श्री नरेश बनसोड, सदस्य यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 21/02/2012)
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.कलम 12 अंतर्गत त्याची चोरी गेलेली हिरो होंडा मोटरसायकलच्या विमा दाव्याबाबत दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याच्या मालकीचे एमएच 31 बीएफ 7705 हे वाहन 11.07.2009 ला बीग बाझार, पंचशिल चौक, सिताबर्डी, नागपूर येथे पार्किंग केले असता चोरीस गेलेले आहे. तक्रारकर्त्यानुसार वाहन पार्किंग करुन, तो काही खरेदी करुन परत आल्यानंतर, वाहनाचा शोध घेतला असता वाहन आढळून आले नाही, म्हणून 11.07.2009 रोजी पोलिस स्टेशन, सिताबर्डी, नागपूर येथे माहिती दिली असता, त्यांनी पोलिस अधिका-यांनी सांगितले की, आधी वाहनाचा शोध घ्या व नंतर तक्रार दाखल करा. परंतू वाहन आढळून न आल्याने 13.07.2009 रोजी पोलिस स्टेशन, नागपूर येथे त.क्र.187/09 दाखल केली. तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराचे कार्यालयात सूचना दिली व एफ.आय.आर.ची प्रत दाखल केली आणि वाहन नुकसान भरपाईची गैरअर्जदार क्र. 2 ने हमी दिली.
तक्रारकर्त्यानुसार त्याचे वाहनाचा पॉलिसी क्र.1000/1/31/10/004950 असून त्याचा अवधी 27.05.2009 ते 26.05.2010 होता. तक्रारकर्त्यानुसार त्याची पॉलिसी वैध असून, विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र आहे. गैरअर्जदार क्र. 2 ने आश्वासन देऊनसुध्दा विमा दावा मंजूर केला नाही, म्हणून 13.08.2010 ला कायदेशीर नोटीस पाठविली, त्यास गैरअर्जदाराने उत्तर दिले नाही किंवा दावाही मंजूर केला नाही. तक्रारकर्त्याने चोरी गेलेल्या वाहनाची विमा रक्कम रु.47,000/- 18 टक्केप्रमाणे व्याजासह, शारिरीक व मानसिक त्रासाची भरपाई व तक्रारीच्या खर्चाची मागणी केली. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत एफ.आय.आर., विमा पॉलिसी, नोटीस इ. दस्तऐवज पृष्ठ क्र. 6 ते 16 वर दाखल केले.
2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारावर बजावण्यात आली असता गैरअर्जदारांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल करुन आक्षेप घेतला की, उपरोक्त वाहनाचे विमा घोषित मूल्य 15,030/- असतांना तक्रारकर्त्याने हिरो होंडा वाहनाची पूर्ण किंमत मागितली, ती खोटी असल्याने नाकारली. गैरअर्जदाराने नमूद केले की, तक्रारकर्त्याने आपले वाहन पे-पार्किंगवर न ठेवला, चालू रोडवर ठेवले व पूर्ण काळजी घेतली नाही व स्वतःच्या निष्काळजीपणाचे खापर गैरअर्जदारावर ठेवीत आहे. सदर वाहन 11.07.2009 ला चोरीस गेले व एफ.आय.आर.13.07.2009 ला दिल्यानंतर तब्बल एक वर्षानंतर नोटीस पाठविला, त्यावरुन तक्रारकर्त्याचा निष्काळजीपणा स्पष्ट होतो. गैरअर्जदारानुसार बीग बाझारमध्ये पार्किंगची व्यवस्था असल्यावर रोडच्या बाजूने वाहन उभे करणे म्हणजे चोरास निमंत्रण देणे आहे. त्यात तक्रारकर्त्याच्या निष्काळजीपणा आहे.
3. मंचाने गैरअर्जदाराच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारकर्ते गैरहजर. तक्रारीसोबत असलेल्या दस्तऐवजांचे सुक्ष्म अवलोकन केले.
-निष्कर्ष-
4. तक्रारकर्त्याचे हिरो होडा स्प्लेंडर वाहन क्र. एम एच 31 बी एफ 7705 हे विमाकृत होते, याबाबत उभय पक्षात वाद नाही, त्यामुळे तक्रारकर्ता गैरअर्जदाराचा ग्राहक ठरतो. तक्रारकर्त्याचे वाहन 11.07.2009 ला चोरीस गेल्यानंतर 13.07.2009 ला पोलिस स्टेशनला एफ.आय.आर. दाखल केला होता हे गैरअर्जदाराने त्याचे उत्तरात मान्य केले आहे. गैरअर्जदाराचा आक्षेप आहे की, तक्रारकर्त्याने बीग बाझारमध्ये पार्किंगची व्यवस्था असतांना रोडच्या बाजूने वाहन उभे करणे हा तक्रारकर्त्याचा निष्काळजीपणा आहे, त्यामुळे चोरीच्या वाहनाकरीता नूकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही असे म्हटले. गैरअर्जदाराचे हे म्हणणे नाही की, तक्रारकर्त्याचे वाहन हे चोरीस गेलेलेच नाही. उलटपक्षी, एफ.आय.आर.वरुन हे स्पष्ट झाले की, तक्रारकर्त्याचे वाहन 11.07.2009 ला चोरी झाले होते. याबाबत गैरअर्जदाराने कुठलेही कथन केले नाही व बीग बाझारमध्ये पे-पार्किंगची सोय आहे. याबाबत कुठलाही वस्तूनिष्ठ पूरावा गैरअर्जदाराने सादर केलेला नाही. त्यामुळे गैरअर्जदाराचे म्हणणे मंचास असंयुक्तीक स्वरुपाचे वाटते.
5. मंचाने सर्वोच्च न्यायालयाचे खालील निकालपत्रास आधारभूत मानले आहे, कारण सदर तक्रारीतील व निकालपत्रातील वस्तूस्थितीत साम्य आहे व दोन्हीबाबतीत वाहन हे चोरीस गेलेले आहे. Supreme Court of India 2008 ACJ 2035 National Insunrance Co. Ltd. V/s Nitin Khandelwal या निकालपत्रात राष्ट्रीय आयोगाप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने खालीलप्रमाणे प्रमाणित केले आहे, “Whether the Insurance Company is liable to indemnity insured for his loss when he has taken comphrensive policy- held; yes; breach of terms of policy is not germane in the case of theft of vehicle.”
यावरुन हे स्पष्ट झाले की, गैरअर्जदार कुठल्याही तांत्रिक बाबीचा तक्रारकर्त्यावर दोषारोप करुन विमा दावा टाळू शकत नाही हे स्पष्ट झाले आहे. गैरअर्जदारास तक्रारकर्त्याचे वाहन चोरी गेलेले नाही, याबाबत कुठलेही कथन केले नाही किंवा त्यांच्या प्रचलित पध्दतीप्रमाणे चौकशी अहवाल सादर केलेला नाही. उलट, गैरअर्जदाराने विमा दावा दाखल झाल्यानंतर, दावा अनिर्णित ठेवला ही ग्राहक सेवेतील त्रुटी असून गैरअर्जदाराने अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे असे मंचाचे निष्कर्ष आहे व गैरअर्जदार तक्रारकर्त्याचा विमा दाव्याची रक्कम देण्यास बाध्य आहे.
6. पॉलिसी पत्रानुसार सदर वाहनाचे विमा घोषित मूल्य रु.15,030/-, तक्रारकर्ता 11.07.2009 पासून म्हणजे वाहन चोरीपासून तर रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह रक्कम मिळण्यास पात्र आहे. तक्रारकर्त्याने वाहन संदर्भात व मानसिक व शारिरीक नुकसान भरपाईबाबत केलेली मागणी अवाजवी आहे. परंतू तक्रारकर्त्यास निश्चितच सदर त्रास सहन करावा लागला, त्यामुळे मानसिक शारिरीक त्रासाच्या भरपाईकरीता रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. उपरोक्त निष्कर्षानुसार मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी वाहनाचे विमा घोषित मूल्य रु.15,030/- दि.11.07.2009 पासून म्हणजे वाहन चोरीपासून तर रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह तक्रारकर्त्याला परत करावे.
3) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी मानसिक शारिरीक त्रासाच्या भरपाईकरीता रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- तक्रारकर्त्याला द्यावे.
4) सदर आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत संयुक्तपणे व पृथ्थकपणे करावी.