निकालपत्र :- (दि.18/06/2011) ( सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला हे वकीलांमार्फत सदर मंचापुढे उपस्थित राहिले. त्यांनी म्हणणे दाखल केले. उभय पक्षांनी लेखी युक्तीवाद दाखल केला. उभय पक्षकारांचे वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. सदरची तक्रार कायदेशीर प्रक्रियाशिवाय बळाचे जोरावर सामनेवाला यांनी वाहन ओढून नेऊ नये व वाहनाची एन.ओ.सी.मिळणेसाठी दाखल केलेली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- तक्रारदार हे नमुद पत्त्यावर कायमपणे त्यांची पत्नी, आई, वडील व मुले यांचेसह रहात आहेत. तक्रारदार व्यवसायाने ट्रक चालक आहेत. ट्रक चालवून येणा-या पैशातून ते त्यांचा व कुटूंबियांचा उदरनिर्वाह करतात. तक्रारदार यांनी व्यवसायाकरिता ट्रक घेणेकरिता सामनेवाला यांचेशी चर्चा केली व सामनेवाला यांनी तक्रारदारास ट्रक खरेदी करणेसाठी अर्थ पुरवठा करणेचे मान्य व कबूल केल व त्याप्रमाणे उभय पक्षकारांमध्ये लेखी करार होऊन सामनेवाला यांनी तक्रारदारास ट्रक खरेदीसाठी रु.1,86,000/- चा अर्थपुरवठा करणेचे निश्चित केले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी वाहन प्रकार क्र.00017, चेसीसी नंबर 360324HT6728095, इंजिन नंबर-697D23HT6789857,वाहनाचा रंग-पांढरा-चॉकलेटी, वाहनाचा रजिस्टर नंबर- MH-09-9305रजिस्ट्रेशन दि.1996/10 याप्रमाणे तक्रारदाराने ट्रक खरेदी करुन स्वत:चा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरु केला. तक्रारदार यांचे कर्जाची मुदत दि.20/12/2008 ते 20/09/2012 पर्यंत आहे. तक्रारदाराने आजपर्यंत रु.3,21,708/- पैकी रु.1,00,000/- इतकी रक्कम जमा केलेली आहे. उर्वरित रक्कम रु.1,50,300/- एक रकमी जमा करुन N.O.C. घेणेस तक्रारदार सामनेवाला कंपनीत गेले असता सामनेवाला यांनी अवास्तव दंड व्याज लावून रक्कम रु.3,00,000/- जमा करा. त्याशिवाय N.O.C. देणार नाही. गाडी ओढून नेण्याची धकमी दिली व रक्कम जमा करुन घेतली नाही. सबब सामनेवाला यांनी वर नमुद ट्रक बेकायदेशीरपणे, अनाधिकाराने, जबरदस्तीने स्वत: किंवा तर्फे इसमांचे मार्फत ओढून नेऊ नये अशी सदर तक्रार अर्जाचे निकालापावेतो कायम मनाई ताकीद व्हावी. तसेच उर्वरित कर्जाची रक्कम अवास्तव दंड व्याज रक्कम मकी होऊन उर्वरित रक्कम जमा करुन घेऊन सामनेवालांना N.O.C. देणेबाबतचा आदेश व्हावा तसेच तक्रार अर्जाचा खर्च व नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.20,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत तक्रारदाराचा सामनेवाला यांचेकडील कर्जाचा खातेउतारा दाखल केला आहे. तसेच रिजॉइन्डर दाखल केला आहे. (4) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या आपले लेखी म्हणणेनुसार तक्रारदार यांनी खोटी विधाने करुन मे.कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे व स्वत:ची चुक सामनेवाला यांचे माथी मढवत आहेत. सबब तक्रारदारांचा सदरचा तक्रार अर्ज मे. कोर्टात न्यायीक तत्वावर व वस्तुस्थितीन्वये चालण्यास पात्र नाही. सामनेवालांनी तक्रार अर्ज कलम 2 मधील काही अंश मजकूर मान्य व कबूल केला आहे. मात्र कलम 3 ते 6 मधील मजकूर मान्य व कबूल नसलेचे प्रतिपादन केले आहे. तक्रार अर्जातील संपूर्ण मजकूराचा सामनेवाला हे स्पष्टपणे इन्कार करतात. (5) सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, यातील सामनेवालांकडे तक्रारदार यांनी तक्रारीत नमुद वाहन ट्रान्सपोर्ट धंदयाकरिता वापरणार असलेचे सांगून कर्ज घेतले. सामनेवाला कंपनी ही कंपनी कायदयाअंतर्गत नोंदणीकृत फायनान्स कंपनी असून सदर कंपनीचे मुख्य कार्यालय चेन्नई येथे असून तसेच क्षेत्रीय कार्यालय बेलापूर नवी मुंबई येथे आहे. तसेच शाखा कार्यालय कोल्हापूर येथे आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारास कंपनीचे नियमावलीबद्दल सांगितले होते तसेच सदर कंपनी ही फक्त हेवी कमर्शिअल मोटर व्हेईकल करीताच फक्त वित्त पुरवठा करते हेसुध्दा सांगितले होते. तक्रारदार व जामीनदार यांनी सामनेवाला कंपनीचे करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. सबब सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देण्यास कोणत्याही प्रकारची त्रुटी केलेली नाही.तसेच प्रस्तुतची तक्रार सामनेवाला यांना नाहक त्रास देण्याचे हेतूने तसेच मे. मंचाची दिशाभूल करुन कोणतातरी आदेश पारीत करुन घेण्याच्या दुष्ट हेतूने दाखल केलेली आहे. तसेच प्रस्तुतची तक्रार मे. मंचात चालणेस पात्र नाही. (6) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये झालेला करार क्र.KLPR811170004 व सदर वाहनाचे हायर लेजर डिटेल्स व स्टेटमेंट इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहे. (7) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, रिजॉइन्डर, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे दाखल कागदपत्रे, उभय पक्षांचा लेखी युक्तीवाद व तक्रारदारचे वकीलांचे तोंडी युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय. 2. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1:- तक्रारदाराने तक्रारीमध्ये सामनेवाला फायनान्स कंपनीकडून टाटा मोटर्स क्र.00017 चेसीसी नंबर360324HT6728095, इंजिन नंबर-697D23HT6789857,वाहनाचा रंग-पांढरा-चॉकलेटी, वाहनाचा रजिस्टर नंबर- MH-09-9305रजिस्ट्रेशन दि.1996/10 नमुद वर्णनाचे वाहन खरेदीकरणेसाठी रु.1,86,000/-इतके कर्ज घेतलेले होते. सदर कर्जाची मुदत दि.20/12/2008 ते 20/09/2012 पर्यंत असून तक्रारदाराने आजपर्यंत रु.3,21,708/- पैकी रु.1,00,000/- इतकी रक्कम जमा केलेली आहे. उर्वरित रक्कम रु.1,50,300/-एक रकमी जमा करुन N.O.C. ची मागणी केली असता रु.3,00,000/- भरणा केलेनंतरच एन.ओ.सी. देणेत येईल अन्यथा गाडी ओढून नेणेची धमकी दिली आहे असे प्रतिपादन तक्रारदाराने केले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार व त्यांचेमध्ये झालेले दि.30/10/2007 रोजीचे कर्ज करार क्र.KLPR811170004 ची प्रत व खाते उतारा दाखल केलेला आहे. सदर कर्जकरारप्रतीचे अवलोकन केले असता सामनेवालांनी प्रस्तुत वाहन घेणेसाठी रक्कम रु.1,86,000/- इतका कर्ज पुरवठा केलेला आहे. एफसी रक्कम व्याजदर 19.20 टक्के प्रमाणे रु.1,07,136/- इतके आहे. अॅग्रीमेंट व्हॅल्यू रु.2,93,136/- नमुद केलेली आहे. प्रस्तुत कर्जाची परतफेड ही 46 मासिक हप्त्यामध्ये करणेची आहे. सदर कर्ज हप्ता परत फेडीचे वेळापत्रकाप्रमाणे प्रतिमाह रु.8,143/- प्रमाणे पहिले 1 ते 5 हप्ते दर महिन्याच्या वीस तारखेस माहे डिसेंबर-2008 ते एप्रिल-2009 अखेर अदा करणेचे आहे. तसेच रु.6,921/- प्रमाणे 6 ते 45 असे एकूण 40 हप्ते मे-09 ते ऑगस्ट-12 अखेर अदा करणेचे आहेत. तर 46 वा हप्ता 20/09/2012 अखेर शेवटचा रु.4,153/- अदा करणेचा आहे. प्रस्तुत एकूण मासिक हप्ते 46 हे दि.20/12/2008 ते 20/09/2012 अखेर अदा करणेचे आहेत हे दाखल कर्जकरार प्रतिवरुन निर्विवाद आहे. तक्रारदाराने दाखल खातेउता-याचे अवलोकन केले असता तक्रारदाराने रक्कम रु.98,368/- इतकी रक्कम भरलेचे दिसून येते. मात्र तक्रारदाराने भरणा पावत्या दाखल केलेल्या नाहीत. तक्रारदाराने दाखल केलेला खातेउतारा व सामनेवाला यांनी दाखल केलेला खातेउताराच्या रचनेत व नोंदणीत फरक आढळून येतो. सामनेवाला यांनी दाखल केलेल्या कर्ज करारपत्राबरोबर दाखल केलेल्या खातेउता-यामध्ये व तक्रारदाराने दाखल केलेल्या खातेउता-यामध्ये कर्ज रक्कम बरोबर आहे. कर्जकरारपत्रावर 19.20 टक्के चा उल्लेख असून तक्रारदाराचे खातेउता-यावर 19.03 टक्केचा उल्लेख आहे व 46 हप्तयांची नोंद आहे तर सामनेवाला यांचे कर्जकरारपत्रासोबत असणा-या खातेउता-यावर 36 प्रतिमासिक हप्ते देणेचे आहे. मात्र शेडयूल 3 नुसार सदर हप्ते 46 मासिक हप्त्यामध्ये कर्ज फेड करणेची आहे. तसेच तक्रारदाराचे कर्जखातेउता-यावर अॅग्रीमेंट व्हॅल्यू रु.3,21,708/- इतकी नोंद असून यामध्ये फायनान्स चार्जेस रु.1,35,708/- ची नोंद आहे. तर सामनेवाला यांचेकडील कर्जकरारपत्रानुसार अॅग्रीमेंट व्हॅल्यू ही रु.2,93,136/- असून फायनान्स चार्जेस रु.1,07,136/- अशी नोंद आहे. अशा प्रकारे ब-याच तफावती नोंदीमध्ये आढळून आलेल्या आहेत. हीसुध्दा सामनेवालांचे सेवेतील गंभीर त्रुटी आहेत. तसेच हप्त्यांमधून तक्रारदाराचे कर्ज खातेवर केवळ जमा एवढयाच रक्कमेची नोंद असून सामनेवाला यांनी दाखल केलेल्या कर्ज खातेवर आरआय ओडीसी अशाप्रकारे रक्कमांची फोड करुन दाखविलेली आहे. सामनेवाला फानयान्स कंपनीचे खातेउता-याचे अवलोकन केले असता प्रस्तुत खातेउतारे हे प्रचलित असणा-या Book Keeping and Accounting च्या पध्दतीस अनुसरुन नाहीत सदर खातेउताहे हे सर्वसामान्य माणसाला किंवा ग्राहकाला आकलन होत नाही. त्यासाठी सामनेवालांचे प्रतिनिधींनी काही संज्ञांचा खुलासा केला. यामध्ये Recd- Received, RI-Regular Installment, ODC-Over Due Charges, Cl bal- Closing Balance, INS-Insurance, FC-Financial Charges अशाप्रकारे संज्ञा स्पष्ट केलेल्या आहेत. वस्तुत: कर्ज खातेवर रोखीत रक्कमा जमा केल्या असतील तर By Cash धनादेशाने जमा केल्या असतील तर By Cheque कर्ज खातेवरुन काही रक्कमा जमा अथवा नांवे वर्ग केल्या असतील तर By Transfer अशा प्रकारच्या नोंदी प्रचलीत आहेत. तसेच त्याबाबत पावत्यांचे नंबर नोंद केले जातात. सदर पावत्यावंर प्रस्तुत रक्कम रोखीत धनादेशाने अथवा वर्ग करुन आली हे स्पष्टपणे नमुद केले जाते व तशा स्वरुपाच्या नोंदी नमुद खात्यावर जमा अथवा नांवे नोंदविल्या जातात. तसेच कर्ज करारप्रमाणे असणा-या दंड अथवा अन्य आकारांची स्पष्टपणे नोंद केली जाते. यामध्ये धनादेशाचा अनादर, विलंबाने हप्ता दाखल केलेबाबतचा दंड आकार, विमा हप्ता अदा करावयाचा असेल तर त्याची नोंद तसेच अन्य अनुषंगिक जमा अथवा खर्चाच्या नोंदी स्पष्टपणे नमुद केल्या जातात. अशा नोंदी सर्व सामान्य माणसाच्यासुध्दा खातेउता-याचे अवलोकन केले असता लक्षात येऊ शकतात. प्रस्तुत खातेउता-याचे अवलोकन केले असता अशा प्रकारच्या प्रचलीत हिशोब ठेवण्याच्या पध्दतीचा अवलंब सामनेवाला यांनी केलेचा दिसून येत नाही. प्रस्तुत खातेउता-यावरुन प्रथमदर्शनी सदर नोंदीचा कोणताही बोध होत नाही. अशा प्रकारच्या वर नमुद कर्ज खातेच्या नोंदी बाबतची पध्दती राबवून प्रकारच्या ग्राहकाभिमुख सेवा देणेचे कायदेशीर कर्तव्य सामनेवाला कंपनीचे असतानाही त्यांनी ते पार पाडलेले नाही. सामनेवाला यांनी सदर भरणा पावत्यांनुसार जमा केलेल्या रक्कमेमधून रेग्यूलर इन्स्टॉलमेंट, ओव्हर डयू चार्जेस, इन्शुरन्स अशा रक्क्मा कपात करुन घेतलेचे दिसून येते. तसेच सामनेवाला यांनी दाखल केलेले करारपत्रातील करारपत्रासोबत असणा-या खातेउता-यामध्ये पॅरेंन्ट लोन सेटलमेंट, चार्इल्ड लोन सेटलमेंट अशाप्रकारच्या नोंद आहेत. या रक्कमा कशाच्या आहेत याचा बोध होत नाही. तसेच पॅरन्ट लोनमध्ये रु.3,71,540/- पैकी रु.93,850/- इतकी रक्कम गोळा केलेली आहे व रु.2,77,690.32/- अदयापी देय असलेची नोंद आहे. त्याचप्रमाणे त्याखाली वेगवेगळया आकाराची नोंद केलेली आहे. ज्याचा उल्लेख प्रस्तुत करारात केलेला नाही ही सामनेवालांचे सेवेतील गंभीर त्रुटी आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या खातेउता-यावरुन त्याने वेळोवेळी दि.20/06/2010 अखेर रु.93,368/- इतक्या रक्कमेचा भरणा केलेचे दिसून येते. यावरुन तक्रारदाराची सदर कर्ज फेडीची प्रामाणिक इच्छा दिसून येते. तसेच सामनेवाला यांनी दाखल केलेल्या कर्ज खातेउता-यावर पॅरेन्ट लोन म्हणून रु.2,36,147/- पैकी रु.79,562/- गोळा केलेचे व रु.1,56,585/- देय असलेची नोंद दिसून येते. अशी वस्तुस्थिती असतानाही सामनेवाला यांनी तक्रारदार हा उर्वरित रक्कम रु.1,50,300/- एकरकमी रक्कम भरुन घेऊन एनओसी घेणेस गेला असता सामनेवाला यांनी त्यास सहकार्य केले नाही. वस्तुत: सदर कर्जाची मुदत 20/09/2012 अखेर आहे. त्यामुळे तक्रारदार हा मुदत पूर्व कर्ज फेडणेसाठी गेला होता ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. उलट उर्वरित रक्कम रु.3,00,,000/- जमा करा त्याशिवाय एनओसी देणार नाही अन्यथा गाडी ओढून नेऊ अशी धमकी दिली आहे. या बाबींचा विचार करता सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेमध्ये प्रिपेमेंट, फोरक्लोजरसाठी 3 टक्के रक्क्म भरुन घेऊन खाते बंद करणेची तरतुद आहे असे नमुद केले आहे. मात्र सामनेवाला यांनी सदर तरतुदीस अधीन राहून कार्यवाही केलेली नाही. याउलट एक महिना आगाऊ नोटीस देणेची गरज होती असे प्रतिपादन केलेले आहे. याचा विचार करता प्रस्तुत करारपत्राच्या प्रती कर्जदारांना दिल्या जात नाहीत ही वस्तुस्थिती ब-याच प्रकरणात या मंचासमोर आलेली आहे. सामनेवाला यांनी त्याचवेळी जर तक्रारदारास सहकार्य केले असते तर प्रस्तुतची तक्रार दाखल झाली नसती ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. सबब तक्रारदार ग्राहकाला ग्राहकाभिमूख सेवा देणेबाबत सामनेवाला यांनी अक्षम्य कसूर केलेला आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला यांनी त्यांचे लेखी युक्तीवादामध्ये अकौन्ट सेंटलमेंट करता येणार नाही. सामनेवाला यांनी कर्मशिअल मोटर वहेईकल करीता वित्त पुरवठा केलेला आहे. त्यामुळे तक्रारदाराने सदरचे वाहन हे वाणिज्य हेतूने घेतलेने तो ग्राहक नाही. अशाप्रकारचा आक्षेप घेतलेला आहे. याचा विचार करता तक्रारदार हा सामनेवाला कंपनीचा कर्जदार ग्राहक आहे. तक्रारदाराने सदरचे वाहन त्याच्या कुटूंबियांचे उदरनिर्वाहाकरिता खरेदी केले होते व सदर ट्रकच्या भाडेतून त्याचे कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत असलेचे त्याचे तक्रारीमध्ये स्पष्टपणे नमुद केले आहे. त्यामुळे सदर ट्रक हा त्याचे उपजिवीकेचे साधन असलेने वाणिज्य हेतूचा प्रश्न उदभवत नाही. त्यामुळे तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक आहे. तसेच सामनेवाला यांनी हिशोबाची मागणी मे; मंचास करता येणार नाही हा आक्षेप् घेतला आहे. सदर आक्षेपाचा विचार करता सामनेवाला व तक्रारदार यांचेमध्ये झालेल्या कर्जकरारपत्राप्रमाणे सामनेवालांनी तक्रारदारास कर्जसेवा दिलेली आहे. सबब त्याअनुषंगीक येणा-या कर्ज करारपत्राची प्रत देणे, तयाची माहिती देणे, अदयावत खातेउतारे देणे, कर्जदार ग्राहकांच्या कर्जखातेच्या हिशोबाबाबतच्या शंकाचे निरसन करणे, थकीत रक्कमांच्या हिशोबाचे निरसन करणे, मुदत पूर्व कर्ज फेडीबाबत कर्जदारांना सहकार्य करणे, माहिती देणे अशा प्रकारचे ग्राहकाभिमूख सेवा देण्याचे कायदेशीर कर्तव्य सामनेवाला कंपनीचे आहे व सदर सेवेचाच एक भाग म्हणून हिशोबाबाबत शंकाचे निरसन करणे तसेच कर्जकरारपत्राबाहेर जाउुन आकारलेल्या जादाच्या रक्कमा दंड, व्याज व इतर आकार याचा जाब विचारणेचा अधिकार निश्चितच ग्राहकाला आहे. कोणताही ग्राहक अथवा सामान्य व्यक्ती सहजासहजी कोर्टाची पायरी चढत नाही या बाबीचा विचार करता तक्रारदार हा कर्जदार असलेने त्याचे हक्काची पायमल्ली झालेने त्यास मे.मंचात यावे लागले आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. सबब सामनेवाला यांनी केलेले सर्व आक्षेप हे मंच फेटाळत आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारास मुदतपूर्व रक्कम फेड करणेबाबत योग्य ती माहिती दिलेली नाही तसेच सहकार्य केलेले ही या वस्तुस्थितीकडे तक्रारदाराने मंचाचे लक्ष वेधले आहे. याचा विचार करता थकीत कर्ज रक्कमेसाठी फायनान्स कंपन्यांकडून बळाचा वापर केला जातो. थकीत रक्कमांबाबत कायदेशीर प्रक्रिया राबवून कर्ज वसुली करणेचे सर्व अधिकार फायनान्स कंपनीला आहेत. मात्र सदर कायदेशीर प्रक्रिया धाबेवर बसवून मनमानी पध्दतीने आपण म्हणू तो कायदया अशा पध्दतीने कर्ज वसुली केली जाते; तसेच मुदत पूर्व कर्ज फेडीबाबत योग्य ते सहकार्य केले जात नाही या बाबीची गंभीर दखल घेऊन तक्रारदाराची तक्रार मंजूर करीत आहे व तक्रारदाराने तक्रारीत मागणी केलेप्रमाणे तक्रारदाराकडून कायदेशीररित्या असणारी कर्जाची रक्कम कोणतेही दंडव्याज व इतर आकार न घेता भरुन घेऊन तक्रारदारास एनओसी दयावी. तसेच तोपर्यंत तक्रारदाराचे वाहन सामनेवाला यांनी जप्त करु अथवा ओढून नेऊ नये या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवालांचे सेवात्रुटीमुळे तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला कंपनीने करारपत्राप्रमाणे असणारे कायदेशीर देणे रक्कम कोणतेही दंड, व्याज अथवा अन्य जादा आकार न आकारता भरुन घेऊन तक्रारदारास ना-हरकत प्रमाण्पत्र (एन. ओ.सी.) दयावे. 3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/-(रु.पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- (रु.एक हजार फक्त) त्वरीत अदा करावेत. 4) तक्रारदाराने प्रस्तुतची कायदेशीर देणे रक्कम 60 दिवसांचे आत भरणा करावी.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |