नि. 17 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 166/2010 नोंदणी तारीख – 14/7/2010 निकाल तारीख – 7/9/2010 निकाल कालावधी – 53 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री प्रशांत शिवाजी कानडे मु.पो. लोणंद ता. खंडाळा जि.सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री अमोल माने) विरुध्द श्री अमित देशमुख मॅनेजर, श्रीराम फायनान्स कं.लि. प्लॉट नं.13/16, गजानन चेंबर्स, दुसरा मजला, विसावा नाका, सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री उमेश शिंदे) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार हे लोणंद येथील कायमचे रहिवासी आहेत. जाबदार ही फायनान्स कंपनी आहे. अर्जदार यांनी टेंपो या वाहन खरेदीसाठी जाबदार यांचेकडून रु.1,45,000/- कर्ज घेतले होते. परंतु त्यांना व्यवसायामध्ये नुकसानी झाल्यामुळे सदर कर्जाचे हप्ते वेळेवर भरता आले नाहीत. अर्जदार यांनी रु.94,000/- जाबदार यांचेकडे कर्जापोटी भरलेले असतानाही जाबदार यांनी सदरचे कर्ज अर्जदार यांना नवे-जुने करावयास लावले. परंतु सदरचे कर्जखात्याचा उतारा जाबदार यांचेकडे मागितला असता त्यांनी खाते उतारा न देता कर्जाचे कागदपत्रांवर सहया करण्यास भाग पाडले. तदनंतर मागणी करुनही जाबदार यांनी कर्जखात्याचा उतारा दिला नाही. म्हणून अर्जदार यांनी माहितीचे अधिकाराखाली जाबदार यांचेकडे खातेउता-याची मागणी केली असता त्यांनी नवीन खात्याचा उतारा अर्जदार यांना दिला. अशा प्रकारे जाबदार यांनी जुन्या कर्जाचा उतारा अर्जदार यांना अद्यापही दिलेला नाही. सबब जुन्या कर्जखात्याचा उतारा मिळावा, नुकसानीदाखल रु.10,000/- मिळावेत, तसेच मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम मिळावी यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि. 10 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. अर्जदार यांनी पूर्वी घेतलेले कर्ज थकीत राहिल्याने अर्जदार यांनी स्वतःहून नवीन कर्जप्रकरण करुन जुने थकीत कर्ज भागविण्याची विनंती केली. व त्यानुसार सदरचे नवीन कर्जाची रक्कम जुन्या कर्जखात्यात जमा केली व उर्वरीत रक्कम स्वतःकडे घेतली. सदरची बाब अर्जदार यांनी या मंचापासून लपवून ठेवली आहे. चालूकर्जखात्याचा उतारा देण्यास जाबदार हे तयार होते व आहेत. जुने कर्ज खाते बंद झाल्यामुळे त्याचा खातेउतारा अर्जदार यांना मागता येणार नाही. अर्जदार यांनी नवीन कर्जाचे हप्तेही सुरुवातीपासून थकविलेले आहेत. ट्रकचा वापर व्यावसायिक कारणासाठी अर्जदार करीत असल्याने अर्जदार हा ग्राहक होत नाही, सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 3. अर्जदारतर्फे दाखल लेखी युक्तिवाद नि.16 ला पाहिला. जाबदारतर्फे वकील श्री शिंदे. यांनी केलेला युक्तिवाद ऐकला. 4. अर्जदारतर्फे दाखल करण्यात आलेले शपथपत्र नि. 2 ला पाहिले. अर्जदारतर्फे दाखल केलेली नि. 5 सोबतची कागदपत्रे, नि. 15 चे प्रत्युत्तर पाहिले. जाबदारतर्फे दाखल शपथपत्र नि. 11 ला पाहिले. तसेच जाबदारतर्फे दाखल नि. 12 सोबतची कागदपत्रे पाहिली. 5. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय, ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? नाही. क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. कारणे 6. अर्जदार यांचे तक्रारअर्जातील कथन पाहता अर्जदार यांनी जाबदार यांचेकडून त्यांचे वाहनासाठी कर्ज घेतलेले होते. सदरचे कर्ज थकीत झाल्याने त्यांनी पुन्हा नवीन कर्ज जाबदार यांचेकडून घेतले व जुने कर्ज भागविले. सदरच्या जुन्या कर्जखात्याचा उतारा जाबदार यांचेकडून मिळावा अशी अर्जदार यांची मागणी आहे. 7. जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये असे कथन केले आहे की, अर्जदार यांनी जुने कर्ज थकीत ठेवलेले होते ते कर्ज भागविणेसाठी अर्जदार यांनी स्वतःहून जाबदार यांचेकडून नवीन कर्ज घेतले व त्या कर्जरकमेतून त्यांनी जुने कर्ज भागविले. सदरचे नवीन कर्जही अर्जदार यांनी थकीत ठेवले आहे. सदरचे नवीन कर्जाचे खात्याचा उतारा देण्यास जाबदार तयार आहेत. जुन्या कर्जाची परतफेड केलेली असल्याने जुन्या कर्जाचा खातेउतारा अर्जदार यांना मागता येणार नाही. 8. अर्जदार यांचे तक्रारअर्जातील व जाबदार यांचे कैफियतीतील मजकूर पाहता अर्जदार यांनी जुने कर्ज फेडून नवीन कर्ज घेतलेले आहे व सध्या नवीन कर्जखाते अस्तित्वात आहे. परंतु अर्जदार यांनी त्यांचे तक्रारअर्जामध्ये जुन्या कर्जखात्याचे उता-याची मागणी केली आहे. अर्जदार यांना जुन्या कर्जखात्याचा उतारा आवश्यक होता तर त्यांनी तो नवे कर्ज घेण्यापूर्वीच जाबदार यांचेकडून का घेतला नाही याचा खुलासा त्यांनी तक्रारअर्जामध्ये केलेला नाही. नवीन कर्ज काढणेपूर्वी प्रथम अर्जदार यांनी जुन्या कर्जखात्याचा उतारा जाबदार यांचेकडून घेणे आवश्यक होते. व नंतरच नवीन कर्जप्रकरण करावयाचे होते. परंतु तसे न करता अर्जदार यांनी नवीन कर्ज घेवून त्या रकमेतून जुने कर्ज भागविलेचे व तदनंतर जुन्या कर्जखात्याचे उता-याची मागणी जाबदार यांचेकडे केल्याचे दिसून येते. सदरची मागणी ही अर्जदार यांनी पश्चातबुध्दीने केली असल्याचे दिसून येते. वरील कारणांचा विचार करता जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे हे अर्जदार शाबीत करु शकलेले नाहीत असे या मंचाचे मत आहे. सबब तक्रारअर्ज फेटाळणेस पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. 9. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत येत आहे. 2. खर्चाबाबत काहीही आदेश करणेत येत नाहीत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 7/9/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |