मंचाचे निर्णयान्वये - श्री. विजयसिंह राणे, अध्यक्ष. //- आदेश -// (पारित दिनांक – 21/04/2011) 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्वये दाखल केलेली असून तक्रारकर्त्यांच्या तक्रारीचा आशय असा आहे की, त्याने गैरअर्जदारांकडून रु.19,752/- कर्ज घेतले व रु.823/- प्रमाणे त्याची परतफेड करावयाची होती. तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी सदर कर्जाची परतफेड केली तरीही गैरअर्जदाराने नोटीस पाठवून रु.12,327/- ची मागणी केली. यावर तक्रारकर्त्याने नोटीसला उत्तर देऊन संपूर्ण कर्जाचे धनादेश हे वटलेले असून कर्जाची रक्कम परत करण्यात आल्याचे कळवून सदर चूक दुरुस्त करण्यास सांगितली. परंतू गैरअर्जदारांनी सदर चुक दुरुस्त करण्यास नकार दिल्याने तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन, तीद्वारे गैरअर्जदारांनी कर्जाबाबत कोणतीही कारवाई करु नये, मानसिक त्रास व सेवेत त्रुटी दिल्याबद्दल रु.50,000/- आणि तक्रारीच्या खर्चाबाबत रु.5,000/- द्यावे अश्या मागण्या केलेल्या आहेत. आपल्या तक्रारीचे पुष्टयर्थ तक्रारकर्त्याने एकूण तीन दस्तऐवज दाखल केलेले आहेत. 2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदाराला पाठविण्यात आली असता गैरअर्जदाराने सदर तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले व तक्रारकर्त्याने तक्रारीत केलेली विपरीत विधाने नाकारली. गैरअर्जदारांचे मते तक्रारकर्त्यांनी कर्जाच्या परतफेडीकरीता 16 धनादेश दिले होते, त्यापैकी 9 धनादेश वटविण्यात आले व उर्वरित 7 धनादेश न वटता परत आले. सदर बाब तक्रारकर्त्याच्या बँक खात्याच्या उता-यावरुन स्पष्ट होते. धनादेश परत गेल्यामुळे तक्रारकर्त्याच्या खात्यामधून काही रक्कम वजा करण्यात आली. म्हणून तक्रारकर्त्यांना नोटीस पाठवून रु.12,327/- ची मागणी करण्यात आली. सदर नोटीसला खोटे उत्तर दाखल करुन मंचासमोर सदर खोटी तक्रार केल्याने ती खारीज करण्याची मागणी गैरअर्जदारांनी केलेली आहे. 3. सदर तक्रार दि.07.04.2011 रोजी मंचासमोर युक्तीवादाकरीता आली असता गैरअर्जदारांचे वकिलांनी युक्तीवाद केला. तक्रारकर्त्यांच्या वकिलांना वारंवार संधी देऊनही त्यांनी लेखी किंवा तोंडी युक्तीवाद सादर केला नाही. 4. तक्रारकर्त्यांनी कर्जाची परतफेड केलेली आहे हे दर्शविण्याकरीता जो बँकेचा खाते तपशिल दाखल केलेला आहे व त्यामध्ये गैरअर्जदार म्हणतात त्याप्रमाणे धनादेश परत केल्याची नोंद आहे. तक्रारकर्त्यांनी कर्ज परतफेड केल्याची बाब मुळात सिध्द केलेली नाही. गैरअर्जदाराने यासंबंधी आपले सविस्तर उत्तर दाखल करुन धनादेश वटले नाही त्यासंबंधीची माहिती दिली. मात्र तक्रारकर्त्याने त्याबाबत प्रती प्रतिज्ञापत्र दाखल करुन सदर माहिती नाकारली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यांचे हे म्हणणे की, त्यांनी पूर्ण कर्जाची परतफेड केली याला कोणताही योग्य आधार सदर प्रकरणी नाही व त्यांनी सिध्दही केलेली नाही. थोडक्यात तक्रारकर्त्याची तक्रार चुकीची आहे व ती खारीज होण्यास पात्र आहे. उपरोक्त निष्कर्षावरुन व दाखल दस्तऐवजांवरुन मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्यांची तक्रार खारीज करण्यात येते. 2) उभय पक्षांनी आप-आपला खर्च सहन करावा.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |