(पारीत व्दारा श्री भास्कर बी. योगी, मा.अध्यक्ष )
(पारीत दिनांक-21 नोव्हेंबर 2022)
01. तक्रारकर्ता यांनी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष विमा कंपनी यांचे विरुध्द विमाकृत क्षतीग्रस्त वाहनास आलेल्या दुरुस्ती खर्चा संबधाने विम्याची रक्कम मिळण्या बाबत जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याचे मालकीचा टाटा कंपनीचा ट्रक असून त्याचा नोंदणी क्रं-MH-12/HD-2978 असून त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनी मध्ये विमा पॉलिसी क्रं-10003/31/18/302752 असा असून विम्याचा कालावधी हा दिनांक-08.09.2017 ते दिनांक-07.09.2018 असा आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून सदर ट्रकचा विमा उतरविला असल्याने तो विरुध्दपक्ष कंपनीचा ग्राहक आहे. त्याचे विमाकृत ट्रकवर चालक म्हणून श्री गौरव मधुकर मसराम तर मदतनीस म्हणून श्री राकेश रामचंद्र मसराम काम करीत होते. दिनांक-21.12.2017 चे रात्री 2.00 वाजताचे सुमारास विमाकृत ट्रक हा नमुद चालक व मदतनीससह जामनी साखर कारखाना येथे बॅग खाली करण्यास जात असताना पहाटे 3.30 वाजता एम.आय.डी.सी. मोहाडी जवळ ट्रक पलटी झाला, ही बाब चालक श्री गौरव याने फोन वरुन तक्रारकर्त्यास सांगितली असता, तो त्वरीत मोहाडी येथे आला, त्यावेळी चालक श्री गौरव याने ट्रकचे संतुलन बिघडलयाने तो पलटी झाला असलयाचे सांगितले तसेच मदतनीस श्री राकेश मसराम याचे डोक्याला मार लागल्याने त्याला नागपूर येथे मेडीकल मध्ये भरती केले. तक्रारकतर्याचे असेही महणणे आहे की, विमाकृत ट्रकवरील चालक श्री गौरव मसराम याने बेदकारपणे आणि निष्काळजीपणे ट्रक चालविल्याने अपघात झाला. सदरचे अपघातात विमाकृत ट्रकचे फार मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून ट्रकचा संपूर्ण ढाचा क्षतीग्रस्त झालेला आहे. त्याने पोलीस स्टेशन मोहाडी येथे चालक श्री गौरस मसराम याचे विरुध्द तक्रार नोंदविली. सदर अपघातामुळे विमाकृत ट्रकचे रुपये-4,00,000/- चे नुकसान झाले. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनी मध्ये संपूर्ण दस्तऐवजासह विमा दावा दाखल केला परंतु वारंवार मौखीक विनंती करुनही आज पर्यंत विमा रक्कम दिली नाही म्हणून त्याने शेवटी प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करुन विरुध्दपक्ष विमा कंपनी विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
- विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याला विमाकृत ट्रक क्रं- MH-12/HD-2978 चे अपघातामुळे झालेले नुकसान भरपाई म्हणून विमा रक्कम रुपये-4,00,000/- आणि सदर रकमेवर अपघात दिनांक-21.12.2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक 18 टक्के दराने व्याज देण्याचे आदेशित व्हावे.
2. तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- तसेच प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-20,000/- विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून देण्याचे आदेशित व्हावे.
3. या शिवाय योग्य ती दाद त्याचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष विमा कंपनीने जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष लेखी उत्तर दाखल केले, त्यांनी असे नमुद केले की, तक्रारकर्ता हा विमाकृत ट्रकचा उपयोग हा व्यवसायासाठी करीत असल्याने तो ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे तरतुदी प्रमाणे विरुध्दपक्ष विमा कंपनीचा ग्राहक होत नाही. तक्रारकर्त्याने विमाकृत ट्रकचे अपघाताची सुचना दिल्या नंतर त्यांनी सर्व्हेअर यांची नियुक्ती केली होती. तसेच तक्रारकर्त्यास विरुध्दपक्ष विमा कंपनीने दिनांक-02.01.2018 रोजीचे पत्र रजिस्टर पोस्टाने पाठवून खालील दसतऐवजाची मागणी केली होती-
- Certified copy of Final Report by Court with case diary
- Certified copy of Fitness Certificate
- Certified copy of Permit Certificate
- Certified copy of RC
- Certified copy of DL
- Toll Tax Receipt
- Claim Form completely filled and duly signed
- Discharge Voucher & CCC sheet duly signed
- Estimate Copy
परंतु तक्रारकर्त्यास दस्तऐवज मागणीचे पत्र मिळाल्या नंतरही त्याने मागणी केलेले कोणतेही दसतऐवज विरुध्दपक्ष विमा कंपनी कडे दाखल केले नसल्याने पुन्हा दिनांक-13.01.2018 रोजी तसेच दिनांक-20.02.2018 रोजी रजिस्टर पोस्टाने त्याला स्मरणपत्रे दिलीत परंतु तक्रारकर्त्याने दसतऐवजाची पुर्तता केली नाही तसेच पत्रांना उत्तर दिले नाही म्हणून तक्रारकर्त्याचा विमा दावा बंद केला. सबब तक्रारकर्ता यांची संपूर्ण तक्रार व मागण्या या अमान्य असून तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
04. प्रस्तुत तक्रारी मध्ये दिनांक-15.11.2022 रोजी तीनदा पुकारा होऊनही मौखीक युक्तीवादाचे वेळी उभय पक्षां तर्फे कोणीही जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष उपस्थित नव्हते. तक्रार ही सन 2019 मधील जुनी असल्याने प्राधान्याने निकाली काढणे आवश्यक आहे. तक्रारकर्त्याची तक्रार, तक्रारी सोबत दाखल केलेला हलफनामा, विरुध्दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्तर तसेच उभय पक्षांनी दाखल केलेल्या दस्तऐवजाचे अवलोकन जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे करण्यात आले, त्यानुसार जिल्हा ग्राहक आयोगाचा निष्कर्ष खालील प्रमाणे आहे-
::निष्कर्ष ::
05. तक्रारकर्त्याचे मालकीचा टाटा कंपनीचा ट्रक असून त्याचा नोंदणी क्रं-MH-12/HD-2978 असून त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनी मध्ये विमा पॉलिसी क्रं-10003/31/18/302752 काढलेली असा असून विम्याचा कालावधी हा दिनांक-08.09.2017 ते दिनांक-07.09.2018 असा आहे ही बाब दाखल विमा पॉलिसीचे प्रतीवरुन सिध्द होते. तसेच विमा पॉलिसीचे प्रतीमध्ये विमाकृत ट्रकची आय.डी.व्ही. रुपये-6,44,970/- एवढी दर्शविल्याचे दिसून येते. तक्रारकर्त्याने विमाकृत ट्रकला झालेल्या अपघाता संबधात नुकसान भरपाई म्हणून रक्क्म रुपये-4,00,000/- ची मागणी केलेली आहे.
06. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनी मध्ये विमाकृत ट्रकला झालेल्या अपघाता संबधाने नुकसान भरपाई मिळण्या बाबत विमा दावा दाखल केला या बाबी उभय पक्षांना मान्य आहेत परंतु विरुध्दपक्ष विमा कंपनीचे असे महणणे आहे की, तक्रारकर्त्यास विरुध्दपक्ष विमा कंपनीने दिनांक-02.01.2018 रोजीचे पत्र रजिस्टर पोस्टाने पाठवून खालील दसतऐवजाची मागणी केली होती-
- Certified copy of Final Report by Court with case diary
- Certified copy of Fitness Certificate
- Certified copy of Permit Certificate
- Certified copy of RC
- Certified copy of DL
- Toll Tax Receipt
- Claim Form completely filled and duly signed
- Discharge Voucher & CCC sheet duly signed
- Estimate Copy
परंतु तक्रारकर्त्यास दस्तऐवज मागणीचे पत्र् मिळाल्या नंतरही त्याने मागणी केलेले कोणतेही दसतऐवज विरुध्दपक्ष विमा कंपनी कडे दाखल केले नसल्याने पुन्हा दिनांक-13.01.2018 रोजी तसेच दिनांक-20.02.2018 रोजी रजिस्टर पोस्टाने त्याला स्मरणपत्रे दिलीत परंतु तक्रारकर्त्याने दसतऐवजाची पुर्तता केली नाही तसेच पत्रांना उत्तर दिले नाही. या संदर्भात विरुध्दपक्ष विमा कंपनीने पुराव्यार्थ तक्रारकर्त्यास पाठविलेल्या दिनांक-02.01.2018, दिनांक-13.01.2018, दिनांक-20.02.2018 रोजीच्या पत्राच्या प्रती दाखल केल्यात.विरुध्दपक्ष विमा कंपनीचे दिनांक-20.02.2018 रोजीचे पत्रान्वये तक्रारकर्त्यास क्षतीग्रस्त विमाकृत वाहन जवळच्या गॅरेज मध्ये सर्व्हेअर यांचे तपासणीसाठी नेण्याचे सुचित केले तसेच उपरोक्त नमुद दस्तऐवजाच्या प्रतीची मागणी केल्याचे नमुद आहे.
07. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्तर तसेच पुराव्यार्थ दाखल करण्यात आलेल्या पत्रांच्या प्रतीवर तक्रारकर्ता यांनी कोणतेही प्रतीउत्तर दाखल केलेले नाही तसेच विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्या विरुध्द केलेले आरोप खोडून काढलेले नाहीत. अशा परिस्थितीत तक्रारकर्त्यास विरुध्दपक्ष विमा कंपनीने दिलेली पत्रे मिळूनही त्याने विमा कंपनीने मागणी केल्या प्रमाणे उपरोक्त नमुद दसतऐवजाच्या प्रती दाखल केलेल्या नाहीत असा निष्कर्ष काढण्यास कोणतीही हरकत नाही.
08. जिल्हा ग्राहक आयोगाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्याने तक्रारी मध्ये विमाकृत क्षतीग्रसत वाहनाची छायाचित्रे तसेच विमाकृत वाहनाचे दुरुस्तीचे अंदाजपत्रक पुराव्यार्थ दाखल केलेले नाही. तसेच वर नमुद केल्या प्रमाणे विरुध्दपक्ष विमा कंपनीने पुराव्यार्थ दाखल केलेल्या पत्रव्यवहारा प्रमाणे मागितलेले दस्तऐवज जे विमा दावा निश्चीतीसाठी आवश्यक आहेत ते विरुध्दपक्ष विमा कंपनीने दाखल केलेले नाहीत वा तसे दस्तऐवज दाखल केल्या बाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तसेच विरुध्दपक्ष विमा कंपनीचे म्हणणे सुध्दा प्रतीउत्तर दाखल करुन खोडून काढलेले नाही. अशा परिस्थिती मध्ये विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याचे विमा दावा बंद केल्यामुळे दोषपूर्ण सेवा दिली असे म्हणता येणार नाही. तक्रारकर्त्याने जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष सुध्दा विमाकृत ट्रकचे दुरुस्तीचे अंदाजपत्रक, तसेच दुरुस्तीची देयके पुराव्यार्थ दाखल केलेली नाहीत अशा परिस्थिती मध्ये विमाकृत वाहनाचे नेमके किती रुपयाचे नुकसान झाले याचे निर्धारण जिल्हा ग्राहक आयोगास योग्य त्या दस्तऐवजाच्या अभावी करणे शक्य नाही.
09. जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे विशेषत्वाने नमुद करावेसे वाटते की, प्रकरणातील रोजनाम्यां वरुन असे दिसून येते की, दिनांक-06.1.2020 रोजी विरुध्दपक्ष विमा कंपनीने लेखी उत्तर दाखल केले आणि तक्रार ही तक्रारकर्त्याचे शपथे वरील पुराव्यासाठी नेमली होती. दिनांक-30 जुलै, 2021 रोजीचे रोजनाम्या प्रमाणे तक्रारकर्त्याने 06 तारखा उलटूनही शपथे वरील पुरावा दाखल केलेला नसल्याने तक्रार उभय पक्षांचे पुराव्यासाठी नेमल्याचे दिसून येते परंतु त्यानंतरही दिनांक-02 जून, 2022 रोजीचे रोजनाम्या प्रमाणे उभय पक्षांनी शपथे वरील पुरावा दाखल केलेला नाही. त्यानंतर दिनांक-30 जून, 2022 रोजीचे रोजनाम्या प्रमाणे ग्राहक संरक्षण कायदा (ग्राहक आयोगाची कार्यपध्दती) विनियम 2020 च्या नियम-13 (2) अनुसार उभय पक्षांनी मौखीक युक्तीवादाचे दोन दिवस अगोदर आपआपला शपथे वरील पुरावा व लेखी युक्तीवाद तीन प्रतीमध्ये जिल्हा आयोगा समक्ष दाखल करावा तसेच तक्रारकर्ता यांनी संपूर्ण दस्तऐवजाचे अखंडीत पृष्ठांकन करावे परंतु जिल्हा ग्राहक आयोगाने लेखी सुचना दिल्या नंतरही उभय पक्षांनी आपआपला शपथे वरील पुरावा व लेखी युक्तीवाद दाखल केला नाही तसेच तक्रारी मध्ये तक्रारकतर्याने पृष्टांकन केले नाही. अशा परिस्थिती शेवटी तक्रार मौखीक युक्तीवादासाठी नेमण्यात आली. दिनांक- 15.11.2022 रोजी सुध्दा उभय पक्षांचा तीनदा पुकारा होऊनही कोणीही मौखीक युक्तीवादाचे वेळी उपस्थित नव्हते नंतर उशिराने विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे वकील श्रीमती गवई उपस्थित झाल्यात व त्यांनी अर्ज दाखल करुन तक्रारकर्त्याने दोन वर्षा पासून शपथे वरील पुरावा दाखल केल्याचे नमुद करुन न्याय देण्याची विनंती केली.
10. प्रस्तुत तक्रारी मधील उपरोक्त नमुद वस्तुस्थिती तसेच योग्य पुराव्याच्या अभावी तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे, त्यावरुन आम्ही प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करीत आहोत-
:: अंतीम आदेश ::
- तक्रारकर्ता जावेद आबिद छव्वारे यांची तक्रार विरुध्दपक्ष श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर्फे शाखा व्यवस्थापक, शाखा नागपूर यांचे विरुध्द योग्य त्या पुराव्या अभावी खारीज करण्यात येते.
- खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
- निकालपत्राच्या प्रथम प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- उभय पक्षकारांनी अतिरिक्त संच जिल्हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.