::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे),सदस्या)
(पारीत दिनांक :-17/06/2017)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम १२ अन्वये दाखल केली आहे. अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत असे कथन केले आहे की अर्जदाराने स्वयंरोजगाराकरीता एक कॅट 424 रजिस्ट्रेशन क्र.सी.जी 04 डी.बी. 2817 ही मशीन व एक एसीई हायड्रा 12 टन, एमएच 29 व्ही 2141 अशा दोन मशिनी खरेदी करण्याकरीता गैरअर्जदाराकडून कर्ज घेतले. सदर कर्जासंबंधी अर्जदार व गैरअर्जदारामध्ये क्र.सीएनडीपीआरओ 01, एसीएल 0002 असे करार झाले. सदर हायड्रा मशीनकरीता गैरअर्जदाराने अर्जदाराला रू.8 लाखाचे कर्ज दिले. सदर कर्जाची, पहिली किस्त रू.33,098/- व उर्वरीत 34 किस्ती रू.28,926/- याप्रमाणे दिनांक 20/7/2011 पासून दिनांक 20/5/2014 पर्यंत एकूण रू.10,16,582/- तक्रारकर्त्याला परतफेड करावयाची होती. अर्जदाराने दोन्ही मशीन्सच्या कर्जाची नियमीतपणे परतफेड केली. अर्जदाराने गैरअर्जदाराला मे,2014 मध्ये दोन्ही कर्जांचा हिशोब मागितला असता गैरअर्जदाराने दिनांक 23/5/2014 च्या पत्रान्वये कॅट मशीनकरीता रू.61,900/- व एसीई हायड्रा मशीन करीता रू.2,40,953/- दिनांक 31/5/2014 पर्यंत भरण्याचे म्हटले. त्यापैकी अर्जदाराने दिनांक 27/5/2014 रोजी कॅट मशीनकरीता थकीत रक्कम रू.61,900/- चा भरणा केला व त्यासंदर्भात गैरअर्जदाराने अर्जदाराला पावती दिली. अर्जदाराने दिनांक 27/5/2014 रोजी हायड्रा मशीनकरीता थकीत रकमेपैकी रू.1,40,900/- चा भरणा केला. अर्जदाराने गैरअर्जदाराला त्यांच्यावर दिनांक 23/5/2014 चे पत्रामध्ये दर्शविलेली रक्कम अर्जदाराकडे निघत नाही असा संशय आल्याने अर्जदाराने गैरअर्जदाराला सदर खात्याच्या परतफेडीचे शेडयूल मागितले. गैरअर्जदाराने अर्जदाराला दिनांक 31/5/2014 रोजी सदर परतफेडीचे शेडयूल दिले. अर्जदाराने सदर विवरणाची पडताळणी केली असता अर्जदाराने भरणा केलल्या रकमेची पूर्ण नोंद गैरअर्जदाराने घेतलेली नव्हती. सदर स्टेटमेंटनुसार अर्जदाराने रू.12,62,938/- चा भरणा केल्याची नोंद आहे. वास्तवीक तक्रारकर्त्याकडे असलेल्या भरणा केल्याच्या पावत्या व स्टेटमेंटमध्ये तफावत आहे. अर्जदाराने भरणा केलेल्या रू.4,35,776/- रकमेची गैरअर्जदाराने स्टेटमेंटमध्ये नोंद घेतलेली नाही. सदर स्टेटमेंटमध्ये थकबाकी 1,63,604/- दर्शविली आहे. जर गैरअर्जदाराने नोंद न घेतलेली रक्कम रू. 4,35,776/- मधून थकीत रक्कम रू.1,63,604/- वजा केल्यांस अर्जदाराला रू.2,72,172/- गैरअर्जदाराकडून घेणे निघतात परंतु नोंद न घेतलेली रक्कम रू. 4,35,776/- गैरअर्जदाराकडून घेण्याचा अधिकार आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराला सदर एसी हायड्रा मशीनचे नादेय प्रमाणपत्र देण्याची विनंती केली. मात्र गैरअर्जदाराने त्याची दखल घेतली नाही. अर्जदाराने 25/11/2014 रोजी गैरअर्जदाराविरूध्द पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. गैरअजदाराने गुंड प्रवृत्तीचे माणसं पाठवून अर्जदारांस त्रास देण्यांस सुरूवात केली. अर्जदार हा थकीतदार नसतांनासुध्दा गैरअर्जदाराने दिनांक 1/3/2015 रोजी अर्जदाराची हायड्रा मशीन जप्त करण्याकरीता माणसं पाठविली परंतु अर्जदाराने गाडीचे टायर काढून ठेवले असल्यामुळे गाडी जप्त करू शकले नाहीत. परंतु ते अर्जदारांस लवकरच गाडी जप्त करण्याची धमकी देवून गेले.त्यामुळे अर्जदाराने सदर घटनेची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. सबब अर्जदाराकडे विद्यमान कोर्टाशिवाय अन्य पर्याय न राहिल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदाराविरूध्द मंचासमक्ष तक्रार दाखल करून तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदाराने दिलेली सेवा न्युनतापूर्ण सेवा असल्याचे जाहीर करावे. तसेच गैरअर्जदाराने हायड्रा मशीनचे कर्जासंबंधीचे नादेय प्रमाणपत्र अर्जदारांस द्यावे. गैरअर्जदाराने स्टेटमेंटमध्ये नोंद न घेतलेली रक्कम रू. 4,35,776/- द.सा.द.शे.12 टक्के व्याजासह अर्जदारांस द्यावे, तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रू.50,000/- व तक्रारीचा खर्च रू.10,000/- गैरअर्जदाराकडून मिळण्याचे आदेश व्हावे.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होवून त्यांनी नि. क्रं. 14 वर आपले लेखीउत्तर दाखल केले. विरूध्द पक्षाने आपल्या लेखी उत्तरात तक्रारकर्त्याने सदर दोन्ही मशीन्स स्वयंरोजगाराकरीता घेतल्याचे नाकबूल केले आहे. परंतु अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात सदर कर्जासंबंधीचा करार झाला होता तसेच अर्जदाराने कॅट मशीनकरीता थकीत रक्कम रू.69,900/- व हायड्रा मशीनकरीता रू.1,40,900/- गैरअर्जदाराकडे भरणा केल्याचे मान्य केले आहे. अर्जदाराने भरणा केलेल्या रकमेच्या पावत्या व गैरअर्जदाराने दिलेल्या स्टेटमेंटमध्ये फरक असून तसेच अर्जदाराने गैरअर्जदाराकडे रू.4,35,476/- ची नोंद स्टेटमेंटमध्ये घेतली नाही हे अर्जदाराचे कथन गैरअर्जदाराने नाकबूल केले आहे.
4. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून दिनांक 20/7/2011 रोजी सदर प्रकरणातील वाहनाकरीता रू.10,16,582/- दिनांक 5/1/2012 रोजी कॅटबॅक लोडरकरीता रू.6,00,438/- दिनांक 11/7/2012 रोजी लोडरकरीता रू.23,61,630/- व पुन्हा दिनांक 17/10/2012 रोजी 2,44,000/- चे चाईल्ड लोन असे चार कर्ज गैरअर्जदाराकडून अर्जदाराने घेतलेले आहेत. अर्जदाराकडे एकापेक्षा जास्त वाहन आहेत. सदर वाहन व्यावसायीक कारणाकरीता वापरीत असल्याने अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक नाही तसेच सदर प्रकरण क्लिष्ट स्वरूपाचे असल्याने व सदर वाद हा दिवाणी स्वरूपाचा असल्याने विद्यमान मंचाच्या अधिकारक्षेत्रात नसल्याने खारीज होण्यांस पात्र आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून सदर हायड्रा मशीनकरीता र8 लाख व त्यावर 9.28 टक्के व्याज दराने एकूण रू.10,16,582/- 35 किस्तीमध्ये दिनांक 9/6/2011 ते 20/5/14 पर्यंत परतफेड करावयाची होती. कराराप्रमाणे अर्जदाराला दर महिन्याच्या 20 तारखेपर्यंत वा त्यापूर्वी गैरअर्जदाराकडे सदर कर्जाच्या किस्तीची रक्कम जमा करावयाची होती. सदर कराराच्या अटींचा भंग झाल्यांस अर्जदाराला दंड, व्याज व इतर शुल्कांसह रक्कम भरावी लागणार होती. अर्जदाराने रेकॉर्डवर दाखलकेलेल्या पावत्या व स्टेटमेंटमध्ये स्पष्ट होते की अर्जदाराने कधीही नियमीतपणे कर्जाच्या किस्तीचा भरणा केलेला नाही. अर्जदाराचे गैरअर्जदाराकडे कर्जव्यवहाराचे अनेक खाते असल्याने अन्य दुस-या कर्जखात्यामध्ये अर्जदाराने रक्कम भरलेली नसल्यांस गैरअर्जदार कराराप्रमाणे अर्जदाराकडून प्राप्त झालेली रक्कम अन्य दुस-या खात्यातसुध्दा समाविष्ट करू शकतो. अर्जदार हा सदर खात्यांमध्येनियमीतपणे किस्त भरत नसल्यामुळे अर्जदाराकडून प्राप्त झालेल्या काही रकमेचा भरणा चाईल्ड लोन या खात्यात समावीष्ट करीत होते. अर्जदाराने सदर कर्जाची बाब विद्यमान मंचापासून लपवून ठेवलेली आहे. अर्जदाराने दिनांक 23/5/2014 च्या पावतीच्या रकमेचा(दस्त क्र.20) विवरणामध्ये नोंद नाही असा आक्षेप घेतलेला आहे. परंतु सदर दस्त क्र.20 ही कच्ची पावती आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराला दिनांक 27/5/2014 रोजी दस्त क्र.21 रू.61,900/- व दस्त क्र.22 प्रमाणे रू.1,40,900/- असे एकूण रू.2,03,000/- च्या रकमेची पावती दिली. अर्जदाराला दस्त क्र.20 ची पावती गैरअर्जदाराने मागितली असता सदर पावती गहाळ झाली असे सांगून दस्त क्र.21 व 22 ची पावती गैरअर्जदाराचे कार्यालयातून अर्जदार घेवून गेला. अर्जदार हा आज रोजी थकीतदार आहे व अर्जदाराला सदर रक्कम द्यावयाची नसल्यामुळे अर्जदाराने खोटी तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराने उर्वरीत थकीत रक्मेचा गैरअर्जदाराकडे भरणा केल्यास गैरअर्जदार आजही अर्जदारांस नाहरकत प्रमाणपत्र देण्यांस तयारआहे. रक्कम न भरता सदर प्रमाणपत्राची मागणी करणे अयोग्य आहे.सबब अर्जदाराची तक्रार दंडासह खारीज करण्यांत यावी.
5. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, अर्जदाराने तक्रारीतील कथनालाच शपथपञ समजण्यांत यावे असे नि.क्र.15 वर पुरसीस दाखल केली, लेखी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ, आणि लेखीउत्तरातील कथनालाच लेखी युक्तिवाद समजण्यांत यावे असे नि.क्र.19 वर पुरसीस दाखल केली. उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील त्याबाबतची कारण मिमांसा व निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय व प्रस्तूत
वाद चालविण्याचे मंचास अधिकारक्षेत्र आहे काय ? होय
(2) गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे होय
काय ?
(3) अर्जदार मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे काय ? अंशतः मंजूर
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
6. तक्रारकर्त्याने स्वयंरोजगाराकरीता एक कॅट 424 रजिस्ट्रेशन क्र.सी.जी 04 डी.बी. 2817 ही मशीन व एक एसीई हायड्रा 12 टन, एमएच 29 व्ही 2141 अशा दोन मशिनी खरेदी करण्याकरीता विरूध्द पक्षाकडून कर्ज घेतले. सदर कर्जासंबंधी उभय पक्षामध्ये क्र.सीएनडीपीआरओ1, एसीएल 0002 असे करार झाले असे अर्जदाराचे म्हणणे आहे. परंतु अर्जदाराने व्यावसायीक कारणाकरीता दोनपेक्षा जास्त कर्जे घेतली असल्यामुळे तक्रारदार हा ग्राहक या संज्ञेत बसत नाही असे गैरअर्जदारांचे म्हणणे आहे. मात्र अर्जदाराने व्यावसायीक कारणासाठी सदर कर्जे घेतली हे दर्शविणारा कोणताही पुरावा गैरअर्जदाराने दाखल केलेला नाही. त्यामुळे अर्जदाराने स्वयंरोजगाराकरीता एक कॅट मशीन व एक एसीई हायड्रा मशीन अशा दोन मशिनी खरेदी करण्याकरीता गैरअर्जदाराकडून कर्ज घेतले व त्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक असून मंचास त्या कर्जप्रकरणातून उद्भवलेल्या वादावर निवाडा देण्याचे अधिकारक्षेत्र आहे. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
7. विरूध्द पक्षाने नि.क्र. 21 वर दाखल केलेल्या दस्त क्र.2 या हायड्रा मशीनच्या कर्जाच्या करारनाम्याचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की, अर्जदाराने गैरअर्जदाराकडून सदर हायड्रा मशीनकरीता र 8 लाख व त्यावरील व्याजासह एकूण रक्कम रू.10,16,582/- पहिली किस्त रू.33,098/- व उर्वरीत 34 किस्ती रू.28,926/- याप्रमाणे एकूण 35 किस्तीमध्ये दिनांक 20/7/2011 ते 20/5/14 पर्यंत परतफेड करावयाची होती. कराराप्रमाणे अर्जदाराला दर महिन्याच्या 20 तारखेपर्यंत वा त्यापूर्वी गैरअर्जदाराकडे सदर कर्जाच्या किस्तीची रक्कम जमा करावयाची होती. अर्जदाराने रेकॉर्डवर दाखल केलेल्या पावत्या व स्टेटमेंटवरून स्पष्ट होते की अर्जदाराने कधीही नियमीतपणे कर्जाच्या किस्तीचा भरणा केलेला नाही. परंतु अर्जदाराने नि.क्र.4 वर दाखल केलेल्या दस्त क्र.23 सदर हायड्रा मशीनच्या कर्जविवरणामध्ये अर्जदाराने सदर कर्ज परतफेडीपोटी एकूण रू.12,62,938/- एवढया रकमेचा भरणा केल्याचे नमूद आहे. अर्जदाराने सदर कर्जाच्या परतफेडीपोटी भरलेली रक्कम पर्याप्त असल्याचे मंचाचे मत आहे. अर्जदाराचे गैरअर्जदाराकडे कर्जव्यवहाराचे अनेक खाते असल्याने अन्य दुस-या कर्जखात्यामध्ये अर्जदाराने रक्कम भरलेली नसल्यांस गैरअर्जदार कराराप्रमाणे अर्जदाराकडून प्राप्त झालेली रक्कम अन्य दुस-या खात्यातसुध्दा समाविष्ट करू शकतो असे गैरअर्जदाराचे म्हणणे असले तरीही गैरअर्जदाराने अर्जदाराचे त्यांचेकडे दोनपेक्षा जास्त कर्जखाते आहेत हे दस्तावेज दाखल करून सिध्द केलेले नाही, त्यामुळे गैरअर्जदाराचे हे कथन ग्राहय धरण्यासारखे नाही. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे सदर हायड्रा मशीनच्या कर्जाची पर्याप्त परतफेड केल्यानंतरही अर्जदाराने सदर मशीनच्या कर्जाचे नादेय प्रमाणपत्राची गैरअर्जदाराकडे मागणी केल्यानंतरही गैरअर्जदाराने अर्जदारांस ते न देवून अर्जदाराप्रती सेवेत न्युनता केली असे सिध्द होत आहे असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
8. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(2) विरूध्द पक्षाने तक्रारदारांस न्युनतापूर्ण सेवा दिल्याचे घोषित करण्यांत
येते.
(3) विरूध्द पक्ष यांनी एसीई हायड्रा 12 टन, एमएच 29 व्ही 2141 या
गाडीच्या कर्जाचे नादेय/नाहरकत प्रमाणपत्र तक्रारकर्त्यांस आदेश प्राप्त
दिनांकापासून 30 दिवसांचे आत द्यावे.
(4) विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक ञासापोटी
रु.25,000/- व तक्रारखर्च रू.5000/- तक्रारकर्त्यांस आदेश प्राप्त
दिनांकापासून 30 दिवसांचे आत द्यावे.
(5) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक – 17/06/2017