( आदेश पारित द्वारा : श्री. विजयसिंह ना. राणे, अध्यक्ष )
आ दे श
( पारित दिनांक : 15 सप्टेबर 2011 )
यातील तक्रारदार श्री सुनील गुलाबराव तानोडकर यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्यांनी गैरअर्जदार क्रं.3 जवळुन व्यवसायासाठी टाटा एल.पी.टी. 909 मिनी ट्रक विकत घेताला. त्यांचा क्रमांक एमएच-31- सी.बी./4081 असा आहे. गैरअर्जदार क्रं.3 ने त्याची पॉलीसी गैरअर्जदार क्रं.1 व 2 कडे नोंदविली. त्याचा पॉलीसी क्रमांक 10003/31/10/109984 व कालावधी 25/9/2009 ते 24/9/2010 एवढा होता. दिनांक 29/8/2010 रोजी तक्रारदाराच्या वाहनाचा अपघात झाला. त्याने यासंबंधी गैरअर्जदारास सुचित केले व त्यांचे सुचनेप्रमाणे वाहनाच्या दुरुस्ती खर्चाचे अंदाजपत्रक दाखल केले. त्याप्रमाणे 2,97,090/- एवढा खर्च येणार होता. तसे दस्तऐवज क्रमांक 15 वर दिले आहे. गैरअर्जदाराने सर्व्हेअर पाठविला व त्यांचे सुचनेशिवाय वाहन दुरुस्त करु नका असे सांगीतले. तक्रारदाराच्या को-या पेमेंट व्हाउचरवर सहया घेतल्या. तसे न केल्यास दावा मंजूर होणार नाही असे अशी धमकी दिली व त्यांचे कारण कळविले नाही. वाहन तसेच पडुन होते. दिनांक 30/01/2002 (ही तारीख चुकीची दिसते ती दिनांक 31/1/2011 अशी असावी) रोजी गॅरेज मालकाने पत्र दिले त्यापत्रानुसार वाहन 5 महिने गॅरेज मधे असल्याने पार्कींग चार्ज रुपये 500/- प्रती दिवसाप्रमाणे रक्कमेची मागणी केली. त्यावर तक्रारदाराने गैरअर्जदारास नोटीस दिली. मात्र गैरअर्जदाराने कोणतेही उत्तर दिले नाही. तक्रारदारास रुपये 10,000/- दिनांक 20/2/2011 रोजी गॅरेज मालकास द्यावे लागले. तक्रारदाराचे वाहन दुरुस्त न झाल्यामुळे आर्थिक नुकसान झाले म्हणुन तक्रारदाराने ही तक्रार दाखल करुन वाहन दुरुस्तीचा खर्च रुपये 2,97,090/- एवढा विमा दावा मंजूर करावा. गॅरेज मालकाला दिलेले रुपये 10,000/- मिळावे. आर्थिक नुकसान भरपाई रुपये 75,000/-मिळावे. गैरअर्जदार क्रं.3 ने खर्चाचे हप्ते थांबवावे. मानसिक त्रासापोटी रुपये 25,000/- तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- मिळावा. अशी मागणी केली.
सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होऊन गैरअर्जदार हजर झाले व त्यांनी आपला लेखी जवाब दाखल केला.
गैरअर्जदार क्रं.1 व 2 यांनी ने आपले उत्तरात तक्रारदाराची सर्व विपरित विधाने अमान्य केली. त्यांचे म्हणणे असे आहे की, त्यांनी वाहनाचे नुकसानी दाखल रुपये 77,000/- चा धनादेश तक्रारदारास दिला व तक्रारदाराने तो उचलला. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खोटी आहे. विम्याचा कालावधी मान्य केला. तक्रारदाराने दुरुस्ती अंदाजपत्रक दिल्याची बाब मान्य केली. तसेच सर्व्हेअर यांनी 77,000/-बाबत अहवाल दिला. त्याप्रमाणे रु.77,000/- तक्रारदारास दिले. तक्रारदाराची इतर विधाने त्यांनी अमान्य केली. थोडक्यात तक्रार चुकीची आहे म्हणुन ती रुपये 50,000/- खर्चासह खारीज करावी असा उजर घेतला.
गैरअर्जदार क्रं.3 ने आपले लेखी जवाबात तक्रारदाराने त्यांचे विरुध्द कुठलेही आरोप केलेले नाही. केवळ जोपर्यत वाहन दुरुस्त होत नाही तोपर्यत कर्जाचे हप्ते थांबविण्याचे व त्यावरील व्याज रद्द करण्याची मागणी केली आहे.तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं.3 कडुन लेखी करार करुन कर्ज घेतले असुन ते मासिक हप्त्यामध्ये तक्रारदारास भरावयाची नसेल तर त्याने एकरकमी थकीत असलेली रक्कम गैरअर्जदाराकडे भरावी अन्यथा गैरअर्जदार कायदेशीर कारवाई करु शकेल असा उजर घेतला व सदर तक्रार गैरअर्जदार क्रं.3 विरुध्द नुकसान भरपाई रुपये 25,000/-खर्चासह खारीज करावी. अशी मागणी केली.
तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असुन, दस्तऐवज यादीनुसार एकुण 12 कागदपत्रे दाखल केलीत. गैरअर्जदार क्रं.3 चे वकीलांनी युक्तिवाद केला. मात्र गैरअर्जदार क्रं.1 व 2 यांनी लेखी युक्तिवाद दाखल केला.
#####- का र ण मि मां सा -#####
सदर प्रकरणातील बहुतांश बाबी एकमेकांस मान्य आहे. जसे विमा दावा, वाहनाचा अपघात इत्यादी सर्व बाबी यातील दोन्ही पक्षांना मान्य आहे. गैरअर्जदार म्हणतात त्याप्रमाणे तक्रारदारास रुपये 77,000/- एवढी रक्कम विमा दाव्यापोटी दिलेली आहे आणि ती दिलेली रक्कम नुकसान भरपाई बद्दल आहे. हे बरोबर आहे काय ?
तक्रारदाराने यासंबंधी सर्व गैरअर्जदारांना नोटीस दिली होती मात्र गैरअर्जदारांनी त्या नोटीसला कोणतेही उत्तर दिले नाही जेव्हा की अशा प्रकारे रुपये 77,000/- एवढी रक्कम तक्रारदारास दिलेली ही बाब नोटीसचे उत्तरात स्पष्ट करुन नाकारता आली असती. याबाबत गैरअर्जदाराने या प्रकरणात असे कोणताही दस्तऐवज दाखल केले नाही की, ज्याद्वारे तक्रारदारास रुपये 77,000/- एवढी रक्कम दिली हे सिध्द होईल. तक्रारदाराने आपले प्रतिउत्तरात ही बाब स्पष्ट केलेली नाही की त्यांना गैरअर्जदार म्हणतात त्याप्रमाणे त्यांना कोणतीही रक्कम प्राप्त झालेली नाही. त्यानंतर गैरअर्जदार यांनी या प्रकरणात दस्तऐवज दाखल करुन तक्रारदारास अशी रक्कम दिल्याची बाब सिध्द करणे गरजेचे होते. त्यांनी तसे केल्याचे दिसुन येत नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्रं.1 व 2 यांचा त्यासंबंधीचा उजर हा निरर्थक ठरतो.
यातील तक्रारदाराचे म्हणण्याप्रमाणे त्यांचे वाहनाचे एस्टीमेट हे लागणा-या खर्चाचे अंदाजपत्रक रुपये 2,97,090/- एवढे होते ते प्रत्यक्ष खर्चापेक्षा जास्त असु शकते कारण असे अंदाजपत्रके बनवित असतांना सर्वसाधारणपणे जास्त खर्च दाखविण्याची पध्दत अवलंबली जाते. सर्व्हेअरने आपले अहवालात स्पष्टपणे नमुद केले आहे की, वाहनाचे स्टिल केबिन हे अत्यंत वाईटदृष्टया अपघातग्रस्त झालेले आहे. डब्ल्यु/एस काच तुटलेला आहे. उजव्या व डाव्या बाजुकडील दारे तुटताट झालेली आहेत. केबीनची उजव्या डाव्या व मागील बाजु तुटुन बरेच नुकसान झालेले आहे. डॅश बोर्ड तुटला आहे. असे असतांना तक्रारदाराच्या वाहनाचे नुकसानीची केबीन सबंधी अपेक्षीत रक्कम 1,81,000/-एवढी दाखविलेली सदर रक्कम सर्व्हेअर कडुन केवळ 42,000/- दर्शविलेली आहे ती का एवढी कमी केलेली आहे त्याचे संबंधी खुलासा केलेला नाही. त्यांचे सर्व्हेअरच्या अहवालामधे इतर अनेक बाबतीत खर्चाची रक्कम का कमी दर्शविली हे याप्रकरणात समोर आलेले नाही. त्यामुळे सव्हेअर यांचा हा अहवाल पुर्णतः चुकीचा आहे व अवास्तव असा दिसुन येतो. त्यामुळे लागलेली मजुरी खर्चाची रक्कम रुपये 19,200/- दर्शवुन रुपये 10,500/- एवढेच मुल्यांकन का काढले याचे कोणतेही कारण दिसुन येत नाही. थोडक्यात हा अहवाल अयोग्य आहे असे दिसते. सर्व्हेअरच्या म्हणण्याप्रमाणे वाहनाचे गंभीर नुकसान झालेले आहे ही बाब लक्षात घेतली तर तक्रारदारास देऊ केलेले रुपये 77,000/- ही अत्यंत कमी रक्कम आहे. मात्र यात गैरअर्जदाराने सर्व्हेअरचा प्रतिज्ञालेख दाखल केला नाही. तक्रारदाराने एकुण खर्चाचे रुपये 2,97,090/- दिलेले असुन ते जास्त आहे असे गृहीत धरले तरीही वाहनाचे एकंदरित नुकसान भरपाईकरिता सदरची रक्कम ही 2,00,000/- पर्यत विचारात घेण्यास या मंचास कोणत्याही प्रकारचे अयोग्य वाटत नाही. या 2,00,000/- रक्कमेपैकी रुपये 20,000/- एवढी रक्कम घसा-यापोटी 10टक्के या हिशोबानेही नुकसानीची रक्कम 1,80,000/- एवढी होते. आणि यातुन सर्व्हेअरच्या म्हणण्याप्रमाणे भंगाराची रक्कम 1,154/-वगळता राहीलेली रक्कम ही (2,00,000-20,000)= 1,80,000-1154 = 1,78,846 एवढी रक्कम तक्रारदाराला विम्यादाव्यापोटी नुकसानीची रक्कम म्हणुन मिळणे गरजेचे आहे असे आमचे मत आहे. तक्रारदाराला गैरअर्जदाराने ही रक्कम न देऊन आपल्या सेवेत गंभीर त्रुटी ठेवलेली आहे तसेच वाहन पडुन आहे ते वापरण्यात आले नाही. त्यामुळे तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे.
वरील परिस्थितीचा विचार करता आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. तक्रारदारास रुपये 1,78,846/- एवढी रक्कम गैरअर्जदार क्रं.1 व 2 यांनी तक्रारदारास विमा दाव्याच्या नुकसानीपोटी द्यावी. त्यावर तक्रार दाखल दिनांक 3/2/2011 पासुन द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने मिळुन येणारी रक्कम आदेश प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत द्यावी.
3. गैरअर्जदार क्रं.1 व 2 ने तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणुन रुपये 40,000/- (केवळ चाळीस हजार रुपये) आणि तक्रारीचा खर्च म्हणुन रुपये 2,000/- (केवळ दोन हजार रुपये) असे एकुण 42,000/-रुपये द्यावे.
4. तक्रारदाराच्या इतर मागण्या अमान्य करण्यात येतात.
वरील आदेशाचे पालन गैरअर्जदार यांनी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसांचे आत करावे.