::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 25/03/2019)
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार ग्राहक सरक्षंण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्ता क्र. 1 हे सहाय्यक निबंधक भामरागड येथून सेवानिवृत्त झाले व ते तक्रारकर्ता क्र. 2 त्यांची पत्नी व त्यांच्या 2 मुलांसोबत चंद्रपूर येथे वास्तव्य करीत आहेत. सेवा निवृत्तीच्या वेळी तक्रारकर्ता क्र.1 यांना मिळालेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम रु. 3 लाख त्यांनी पोस्ट ऑफिस चंद्रपूर येथे 3249172842 क्रमांकाच्या खात्यामध्ये जमा केली होती. विरुद्ध पक्ष क्र. 3 व 4 यांनी दिनांक 17/3/2017 रोजी तक्रारकर्त्यांचे घरी जाऊन त्यांना खोटी माहिती देऊन त्यांची फसवणूक करून जबरदस्तीने फॉर्म भरून त्यावर तक्रारकर्त्यांची सही घेऊन विरुद्ध पक्ष क्र. 2 मार्फत विरुद्ध पक्ष क्र. 1ची श्रीराम फॉर्च्यून बिल्डर इन्शुरन्स प्लान 128L038V02 ही दहा वर्षा करता प्रत्येकी रु. 1,50,000/- एकरकमी प्रिमियम पॉलिसी अनुक्रमे क्र.एल एन 061703006059 व एल एन 061703006046 घेण्याकरिता भाग पाडले. व त्याकरिता तक्रारकर्ता क्र.1 चे खात्यातील प्रत्येकी रु. 1,50,000/- अनुक्रमे क्र. 307608 व 307609 चे 2 धनादेश सही करून देण्यास जबरदस्ती व नाईलाजाने भाग पाडले.
तक्रारकर्ता क्र. 1 हे सेवानिवृत्त असून ते पेन्शनच्या आधारे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांना त्यांच्या दोन्ही मुलांच्या उच्च शिक्षणाकरिता जास्त पैशांची गरज आहे म्हणून तक्रारकर्ता क्र.1 व 2 हे दिनांक 21/3/2017 पासून विरुद्ध पक्ष क्र. 1 ते 4 त्यांना उपरोक्त पॉलिसी बंद करून मुद्दल रक्कम प्रत्येकी रु. 1,50,000/- असे एकूण रु. 3 लाख परत देण्याबद्दल वारंवार विनंती व पत्रव्यवहार करीत आहेत. परंतु विरुद्ध पक्ष क्र. 1 ते 4 देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे तक्रारकर्त्यांना शारीरिक व मानसिक त्रास होत आहे तसेच दोन्ही मुलांच्या उच्च शिक्षणात अडथळा निर्माण झालेला आहे.
विरुद्ध पक्ष यांनी उपरोक्त पॉलिसीची नमूद मुद्दल रक्कम मागणी करूनही परत न दिल्याने तक्रारकर्त्यांनी दिनांक 24/4/2018 रोजी विरुद्ध पक्ष यांना नोटीस सुद्धा पाठविला परंतु विरुद्ध पक्ष क्र.1 व 2 यांनी सदर नोटीसला खोटे उत्तर दिले व विरुद्ध पक्ष क्र. 3 व 4 यांनी नोटीसला उत्तर दिलेले नाही व पूर्तताही केली नाही. सबब तक्रारकर्त्यांनी विरूध्द पक्षांविरुद्ध विद्यमान मंचासमक्ष तक्रार दाखल करून विरुद्ध पक्ष क्र.1 यांना दोन्ही पॉलिसी अनुक्रमे एल एन 061703006059 व एल एन 061703006046 त्वरित बंद करून प्रत्येकी रु. 1,50,000/- असे एकूण रु. 3 लाख व त्यावर तक्रारकर्त्यांना रक्कम मिळेपर्यंतच्या तारखेपर्यंत 18 टक्के व्याज तक्रारकर्त्यांना देण्याचा आदेश तसेच तक्रारकर्ता क्र.1 व 2 यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई प्रत्येकी रु.1,00,000/- असे एकूण रु. 2 लाख व तक्रार खर्च देण्याचा आदेश विरुद्ध पक्ष क्र. 1 ते 4 यांना व्हावा अशी विनंती केली.
3. तक्रारकर्त्यांची तक्रार स्वीकृत करून विरुद्ध पक्ष क्र. 1 ते 4 यांना नोटीस काढली. विरूध्द पक्ष क्र.1 यांनी प्रकरणात हजर होवून त्यांनी आपले लेखी उत्तर दाखल केले. विरुद्ध पक्ष क्र. 1 यांनी, तक्रारकर्त्यांनी विरूध्द पक्षांवर फसवणूकीचे आरोप केलेले आहेत तसेच सदर प्रकरण हे गुंतागूंतीचे असल्याकारणाने दिवाणी स्वरूपाचे आहे व त्यामुळे विद्यमान मंचाचे कार्यक्षेत्रात येत नाही अशा प्राथमीक आक्षेपासह दाखल केले आहे व आपले लेखी कथनामध्ये तक्रारकर्त्यांचे तक्रारीतील उर्वरीत कथन नाकबूल करून पुढे नमूद केले की तक्रारकर्त्यानी प्रपोझल फॉर्म व रक्कम जमा केल्यानंतर विरूध्द पक्ष क्र.1 यांनी श्रीराम फॉर्चुन बिल्डर इन्श्युरन्स प्लानची प्रत्येकी रू.1,50,000/- एकरकमी प्रिमियम भरून 10 वर्षांकरीता अनुक्रमे क्र. एल एन061703006059 व एल एन061703006046 च्या 2 पॉलिसी घेतल्या त्या तक्रारकर्त्याच्या पत्त्यावर दिनांक 24/3/2017 रोजी कव्हरींग लेटरसह पाठविण्यांत आल्या.
4. पॉलिसीसोबत पाठविलेल्या पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद केले होते की पॉलिसीधारकाला सदर पॉलिसीच्या अटी व शर्ती मान्य नसल्यास तक्रारकर्ता सदर पॉलिसी 15 दिवसांच्या आत फ्रिलूक कालावधीमध्येकारणे देऊन रद्द करू शकतो तसेच आय.आर.डी.ए.च्या नियमाप्रमाणे पॉलिसीधारकाला दि.24/3/2017 रोजी अटी व शर्तीचा दस्तावेज व पॉलिसीसोबतचा प्रपोझल फॉर्म पाठविला होता. तक्रारकर्त्यानी सदर पॉलिसी प्राप्त झाल्यानंतर फ्रिलूक कालावधीमध्ये सदर पॉलिसी रद्द करण्याबद्दल काहीही कळविले नाही याचा अर्थ तक्रारकर्त्यांना सदर पॉलिसी हया अटी व शर्तीसह मान्य आहेत. सदर पॉलिसी आज रोजी चालू आहेत आणी आजपर्यंत दि.10/5/2018 व्यतिरीक्त तक्रारकर्त्याकडून कोणतीही तक्रार विरूध्द पक्ष क्र.1 यांना प्राप्त झाली नाही व सदर तक्रारसुध्दा पॉलिसी जारी केल्यापासून 1 वर्षाच्या कालावधीनंतर दि.10/5/2018 रोजी दिली आहे. तक्रारकर्त्यांनी केलेले आरोप हे वाईट हेतूने मंचाची सहानुभूती प्राप्त करण्याकरीता केलेले आहेत.
5. सदर दोन्ही पॉलिसीअंतर्गत तक्रारकर्त्याचा जिवनाचा विमा सम अॅश्युअर्ड रू.1,65,000/- करिता पॉलिसी प्रारंभ तारखेपासून मार्च,2027 पर्यंत एकरकमी प्रिमियम मध्ये विरूध्द पक्ष क्र.1 यांनी काढला. दुर्दैवाने सदर कालावधीमध्ये तक्रारकर्त्यांना काही झाल्यास नॉमिनीला/लाभधारकाला त्याचा लाभ होणार आहे तोपर्यंत तक्रारकर्ता हे सदर पॉलिसीचा उपभोग/लाभ घेत आहेत करिता त्यांना कायद्याने सदर रक्कम विरूध्द पक्ष क्र.1 कडून परत मागण्यापासून वंचीत केले आहे. सबब सदर तक्रार ही खोटी, आधारहीन असल्याकारणाने खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
6. विरुद्ध पक्ष क्र. 2 ते 4 यांनी उपस्थित होऊन संयुक्त लेखी कथन दाखल केले असून त्यामध्ये तक्रारकर्त्यांनी विरुद्ध पक्ष क्र. 2 ते 4 मार्फत श्रीराम फॉर्च्यून बिल्डर इन्शुरन्स प्लॅन मध्ये एकरकमी एकूण रु. 3 लाख च्या विरुद्ध पक्ष क्र. 1 च्या पॉलिसी घेतल्या आहेत ही बाब मान्य केली असून तक्रारकर्त्यांचे तक्रारीतील उर्वरीत कथन खोडून काढले व पुढे विशेष कथनात नमूद केले की विरुद्ध पक्ष क्र. 2 ही 1 डिस्ट्रीब्यूशन कंपनी असून ती विरुद्ध पक्ष क्र. 1 या कंपनीचे प्रोडक्ट्सचे मार्केटिंग करते. त्यामध्ये फिक्स डिपॉझिट, लाइफ जनरल इन्शुरन्स इत्यादी प्रॉडक्टची आपल्या एजंटमार्फत विक्री करते.
तक्रारकर्त्यांनी विरुद्ध पक्ष क्र. 2 मार्फत विरुद्ध पक्ष क्र. 3 कडे अनुक्रमे दिनांक 17/3/2017 व 18/3/2017 रोजी उपरोक्त रकमेच्या 2 पोलीसीज मध्ये गुंतवणूक केली होती. सदर पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार सदर पॉलिसीच्या प्लॅन चा लॉकिंग कालावधी हा पाच वर्षांकरिता होता व त्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सदर रक्कम काढता येत नसून ती कमीत कमी पाच वर्षाकरिता गुंतवणूक करायची होती. त्यानंतर तक्रारकर्त्यांनी पुन्हा दिनांक 24/4/2017 रोजी प्रत्येकी रु. 1,50,000/- चे 2 असे एकूण रु. 3 लाख चे फिक्स डिपॉझिट विरुद्ध पक्ष क्र. 3 मार्फत विरुद्ध पक्षांकडे काढले व 1 महिन्यानंतरच तक्रारकर्त्यांनी दिनांक 17/5/2017 रोजी विरुद्ध पक्ष क्र. 2 यांचेकडे सदर रक्कम परत मिळणेकरीता अर्ज केला. त्यानुसार श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीने तक्रारकर्त्यांची रक्कम प्रत्येकी रु. 1,50,000/- धनादेशाद्वारे अनुक्रमे दिनांक 31/5/2017 व दिनांक 4/6/2017 रोजी परत दिली व सदर परत केलेली रक्कम रु. 3 लाख तक्रारकर्त्याने पोस्ट ऑफिसमध्ये 3675515015 या खात्यात 1 वर्षाच्या कालावधीकरिता फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवली दिनांक 8/6/2018 रोजी सदर रक्कम परिपक्व झाल्यानंतर परत पुन्हा दिनांक 9/6/2018 ला परत गुंतविलेली आहे.
7. तक्रारकर्त्यांनी दिनांक 28/11/2017 रोजी श्रीराम फॉर्च्युन बिल्डर इन्शुरन्स प्लॅन मध्ये एकरकमी केलेली गुंतवणुकीची रक्कम परत मिळण्याकरता पत्र पाठविले. सदर पत्र विरुद्ध पक्ष क्र. 2 यांना दिनांक 1/1/2018 रोजी प्राप्त झाले तसेच तक्रारकर्ता हे सुद्धा त्यांच्याकडे चौकशी करण्याकरता आले तेव्हा विरुद्ध पक्ष यांनी सदर पॉलिसीचा लॉकींग कालावधी पाच वर्षांचा असून पाच वर्षांनंतर तुम्हाला सदर पॉलिसीची रक्कम परत घेण्याची सुविधा आहे व सदर पॉलिसी ही तक्रारकर्त्यांनी दहा वर्षाच्या कालावधीकरिता घेतली आहे असे सांगितले.. त्यानंतर तक्रारकर्त्यांनी दिनांक 24/4/2018 रोजी विरुद्ध पक्ष क्र. 2 यांना रजिस्टर्ड पोस्टाने पत्र दिले सदर पत्र दिनांक 27/4/2018 रोजी विरुद्ध पक्ष क्र. 2 यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी श्रीराम लाइफ इन्शुरन्स कंपनीची मुख्य शाखा मुंबई येथे ई-मेल द्वारे उपरोक्त पॉलिसीची रक्कम मुदतीपूर्व मिळणेबाबत विचारणा केली त्यावर दिनांक 28/4/2018 रोजी त्यांनी सदर पॉलिसी ही लॉकींग पिरेड मध्ये असल्यामुळे पाच वर्षांपूर्वी तोडता येत नाही किंवा काही अंशी रक्कम सुद्धा काढता येत नाही असे विरुद्ध पक्ष क्र. 2 यांना ई-मेल द्वारे कळविले त्याप्रमाणे विरुद्ध पक्ष क्र. 2 यांनी दिनांक 30/4/2018 रोजी तक्रारकर्त्यांना पत्राद्वारे सदर बाब कळविली व ते पत्र त्यांना प्राप्त झाले आहे. सबब तक्रारकर्त्याची तक्रार उपरोक्त कारणास्तव खारीज होण्यास पात्र आहे..
8. तक्रारदारांची तक्रार, दस्तावेज, संयुक्त शपथपत्र व लेखी युक्तीवाद तसेच विरूध्द पक्ष क्र.1 यांचे लेखी कथन तसेच शपथपत्र व लेखी युक्तीवाद, विरूध्द पक्ष क्र.2 ते 4 यांचे संयुक्त लेखी कथन, विरूध्द पक्ष क्र.2 यांचे शपथपत्र व सदर शपथपत्र विरूध्द पक्ष क्र.3 व 4 यांना मान्य आहे अशी नि.क्र.21 वर दाखल केलेली पुरसीस व संयुक्त लेखी युक्तीवाद आणी उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता क्र.1 व 2 हे विरूध्द पक्षांचे ग्राहक आहेत काय?: होय
2) विरूध्द पक्षांनी तक्रारकर्त्यांप्रति न्युनता पूर्ण सेवा दिली आहे
काय ? : नाही
3) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
9. तक्रारकर्ता क्र. 1 व 2 यांची, वि.प.क्र.2 यांचे अभिकर्ता विरुद्ध पक्ष क्र. 3 मार्फत क्र. 1 यांचेकडून श्रीराम फॉर्च्युन बिल्डर इन्शुरन्स प्लॅन अंतर्गत प्रत्येकी रु. 1,50,000/- अशा अनुक्रमे क्र. 307608 व 307609 चे धनादेशाद्वारे प्रत्येकी एकरकमी प्रीमियम भरून अनुक्रमे क्र. एलेन0161703006059 व एलेन0161703006046 च्या 2 पॉलिसिज दहा वर्ष कालावधी करिता घेतल्या ही बाब विरुद्ध पक्षांना मान्य असल्याने तक्रारकर्ते हे विरुद्ध पक्षांचे ग्राहक आहेत ही बाब निर्विवाद आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
10. उभय पक्षांमध्ये उपरोक्त दोन्ही पॉलिसी रद्द करून प्रीमियम रक्कम परत करणे बाबत वाद आहे. तक्रारीमध्ये निशाणी क्र. 2 अ व निशाणी क्र.15 वर दाखल प्रपोजल फॉर्म व इतर दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की तक्रारकर्त्यांनी विरुद्ध पक्ष क्र. 2 यांचे अभिकर्ता विरुद्ध पक्ष क्र. 3 ह्यांना दिनांक 17/3/2017 रोजी उपरोक्त दोन्ही पॉलिसिंकरिता प्रपोजल फॉर्म सह्या करून प्रीमियमची रक्कम धनादेशाद्वारे दिली याबाबत वाद नाही परंतु विरुद्ध पक्ष क्र. 3 व 4 यांनी तक्रारकर्त्यांना खोटी व बनावट माहिती देऊन त्यांची फसवणूक करून त्यांना विरुद्ध पक्ष क्र. 1 यांची पॉलिसी घेण्यास भाग पाडले हे तक्रारकर्त्यांनी दस्तावेजांसह सिद्ध केलेले नाही. त्यामुळे याबाबत तक्रारकर्त्यांचे म्हणणे ग्राहय धरता येत नाही असे मंचाचे मत आहे.
11. तक्रारकर्त्यांनी दोन्ही पोलिसिंकरिता प्रपोजल फॉर्म सह्या करून प्रीमियमची रक्कम धनादेशाद्वारे दिल्यानंतर विरुद्ध पक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्यांना दिनांक 23/3/2017 रोजी पत्रा सोबत पॉलिसी शेड्युल पाठविले. सदर पत्र व पॉलिसी प्रोपोजल फॉर्म निशाणी क्र. 2 अ वर दस्त क्र. 1-2 व पॉलिसी शेड्युल निशाणी क्र.15 वर दाखल आहे सदर पत्र, प्रपोजल फॉर्ममध्ये पॉलिसीच्या अटी व शर्ती पॉलिसीधारकाला मान्य नसल्यास तक्रारकर्ता सदर पॉलिसी प्राप्त झाल्यापासून पंधरा दिवसांचे फ्री लूक कालावधीमध्ये कारणे देऊन रद्द करू शकतो असे नमूद आहे कार्यकर्त्यांनी सदर पत्र व पॉलिसी दस्तावेज प्राप्त झाल्यानंतर पंधरा दिवसांचे फ्रीलुक कालावधीमध्ये सदर दोन्ही पॉलिसी रद्द करून उपरोक्त रकमेची मागणी विरुद्ध पक्ष क्र. 1 व 2 यांचेकडे करण्यासाठी आक्षेप वा पत्र पाठविले होते हे दस्तावेज दाखल करून सिद्ध केले नाही. विरुद्ध पक्ष क्र. 1 यांनी दिनांक 23/3/2017 रोजी पत्र व पॉलिसी शेड्युल दिल्याचे स्पष्ट होते परंतु तक्रारकर्त्यांनी उपरोक्त दोन्ही पॉलिसीज चे दस्तावेज प्रपोजल फॉर्म दिनांक 24/4/2017 रोजी विरुद्ध पक्ष क्र. 3 यांनी आणून दिल्याचे त्यांचे लेखी युक्तिवाद यामध्ये नमूद आहे यावरूनही तक्रारकर्त्यांना उपरोक्त पॉलिसी दस्तावेज, प्रपोजल फॉर्म दस्तावेज प्राप्त झाल्याचे सिद्ध होते. तक्रारकर्त्या यांना सदर पॉलिसी दस्तावेज दिनांक 24/4/2017 रोजी प्राप्त झाल्याचे गृहीत धरले तरी तक्रारकर्त्यांनी पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार पॉलिसी प्राप्त झाल्यापासून पंधरा दिवसाचे फ्री लूक कालावधीमध्ये विरुद्ध पक्ष क्र. 1 कडे उपरोक्त पॉलिसी रद्द करणेबाबत अर्ज केला होता याबाबत कोणताही दस्तावेज दाखल नाही. विरुद्ध पक्ष क्र. 2 कडे दिनांक 28/11/2017 रोजी तक्रारकर्त्यांनी अर्ज केला परंतु तो अर्ज सुद्धा विहित कालावधी मध्ये केलेला नाही.
12. विमा करार अटी व शर्ती प्रमाणे तक्रारकर्त्यास पॉलिसीचे दस्तावेज प्राप्त झाल्यानंतर विमा करार रद्द करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी होता तक्रारकर्त्यांनी घेतलेली विमा संरक्षण पॉलिसी ही अटी व शर्तीच्या अधीन असून त्याबाबतची तक्रार विहित मुदतीत करणे तक्रारकर्त्यांस आवश्यक आहे विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्त्यांना विमा पॉलिसीचे अटी व शर्तीचे दस्तावेज दिले असल्याने सदर दस्तावेज प्राप्त झाल्याचे दिनांकापासून पंधरा दिवसांच्या फ्रीलुक कालावधीमध्ये सदर करार रद्द करण्यासाठी तक्रारकर्त्यांनी कोणतीही उपाययोजना न केल्याची बाब दाखल दस्तावेजांवरून सिद्ध होते. सबब विरुद्ध पक्ष क्र. 1 यांनी, तक्रारकर्त्यांच्या उपरोक्त दोन्ही पॉलिसी रद्द करून प्रिमियम रकमेची केलेली मागणी, फ्रीलुक कालावधीमध्ये केलेली नसल्याचे कारणास्तव अमान्य करून तक्रारकर्त्यांप्रति सेवेत कोणतीही न्यूनता दिलेली नाही हे दाखल दस्तावेजांवरून सिद्ध होते. सबब मुद्दा क्र. 2 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
13. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्यांची तक्रार क्र.75/2018 खारीज करण्यात येते.
(2) उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
चंद्रपूर
दिनांक – 25/03/2019
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.