निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. श्री आर. एच. बिलोलीकर, सदस्य )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
1. अर्जदार सतिश बळीराम देशमुख हा ट्रक क्र. MH-26/AH-7325 चा मालक व ताबेदार आहे. अर्जदाराने गैरअर्जदार 2 यांच्याकडून रु.8,00,000/- चे कर्ज घेवून सदर ट्रक खरेदी केला होता. सदर ट्रकचा विमा गैरअर्जदार 1 यांच्याकडे उतरविलेला आहे त्याचा पॉलिसी क्र. 10003/31/13/331546 असा आहे व विमा रक्कम रु. 6,75,000/- एवढी होती. सदर विम्याचा कालावधी दिनांक 03/09/2012 ते 02/09/2013 पर्यंत होता. अर्जदाराने सदर विम्याचा हप्ता गैरअर्जदार 2 कडे भरलेला आहे. अर्जदाराने गैरअर्जदार 2 यांच्याकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड ही पहिला हप्ता रु.25,394/- व दुसरा हप्ता रक्कम रु. 27,224/- आणि त्यानंतर प्रत्येक हप्ता रक्कम रु. 25,394/- दरमहा असे एकूण 44 हप्ते दिनांक 01/02/2012 पासून दिनांक 05/10/2015 पर्यंत भरावयाचे होते. अर्जदाराने सदर हप्ते न चुकता दिनांक 01/02/2012 पासून ते दिनांक 06/04/2013 पर्यंत नगदी एकूण रक्कम रु. 3,29,044/- भरणा केलेले आहेत. दिनांक 19/04/2013 रोजी दुर्देवाने यवतमाळ वरुन नांदेडला येत असतांना सदर ट्रक रोडखाली जावून आदळला व ट्रकचा अपघात झाला. त्यामध्ये ट्रकची पूर्ण बॉडी नस्ट झाली व अर्जदाराने खुप नुकसान झाले. अर्जदाराने लगेचच सदर ट्रकच्या अपघाताची माहिती गैरअर्जदार 1 ते 3 यांना दिली. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्या सांगण्याप्रमाणे ट्रक अपघात स्थळावरुन काढून ‘इजहार शो मेकर्स अँड बॉडी बिल्डर्स, धनेगांव, नांदेड’ येथे दुरुस्तीसाठी आणला. त्यांनी सदर अपघातग्रस्त ट्रकची पाहणी करुन अर्जदारास दुरुस्तीसाठी लागणा-या खर्चाचे इस्टीमेंट दिले. सदर ट्रकच्या दुरुस्तीचे काम चालू असतांना गैरअर्जदार 2 हे अर्जदारास ट्रकच्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी सतत दबाव टाकत होते. अर्जदाराने त्याच्या घरातील सोने-नाने विकून गैरअर्जदार 2 यांच्याकडे दिनांक 13/09/2013 रोजी रक्कम रु. 37,219/- चा भरणा केला. अर्जदाराने गैरअर्जदार 1 यांच्याकडे विमा रक्कम मिळण्यासाठी क्लेम फॉर्म भरुन दिला. गैरअर्जदार 1 यांनी सदर वाहनाचा सर्व्हे करण्यासाठी सर्व्हेअर श्री बस्वराज बडबडे यांची नियुक्ती केली. सदर सर्व्हेअरने ट्रकची पाहणी करुन तसेच ट्रकच्या दुरुस्तीसाठी लागणा-या ‘इजहार शो मेकर्स अँड बॉडी बिल्डर्स, धनेगांव, नांदेड’ यांनी दिलेल्या बिलाची पाहणी करुन देखील सर्व्हेअरने ट्रकच्या नुकसान भरपाईची रक्कम रु. 1,67,270/- एवढीच रक्कम त्यांच्या सर्व्हे रिपोर्टमध्ये नमूद केलेली आहे. सदर रिपोर्ट त्यांनी गैरअर्जदार 1 यांना दिला. गैरअर्जदार 1 यांनी अर्जदारास कोणतीही माहिती न देता अर्जदाराच्या माघारीच सर्व्हेअरने ठरवलेली नुकसान भरपाईची रक्कम रु. 1,67,270/- च्या ऐवजी फक्त रक्कम रु. 90,000/- गैरअर्जदार 2 यांच्या नावे दिनांक 19/11/2013 रोजी जमा केले. अर्जदाराने गैरअर्जदार 2 यांच्याकडे कर्ज रक्कमेच्या परतफेडीपोटी दिनांक 01/02/2012 ते 06/04/2013 पर्यंत रक्कम रु. 2,29,044/- जमा केले तसेच दिनांक 13/09/2013 रोजी रक्कम रु. 37,219/- जमा केले व दिनांक 19/11/2013 रोजी गैरअर्जदार 1 यांच्याकडून अर्जदाराच्या ट्रकच्या नुकसानीपोटी रु.90,000/- जमा केलेले आहेत. अशाप्रकारे आजपर्यंत एकूण रक्कम रु. 4,56,263/- गैरअर्जदार 2 यांच्याकडे अर्जदाराने जमा केलेले आहेत. दिनांक 20/12/2013 रोजी गैरअर्जदार 2 यांच्या अधिका-यांनी अर्जदारास प्रत्यक्ष भेटून कर्ज रक्कमेपोटी रक्कम रु. 1,00,000/- भरा नसता गाडी जप्त करुन घेवून जावू अशी धमकी दिली. गैरअर्जदार 1 यांनी गैरअर्जदार 2 यांच्याशी संगनमतकरुन सदरील ट्रकची नुकसान भरपाई ही अत्यंत कमी दर्शविलेली आहे. अर्जदाराने सदर गाडीच्या नुकसान भरपाईबद्दलची उर्वरीत रक्कम रु. 2,67,998/- ची मागणी करणारी कायदेशीर नोटीस गैरअर्जदार 1 यांना दिनांक 24/12/2013 रोजी आपल्या वकिलामार्फत पाठवली. परंतू गैरअर्जदाराने त्यास कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही. गैरअर्जदाराने अर्जदारास त्याची उर्वरीत नुकसान भरपाई न दिल्यामुळे अर्जदार हा त्याच्या वाहनाचा नियमितपणे वापर करु शकलेला नाही व त्यामुळे त्याचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. एवढे होवूनही गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा ट्रक जप्त करुन विक्री करतो अशी धमकी दिलेली आहे. दिनांक 09/01/2014 रोजी देखील गैरअर्जदाराने अर्जदाराचा ट्रक जप्त करण्यासाठी गुंडांना पाठवलेले होते. त्यामुळे अर्जदारास प्रचंड मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास झालेला आहे व अर्जदाराने अतोनात नुकसान झालेले आहे त्यामुळे अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराची तक्रार पूर्णपणे मंजूर करुन अर्जदारास त्याच्या ट्रकच्या नुकसान भरपाईबद्दल बाकी राहिलेली रक्कम रु. 2,67,989/- दिनांक 19/09/2013 पासून 18 टक्के व्याजासह गैरअर्जदार 1 यांच्याकडून अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा. तसेच गैरअर्जदार 2 व 3 यांच्याकडून अर्जदाराचा ट्रक जप्त करु नये असा चिरकालीन मनाई हुकूम पारीत करावा. अपघात झाल्यापासून 9 महिने ट्रक दुरुस्तीसाठी उभा असल्याने 9 महिन्याचे कर्जाचे हप्ते व व्याज पूर्णपणे माफ करण्याबाबत तसेच अर्जदारास दिलेल्या सेवेतील त्रुटी बद्दल रक्कम रु. 1,00,000/- व त्यावर 12 टक्के व्याज दावा तारखेपासून रक्कम वसूल होईपर्यत अर्जदारास गैरअर्जदाराकडून देण्याबाबत आदेश व्हावा. तसेच गैरअर्जदार 1 यांनी सदरील अपघाताची नुकसान भरपाई पूर्ण रक्कम रु. 3,57,989/- गैरअर्जदार 2 यांच्याकडे कर्ज खात्यात न भरल्यामुळे गैरअर्जदार 2 यांचे हप्ते बाकी राहिले आहेत त्यामुळे अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 50,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 10,000/- देण्याबाबत गैरअर्जदार यांना आदेश व्हावा.
गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊनही आपले लेखी म्हणणे दाखल केले नाही म्हणून गैरअर्जदाराविरध्द नो-सेचा आदेश पारीत करण्यात आला.
दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होतात.
अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडून त्यांचा ट्रक क्र. एमएच-26-एच-7325 या वाहनाची पॉलिसी घेतली होती. जिचा पॉलिसी कव्हर नोट क्र. 10003/31/13/331546 असा आहे. व कालावधी दिनांक 03/09/2012 ते 02/09/2013 असा आहे, हे अर्जदाराने दाखल केलेल्या सदर पॉलिसी कव्हर नोटच्या प्रतीवरुन स्पष्ट आहे. अर्जदाराच्या सदर ट्रकला दिनांक 19/04/2013 रोजी अपघात झाल्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांना माहिती दिल्यानंतर गैरअर्जदार क्र. 1 यांनी सदर ट्रकचा सर्व्हे करण्यासाठी श्री बस्वराज बरबडे यांची सर्व्हेअर म्हणून नियुक्ती केलेली आहे. सदर सर्व्हेअर यांनी दिनांक 19/09/2013 रोजी फायनल सर्व्हे रिपोर्ट दिलेला आहे. सदर सर्व्हे रिपोर्ट हा दिनांक 17/09/2013 रोजी सदर वाहनाचे रिइन्स्पेक्शन केल्यानंतर दिलेला आहे. सदर सर्व्हे रिपोर्टमध्ये Gross assessment रक्कम रु. 1,67,270/- एवढे नमूद केलेले आहे. गैरअर्जदार 1 यांनी त्यांच्या लेखी युक्तीवादात सर्व्हेअरच्या अहवालाप्रमाणे अर्जदाराचे रक्कम रु. 90,000/- चे नुकसान झाल्याचे म्हटलेले आहे व त्याची जबाबदारी फक्त रक्कम रु. 90,000/- ची असून त्यांनी सदरची रक्कम गैरअर्जदार क्र. 2 यांच्याकडे भरलेली आहे, असे नमूद केलेले आहे. परंतू गैरअर्जदार क्र. 1 विमा कंपनीने अर्जदाराच्या वाहनाची नुकसान भरपाई रक्कम रु. 90,000/- सर्वेअरने आपल्या अहवालामध्ये नमूद केलेली आहे, याबद्दलचा कोणताही पुरावा / कागदपत्रे मंचासमोर दाखल केलेली नाहीत. तसेच रक्कम रु. 90,000/- अर्जदारास का दिले याबद्दलचे तपशीलवार स्पष्टीकरण दिलेले नाही. म्हणून अर्जदार हा रक्कम रु. 1,67,270/- मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे. अर्जदाराने सदरील ट्रक दुरुस्त केलेला आहे. यापुढे अर्जदार गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांचे हप्ते कराराप्रमाणे नियमितपणे भरण्यास बांधील आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास सर्व्हेअरच्या अहवालाप्रमाणे उर्वरीत रक्कम रु. 77,270/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
3. गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
4. गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 1,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
5. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
6. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.