि.7 कडे अँड.व्ही.एस.खताळ यांचे जाबदार क्र.1 ते 3 तर्फे वकीलपत्र, नि.8 कडे जाबदार क्र.1 ते 3 ची पत्ता पुरसीस, नि.9 कडे कागदयादी, नि.10 कडे जाबदार कारखान्याचे संचालक मंडळाची यादी, नि.11 कडे हणमंत किसनराव निंबाळकर यांचे प्रतिज्ञापत्र, नि.12 कडे जाबदार क्र.1 ते 3 तर्फे तक्रारअर्जास म्हणणे, नि.13 कडे तक्रारदाराची पुरसीस की, त्यांनी दाखल केलेला तक्रारअर्ज, त्यासोबतचे प्रतिज्ञापत्र हेच पुराव्याचे प्रतिज्ञापत्र व लेखी युक्तीवाद समजावा, तसेच जादा पुरावा देणेचा नाही, नि.14 कडे जाबदारातर्फे पुरसीस की, जाबदारानी दिलेले म्हणणे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र हाच लेखी युक्तीवाद समजणेत यावा इ.कागदपत्रे दाखल आहेत.
4. तक्रारदारांची तक्रार, त्यासोबतचे प्रतिज्ञापत्र, पुरावे, पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, पुरसीस, जाबदारांचे म्हणणे, प्रतिज्ञापत्र, पुरसीस यांचे अवलोकन करुन सदर तक्रारीचे निराकरणार्थ मे. मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा निष्कर्ष
1. तक्रारदार व जाबदार यांचेत ग्राहक व सेवापुरवठादार
असे नाते आहे काय? होय.
2. जाबदारानी तक्रारदाराना दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय? होय.
3. जाबदार हे तक्रारदारांच्या रकमा देणे लागतात काय? होय.
4. अंतिम आदेश काय? तक्रार अंशतः मंजूर.
विवेचन- मुद्दा क्र.1 ते 3-
5. मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. तक्रारदार हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. जाबदार कारखाना हा सहकार कायद्याप्रमाणे स्थापन झालेला असून ग्राहकांकडून ठेवी स्वरुपात रक्कम स्विकारुन मुदतीनंतर किंवा मुदतपूर्वही ग्राहकाना रक्कम हवी असलेस त्यांच्या रकमा होणा-या व्याजासह त्याना परत देणे अशा स्वरुपाच्या हेतूने जाबदार कारखाना स्थापन झाला आहे. तक्रारदारानी जाबदारांकडे रक्कम रु.10,000/- व रक्कम रु.39,000/- अशा दोन मुदतठेवीच्या पावत्या ठेवल्या. या पावत्यांच्या मुदती संपल्याने तक्रारदारानी जाबदारांकडे रकमा मागितल्या असता त्यानी प्रथम टाळाटाळ करुन वेळ मारुन नेली व वारंवार आश्वासने देत राहिले. वस्तुतः जाबदारानी तक्रारदारांच्या ठेवपावत्यांवरील मुदती संपल्यावर त्यांच्या रकमा त्यांना सव्याज परत करणे बंधनकारक होते. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक ठरतात. त्यांना त्यांचे पैसे वेळेत सव्याज परत करणे ही जाबदारांची जबाबदारी होती व तक्रारदाराना द्यावयाची सेवाही होती. जाबदार हे आजपावेतो पैसे परत देऊ शकले नाहीत ही जाबदारांच्या सेवेतील त्रुटी आहे. तक्रारदार वयोवृध्द असून त्यांना घरगुती व औषधोपचारासाठी रकमेची अत्यंत आवश्यकता आहे. जाबदारांच्या पैसे न देणेचे कृतीमुळे तक्रारदाराना खूप शारिरीक व मानसिक त्रास झाला आहे. सदर कामी जाबदाराकडून तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत झालेली त्रुटी, तक्रारदारास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रास या सर्वाना जाबदारच जबाबदार आहेत असे मंचाचे स्पष्ट मत आहे. जाबदारानी तक्रारदारांच्या रकमा मुदती संपून गेल्या तरी परत केल्या नसल्यामुळेच त्यांचेकडून त्यांच्या-(जाबदारांच्या) कर्तव्यात कसूर झाली आहे व ग्राहकाला त्यांचेकडून दयावयाच्या सेवेत त्रुटी निर्माण झालेली आहे. आजपावेतो जाबदारांनी तक्रारदारांची रक्कम सव्याज परत केलेली नाही, ती त्यांनी त्यांना सव्याज परत केली पाहिजे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
6. जाबदारांचे अशा वर्तनाने तक्रारदाराचे मनस्वास्थ बिघडले आहे, तसेच तक्रारदारांची आर्थिक स्थितीही ढासळलेली आहे. ग्राहकाना योग्य सेवा पुरवणेची जबाबदारी जाबदार क्र.1 ते 3 यांची होती ती ते पुरवू शकले नाहीत. म्हणून आम्ही येथे Co-operate corporate veil चा आधार घेऊन या सर्व गोष्टींना जाबदार क्र.1 ते 3 यांना वैयक्तिक व संयुक्तीकरित्या जबाबदार धरीत आहोत. येथे आम्ही मे. मुंबई उच्च न्यायालयाच्या रिट पिटीशन नंबर 117/2011 मंदाताई संभाजी पवार वि. स्टेट ऑफ महाराष्ट्र या न्यायनिवाडयाचा व त्यातील दंडकांचा आधार घेतला आहे.
7. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहेत-
आदेश
1. तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करणेत येते.
2. ठेवपावती क्र.698 वरील रक्कम रु.10,000/- वर दि.28-10-2002 पासून आदेश पारित तारखेपर्यंत ठेवपावतीवरील जाबदार कारखान्याच्या नियमाप्रमाणे व्याज देऊन एकूण व्याजासह होणारी रक्कम जाबदार क्र.1 ते 3 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदारास अदा करावी.
3. ठेवपावती क्र.2131 वरील रक्कम रु.39,000/- वर दि.18-12-2003 पासून आदेश पारित तारखेपर्यंत ठेवपावतीवरील जाबदार कारखान्याच्या नियमाप्रमाणे व्याज देऊन एकूण व्याजासह होणारी रक्कम जाबदार क्र.1 ते 3 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदारास अदा करावी.
4. तक्रारदाराना जाबदार क्र.1 ते 3 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.5000/- अदा करावेत.
5. वरील आदेशाचे पालन जाबदार क्र. 1 ते 3 यांनी आदेश पारित तारखेपासून 45 दिवसांचे आत करावयाचे आहे तसे न केलेस आदेश पारित तारखेपासून जाबदाराचे हाती रक्कम पडेपर्यंत झालेल्या एकूण रकमेवर द.सा.द.शे.6% ने व्याज अदा करावे लागेल.
6. जाबदारानी विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केलेस तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्वये दाद मागू शकतील.
7. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
8. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 28 –8-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.