जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ०७/२०११
तक्रार दाखल दिनांक – १३/०१/२०११
तक्रार निकाल दिनांक – १९/०८/२०१३
धुळे जिल्हा कृषी पदवीधर
शेती उदयोग विकास सहकारी
संस्था मर्या. धुळे तर्फे व्यवस्थापक,
चंद्रकांत नामदेव सुर्यवंशी
उ.वः- ४५ धंदाः- नोकरी
रा. जिजामाता हायस्कुल समोर, धुळे
(संस्थेच्या कार्यालयाचा पत्ता) ................ तक्रारदार
विरुध्द
श्रीराम प्लॉस्टीकस
दृारा प्रोप्रायटर, श्री समीर पी. मेहता
उ.वः- सज्ञान धंदाः- उदयोजक व विक्रेता
रा.३७६/१, ३७७ जी आयडीसी,
बी/एच पोर रामगमडी बडोदा गुजराथ राज्य ............ सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस. जैन)
(मा.सदस्य – श्री.एस.एस. जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड. श्री.एस.एल.पाटील/ अॅड. सौ.आर.बी.पांडे)
(सामनेवाले तर्फे – अॅड.सी.पी. पवार/ अॅड.एच.एच.पाटील)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्य – श्री.एस.एस. जोशी)
शेतक-यांना वितरीत करण्यात आलेले प्लॅस्टिक शीटस् निकृष्ट निघाल्यामुळे सामनेवाले यांनी ते परत घेवून त्याची नुकसान भरपाई दयावी, यासाठी तक्रारदाराने न्याय मंचात ही तक्रार दाखल केली आहे.
१. तक्रारदार संस्थेची तक्रार अशी आहे की, त्यांची संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अन्वये नोंदणीकृत संस्था आहे. तिचा नोंदणी क्रमांक १०१/८६ असा आहे. शेतक-यांना सुधारीत तंत्रज्ञान, अवजारे, बियाणे,खते, औषधे याबाबत मदत उपलब्ध करून देण्याचे व शासनाचे कृषीविषयक प्रकल्प राबविण्याचे काम संस्था करते.
२. सन २००७/०८ साली राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेततळे अस्तरीकरणाचे काम कृषी विभागाने तक्रारदार संस्थेला दिले.
३. सामनेवाले हे प्लॅस्टिक शीटचे उत्पादक आणि पुरवठादार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून २७५ प्लॅस्टिक शीट खरेदी करण्याचा निर्णय तक्रारदार संस्थेने घेतला. तक्रारदार संस्थेने त्यासाठी ठराव केला. कृषी विभागाच्या निर्देशानुसार, प्लॅस्टिक शीट खरेदीसाठी सामनेवाले यांच्याशी दि.२९/०१/२००८ रोजी १०० रूपयाच्या स्टॅम्पवर लेखी करार करण्यात आला.
४. सामनेवाले यांच्याकडून प्लॅस्टिक शीट खरेदी केल्यानंतर तक्रारदार संस्थेने शेतक-यांच्या शेतातील शेततळयांमध्ये त्याचे अस्तरीकरण केले. मात्र १५ शेतक-यांच्या शेततळयातील शीटस् अल्प काळातच फाटले. त्यामुळे या शेतक-यांना शेतात उत्पन्न घेता आले नाही. याशिवाय त्यांच्या शेतातील शेततळयाची जागा विनाकारण अडकून पडली. निकृष्ट शीट बदलून देण्याचे सामनेवाले यांनी त्यांच्या करारात म्हटले होते. त्यांनी ५ वर्षांची गॅरंटी दिली होती. प्रत्यक्षात सामनेवाले यांनी फक्त ४ शेतक-यांचे प्लॅस्टिक शीट बदलून दिले. उर्वरित ११ शेतक-यांचे शीट बदलून दिले नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे ३,९१,३७०/- रूपयांचे पेमेंट रोखून ठेवले.
५. सामनेवाले यांनी कराराचा भंग केला असून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. त्यांना दोन वेळा नोटीस पाठवूनही त्यांनी शीट बदलून दिले नाहीत किंवा पैसे परत केले नाहीत. त्यामुळे एकूण रूपये १५,०१,३६२/- रूपयांपैकी रूपये ३,९१,३७०/- रूपये वजा करून उर्वरीत ११,०९,९९२/- रूपये, संस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का बसला, त्यापोटी १,५०,०००/- रूपये नुकसान भरपाई आणि अर्जाचा खर्च २०,०००/- रूपये सामनेवालेकडून देववावेत अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.
६. तक्रारदारच्या नोटीसीला सामनेवाला यांनी दि.०३/०६/२००९ रोजी उत्तर दिले. त्यानंतर न्यायमंचात खुलासाही सादर केला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, तक्रारदार यांची तक्रार, खोटी, लबाडीची आहे. ही तक्रार न्याय मंचात चालू शकत नाही. तिला मुदतीच्या कायदयाची बाधा येते. आवश्यक पक्षकार सामील केलेले नाहीत. तक्रारदारांना उत्कृष्ट मालाचे वितरण करण्यात आले होते. तक्रारदाराच्या हलगर्जीपणाचे खापर सामनेवालेंवर फोडले जात आहे. अस्तरीकरण करतांना काळजी घेतली नाही. अस्तरीकरण करतांना तज्ज्ञांचा सल्ला घेतला नाही. तांत्रिक दोष आणि पाण्याच्या दाबामुळे कागद फाटला. याप्रकरणी १५ दिवसात तक्रार करणे आवश्यक होते. जी १३ महिन्यानंतर करण्यात आली. त्यामुळे तक्रारदारांकडे घेणे असलेले रू.०३,९१,३७०/- खर्चासह मिळावे आणि तक्रार रदृ करावी, अशी विनंती सामनेवालेंनी केली आहे.
७. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत (निशाणी क्रमांक २), शपथपत्र (निशाणी क्रमांक ३), सामनेवालेंना दि.१९/०५/२००९ रोजी पाठविलेली नोटीस (निशाणी क्रमांक ६/१), दि.०६/०४/२०१० रोजी पाठविलेली दुसरी नोटीस (निशाणी क्रमांक ६/३), सामनेवालेंकडून नोटीसीला मिळालेले उत्तर (निशाणी क्रमांक ६/२), कृषी विभागातर्फे मिळालेली कामाची परवानगी (निशाणी क्रमांक ६/४), तक्रारदार आणि सामनेवाले यांच्यात झालेला दि.२९/०१/२००८ रोजीचा करारनामा (निशाणी क्रमांक ६/६), इनव्हाईस (निशाणी क्रमांक ६/७ पासून ६/२१ पर्यंत), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीचे इतिवृत्त (निशाणी १६ सोबत) दाखल केले आहेत. तथापि, सामनेवाले तर्फे त्यांच्या खुलाशाव्यतिरिक्त (निशाणी क्रमांक १२) कोणतेही दस्तावेज दाखल नाहीत.
८. वरील सर्व कागदपत्रे पाहता आणि तक्रारदार यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यावर न्याय मंचासमोर खालील मुददे उपस्थित होतात. त्यांची उत्तरेही आम्ही सकारण देत आहोत.
मुद्दे निष्कर्ष
अ. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक
आहेत का ? होय
ब. सामनेवाले यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा
अवलंब केला आहे काय ? होय
क. तक्रार न्यायमंचाच्या न्याय क्षेत्रात
आहे काय ? होय
ड. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
विवेचन
९. मुद्दा क्र.अ- तक्रारदार ही सहकारी संस्था आहे. शेतक-यांना सेवा आणि तंत्रज्ञान पुरविण्याचे काम संस्था करते. या संस्थेने दि.२९/०१/२००८ रोजी लेखी करार करून सामनेवाले यांच्याकडून प्लॅस्टिक शीट खरेदी केले. या खरेदीपूर्वी कृषी विभागाने दि.१०/०१/२००८ रोजी संस्थेला प्लॅस्टिक शीट खरेदीसाठी परवानगी दिली होती. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना प्लॅस्टिक शीटचे पैसेही अदा केले आहेत. दोघांमध्ये आर्थिक व्यवहार झाला आहे. त्यामुळे मुदृा क्रमांक ‘अ’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
१०. मुद्दा क्र.ब- तक्रारदार आणि सामनेवाले यांच्यात दि.२९/०१/२००८ रोजी १०० रूपयांच्या स्टॅम्पवर लेखी करार झाला आहे. तो नोटरीसमक्ष करण्यात आला. त्या करारात ‘प्लॅस्टिक शीटची गॅरंटी ५ वर्षे राहील, शीटमध्ये तांत्रिक दोष आढळल्यास, जाडी कमी निघाल्यास भरपाई देणार’ असे स्पष्ट नमूद आहे. त्याचबरोबर दि.०६/०१/२००९ रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या दालनात याच विषयावर बैठक झाली. त्या वैठकीला सामनेवाले यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी प्लॅस्टिक शीट बदलून देण्याची तयारी दाखविली होती. असे असतांनाही सामनेवाले यांनी प्लॅस्टिक शीट बदलून दिलेले नाहीत, किंवा भरपाई दिलेली नाही. त्यामुळे मुदृा क्रमांक ‘ब’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
११. मुद्दा क्र.क- तक्रारदार आणि सामनेवाले यांच्यातील करार धुळे येथे झाला आहे. धुळे येथेच या कराराची नोटरी करण्यात आली. दोघांमधील आर्थिक व्यवहार येथेच झाला आहे. त्यामुळे या न्यायमंचाला तक्रार चालविण्याचा अधिकार असल्याचे आमचे मत आहे. त्यामुळे मुदृा क्रमांक ‘क’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. तक्रारीस मुदतीच्या कायदयाची बाधा निर्माण होते, असा मुदृा सामनेवाले यांनी आपल्या खुलाशात उपस्थित केला आहे. मात्र प्लॅस्टिक शीटची गॅरंटी सामनेवाले यांनीच ५ वर्षे दिली आहे. असे असतांना त्यांनी १५ दिवसात कशी तक्रार करावी ? असा प्रश्न निर्माण होतो,या संदर्भात सामनेवालेंचे वकील युक्तिवादासाठी उपस्थित झाले नाहीत.
११. मुद्दा क्र.ड- वरील सर्व मुद्यांचा विचार करता आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
२. सामनेवाले यांनी तक्रारदारांना भरपाई पोटी ११,०९,९९२ रूपये निकाल प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अदा करावेत. या कालावधीत पैसे न दिल्यास पुढे त्या रकमेवर ६ टक्के प्रमाणे व्याज दयावे.
३. सामनेवाले यांनी तक्रारदारांना मानसिक त्रसापोटी १००० रूपये आणि तक्रारीचा खर्च ५०० रूपये दयावा.
४. तक्रारदार यांनी सदोष आणि निकृष्ट प्लॅस्टिक शीट सामनेवालेंना परत करावेत.
धुळे
दि.१९/०८/२०१३
(श्री.एस.एस. जोशी ) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.