::: आ दे श :::
( पारित दिनांक : 24/03/2018 )
माननिय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार : -
1) तक्रारकर्ता यांनी सदरहू तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम 12 अन्वये, दोषपूर्ण सेवे संदर्भात विरुध्द पक्षांविरुध्द दाखल केली आहे.
तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चा स्वतंत्र लेखी जबाब, तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले दस्त व तक्रारकर्ते यांचे प्रतिऊत्तर, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चा पुरावा व उभय पक्षाचा लेखी युक्तिवाद, यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन खालील निर्णय पारित केला.
2) तक्रारकर्ते यांचा युक्तिवाद असा आहे की, तक्रारकर्ते यांनी विरुध्द पक्षाच्या चिट फंड योजनेत प्रतिमाह रुपये 6,500/- भरुन भाग घेतला होता, विरुध्द पक्ष क्र. 2 हे विरुध्द पक्ष क्र. 1 च्या कार्यालयात येवुन, त्यांनी तक्रारकर्ते व ईतर ग्राहकाकडून रक्कम जमा करुन घेतली होती तसेच विरुध्द पक्षाने असे आश्वासन दिले होते की, सदर चिटस् मध्ये जी रक्कम जमा केली जाते, त्यावर आकर्षक व्याज मिळते, शिवाय सहा महिण्यामध्ये नंबर काढला गेला नाही तर भरलेली रक्कम व्याजासह व नफ्यासह परत केल्या जाईल. तक्रारकर्ते यांनी 12 महिण्यांच्या हप्त्यांचा एकूण भरणा रक्कम रुपये 78,000/- दंड व व्याजासह केला आहे. मात्र विरुध्द पक्षाने चिट फंड नाव उघडण्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही किंवा ती नियमीत उघडली नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याने भरणा केलेली रक्कम मागणी केली. परंतु विरुध्द पक्षाने रक्कम परत केली नाही. म्हणून तक्रारकर्ते यांनी कायदेशीर नोटीस विरुध्द पक्षाला पाठवून नंतर ही तक्रार दाखल केली. तक्रार मंजूर व्हावी, अशी विनंती, तक्रारकर्ते यांनी मंचाला केली आहे.
3) विरुध्द पक्ष क्र. 1 चा युक्तिवाद असा आहे की, ते फायनान्स कंपनी म्हणून काम करतात, त्यांचा श्रीराम चिटस् शी संबंध नाही व विरुध्द पक्ष क्र. 2 चिट फंड कंपनी यांचे कार्यालय यवतमाळ इथे आहे. कोणताही व्यवहार वाशिम इथे झाला नाही, त्यामुळे सदर तक्रार वि. मंचाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. सदर कंपनी सेंट्रल चिट फंड अॅक्ट 1982 नुसार भिसीचा व्यवसाय करते व सदर अॅक्ट मधील तरतुदीनुसार तक्रारकर्ते व विरुध्द पक्ष क्र. 2 मध्ये झालेल्या करारानुसार, तक्रारकर्ते यांचा वाद लवादाकडे चालतो, त्यामुळे वि. मंचाला तक्रार तपासता येणार नाही. तक्रारकर्ता हा भिसी ( चिट ) ग्रुपचा सदस्य आहे, त्यामुळे तो ग्राहक हया व्याख्येत बसत नाही, म्हणून तक्रार खारिज करावी.
4) विरुध्द पक्ष क्र. 2 यांचा युक्तिवाद असा आहे की, वाशिम न्यायमंचाला ही तक्रार तपासण्याचे कार्यक्षेत्र नाही. विरुध्द पक्ष कंपनी श्रीराम चिटस् महा. लिमी. या नावाने कार्यरत आहे. ही रजिष्टर्ड कंपनी आहे व तिचे कार्यालय मुंबई स्थित असून, विरुध्द पक्ष क्र. 2 ही त्यांची शाखा असून, ती यवतमाळ येथे कार्यरत आहे. सेंट्रल चिट फंड अॅक्ट 1982 नुसार सदर वाद तपासण्याचा अधिकार करारानुसार लवादाला आहे. तक्रारकर्ता विरुध्द पक्ष क्र. 2 चा ग्राहक नाही. विरुध्द पक्ष कंपनी भिसी चालवते. सदर भिसीमध्ये एका ग्रुपमध्ये एक कंपनी आणि ईतर 49 व्यक्ती / सभासद असे एकूण 50 सभासद असतात. भिसीची रक्कम जमा करण्याची व देण्याची जबाबदारी कंपनीची असते. तक्रारकर्ते यांनी विरुध्द पक्ष कंपनीच्या रुपये 5,00,000/- च्या भिसी योजनेत भाग घेतला, त्यानुसार तक्रारकर्ते याला रुपये 10,000/- दरमहा हप्त्याप्रमाणे 50 महिण्यात रुपये 5,00,000/- भरावयाचे होते. सदर भिसीमध्ये भाग घेतांना तक्रारकर्ते यांनी भिसीचे सर्व नियम व करारातील सर्व अटी, शर्ती वाचुन समजून घेवून विरुध्द पक्ष कंपनीसोबत दिनांक 28/11/2014 रोजी करार केला, सदर ग्रुपचा क्र. वाय.टी.एल 39 असून त्यामध्ये तक्रारकर्तेचा तिकीट क्र. 47 आहे. भिसीचा प्रत्येक महिण्यात ऑक्शन करण्यात येतो. नियमानुसार बोली बोलून भिसी उचलता येते. त्यातून खर्चाची 5 % रक्कम कापुन उर्वरीत रक्कम सर्व सभासदांना डिव्हीडंट म्हणून वाटण्यात येते. सदर डिव्हीडंट ची रक्कम भिसीच्या हप्त्यात जमा करता येते. त्यामुळे तक्रारकर्ते यांनी रुपये 10,000/- चे हप्त्याऐवजी रुपये 6,500/- प्रमाणे हप्ते भरले आहे. हप्ता भरण्याबाबत सुचनापत्र पाठविण्यात येते, परंतु तक्रारकर्ते यांनी सुरुवातीपासुनच हप्त्याची रक्कम भरण्यास कसूर केला. तक्रारकर्त्याने जुलै महिण्यापर्यंत भिसी हप्ता भरला, त्यानंतर हप्ते भरणे बंद केले, वारंवार मागणी करुनही, थकीत हप्त्याची रक्कम न भरुन, कराराचा भंग केला. म्हणून नियमानुसार त्याला रिमूव्ह करुन भरलेल्या रुपये 59,500/- पैकी 5 % रक्कम रुपये 25,000/- कराराचे उल्लंघन केल्याबद्दल व रुपये 100/- प्रोसेसिंग शुल्क असे एकूण 25,100/- कपात करुन उर्वरीत रुपये 34,400/- तक्रारकर्ते यांना देणे होते, पण सुचना देवूनही तक्रारकर्ते रक्कम घेण्यास आले नाही, त्यामुळे विरुध्द पक्ष क्र. 2 ची सेवा न्युनता नाही, म्हणून तक्रार खारिज करावी.
5) अशाप्रकारे उभय पक्षाचा युक्तिवाद एैकल्यानंतर मंचाचे असे मत आहे की, विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी कबुल केल्यानुसार उभय पक्षात करार झाला होता व तक्रारकर्त्यास विरुध्द पक्ष क्र. 2 कडून डिव्हीडंट वाटप झाला होता. म्हणून अशा परिस्थितीत तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे, या निष्कर्षावर मंच आले आहे.
तक्रारकर्त्याच्या मते विरुध्द पक्ष क्र. 2 चे संपर्क कार्यालय हे विरुध्द पक्ष क्र. 1 च्या कार्यालयात होते, तेथे त्यांचे प्रतिनीधी बसत होते व तेथे चिटस् च्या चिठ्ठया काढल्या जात होत्या व विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी वाशिम येथील ग्राहकांना फंडमध्ये समाविष्ठ करुन घेतले होते, ही बाब विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी लेखी जबाब व युक्तिवादात नाकारली आहे. परंतु प्रकरण दाखल होण्याआधी तक्रारकर्ते यांनी विरुध्द पक्ष क्र. 1 ला श्रीराम चिटस् नावाने नोटीस पाठवली होती, ती त्यांनी स्विकारली होती, असे दिसते तसेच या प्रकरणाची नोटीसही विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी स्विकारली आहे, म्हणजे विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी श्रीराम चिटस् नावाने होणारे पत्रव्यवहार स्विकारलेले आहेत, त्यामुळे तक्रारकर्ते यांच्या कथनात मंचाला तथ्य आढळते. म्हणून सदर तक्रार तपासण्याचे कार्यक्षेत्र ग्राहक संरक्षण कायदा तरतुदीनुसार मंचाला आहे, असे मंचाचे मत आहे. उभय पक्षातील करार हा जरी चिट फंड अॅक्ट 1982 मधील तरतुदीनुसार झाला तरी तक्रारकर्ते ग्राहक ह्या व्याख्येत बसत असल्यामुळे, त्यांनी ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार मंचासमोर ही तक्रार दाखल केली आहे व ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुद ही अधिकची असल्यामुळे, तक्रारकर्ते यांचा वाद मंचाला तपासता येतो. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चा लवाद आक्षेप मान्य करता येणार नाही.
विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी ही बाब कबुल केली की, तक्रारकर्ते यांनी त्यांच्याकडे भिसी हप्ता रक्कम रुपये 59,500/- भरलेली आहे, मात्र विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी करार अट क्र. 16 (d) व 18 नुसार तक्रारकर्ते यांना भिसी ग्रुप मधून रिमुव्ह केले व या रकमेतुन 5 % रक्कम कपात म्हणून एकदम रुपये 25,000/- व प्रोसेसींग शुल्क रुपये 100/- कपात केले, ह्या हिशोबात मंचाला संदिग्धता आढळते. शिवाय विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्ते यांना ग्रुप मधून रिमुव्ह करण्याआधी तशी नोटीस पाठवून सुचित केले नाही. फक्त तक्रारकर्त्याच्या कायदेशीर नोटीसला ऊत्तर दिले व त्यात ही बाब त्यांनी त्यांच्या दिनांक 03/11/2015 च्या पत्रान्वये तक्रारकर्ते यांना सुचित केल्याचे नमुद केले. परंतु ते पत्र रेकॉर्डवर दाखल नाही. म्हणून सुचित करणे ही बाब अलग ठरते कारण ग्रुपमधून रिमुव्ह करण्याआधी, तक्रारकर्त्याचे म्हणणे एैकून घेणे संयुक्तीक ठरले असते तसेच अट क्र. 16 (d) नुसार विरुध्द पक्ष क्र. 2 यांना कपात करुन उर्वरीत रक्कम तक्रारदारास लगेच Substituted Sub-scriber Draws नंतर किंवा at the close of the series ह्यापैकी जी घटना आधी घडेल तेंव्हा लगेच ती वापस करणे होती, परंतु विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी या प्रकरणात ते हजर झाल्यावरही तक्रारकर्ते यांना रक्कम अदा केली नाही किंवा मंचात जमा करण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे ही विरुध्द पक्ष क्र. 2 ची सेवा न्युनता आहे, असे मंचाचे मत आहे. म्हणून तक्रारकर्ते यांची तक्रार फक्त विरुध्द पक्ष क्र. 2 विरुध्द खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करुन, अंशतः मंजूर केली.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ते यांची तक्रार फक्त विरुध्द पक्ष क्र. 2 विरुध्द अंशतः मंजूर करण्यांत येते.
- विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्ते यांना रक्कम रुपये 59,500/- ( रुपये एकोणसाठ हजार पाचशे फक्त ) दरसाल, दरशेकडा 8 % व्याजदराने दिनांक 20/06/2016 ( प्रकरण दाखल तारीख ) पासुन तर प्रत्यक्ष रक्कम अदायगीपर्यंत व्याजासह अदा करावे तसेच शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान भरपाई व प्रकरण खर्च मिळून रक्कम रुपये 8,000/- ( अक्षरी रुपये आठ हजार फक्त ) अदा करावी.
- विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी ऊपरोक्त आदेशाचे पालन 45 दिवसाचे आत करावे.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निःशुल्क पुरवाव्या.
( श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
Svgiri