(आदेश पारीत व्दारा - श्रीमती चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या)
(पारीत दिनांक : 07 डिसेंबर, 2017)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून, तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे आहे.
2. विरुध्दपक्ष हा सोन्या-चांदीचे दागीने जड-जवाहरात आणि या प्रकारचे दृष्टीने अलंकारीत वस्तुंचा आणि इतर वस्तुचे गहाण ठेवून पैसे देण्याचा धंदा वरील नावाने नागपुर येथे चालवितात. वर्षे 2006 मध्ये तक्रारकर्त्यास पैशाची आवश्यकता खाजगी कारणास्तव होती, त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे दिनांक 8.11.2006 रोजी खालील नमूद ‘परिशिष्ट – अ’ प्रमाणे सोन्याचे दागीने गहाण ठेवले.
‘परिशिष्ट – अ’
अ.क्र. | विवरण | वजन (ग्रॅम) | सोन्याची शुध्दता |
1) | एक जोड सोन्याच्या बांगड्या | 34.800 ग्रॅम | 23 कॅरेट |
2) | एक जोडी सोन्याच्या आंगठ्या | 24.350 ग्रॅम | 24 कॅरेट |
| एकूण वजन | 59.150 ग्रॅम | |
3. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे सोन्याचे दागीने एकूण 59.150 ग्रॅम वजनाचे गहाण ठेवले होते. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याचे नावाने पावती क्रमांक 565 त्याच रोजी दिली आणि सदर पावतीवर तक्रारकर्त्याने उसणे घेतलेले रुपये 20,000/- असे सुध्दा उल्लेखीत आहे. वरील पावतीवरुन हे सिध्द होते की, विरुध्दपक्षाने सदर सोन्याचे आभुषणे गहाण ठेवून तक्रारकर्त्यास रुपये 20,000/- व्याजाप्रमाणे उसणे दिले होते. तक्रारकर्ता पुढे सादर करतो की, तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांच्यात असे ठरले होते की, सदर रक्कम रुपये 20,000/- यावर प्रत्येक महिन्याला 3 % टक्के व्याज एकुण रक्कम मिळेपर्यंत आकारण्यात येईल, तसेच या कर्जाची एकूण मुदत ठरविण्यात आली नव्हती. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास आश्वासीत केले होते की, जेंव्हा–केंव्हा तक्रारकर्ता एकूण कर्ज रकमेचा व्याजासह पूर्ण भुगतान करुन देईल, तेंव्हा सदर दागीने तक्रारकर्त्यास परत करण्यात येईल. जुलै 2011 मध्ये जेंव्हा तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाची भेट घेतली तेंव्हा तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास सांगितले की, तो आता कर्जाची रक्कम व्याजासह पूर्ण भुगतान करण्यास तयार आहे. परंतु, विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास उडवा-उडवीचे उत्तर देवून असे सांगितले की, गहाण ठेवलेले दागीने आता मिळून शकत नाही. वरील बाबी तक्रारकर्त्याच्या लक्षात आल्यामुळे व सदर परिस्थितीमुळे व्यतिथ व हताश झाल्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास दिनांक 16.8.2011 रोजी आपल्या वकीला मार्फत कायदेशिर नोटीस पाठविला. त्यानंतर, सुध्दा विरुध्दपक्षाने सदर नोटीसमध्ये उल्लेखीत बाबीचे पालन केले नाही व त्या नोटीसाला उत्तर सुध्दा दिले नाही. तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे विरुध्दपक्षाने त्याची फसवणूक केली असून त्याचे अतोनाथ नुकसान म्हणजे रुपये 1,89,979/- चे नुकसान झाले आहे. तसेच, तक्रारकर्त्याला फसवणुकीचा व लुबाडण्याचा प्रयत्न केला आहे, तसेच विरुध्दपक्षाने अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब व सेवेत त्रुटी केली आहे. त्यामुळे, तक्रारकर्त्याने खालील प्रमाणे प्रार्थना केली आहे.
(1) तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे ठेवलेले एकूण दागीने ज्याचे वजन 59.150 ग्रॅम हे कर्जाची रक्कम रुपये 20,000/- व व्याजाची रक्कम 3 % प्रती महिन्याचे हिशोबाने स्विकारुन सदर दागीने परत करण्याचा आदेश व्हावा.
ते शक्य नसल्यास सदर सोन्याचे दागीण्याची आजच्या बाजारभावाप्रमाणे किंमत रुपये 1,59,203/- देण्यात यावे व सदर रकमेवर 18 % व्याजाची आकारणी व्हावी.
(2) तक्रारकर्त्यास आलेला नोटीसचा खर्च रुपये 1,000/- व मानसिक, शारिरीक त्रासाबद्दल रुपये 25,000/- मागितला आहे.
4. तक्रारकर्तीच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष यांना मंचा मार्फत नोटीस पाठविण्यात आली. त्यानुसार विरुध्दपक्ष यानी आपले लेखी बयाण दाखल करुन नमूद केले की, हे म्हणणे खरे आहे की, ते सोन्या–चांदीचे दागीने तयार करण्याचा व्यवसाय करतात. अन्य तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील मजकुर हा खोटा व बनावटी असल्याचे म्हटले आहे. विरुध्दपक्षाने पुढे असे नमूद केले की, त्याने तक्रारकर्त्यासोबत कुठलाही व्यवहार केला नाही किंवा तक्रारकर्त्यास कुठलिही पावती कोणत्याही व्यवहाराबाबत दिली नाही. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष यांचा ग्राहक होत नसून, सदर तक्रार विरुध्दपक्षाविरुध्द दाखल करण्याचा तक्रारकर्त्यास कोणताही अधिकार नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार रुपये 10,000/- दंडासह खारीज करण्याची विनंती केली आहे.
5. सदर प्रकरणात दोन्ही पक्षाच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. दोन्ही पक्षांनी अभिलेखावर दाखल केलेली तक्रार, लेखी बयाण व दस्ताऐवजांचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : नाही.
2) अंतिम आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
6. विरुध्दपक्ष हा सोन्या–चांदीचे दागीने तयार करण्याचा व्यवसाय करतात यात काही दुमत नाही. तक्रारकर्त्याचे म्हणण्याप्रमाणे त्यांनी ‘परिशिष्ट-अ’ प्रमाणे विरुध्दपक्षाकडे आपले दागीने गहाण ठेवले व त्यावर रुपये 20,000/- चे कर्ज घेतले, असे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. परंतु, निशाणी क्रमांक 3 नुसार दस्ताऐवज क्र.1 वर लावलेली पावती क्र.565 ही पावती नसून इस्टीमेट आहे व त्यावर कुणाचेही अधिकृत हस्ताक्षर नाही. त्याचप्रमाणे, सोन्याच्या बांगळ्या व अंगठी याचे केवळ वजन लिहिल्याचे दस्त आहे. सोन्याचे दागीने गहाण ठेवून रुपये 20,000/- तक्रारकर्त्याने घेतल्याचे स्पष्ट नमूद नाही व बाकीचा मजकुर अवाचनीय आहे, त्यामुळे सदर दस्ताऐवज हा पुरावापत्र होऊ शकत नाही. याशिवाय तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे देणे-घेणे झाले असल्याचा इतर कोणताही पुरावा तक्रारकर्त्याने सादर केला नाही. त्यामुळे, सबळ पुराव्या अभावी सदर प्रकरणात न्यायनिर्णय देणे कठीण आहे. करीता, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
(2) खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.
(3) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 07/12/2017