निकालपत्र :- (दि.26/11/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला हे वकीलांमार्फत सदर मंचापुढे उपस्थित राहिले. त्यांनी म्हणणे दाखल केले. उभय पक्षांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. सदरची तक्रार कायदेशीर प्रक्रियेशिवाय बळाचे जोरावर वाहन ओढून नेणेची धमकी देऊन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याने दाखल केलेली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी :- तक्रारदार हे वर नमुद पत्त्यावर कायम रहिवाशी असून ते शेती व्यवसाय करतात. तक्रारदार यांनी शेतीव्यवसायासोबत वाहतूक व्यवसाय करणेकरिता सामनेवाला कंपनीचे कर्ज घेऊन अप्पे थ्री व्हीलर रिक्षा नं.MH-09L-7815 P.G.O. Model-2006 खरेदी केली आहे. सदरची गाडी श्री चौगुले यांची होती. श्री चौगुले यांनी सामनेवाला संस्थेचे कर्जाचे हप्ते न भरलेने सामनेवाला कंपनीने सदरची गाडी ओढून आणली होती व तक्रारदार यांना रक्कम रु.82,000/- ला विक्री केली. सदर रक्कमेपैकी रक्कम रु.25,000/- तक्रारदार यांचेकडून स्विकारुन दि.07/09/2007रोजी तक्रारदार यांचे अफिडेव्हीट लिहून घेऊन रक्कम रु.20,000/-दि.25/09/2007अखेर भरणेस सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी सामनेवाला कंपनीकडे सदरची रक्कम भरणा केलेली आहे व उर्वरित रक्कमेपैकी रु.37,000/-च्या रक्कमेकरिता सामनेवाला कंपनीने कर्ज मंजूर करुन सदरची गाडी तक्रारदार यांचे नांवे करणेची हमी सामनेवाला यांनी तक्रारदारास दिली होती. तक्रारदार यांचेकडून 20 को-या धनादेशावर तक्रारदार यांच्या सहया करुन घेतलेल्या आहेत. सदर गाडीच्या ठरले रक्क्मेच्या परतफेडीपोटी तक्रारदार यांनी आतापर्यंत रक्कम रु.57,000/- भरलेले आहेत. सदरची गाडी तक्रारदार यांचे नांवे करणेकरिता सामनेवाला यांनी अदयाप ना हरकत दाखला दिलेला नाही तसेच आवश्यक ती कागदपत्रे दिलेली नाहीत. त्यामुळे तक्रारदार यांना सदर गाडीचा मालकी हक्काने उपभोग घेता येत नाही. ब) तक्रारदार यांनी सामनेवालांकडे ना हरकत दाखल्याची वारंवार मागणी करुनही सामनेवालांनी सदर दाखला न दिलेने प्रस्तुतची गाडी तक्रारदारचे नांवे झालेली नाही. उलटपक्षी सामनेवाला नमुद गाडीची र्उवरित रक्कम रु.25,000/- भरणा करा अन्यथा गाडी ओढून नेली जाईल अशी धमकी देतात. त्यामुळे तक्रारदारास सदरची गाडी बाहेर कुठेही फिरवता येत नाही. जवळजवळ 36 महिने तक्रारदाराची गाडी बदं असलेने तक्रारदाराचे दरमहा रु.2,000/- प्रमाणे रक्कम रु.72,000/- नुकसान झालेले आहे. सामनेवालांच्या धमकीमुळे तक्रारदारास सामनेवाला कधीही गाडी ओढून नेतील अशी भिती निर्माण झालेने शारिरीक व मानसिक त्रास होत आहे. सामनेवालांचे हे कृत्य बेकायदेशीर व अनुचित व्यापारी प्रथेचे अवलंब करणारे आहे. त्याबाबत तक्रारदाराने दि.21/03/2010 रोजी सामनेवालांना वकील नोटीस पाठवून गाडी नावावर करणेकरिता लागणारी कागदपत्रे व ना हरकत दाखल्याची मागणी करुनही सामनेवालांनी याबाबत काही कृती केलेली नाही. सबब दरम्यानच्या काळात तक्रारदाराची गाडी ओढून नेऊ नये म्हणून सामनेवालांना कायम मनाई ताकीद व्हावी. तसेच उर्वरित रक्कम रु.25,000/- हप्त्याहप्त्याने भरुन घेणेबाबत सामनेवालांना आदेश व्हावा मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- वसुल होऊन मिळावेत तसेच तक्रारदाराचे नांवावर होणेकरिता लागणा-या कागदपत्रांची पूर्तता करुन गाडी नावावर करुन दयावी. आर्थिक नुकसानीपोटी रक्कम रु.72,000/-, तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- सामनेवालांकडून वसुल होऊन मिळावेत अशी विंनती सदर मंचास केली आहे. (03) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ तक्रारदार यांनी सामनेवाला कंपनीत रक्कम रु.20,000/- भरलेली पावती क्र.406009, रक्कम रु.2,000/-भरलेली पावती क्र.406017, रक्कम रु.25,000/- भरलेली पावती क्र.406325, रक्कम रु.10,000/- भरलेली पावती क्र.1585418, तक्रारदार व सामनेवाला यांचे दरम्यान झालेले अफिडेव्हीट, तक्रारदार यांनी सामनेवाला यांना वकीलांमार्फत पाठविलेली नोटीस, त्याची पोष्टाची पोच पावती व यु.पी.सी.पोच इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (04) सामनेवालांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार बिनबुडाची, वस्तुस्थितीपासून फार विरहित आहे. तसेच तक्रारीतील कथन केलेला काही मजकूर वगळता उर्वरित मजकूर सामनेवालांना मान्य व कबूल नाही. तक्रार अर्ज कलम 1 ते 5 मधील काही अंशी मजकूर मान्य व कबूल आहे व उर्वरित मजकूर अमान्य आहे. तसेच तक्रार अर्ज कलम 6 ते 8 मधील मजकूर अमान्य आहे. सामनेवाला यांनी काहीही सेवात्रुटी केलेली नसून याउलट तक्रारदार यांनी सामनेवाला यांना रितसर देय असणारी रक्कम न भरता सदर वाहनाचा वापर सुरु ठेवला आहे. तसेच खोटे आमिषे व आश्वासने देऊन सामनेवालांची दिशाभूल करीत आहेत. प्रस्तुत मे. मंचाचे आदेश घेऊन तक्रारदार सदर वाहन रक्कम न भरता वापरणेचा दुष्ट हेतू बाळगतात. सामनेवाला हे सदैव ठरलेल्या रक्कमेप्रमाणे व नियमाप्रमाणे पैसे भरुन घेणेस तयार होते व आहेत. तक्रारदाराने निव्वळ नाहक त्रास देणेचे हेतूने सदरचा तक्रार अर्ज दाखल केला आहे. सबब तो नामंजूर करणेत यावा अशी विनंती सामनेवालांना सदर मंचास केली आहे. (05) सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणणे शपथपत्रासह दाखल केलेले आहे. अन्य कोणतेही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. (06) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, रिजॉइन्डर, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे दाखल कागदपत्रे, उभय पक्षांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय. 2. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1:- अ) तक्रारदाराने सामनेवालांकडून सुरेश आनंदा चौगुले या सामनेवालांच्या कर्जदाराची अॅप्पे थ्री व्हीलर रिक्षा नं.MH-09L-7815 P.G.O. Model-2006 खरेदी केली होती व सदर खरेदीपोटी रक्कम रु.82,000/- सामनेवालांना देय होती. सामनेवालांनी तक्रारदाराकडून सदर व्यवहारापोटी दि.07/09/2007 रोजी रक्कम रु.20,000/- दि.25/09/2007 रोजी रक्क्म रु.2,000/- तसेच सदर दिवशी रक्कम रु.25,000/- तसेच दि.23/03/2010 रेाजी रक्क्म रु.10,000/- असे एकंदरीत रक्कम रु.57,000/- स्विकारलेचे दाखल पावत्यांवरुन दिसून येते व सदरची वस्तुस्थिती दोन्ही बाजूंनी मान्य केलेली आहे. अदयापही रक्कम रु.25,000/- तक्रारदार सामनेवालांना देय लागतात हे तक्रारदाराने आपल्या तक्रारीत मान्य केलेले आहे. ब) वरील वस्तुस्थिती निर्विवाद असून प्रस्तुतची तक्रार सदर उर्वरित रक्कम तक्रारदार हप्त्याहप्त्याने देणेस तयार असतानाही प्रस्तुतची गाडी ओढून नेणेबाबत सामनेवालांनी धमकी दिली आहे. त्याबाबत दि.31/03/2010 रोजी तक्रारदाराने नमुद सामनेवाला यांना सदर कृत्याबाबत जाब विचारणारी नोटीस पाठवली आहे. सदर नोटीसला सामनेवालांनी उत्तर दिलेले नाही. तसेच सामनेवाला यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेमध्ये तक्रारीतील कोणता मजकूर अंशत: मंजूर आहे व कोणता मजकूर अमान्य आहे याचा स्पष्टपणे खुलासा केलेला नाही. तसेच प्रस्तुतचे वाहन सामनेवालांचे थकीत कर्जदार सुरेश आनंदा चौगुले यांचे असलेचे व सदर कर्ज वसुलीपोटी सदर वाहनाची विक्री सामनेवालांनी तक्रारदारास केलेचे युक्तीवादाच्या वेळेस सामनेवालांच्या वकीलांनी मान्य केलेले आहे. तक्रारदाराने दि.07/09/2007 रोजीची सामनेवाला यांना लिहून दिलेले शपथपत्राचे अवलोकन केले असता सदर शपथपत्रानुसार वर नमुद केलेप्रमाणे रक्कम रु.82,000/- इतक्या रक्कमेस नमुद वाहन खुषखरेदी देणेचे ठरले व त्याप्रमाणे तक्रारदाराने दि.07/09/2007 व 25/09/2007 रोजी रक्कम रु.20,000/- व 25,000/- रोखीत अदा केले असून उर्वरित रक्कम रु.37,000/- चे कर्जप्रकरण सामनेवालांकडून मंजूर केले असून सदरची रक्कम जमा करुन घेणेत यावी व अन्य इतर मजकूर नमुद केलेला आहे. सदर शपथपत्राचा विचार करता सामनेवालांच्या वकीलांनी जरी सदरचे शपथपत्र सामनेवाला कंपनीस लिहून दिले असलेतरी सामनेवाला कंपनीच्या अथवा त्यांचे अधिकारी यांचे सहया सदर शपथपत्रावर नाही. त्यामुळे सामनेवालांवर ते शपथपत्र बंधनकारक नसलेचे प्रतिपादन केले आहे. याचा विचार करता सदर शपथपत्रामध्ये नमुद असणारा कर्ज रक्क्म रु.37,000/- चा मजकूर वगळता सदर वाहनाचा व्यवहाराबाबतच्या अन्य मजकूरमध्ये खरेदीची रक्कम रु.82,000/-,भरणा केलेल्या रक्कमा इत्यादी बाबी तक्रारीत तसेच दाखल कागदपत्रांनुसार तंतोतंत जुळतात. त्यामुळे सदरचे शपथपत्र पूर्णत: खोटे आहे असे म्हणता येणार नाही. अशा प्रकारचा व्यवहार करणा-या कंपन्या अशा प्रकारची एकांगी शपथपत्रे घेत असलेचे ब-याच वेळा निदर्शनास येते. क) सामनेवालांनी आपल्या म्हणणेमध्ये असे कुठेही नमुद केलेले नाही. सदर खरेदी रक्कम रु.82,000/- एकाचवेळी भागवणेचे होते. सामनेवालांच्या कृतीतूनच त्यांनी सदर व्यवहार झालेपासून वेळोवेळी रक्कमा स्विकारलेले आहेत व उर्वरित रक्कम तक्रारदार देणेस तयार असतानाही त्यांना गाडी ओढून नेणेची धमकी दिलेली आहे. अशा प्रकारची वित्तीय सेवा देणा-या कंपन्या या कायदेशीर प्रक्रिया न राबवता बळाचे जोरावर वाहन ओढून नेऊन अथवा वाहन ओढून नेण्याची धमकी देऊन बेकायदेशीर कृत्य करतात याबाबत मा. सर्वोच्च् न्यायालय, राष्ट्रीय आयोग, राज्य आयोग यांचे कितीतरी दाखले आहेत. सबब सामनेवालांनी अशा प्रकारची धमकी दिलेली आहे व त्याची विचारणा करणा-या तक्रारदाराने पाठविलेल्या नोटीसला सामनेवालांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. तसेच अशा प्रकारचे कृत्य सामनेवाला कंपनीने केलेले नाही असे कुठेही आपल्या लेखी म्हणणेत स्पष्टपणे नाकारलेले नाही. याचा विचार करता सामनेवालांनी सेवेत गंभीर त्रुटी ठेवली आहे अशा निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- सामनेवालांनी गाडी ओढून नेणेची धमकी तक्रारदारास दिलेने सदर गाडी कधीही ओढून नेतील या भितीपोटी तक्रारदारास निर्धास्तपणे त्याचा व्यवसाय करता आलेला नाही ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. त्यामुळे तक्रारदारास झालेल्या मानसिक वशारिरीक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे.सामनेवालांनी सदर खरेदीपोटी वेळोवेळी रक्कमा स्विकारलेल्या दिसून येतात. त्यामुळे तक्रारदाराचे मागणीप्रमाणे तक्रारदाराकडून हप्त्यामध्ये उर्वरित रक्कम रु.25,000/- स्विकारले असते तरी सदरची तक्रार मंचात दाखल झाली नसती असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारदाराने आपल्या तक्रारीत प्रतिमाह रक्कम रु.2,000/- एकूण रक्क्म रु.72,000/- नुकसान झालेचे नमुद केले आहे. परंतु त्याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल नसलेने हे मंच सदरची मागणी मान्य करु शकत नाही. तसेच तक्रारदार हे सामनेवालांचे रक्कम रु.25,000/- अदयापही देणे आहे तसेच प्रस्तुतचे देणे कायदेशीर आहे. त्यामुळे तक्रारदार आदेशाप्रमाणे रक्कम सामनेवालांना देईपर्यंत तक्रारदाराचे नमुद वाहन सामनेवालांना ओढून नेता येणार नाही तसेच हे मंच पुढे असेही स्पष्ट करीत आहे की प्रस्तुतची उर्वरित रक्कम सामनेवाला यांना मिळालेनंतर तक्रारदाराने मागणी केलेले आवश्यक कागदपत्रे, ना हरकत दाखला देऊन सदर वाहन तक्रारदाराचे नांवे करावे अशा निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते. 2) तक्रारदार यांनी सामनेवाला यांना तक्रारीतील नमुद व्यवहारापोटी देय असणारी उर्वरित रक्कम रु.25,000/- दोन महिन्याच्या आत अदा करावी. 3) प्रस्तुत दोन महिन्याच्या कालावधीत सामनेवाला यांनी तक्रारदाराचे वाहन जप्त करुन नये अथवा ओढून नेऊ नये. तसेच उर्वरित रक्कम सामनेवाला यांना मिळालेनंतर तक्रारदाराने मागणी केलेले आवश्यक कागदपत्रे, ना हरकत दाखला देऊन सदर वाहन तक्रारदाराचे नांवे करावे. 4) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त)व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- (रु. एक हजार फक्त) त्वरीत अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |