सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 114/2013
तक्रार दाखल दि.10-07-2013.
तक्रार निकाली दि.25-08-2015.
1. श्री. गजानन चनाप्पा शेटे,
रा. “शिवाई” 415/15 ए शनिवार पेठ,
हॉटेल संगमच्या पाठीमागे, कराड, जि.सातारा
सध्या रा. सोमवार पेठ, दाणे गल्ली,
तासगांव,ता.तासगांव,जि.सांगली. .... तक्रारदार.
विरुध्द
1. श्रीराम मोटर्स, तर्फे सेल्स मॅनेजर,
अँथोराईज्ड डिलर, सातारा डिस्टि्रक्ट,
श्री. विजय निंबाळकर,
शाखा सातारा (941),
मार्केट यार्ड, शॉप नं.100, फलटण,
ता. फलटण, जि.सातारा 415 523.
2. स्कुटर्स इंडिया लि. तर्फे
रिजनल मॅनेजर (W.R.)
A-9/1, दुसरा मजला, विठ्ठल रेसिडेन्सी,
सदाशिव पेठ, कुमठेकर रोड,
चित्रशाळा चौक, पुणे .... जाबदार.
तक्रारदारतर्फे –अँड.पी.के.जाधव,
जाबदार क्र.1 व 2 तर्फे– अँड.एस.एम.अयाचित.
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे कराड, जि.सातारा येथील रहिवाशी आहेत. ते रिक्षा ड्रायव्हींगच्या व्यवसायातून येणा-या उत्पन्नावर कुटूंबाची उपजीविका करत असतात. प्रस्तुत रिक्षा हवी असलेने जाबदार क्र. 1 यांचे शोरुममधून माहिती घेवून त्यांचे सांगण्यावरुन विक्रम 750 थ्री व्हीलर डिझेल या मॉडेलची अँटोरिक्षा घेण्याचे ठरविले व जाबदार क्र. 1 यांचेकडून कोटेशन घेवून शिवाई बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., मलकापूर या पतसंस्थेमार्फत दि. 18/10/2012 रोजी रक्कम रु.2,06,000/- (रुपये दोन लाख सहा हजार मात्र) कर्ज घेवून सदर रिक्षा बुक केली. रिक्षा बुक करताना तक्रारदाराने जाबदार क्र. 1 यांना रक्कम रु.20,000/- एवढी अँडव्हान्स म्हणून दि.30/7/2012 रोजी दिली त्याची रितसर पावती जाबदार क्र. 1 ने तक्रारदाराला दिली आहे. त्यावेळी जाबदार क्र. 1 यांनी प्रस्तुत रिक्षाचे एकूण किंमतीपैकी उर्वरीत रक्कम दिलेनंतर प्रस्तुत अँटोरिक्षाची डिलीव्हरी व प्रस्तुत रिक्षाचे आर.टी.ओ. पासींग करुन देणेची हमी जाबदार क्र. 1 यांनी तक्रारदारास दिली होती. म्हणूनच तक्रारदाराने प्रस्तुत अँटो रिक्षा खरेदीसाठी शिवाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.,मलकापूर यांचेमार्फत नवीन वाहन खरेदीसाठी रक्कम रु.2,06,000/- (रुपये दोन लाख सहा हजार मात्र) इतक्या रकमेचा अँक्सीस बँकेचा चेक नं. 39079 ने अदा केला आहे. प्रस्तुत रकमेची रितसर पावती दि.18/12/2012 रोजी जाबदार क्र. 1 ने तक्रारदाराला दिली आहे. तसेच शिवाई ग्रामीण पतसंस्थेसाठी दिलेली आहे. प्रस्तुत एकूण रक्कम रु.2,56,585/- (रुपये दोन लाख छपन्न हजार पाचशे पंच्याऐंशी मात्र) भरलेनंतर जाबदार क्र. 1 ने दि.30/10/2012 रोजी डिलीव्हरी चलन व गेटपास ने प्रस्तुत वाहन अँटोरिक्षा विक्रम 750 (W.C. 6 सिटर डिझेल) तक्रारदाराच्या ताबेत, Temporary Passing No. MH-11-TR-402 करुन दिली. प्रस्तुत गाडीचे आर.टी.ओ.पासींग करुन देणेचे अभिवचन जाबदार क्र. 1 ने तक्रारदारास दिले होते. त्यासाठी लागणारी रक्कमही जाबदार क्र. 1 ने तक्रारदाराकडून जमा करुन घेतली होती. परंतू रिक्षा तक्रारदाराचे ताब्यात दिलेनंतर काही दिवसांनी तक्रारदाराने प्रस्तुत गाडीचे पासींग बाबत जाबदाराकडे विचारणा केली असता स्वत:ची जबाबदारी झटकून तक्रारदार वरती ‘पासींग तुमचे तुम्ही करुन घ्या’ म्हणून जबाबदारी झटकली. प्रस्तुत पासींगसाठी तक्रारदार आर.टी.ओ. ऑफीसमध्ये गेले असता, आर.टी.ओ.सातारा यांनी तक्रारदार यांना दि.15/10/2006 चा जी.आर. दाखवला व डिझेल अँटोरिक्षा, आर.टी.ओ. पासींग करता येत नाही असे सांगीतले ही बाब जाबदार क्र. 1 डिलरला माहिती असूनही त्यांनी तक्रारदाराला सांगीतले नाही. व आर.टी.ओ. यांनी पासींग करुन दिले नाही त्यामुळे तक्रारदाराने जाबदार क्र. 1 यांचेकडे जाऊन विचारणा केली असता जाबदाराने सदर रिक्षाचे पासींग आज करुन देतो, उद्या करुन देतो असे म्हणत टोलवाटोलवी केली व रिक्षाचे आर.टी.ओ.पासींग करुन दिलेले नाही व आर.टी.ओ.पासींग न होणारी रिक्षा जाबदार यांनी तक्रारदाराला विकली आहे व तक्रारदाराला यांची कोणतीही माहीती दिली नाही अशाप्रकारे जाबदार क्र. 1 ने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे. त्यामुळे तक्रारदाराने गाडीचे पासींग न झालेने व्यवसाय करता आला नाही म्हणून झालेली नुकसानभरपाई व पासींग करणेस आलेला खर्च व अर्जाचा खर्च मिळावा त्यासाठी प्रस्तुत तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने नि. 2 कडे प्रतिज्ञापत्र, नि. 5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 ते नि.5/10 कडे अनुक्रमे जाबदाराने तक्रारदाराला, वाहनासाठी घेतले कर्जाचा तपशील, जाबदाराला रक्कम रु.2,36,585/- (रुपये दोन लाख छत्तीस हजार पाचशे पंच्याऐंशी मात्र) दिले याबाबत पावती, जाबदार क्र. 1 व 2 यांना रजि. पोष्टाने पाठवलेली नोटीस, जाबदार क्र. 1 व 2 यांना नोटीस मिळालेची पोहोचपावती, जाबदार क्र.1 चे खातेवर रक्कम रु.8,000/- तक्रारदाराने भरलेची पावती, वाहनाचे डिलीव्हरी सर्टीफिकेट, सेल सर्टीफिकेट, प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, कोल्हापूर यांच्या दि. 15/1/2006 रोजीच्या बैठकीचे इतिवृत्त, नि. 11 कडे तक्रार अर्ज, कागदपत्रे व तक्रार अर्जासोबत दाखल केलेले अँफीडेव्हीट, नि. 14 कडे लेखी युक्तीवाद, नि. 29 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि. 31 कडे जादा पुराव्याचे शपथपत्र, नि.44 सोबत तक्रारदाराचे गाडीचे आर.सी.टी.सी. बुक, नि. 45 कडे लेखी युक्तीवाद, नि. 52 कडे वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र, तक्रारदाराने पासींगसाठी भरले रकमेची पावती, वाहनाच्या टॅक्सची पावती, वाहनास मीटर बसविलेचे प्रमाणपत्र, वाहनास मीटर बसवलेबाबत पावती, सन 2014-15 सालाकरीता वाहनाचा विमा भरलेची पावती, वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
3. जाबदार क्र.1 ने नि.19 कडे म्हणणे, नि.20 कडे म्हणण्याचे अँफीडेव्हीट, नि.25 चे कागदयादीसोबत नि.25/1 ते नि.25/5 कडे अनुक्रमे जाबदार क्र.1 कडून तक्रारदार यांनी रक्कम रु.12,500/- स्विकारलेचे कॅश व्हॉऊचर, जाबदार नं.1 ने तक्रारदाराला पाठवलेल्या रजि. नोटीसची प्रत, जाबदार क्र.1 यांनी तक्रारदाराला पाठवले पत्राची पोष्टाची पावती, तक्रारदार क्र. 1 यांना जाबदार क्र. 1 ने दि. 21/8/2013 रोजीचे पत्र मिळलेची पोहोचपावती, जाबदार यांचेकडील लेजर बुकच्या पानाची व्हेरिफाईड प्रत, जाबदार क्र. 2 ने नि. 30 कडे म्हणणे, नि. 36 कडे जाबदार क्र. 1 चे पुराव्याचे शपथपत्र, नि. 37 कडे म्हणण्याचे दुरुस्ती प्रत, नि. 38 कडे म्हणणे दुरुस्ती अर्ज, नि.39 चे कागदयादी सोबत नि. 39/1 ते नि.39/4 कडे रिक्षाचा टॅक्स भरलेची प्रत, तक्रारदाराचे रिक्षाची स्क्रॅप ऑर्डर, आर.टी.ओ. कडील पत्र, तक्रारदाराचे जुने रिक्षाचे परमीट, नि. 42 कडे जाबदार क्र. 2चे पुराव्याचे शपथपत्र, नि. 46 कडे जाबदार क्र. 2 चा लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे जाबदाराने याकामी दाखली केली आहेत. जाबदाराने प्रस्तुत कामी पुढीलप्रमाणे आक्षेप घेतले आहेत.
तक्रारदाराचा अर्ज व त्यातील मजकूर मान्य व कबूल नाही. तक्रारदार जाबदाराकडे रिक्षाची चौकशी करायला गेल्यावर उपलब्ध रिक्षा तक्रारदाराला जाबदाराने दाखलवलेनंतर तक्रारदार यांनीच सदर रिक्षा पसंत करुन कोटेशनची मागणी केलेमुळेच जाबदार यांनी प्रस्तुत कोटेशन दिले. जाबदाराने तक्रारदाराला वादातीत रिक्षाच खरेदी करा असे सांगीतलेले नव्हते. आर.टी.ओ पासींगची रक्कम जाबदाराने तक्रारदाराकडून जमा करुन घेतलेली नाही. तक्रारदाराने खोटी केस जाबदारांविरुध्द दाखल केली आहे. तक्रारदार यांची विक्रम 750 डिझेल थ्री व्हीलर जुने मॉडेल एम.एच.11 एफ. 1135 असून त्याचे प्रवासी वाहतूकीचे परमीट क्र. एम.एच.11/581/97 हे असून प्रस्तुत जुन्या रिक्षाचे परमीट सदर वादातीत नवीन डिझेल रिक्षावर चढविणेचे आहे अशी तक्रारदाराची केस आहे. तक्रारदाराचे वादातीत रिक्षाचे पासींग झालेले आहे. जाबदाराने तक्रारदाराला वादातीत रिक्षाचे पासींग बाबत सर्व माहीती दिलेली होती. त्यावेळी रिक्षाचे पासींग तक्रारदार स्वत: करुन घेतो असे म्हटले व प्रस्तुत मॉडेलची रिक्षा उपलब्ध करुन देणेस तक्रारदाराने आग्रह धरण्यामुळेच सदरची रिक्षा जाबदाराने तक्रारदाराला विकली. रिक्षा बुकींगसाठी तक्रारदाराने रक्कम रु.20,000/- जाबदाराकडे जमा केलेचे जाबदाराने मान्य केले आहे. वाहनाचे माहीती ठेवण्याचे रजिस्टरमध्ये ‘स्वतः पासींग’ असा शेरा नमूद आहे. त्यामुळे पासींग करुन देणेची जबाबदारी जाबदारांची नाही व नव्हती. तक्रारदार स्वतः पासींग करणार असलेने पासींगची रक्कम रु.12,500/- दि. 1/11/2012 रोजी जाबदारकडून पासींगपोटी परत घेतली आहे. त्याची पावती या कथनासोबत दाखल आहे. त्यामुळे तक्रारदाराचा पासींग करुन मागणेचा हक्क राहीलेला नाही. पासींगसाठी तक्रारदाराला अडचणी आल्यानंतर तक्रारदाराने प्रस्तुत जबाबदारी जाबदार यांचेवर ढकलली आहे. तसेच प्रस्तुत वादातीत रिक्षा तक्रारदाराचे वापरात होती. तक्रारदार जुन्या रिक्षाचा वापर करत होते तसेच वादातीत रिक्षाही ते वापरत आहेत. त्यामुळे परमीटशिवाय रिक्षा वापरता येत नाही. त्यामुळे तक्रारदाराचे नुकसान झाले ही बाब सिध्द होत नाही. तसेच तक्रारदाराने प्रस्तुत रिक्षा ही व्यवसायाचे भांडवल म्हणून वापरात आणली असून वादातीत नवीन रिक्षाही व्यवसायासाठीचे तक्रारदाराने खरेदी केली आहे. त्यामुळे तक्रारदार हे ‘ग्राहक’ या संज्ञेत येत नाहीत. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे म्हणणे जाबदाराने दाखल केले आहे.
4. प्रस्तुत कामी तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दयांचा विचार केला.
अ.नं. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय ? होय
2. जाबदार यांनी तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे काय ? होय
3. अंतीम आदेश काय ? खाली नमूद
आदेशाप्रमाणे.
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण-तक्रारदार हे रिक्षा ड्रायव्हींगचा व्यवसाय करुन त्यातून येणा-या उत्पन्नातून त्यांच्या कुटूंबाची उपजीवीका चालवित होते. तसेच तक्रारदाराने जाबदार क्र. 2 ने उत्पादीत केलेली विक्रम 750 थ्री व्हीलर डिझेल 6 सीटर ही रिक्षा जाबदार क्र. 1 यांचेकडून दि.30/07/2012 रोजी बुक केली. रिक्षा बुक करतेवेळी तक्रारदाराने जाबदाराला रक्कम रु.20,000/- अँडव्हान्स म्हणून दिले. त्याची रितसर पावती तक्रारदाराने नि. 5 सोबत दाखल केली आहे. तसेच जाबदाराने प्रस्तुत रक्कम जाबदाराकडून मिळालेचे मान्य केले आहे. सबब तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक असून जाबदार हे तक्रारदार यांचे सेवापुरवठादार आहेत हे निर्विवाद स्पष्ट होते. तसेच प्रस्तुत वेळी जाबदाराने तक्रारदाराच रिक्षाचे आर.टी.ओ. पासिंग व डिलीव्हरी करुन देणेची हमी जाबदाराने तक्रारदाराला दिली होती. जाबदाराने दिले हमीनुसार तक्रारदाराने विक्रम 750 थ्री व्हीलर या रिक्षासाठी शिवाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., मलकापूर यांचेमार्फत रक्कम रु.2,06,000/- चे कर्ज घेवून त्या रकमेचा अँक्सीस बँकेचा चेक नं.39079 तसेच उर्वरीत रक्कम रु.30,585/- जाबदार क्र. 1 लाअदा केली. प्रस्तुत रक्कम जाबदाराला मिळालेची पावती नि. 5 चे यादीसोबत नि 5/4 कडे दाखल आहे. प्रस्तुत रक्कम रु.2,56,585/- जाबदार क्र. 1 यांचेकडे जमा केलेनंतर जाबदार क्र. 1 ने वादातीत रिक्ष विक्रम 750 W.C.6 सीटर डिझेल अँटो रिक्षा तक्रारदाराचे ताब्यात Temporary Passing No. MH-11-TR-402 करुन दिली व सदरची गाडी आर.टी.ओ. पासींग करुन देतो असे अभिवचन जाबदाराने दिले होते. परंतू तक्रारदाराचे रिक्षाचे पार्कींग जाबदाराने करुन दिले नाही त्यावेळी वारंवार तक्रारदाराने जाबदार क्र. 1 यांना विचारणा केली असता जाबदार क्र. 1 ने तक्रारदाराला तुमचे तुम्ही आर.टी.ओ.पासींग करुन घेणेस सुचविले. तक्रारदारावर स्वतः पासींगसाठी आर.टी.ओ. ऑफीसला गेले असता, आर.टी.ओ. सातारा यांनी तक्रारदाराला दि.15/10/2006 पासींग रोजीचा जी.आर. दाखवला व प्रस्तुत जी.आर. प्रमाणे सदर गाडीचे आर.टी.ओ. पासिंग करता येत नाही असे सांगीतले. सदर जी.आर.ची प्रत तक्रारदाराने नि. 5 चे कागदयादीसोबत नि. 5/9 कडे दाखल केली आहे. परंतू प्रस्तुत बाब जाबदार क्र. 1 यांना माहिती असून देखील जाबदार क्र. 1 यांनी तक्रारदाराला सदर रिक्षा खरेदी करताना प्रस्तुत गाडीचे पासींग होत नाही. जी.आर.प्रमाणे पासींग करता येत नाही, ही रिक्षा खरेदी करु नका असे जाबदाराने तक्रारदाराला सांगणेची जबाबादारी जाबदार क्र. 1 ची होती. परंतू जाबदार क्र. 1 ने सदरची बाब तक्रारदाराला सांगीतली नाही व रिक्षाचे पासींगही करुन दिले नाही. जाबदाराने प्रस्तुत जी.आर. ची माहीती तक्रारदाराला दिली होती व रिक्षाचे पासींगबाबत सर्व माहिती तक्रारदारास सांगितली ही बाब जाबदाराने सिध्द केलेली नाही व तक्रार अर्ज दाखल झालेनंतर दि.21/8/2013 रोजी जाबदाराला पासींगबाबत पत्र पाठवले आहे. म्हणजेच रिक्षा खरेदी करतातना या गोष्टी जाबदाराने तक्रारदाराला पटवून सांगणेची जबाबदारी जाबदार क्र. 1 यांची असतानाही जाबदाराने याबाबी तक्रारदारला सांगीतले नसल्याने व प्रस्तुतचे पासींग जाबदाराने तक्रारदाराला करुन दिले नसलेने तक्रारदार यांना जाबदाराने सदोष सेवा पुरविलेचे स्पष्ट होते. तसेच आर.टी.ओ. पासींग न होणारी गाडी तक्रारदारास विक्री केलेने जाबदार क्र. 1 व 2 हे दोघेही तक्रारदराला दिलेने सदोष सेवेस जबाबदार आहेत. प्रस्तुत वादातीत रिक्षाची डिलीव्हरी दि. 23/10/2012 रोजी दिली असून सदर वाहनास आर.टी.ओ.पासींग नसलेमुळे ते वापरता आले नाही. त्यामुळे तक्रारदाराचे नुकसन झालेले आहे हे स्पष्ट होते. तसेच तक्रारदार यांचेकडून जाबदाराने दि. 22/2/2013 रोजी रजि. नोटीस पाठवून रक्कम रु.8,000/- जाबदार क्र. 1 तर्फे विजय निंबाळकर यांनी जाबदार क्र. 1 चे खातेवर भरणेस सांगीतले व नंतर गाडीचे पासींग करुन देणे असे सांगीतले. त्याप्रमाणे तक्रारदाराने रक्कम रु.8,000/- जाबदार तर्फे विजय निंबाळकर यांचे अँक्सीस बँक तासगांव येथील खातेवर दि. 5/4/2013 रोजी जमा केली. प्रस्तुत जमा केले रकमेची स्लीप नि. 5 चे कागदयादी सोबत नि. 5/6 कडे दाखल आहे. अशाप्रकारे पासींगची रक्कम तक्रारदाराकडून जमा करुन घेऊनही जाबदाराने तक्रारदाराचे गाडीचे पासींग करुन दिले नाही ही सेवेतील त्रुटीच आहे. म्हणून तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केला. प्रस्तुत प्रकरण प्रलंबीत असतानाच जाबदार क्र. 1 ने तक्रारदाराला नोटीस पाठवून (दि.21/8/2013) रोजी प्रस्तुत गाडी दि.27/8/2013 रोजी मुंबई ट्रान्स्पोर्ट ऑफीस, कमिशनर ऑफीस, बांद्रा,मुंबई येथे ठिक सकाळी 10.30 वाजता सदर रिक्षा घेवून हजर राहणेस सांगीतले होते. परंतू गाडीला पासींग नसलेमुळे व प्रकरण नोटीस प्रलंबीत असलेने तक्रारदाराने रिक्षा मुंबईला नेलेली नाही. वास्तविक गाडी पार्कींगचे व जुन्या गाडीचे परमीट नवीन गाडीवर उतरविलेचे पासींगशी काहीएक संबंध नाही. प्रस्तुत तक्रारदाराला जाबदाराने दिलेले कोटेशन नि.5/1 कडे दाखल आहे ते पाहीले असता असे लक्षात येते की, जाबदाराने गाडी पासींगसाठी तक्रारदाराकडून रक्क्म रु.13,250/- जमा करुन घेतले आहेत. अशी एकूण रक्कम रु.2,56,585/- (रुपये दोन लाख छपन्न हजार पाचशे पंच्याऐंशी मात्र) जाबदाराला तक्रारदाराने अदा केली आहे. प्रस्तुत रक्कम रु.20,000/- अँडव्हान्स व नंतर रक्कम रु.2,36,585/- जाबदाराला अदा केलेच्या रितसर पावत्या नि. 5 चे कागदयादीसोबत नि. 5/2 व नि. 5/4 कडे दाखल आहेत. प्रस्तुत कामी जाबदाराने म्हटलेप्रमाणे रक्क्म रु.12,000/- पासींगसाठी तक्रारदाराने जाबदाराकडून काढून घेतली आहे. परंतू जाबदाराने म्हटलेप्रमाणे सदरची रक्कम तक्रारदाराने परत नेलेची पावती जबदाराने मे. मंचात दाखल केलेली नाही व प्रस्तुत रक्कम तक्रारदाराला जाबदाराने अदा केलेचे शाबीत केलेले नाही. शेवटी तक्रारदाराने केस दाखल केलेनंतर दि. 21/8/2013 रोजी जाबदाराने तक्रारदाराला नोटीस पाठवली व दि. 27/8/2013 रोजी गाडी घेवून मुंबई येथे यावे म्हणून, परंतु पासींग नसल्याने तक्रारदाराला गाडी घेऊन मुंबईला जाणे अशक्य झालेने शेवटी तक्रारदाराने प्रयत्न करुन दि. 18/2/2014 रोजी सदर वाहनाचे पासींग स्वतः रक्कम खर्च करुन करुन घेतले आहे. त्यामुळे या सर्व बाबी विचारात घेता, जाबदाराने दिले सदोष सेवेमुळे तक्रारदाराला मानसिक त्रास होणे स्वाभाविक आहे व या त्रासापोटी जाबदाराने तक्रारदार यांना रक्कम रु.25,000/- (रुपये पंचवीस हजार मात्र) तसेच वाहनाचे पासींग नसलेने सदरच्या वाहनाचा वापर करता आला नाही. त्यामुळे तक्रारदाराचे झाले उत्पन्नाचे नुकसानीपोटी रक्कम रु.12,000/- दरमहा याप्रमाणे दि.30/10/2013 पासून दि.18/2/2014 पर्यंत (पासिंग तारखेपर्यंत) (रु. 12,000/- X 16 महिने ) रक्कम रु.1,92,000/- (रुपये एक लाख ब्यानऊ हजार मात्र) जाबदार यांनी तक्रारदाराला अदा करावी. तसेच पासिंगसाठी झाले खर्चाची रक्कम रु.5,000/- व अर्जाचा खर्च म्हणून रक्कम र.3,000/- जाबदाराने तक्रारदार यांना अदा करणे न्यायोचीत होणार आहे असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे.
9. सबब आम्ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदाराने तक्रारदाराला वाहनाचे पासींग करुन न दिलेने जाबदाराने त्यांची
स्वतःची जबाबदारी झटकून तक्रारदाराला दिले सदोष सेवेसाठी जाबदार क्र. 1
व 2 यांना जबाबदार धरणेत येते.
3. जाबदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार यांना वाहनाचे
पासींग करुन न दिलेने वाहनाचा वापर करता न आलेने झालेले नुकसान
म्हणून रक्कम रु.1,92,000/-(रुपये एक लाख ब्यानऊ हजार मात्र) अर्ज
दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के
व्याजदाराने होणा-या व्याजासह अदा करावेत.
4. तक्रारदाराला पासींगसाठी आलेला खर्च रक्कम रु.5,000/- (रुपये पाच हजार
फक्त) जाबदार क्र. 1 व 2 ने वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदाराला अदा
करावा.
5. तक्रारदाराला झाले मानसिकत्रासापोटी रक्कम रु.25,000/- (रुपये पंचवीस
हजार फक्त) जाबदार क्र.1 व 2 यानी वैयक्तिक व संयुक्तिकपणे
तक्रारदाराला अदा करावेत.
6. तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.3,000/-(रुपये तीन हजार फक्त)
जाबदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारास अदा करावेत.
7. वरील सर्व आदेशाचे पालन जाबदार यांनी आदेश पारीत तारखेपासून 45
दिवसांचे आत करावे.
8. विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केलेस तक्रारदाराला ग्राहक संरक्षण
कायद्यातील कलम 25 किंवा 27 नुसार वसुलीची प्रक्रिया करणेची मुभा
राहील.
9. पस्तुत आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य द्याव्यात.
10. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 25-08-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.