न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचे मालकीचे महिंद्र बलेरो पिकअप वाहन नं. एम.एच.09-सीए-8850 हे वाहन असून सदर वाहनाचा विमा वि.प. विमा कंपनीकडे पॉलिसी क्र. 215036/31/18/001126 ने ता. 11/11/2017 ते 10/11/2018 या कालावधीकरिता उतरविला होता. दि. 25/6/2018 रोजी तक्रारदार यांचे वाहन निपाणीहून कोल्हापूरला येति असताना सदर वाहनाचा अपघात झाला व अपघातात तक्रारदारांचा चालक, तसेच माल खरेदीदार हे मृत झाले व सदर वाहनाचे संपूर्ण नुकसान झाले. तक्रारदार यांना सदर घटनेचा धक्का बसल्याने तसेच पोलिस पेपर्स हे कन्नड भाषेत असलेमुळे तक्रारदार हे वि.प. विमा कंपनीस अपघाताची माहिती कळवू शकले नाहीत. वि.प. कंपनीने स्पॉट सर्व्हे करुन घेतला. तक्रारदारांनी वि.प. यांना सर्व कागदपत्रे देवूनही वि.प. यांनी तक्रारदाराचा क्लेम दिला नाही. सबब, विमादावा नाकारुन वि.प. यांनी सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 3,17,850/-, सदर रकमेवर व्याज, मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 6 कडे अनुक्रमे आर.सी.बुक, पॉलिसी, लायसेन्स उतारा, मागणी पत्र, एफ.आय.आर., पंचनामा वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, पुरावा शपथपत्र, कागदयादीसोबत सर्व्हे रिपोर्ट, पॉलिसी अटी व शर्ती, क्लेम फॉर्म, एफआयआर, पंचनामा, तक्रारदारास दिलेली पत्रे, ड्रायव्हींग लायसेन्स वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही.
iii) तक्रारदारांनी अपघातानंतर खूप उशिरा म्हणजे दि. 5/12/2018 रोजी म्हणजे जवळपास पाच महिने व दहा दिवसांनी वि.प. यांना प्रथमतः कळविले. उशिरा कळविणेची कारणे निव्वळ खोटी आहेत.
iv) तक्रारदाराने अपघाताची माहिती उशिरा दिल्याने वि.प. यांना स्पॉट सर्व्हे करण्याची संधी मिळाली नाही. तदनंतर अनेकवेळा वि.प यांनी कागदपत्रांची मागणी करुनही तक्रारदारांनी सर्व पूर्तता केली नाही. तक्रारदाराने दि. 3/1/2019 रोजी एस्टिमेटसह वाहन सर्व्हेकरिता उपलब्ध केले.
v) विमा पॉलिसीचे विविध अटी शर्तींचा भंग होत असलेने वि.प. यांनी तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला आहे. वि.प. यांनी योग्य त्या कारणासाठीच तक्रारदाराचा क्लेम नाकारला आहे. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
वि.प. यांनी याकामी पुढील न्यायनिवाडे दाखल केलेले आहेत.
- (2012) 4 CPJ 116
- Revision petition No. 1407 of 2014 NCDRC
- Revision petition No. 2670 of 2013
- Supreme Court of India Civil Appeal No. 2703 of 2010
- Civil Appeal No. 841 of 2018 Supreme Court of India
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांचे मालकीचे महिंद्र बलेरो पिकअप वाहन नं. एम.एच.09-सीए-8850 हे वाहन असून सदर वाहनाचा विमा वि.प. विमा कंपनीकडे पॉलिसी क्र. 215036/31/18/001126 ने ता. 11/11/2017 ते 10/11/2018 या कालावधीकरिता उतरविला होता. सदर पॉलिसीची प्रत वि.प. यांनी याकामी दाखल केलेली आहे. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. प्रस्तुतकामी वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये, तक्रारदार यांनी अपघाताची माहिती वि.प. यांना उशिराने दिली तसेच अपघातसमयी वाहन चालकाकडे वैध ड्रायव्हींग लायसेन्स नव्हते, त्याचप्रमाणे वाहनात क्षमतेपेक्षा (seating capacity) जास्त लोक बसले होते, त्यामुळे विमा पॉलिसीचे अटी व शर्तींचा भंग झाला आहे असे कथन केले आहे. परंतु विमाधारकाने उशिराने अपघाताची माहिती दिली म्हणून विमा क्लेम नाकारता येत नाही असे मा.उच्च व सर्वोच्च न्यायालयांनी वेगवेगळया न्यायनिवाडयात नमूद गेले आहे. तसेच वि.प. यांनी वाहनाचा सर्व्हे करण्यास वेळ लावला असलेने उशिर झाल्याचे दिसून येते. प्रस्तुतकामी तक्रारदारांनी मा. वरिष्ठ न्यायालयाचा खालील निवाडा दाखल केला आहे.
IV 2019 ACC 757 (S.C.)
Liability of insurance company – delay in intimation alleged – argument that by appointing a surveyor the respondent insurer is estopped from raising plea of violation of condition prescribing time limit for intimation/loading of claim has no legs to stand.
8. तसेच अपघातसमयी वाहनाचे चालकाकडे वैध ड्रायव्हींग लायसेन्स नव्हते म्हणून तक्रारदाराचा विमाक्लेम वि.प यांनी नाकारला आहे. परंतु दाखल कागदपत्रांवरुन तक्रारदाराकडे वाहन चालविणेचे L.M.V. (N.T.) चे लायसेन्स होते. ते त्यांनी याकामी दाखल केले आहे. त्याची मुदत दि. 28/09/2016 ते 15/09/2034 पर्यंत आहे. तसेच सर्व्हे रिपोर्टमध्ये वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट दि. 5/12/2018 पर्यंत होते तसेच सदर अपघातग्रस्त वाहनाचे ग्रॉस व्हेईकल वेट 2880 होते. त्यामुळे सदर वाहनास कायदेशीर परमीटची आवश्यकता नाही म्हणजेच तक्रारदाराचे वाहन हे L.M.V. मध्ये मोडते हे स्पष्ट होते. याकामी खालील मा.वरिष्ठ न्यायालयाचे निवाडयाचा आधार घेतला आहे.
II (2019) CPJ 79 (S.C.)
M.S. Bhati Vs. National Insurance Co.Ltd.
Head note : C.P.Act 1986 – Sec. 2(1) (g) 14(1) (d), 23 – Insurance – Accident of vehicle – Driver and eight persons died and three persons were injured – Driving license – Absence of endorsement – claim repudiated – Deficiency in service – District Forum dismissed complaint – State Commission allowed appeal – National Commission allowed Revision – Driver had a license to drive a light motor vehicle which was valid on the date of accident – There is no requirement to obtain separate endorsement to drive transport vehicle of such class – violation of policy conditions not established – Repudiation not justified – impugned order of NCDRC set aside.
9. याकामी वि.प यांनी असाही आक्षेप नोंदविला आहे की, तक्रारदाराचे अपघातग्रस्त वाहनातून seating capacity पेक्षा जास्त लोक प्रवास करत होते. परंतु याकामी विमा पॉलिसीचे अवलोकन करता सदर वाहनाची seating capacity ही 4+1 अशी दिसून येते. परंतु आर.सी.बीकवर seating capacity 2 असे नमूद आहे. असे जरी असले तरी याकामी वाहनाचे झालेल्या अपघातास सदर वाहनात बसलेले लोक कारणीभूत नाहीत किंवा वाहनात क्षमतेपेक्षा जास्त लोक बसवले म्हणून सदर अपघातास कारण घडलेले नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे. तसेच वाहनाच्या मालकाविरुध्द याकामी गुन्हा नोंद नाही. याकामी मा. सर्वोच्च न्यायालयाचा पुढील न्यायनिर्णयाचा व त्यातील दंडकांचा आम्ही आधार घेतला आहे.
1) I (1997) ACC 123 (S.C.)
B.V. Nararaju Vs. M/s Oriental Insurance Co.Ltd.
2) 1 (2018) CPJ 1 (S.C.)
Manjeet Singh Vs. National Insurance Co.Ltd
10. सदरकामी तक्रारदार हे वि.प. विमा कंपनीकडून विमाक्लेमपोटी किती रक्कम मिळणेस पात्र आहे याचा विचार करावा लागेल. याकामी अपघातग्रस्त वाहनाची आयडीव्ही ही रक्कम रु.3,17,850/- आहे, तर सर्व्हे रिपोर्टवरुन वाहन हे टोटल लॉस झालेचे स्पष्ट होते. सदरचे वाहन तक्रारदाराने दि. 16/7/2021 रोजी रु.45,000/- या किंमतीस विक्री केलेले आहे. म्हणजेच आयडीव्ही रु. 3,17,850/- मधून रक्कम रु.45,000/- वजा जाता रक्कम रु.2,72,850/- येते. सर्व्हे रिपोर्टनुसार वि.प. कंपनीची जबाबदारी ही रक्कम रु.3,72,951/- येते. परंतु वाहनाची आयडीव्ही रु. 3,17,850/- आहे. यातून वाहन विक्री केलेची किंमत रु.45,000/- वजावट करणे योग्य होईल. सदर रक्कम रु.2,72,850/- येते. म्हणजेच सदर रक्कम रु.2,72,850/- पैकी नॉन स्टँडर्ड बेसीसवर 75 टक्के रक्कम म्हणजेच रु. 2,04,638/- विमाक्लेमपोटी वि.प. कंपनीकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तसेच सदर रकमेवर तक्रारदार हे विमा क्लेम नाकारलेचे तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत.
याकामी आम्ही
Supreme Court of India
Civil Appeal No. 2703/2010
Amalendu Sahoo Vs. Oriental Insurance Co.Ltd. Ltd.
या न्यायनिवाडयाचा आधार घेतला आहे.
11. तसेच सदरकामी तक्रारदार हे वि.प. कंपनीकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्लेमपोटी रक्कम रु. 2,04,638/- अदा करावेत व सदर रकमेवर विमा क्लेम नाकारले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.