निकालपत्र :- (दि.21/06/2011) ( सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला हे वकीलांमार्फत सदर मंचापुढे उपस्थित राहिले. त्यांनी म्हणणे दाखल केले. उभय पक्षांनी लेखी युक्तीवाद दाखल केला. उभय पक्षकारांचे वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. सदरची तक्रार कायदेशीर प्रक्रियाशिवाय बळाचे जोरावर सामनेवाला यांनी वाहन ओढून नेऊ नये व वाहनाची एन.ओ.सी.मिळणेसाठी दाखल केलेली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी :- तक्रारदार हे नमुद पत्त्यावर कायमपणे त्यांची पत्नी, आई, वडील व मुले यांचेसह रहात आहेत. तक्रारदार व्यवसायाने ट्रक चालक आहेत. ट्रक चालवून येणा-या पैशातून ते त्यांचा व कुटूंबियांचा उदरनिर्वाह करतात. तक्रारदार यांनी व्यवसायाकरिता नविन ट्रक घेणेकरिता सामनेवाला यांचेशी चर्चा केली व सामनेवाला यांनी तक्रारदारास ट्रक खरेदी करणेसाठी अर्थ पुरवठा करणेचे मान्य व कबूल केल व त्याप्रमाणे उभय पक्षकारांमध्ये लेखी करार होऊन सामनेवाला यांनी तक्रारदारास ट्रक खरेदीसाठी रु.1,20,000/- चा अर्थपुरवठा करणेचे निश्चित केले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी टाटा मोटर्स 000237 चेसीसी नंबर 36052373053, इंजिन नंबर-69002385665,वाहनाचा रंग-लालसर, वाहनाचा रजिस्टर नंबर- MH-09-L-3665. याप्रमाणे तक्रारदाराने नवीन ट्रक खरेदी करुन स्वत:चा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरु केला. तक्रारदार यांचे कर्जाची मुदत दि.01/2/2007 ते 01/04/2011 पर्यंत आहे. तक्रारदाराने आजपर्यंत रु.1,95,984/- पैकी रु.1,76,607/- इतकी रक्कम जमा केलेली आहे. उर्वरित रक्कम रु.19,277/- एक रकमी जमा करुन N.O.C. घेणेस तक्रारदार सामनेवाला कंपनीत गेले असता सामनेवाला यांनी रु.1,00,000/- जमा करा. त्याशिवाय N.O.C. देणार नाही. गाडी ओढून नेण्याची धमकी दिली व रक्कम जमा करुन घेतली नाही. सबब सामनेवाला यांनी वर नमुद ट्रक बेकायदेशीरपणे, अनाधिकाराने, जबरदस्तीने स्वत: किंवा तर्फे इसमांचे मार्फत ओढून नेऊ नये अशी सदर तक्रार अर्जाचे निकालापावेतो कायम मनाई ताकीद व्हावी. तसेच उर्वरित कर्जाची रक्कम रु.19,277/- जमा करुन घेऊन सामनेवालांना N.O.C. देणेबाबतचा आदेश व्हावा तसेच तक्रार अर्जाचा खर्च व नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.20,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत तक्रारदाराचा सामनेवाला यांचेकडील कर्जाचा खातेउतारा दाखल केला आहे. तसेच रिजॉइन्डर दाखल केला आहे. (4) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या आपले लेखी म्हणणेनुसार तक्रारदार यांनी खोटी विधाने करुन मे.कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे व स्वत:ची चुक सामनेवाला यांचे माथी मढवत आहेत. सबब तक्रारदारांचा सदरचा तक्रार अर्ज मे. कोर्टात न्यायीक तत्वावर व वस्तुस्थितीन्वये चालण्यास पात्र नाही. सामनेवालांनी तक्रार अर्ज कलम 2 मधील काही अंश मजकूर मान्य व कबूल केला आहे. मात्र कलम 3 ते 6 मधील मजकूर मान्य व कबूल नसलेचे प्रतिपादन केले आहे. तक्रार अर्जातील संपूर्ण मजकूराचा सामनेवाला हे स्पष्टपणे इन्कार करतात. (5) सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, यातील सामनेवालांकडे तक्रारदार यांनी तक्रारीत नमुद वाहन ट्रान्सपोर्ट धंदयाकरिता वापरणार असलेचे सांगून कर्ज घेतले. सामनेवाला कंपनी ही कंपनी कायदयाअंतर्गत नोंदणीकृत फायनान्स कंपनी असून सदर कंपनीचे मुख्य कार्यालय चेन्नई येथे असून तसेच क्षेत्रीय कार्यालय बेलापूर नवी मुंबई येथे आहे. तसेच शाखा कार्यालय कोल्हापूर येथे आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारास कंपनीचे नियमावलीबद्दल सांगितले होते तसेच सदर कंपनी ही फक्त हेवी कमर्शिअल मोटर व्हेईकल करीताच वित्त पुरवठा करते हेसुध्दा सांगितले होते. तक्रारदार व जामीनदार यांनी सामनेवाला कंपनीचे करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. सबब सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देण्यास कोणत्याही प्रकारची त्रुटी केलेली नाही.तसेच प्रस्तुतची तक्रार सामनेवाला यांना नाहक त्रास देण्याचे हेतूने तसेच मे. मंचाची दिशाभूल करुन कोणतातरी आदेश पारीत करुन घेण्याच्या दुष्ट हेतूने दाखल केलेली आहे. तसेच प्रस्तुतची तक्रार मे. मंचात चालणेस पात्र नाही. (6) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये झालेला करार क्र.TSLKLPR0001637 व सदर वाहनाचे हायर लेजर डिटेल्स व स्टेटमेंट इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहे. (7) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, रिजॉइन्डर, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे दाखल कागदपत्रे, उभय पक्षांचा लेखी युक्तीवाद व तक्रारदारचे वकीलांचे तोंडी युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय. 2. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1:- तक्रारदाराने तक्रारीमध्ये सामनेवाला फायनान्स कंपनीकडून टाटा मोटर्स 000237 चेसीसी नंबर 36052373053, इंजिन नंबर-69002385665, वाहनाचा रंग-लालसर, वाहनाचा रजिस्टर नंबर- MH-09-L-3665 नमुद वर्णनाचे वाहन खरेदीकरणेसाठी रु.1,20,000/- इतके कर्ज घेतलेले होते. सदर कर्जाची मुदत दि.01/2/2007 ते 01/04/2011 पर्यंत असून तक्रारदाराने आजतागायत रु.1,95,984/- पैकी रु.1,76,607/- जमा केली असून देणे बाकी रु.19,277/- इतकी आहे. सदर रक्कम भरुन घेऊन एन.ओ.सी.ची मागणी केली असता रु.1,00,000/- भरणा केलेनंतरच एन.ओ.सी. देणेत येईल अन्यथा गाडी ओढून नेणेची धमकी दिली आहे असे प्रतिपादन तक्रारदाराने केले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार व त्यांचेमध्ये झालेले दि.30/10/2007 रोजीचे कर्ज करार क्र.TSLKPR0000465 ची प्रत व खाते उतारा दाखल केलेला आहे. सदर कर्जकरार प्रतीचे अवलोकन केले असता सामनेवालांनी प्रस्तुत वाहन घेणेसाठी रक्कम रु.1,20,000/- इतका कर्ज पुरवठा केलेबाबत शेडयुल-1 मध्ये नमुद आहे. शेडयूल-2 मध्ये नमुद वाहनाचे वर्णन नोंद केलेले आहे. शेडयूल-3 मध्ये कर्ज रक्कम रु.1,20,000/- व्याजदर प्रतिवर्ष 13.65 टक्के. सदर व्याजदर हा महिन्याचे शिल्लक मुद्दल रक्कमेवर आकारणेबाबत नोंद आहे. चेक अनादर झाल्यास रु.200/- इतका दंडाची नोंद आहे. तसेच प्रति मासिक हप्ते भरणेबाबतचे वेळापत्रक नमुद केले आहे. सदर वेळापत्रकानुसार दि.01/12/2007 ते 01/04/2011 पर्यंत दर महिन्याचे एक तारखेस 41 हप्त्यामध्ये परत फेड करणेची आहे. सदर कर्ज हप्ता परत फेडीचे वेळापत्रकाप्रमाणे प्रतिमाह रु.7,113/- प्रमाणे पहिले 1 ते 12 हप्ते दर महिन्याच्या एक तारखेस माहे डिसेंबर-2007 ते नोव्हेंबर-2008 अखेर अदा करणेचे आहे. तसेच रु.5,532/-प्रमाणे 13 ते 17 असे एकूण 5 हप्ते तसेच 18 ते 35 व्या हप्त्यापर्यंत एकूण 18 हप्ते रु.3,526/-प्रमाणे 36 वा हप्ता रु.3,560/-,तसेच 37 ते 40 पर्यंतचे एकूण 4 हप्ते रु.3,020/- प्रमाणे व 41 वा हप्ता रु.2,960/-प्रमाणे अदा करणेचा आहे. प्रस्तुत एकूण मासिक हप्ते 41 हे दि.01/12/2007 ते 01/04/2011 अखेर अदा करणेचे आहेत. हे दाखल कर्जकरार प्रतिवरुन निर्विवाद आहे. तक्रारदार व सामनेवाला यांनी कर्ज खातेउतारे दाखल केलेले आहेत. सदर दोन्ही खातेउतारे हे सामनेवाला फायनान्स कंपनीचेच असलेचे त्यांचे प्रतिनिधी यांनी युक्तीवादाच्या वेळेस मान्य केलेले आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या खातेउतारेचे अवलोकन केले असता तक्रारदाराने वेळोवेळी रक्कमा भरल्याचे दिसून येते. तक्रारदाराने पहिले दोन हप्ते वेळेपूर्वी भरलेले आहेत. मात्र तदनंतरचे हप्ते हे वेळापत्रकात ठरलेप्रमाणे दर महिन्याच्या एक तारखेस न भरता पुढील तारखेस भरलेचे दिसून येते. तक्रारदाराने दाखल केलेल्या खातेउतारा व सामनेवाला यांनी दाखल केलेला खातेउतारा यावरील नोंदींची तपासणी केली असता दि.01/04/2009 रोजीचे रिसीट नं.KLPR0904010035 नुसार रक्कम रु.29,608/- रु.3,195/-, रु.1,720/-, व रिसीट नं.KLPRO090000010125 नुसार रक्क्म रु.477/- च्या नोंदी जमेमध्ये दिसून येतात मात्र सामनेवाला यांनी दाखल केलेल्या खातेउता-यावर सदर तारखेस या नोंदी दिसून येत नाहीत. याउलट सामनेवाला यांनी दाखल केलेल्या खातेउता-यामध्ये दि.24/06/2009 ते दि.31/12/2010 अखेर अनुक्रमे रु.3,912/-, ओडीसी रु.150/- अशाच प्रकारच्या अन्य असणा-या जमेच्या नोंदी तक्रारदाराने दाखल केलेल्या खातेउता-यावर दिसून येत नाहीत. प्रस्तुत दोन्ही खातेउतारे हे सामनेवाला यांचेच आहेत. मात्र सॉफ्टवेअरमध्ये बदल केल्यामुळे खातेउता-याच्या पध्दतीत बदल झाला आहे असे प्रतिपादन युक्तीवादाच्या वेळेस सामनेवाला यांचे वकील व प्रतिनिधी यांनी केलेले आहे. सॉफ्टवेअर पध्दतीत जरी फरक पडला तरी नोंदीमध्ये फरक पडण्याचे काहीही कारण नाही. सामनेवाला यांचे प्रतिनिधी तक्रारदाराचे खातेवर वर नमुद केलेल्या जमा दाखविलेल्या रक्क्मा या प्रत्यक्षात मिळाल्या नसून त्या आलेल्या मंदीमुळे कर्जाच्या नमुद व्याजदरानेच नोंदविलेल्या आहेत असे प्रतिपादन केले आहे. तसेच अन्य काही रक्कमा सामनेवाला कंपनीस तक्रारदाराचे वतीने अदा केलेल्या आहेत. सबब सदर अदा केलेल्या रक्क्मा तक्रारदार देय लागत असलेचे प्रतिपादन केले आहे. सामनेवाला फानयान्स कंपनीचे खातेउता-याचे अवलोकन केले असता प्रस्तुत खातेउतारे हे प्रचलित असणा-या Book Keeping and Accounting च्या पध्दतीस अनुसरुन नाहीत सदर खातेउताहे हे सर्वसामान्य माणसाला किंवा ग्राहकाला आकलन होत नाही. सामनेवाला यांचे वकीलसुध्दा प्रस्तुत खातेउता-याचे स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. त्यासाठी सामनेवालांचे प्रतिनिधींनी काही संज्ञांचा खुलासा केला. यामध्ये Recd- Received, RI-Regular Installment, ODC-Over Due Charges, Cl bal- Closing Balance, INS-Insurance, FC-Financial Charges अशाप्रकारे संज्ञा स्पष्ट केलेल्या आहेत. वस्तुत: कर्ज खातेवर रोखीत रक्कमा जमा केल्या असतील तर By Cash धनादेशाने जमा केल्या असतील तर By Cheque कर्ज खातेवरुन काही रक्कमा जमा अथवा नांवे वर्ग केल्या असतील तर By Transfer अशा प्रकारच्या नोंदी प्रचलीत आहेत. तसेच त्याबाबत पावत्यांचे नंबर नोंद केले जातात. सदर पावत्यावंर प्रस्तुत रक्कम रोखीत ध्नादेशाने अथवा वर्ग करुन आली हे स्पष्टपणे नमुद केले जाते व तशा स्वरुपाच्या नोंदी नमुद खात्यावर जमा अथवा नांवे नोंदविल्या जातात. तसेच कर्ज करारप्रमाणे असणा-या दंड अथवा अन्य आकारांची स्पष्टपणे नोंद केली जाते. यामध्ये धनादेशाचा अनादर, विलंबाने हप्ता दाखल केलेबाबतचा दंड आकार, विमा हप्ता अदा करावयाचा असेल तर त्याची नोंद तसेच अन्य अनुषंगिक जमा अथवा खर्चाच्या नोंदी स्पष्टपणे नमुद केल्या जातात. अशा नोंदी सर्व सामान्य माणसाच्यासुध्दा खातेउता-याचे अवलोकन केले असता लक्षात येऊ शकतात. प्रस्तुत खातेउता-याचे अवलोकन केले असता अशा प्रकारच्या प्रचलीत हिशोब ठेवण्याच्या पध्दतीचा अवलंब सामनेवाला यांनी केलेचा दिसून येत नाही. प्रस्तुत खातेउता-यावरुन प्रथमदर्शनी सदर नोंदीचा कोणताही बोध होत नाही. अशा प्रकारच्या वर नमुद कर्ज खातेच्या नोंदी बाबतची पध्दती राबवून प्रकारच्या ग्राहकाभिमुख सेवा देणेचे कायदेशीर कर्तव्य सामनेवाला कंपनीचे असतानाही त्यांनी ते पार पाडलेले नाही. त्यांच्या ग्राहकांना असा अनाकलनीय खाते उतारा दिल्यामुळेच प्रस्तुत सामनेवाला फायनान्स कंपनीविरुध्द तक्रारी दाखल होत आहेत व वेळोवेळी सदर बाबींबाबत सामनेवाला फायनान्स कंपनीला मे. मंचाने याबाबत सदर वस्तुस्थिती निदर्शनास आणून देऊनही सामनेवाला फायनान्स कंपनीने सदर बाबी गांभीर्याने घेतलेल्या नाहीत. सामनेवाला फायनान्स कंपनीने त्यांचे ग्राहकांचे आकलनापलीकडे असणा-या तसेच प्रचलीत हिशोब पध्दती पलीकडे जाऊन स्वत:चे हिशोबाचे सॉफ्टवेअर तयार केलेले आहे जे सर्वसामान्यांच्या आकलनाच्या पलीकडले आहे. तसेच कर्जकरारपत्राप्रमाणे मुख्य कर्जाबरोबरच Parent Loan, Child Loan अशा प्रकारच्या कर्जाची नोंद प्रस्तुत दाखल कागदपत्रामध्ये दिसून येते. याचा कोणताही सहजासहजी अर्थ लागत नाही. प्रस्तुत प्रकरणी सामनेवाला यांनी दाखल केलेले कर्ज करारपत्रामध्ये 13.65 इतक्या व्याजाची नोंद असतानाही प्रस्तुत प्रकरणी सामनेवाला यांनी दाखल केलेल्या खातेउता-यावरील नोंदीत 13.80 टक्के व्याजाची नोंद दिसून येते. तसेच तक्रारदाराने दाखल केलेल्या खातेउता-यावर 41 महिन्यामध्ये 13.65 टक्केने रु.55,984/- इतक्या रक्कमेची FC म्हणून नोंद आहे. तर सामनेवाला यांनी दाखल केलेल्या खातेउता-यावर सदर रक्कम 13.80टक्केने रु.49,680/- इतकी रक्कम नमुद केली आहे. प्रस्तुत दोन्ही खाते उतारे त्यांचेच असलेचे त्यांनी मान्य केले आहे. Parent Loan म्हणजे मुख्य कर्ज व Child Loan म्हणजे त्याअनुषंगीक असणारे कर्ज उदा. इन्शुरन्सची रक्कम तसेच आवश्यक अन्य रक्कमांपोटी केलेले पेमेंटबाबत असे सामनेवाला यांनी प्रतिपादन केले आहे. मात्र सदर प्रकरणी रु.20,000/- इतकी इन्शुरन्स डिपॉझीटची नोंद दिसते व सदर रक्कम सदर कर्जाबरोबरच एकूण रक्कमेत जमा केलेचे दिसून येते. मात्र कर्जकरारपत्रामध्ये सदर विमा रक्कमेचा साधा उल्लेखही नाही. तसेच पेमेंट या क्लॉजखाली ब-याच रक्कमा अदा केल्याच्या नोंदी आहेत. सदर रक्कमा करारपत्राच्या तरतुदीनुसार नांवे टाकलेचे दिसून येत नाही. सबब ब-याच रक्कमा या अशाप्रकारे बेकायदेशीरपणे नांवे टाकलेल्या आहेत. तसेच एकूण थकीत रक्कमेत सदर रक्कमा देय असलेची नोंद केलेली आहे. अशाप्रकारे मुख्य कर्ज रक्कमेबरोबरच करारपत्रामध्ये उल्लेख न करता अन्य रक्कमांची एकूण कर्ज रक्कमेत कर्ज म्हणून एकूण कर्ज वाढवून जमा केलेल्या नोंदी या बेकायदेशीर आहेत असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच ओडीआय पोटी टाकलेल्या नोंदी या कशा पध्दतीने आकारल्या याबाबतचा खुलासा सामनेवाला यांनी केलेला नाही. तसेच कर्जकरारपत्रामध्येही स्पष्टपणे उल्लेख केलेला नाही. तक्रारदाराने दाखल केलेल्या खाते उता-याप्रमाणे मुख्य कर्ज रु.1,20,000/- फायनान्स चार्जेस रु.55,984/-, इन्शुरन्स डिपॉझीट रु.20,000/- असे मिळून एकूण रक्कम रु.1,95,984/- इतकी रक्कम नोंद केलेली आहे. तर सामनेवाला यांनी दाखल केलेल्या खातेउता-यावरुन रक्कम रु.1,89,680/- इतकी दिसून येते. सबब प्रस्तुत दोन्ही उतारे सामनेवाला यांनी मान्य केलेले आहेत तरीही सदर खातेउता-यामध्ये नोंदीबाबत तफावती दिसून येतात. तक्रारदाराने सामनेवालांकडे प्रस्तुत कर्जाचे हिशोबाबाबत मागणी करुन देणे रक्कम एक रकमी भागवणेस तयार असतानाही त्यास योग्य प्रकारची माहिती सामनेवाला यांनी दिलेचे दिसून येत नाही. तसेच तक्रारदाराने प्रस्तुत कर्ज रक्कमेपैकी बरीच मोठी रक्कम कर्जापोटी भरलेली आहे व उर्वरित रक्कम भरणेची तक्रारदाराने तयारी दर्शविलेली आहे. सदर रक्कम भरुन घेऊन ना-हरकत दाखल्याची मागणी तक्रारदाराने केलेली आहे. मात्र सामनेवाला यांनी त्यास कोणतेही सहकार्य केले नाही. अथवा हिशोबाचे स्पष्टीकरण दिलेले नाही. फायनान्स कंपनीच्या कर्जदाराच्या त्याचे कर्जाबाबत हिशोब देणे व त्याचे शंकाचे निरसन करणे हा त्याचा कायदेशीर हक्क आहे. सदर हक्कास सामनेवाला यांनी बाधा आणलेली आहे. वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदार कर्जदारास त्याचे कर्ज खातेबद्दल ग्राहकाभिमुख सेवा दिलेली नाही. विस्तृत विवेचनाचा विचार करता सामनेवाला यांनी सेवेत गंभीर त्रुटी ठेवली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2:-वरील विस्तुत विवेचनाचा विचार करता सामनेवाला कंपनीने तक्रारदार कर्जदाराचे असणारे कायदेशीर देणे रक्कम कोणतेही दंड, व्याज अथवा अन्य जादा आकार न आकारता भरुन घेऊन तक्रारदारास एन.ओ.सी. दयावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच प्रस्तुत प्रकरणी मे. मंचाने यापूर्वीच नमुद वाहन ओढून नेऊ नये याबाबत मनाई हुकूम पारीत केलेला आहे. सबब कर्ज कराराप्रमाणे कायदेशीर देणे रक्कमा देणेस तक्रारदार बांधील आहे व सदर रक्कमा अदा केलेनंतरच तो ना-हरकत प्रमाणपत्र मिळणेस पात्र आहे. तक्रारदाराने ब-याच मोठया कर्ज रक्कमेचा भरणा केला आहे. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदाराचे कर्जवसुलीबाबत खाते उता-यातील नोंदी बाबतच्या तफावती तसेच खाते उता-याचे अनाकलनीयता तसेच खातेवर केलेल्या बेकायदेशीर नोंदी यासामनेवालांचे सेवेतील त्रुटी आहेत. सामनेवालांचे हिशोबाचे पध्दती व सामनेवाला व तक्रारदाराने दाखल केलेले दोन्ही खातेउतारे हे सामनेवालांचे असूनही सदर दोन्ही खातेउता-यामध्ये तफावत असलेने तक्रारदारास प्रस्तुतची तक्रार दाखल करावी लागली आहे. तक्रारदारास त्याच्या कर्जखाते व त्याबाबतचे योग्य माहिती देणे शंका निरसन करुन घेणे हा त्याचा हक्क आहे. सदर हक्कास सामनेवाला यांनी बाधा आणलेली आहे. सबब तक्रारदार हा मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मे. मंचाने यापूर्वीच तक्रारदाराचे वाहन जप्त करु नये याबाबतचा दि.14/03/2011 रोजी अंतरिम आदेश पारीत केलेला आहे. आदेशाप्रमाणे रक्कमा भरेपर्यत वाहन जप्त करु नये या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला फायनान्स कंपनीने त्यांचे ग्राहकाच्या तसेच सामान्य व्यक्तीचे सुध्दा लक्षात येईल अशाप्रकारची हिशोब पध्दती अवलंबावी व त्यापध्दतीने त्याचे सॉफ्टवेअर विकसीत करावे जेणेकरुन भविष्यात अशा दाखल होणा-या तक्रारीस आळा बसेल व त्यांचे ग्राहकास ग्राहकाभिमुख सेवा मिळेल अशी अपेक्षा हे मंच व्यक्त करत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला कंपनीने करारपत्राप्रमाणे असणारे कायदेशीर देणे रक्कम कोणतेही दंड, व्याज अथवा अन्य जादा आकार न आकारता भरुन घेऊन तक्रारदारास ना-हरकत प्रमाणपत्र (एन. ओ.सी.) दयावे. 3) सामनेवाला यांनी तक्रारदारास माननिस त्रासापोटी रक्कम रु.5,000/-(रु.पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- (रु.एक हजार फक्त) त्वरीत अदा करावेत. 4) तक्रारदाराने प्रस्तुतची कायदेशीर देणे रक्कम 30 दिवसांचे आत भरणा करावी.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |