जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे.
मा.अध्यक्षा- सौ.व्ही.व्ही.दाणी
मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – २६/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २७/०२/२०१२
तक्रार निकाली दिनांक – १७/०२/२०१४
श्री.दिलीप वेडु कुवर ----- तक्रारदार.
उ.व.५८, धंदा-शेती.
रा.छाईल,ता.साक्री,जि.धुळे.
विरुध्द
(१)श्रीराम बायोसीड जेनेटीक्स इंडिया लि. ----- सामनेवाले.
प्लॉट नं.२०६,रोड नं.१४,ज्युबली हिल्स,
हैद्राबाद-५०००३३
(२)सुशील अॅग्रीकल्चर एजन्सीज
प्रो.उदय साहेबराव पाटील
मेन रोड,साक्री,ता.साक्री,जि.धुळे.
न्यायासन
(मा.अध्यक्षाः सौ.व्ही.व्ही.दाणी )
(मा.सदस्य: श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.डी.डी.जोशी)
(सामनेवाले क्र.१ तर्फे – वकील श्री.वो.के.भुतडा)
(सामनेवाले क्र.२ तर्फे – गैरहजर)
------------------------------------------------------------------------
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
(१) तक्रारदारांनी, सामनेवाले यांच्याकडून सदोष बियाण्यापोटी नुकसान भरपाई मिळणेकामी सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये या मंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांची मौजे छाईल ता.साक्री.जि.धुळे येथे गट क्रमांक १९२ अशी शेतजमीन आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या शेतामध्ये मक्याचे उत्पादन घेणेकामी सामनेवाले क्र.१ यांनी उत्पादीत केलेले मक्याचे बियाणे, सामनेवाले क्र.२ यांचेकडून दि.११-०६-२०११ रोजी खरेदी केले. सदर बियाण्याची तक्रारदार यांनी त्यांच्या शेतजमिनीत लागवड केली व आवश्यक त्या उपाययोजना केल्या. परंतु सामनेवाले क्र.१ व २ यांच्या सूचनांचे पालन करुनसुध्दा अपेक्षेप्रमाणे मक्याचे उत्पादन आले नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी दि.०९-११-२०११ रोजी कृषिअधिकारी पंचायत समिती साक्री यांच्याकडे तक्रार दिली. त्याप्रमाणे कृषिअधिकारी यांनी पाहणी करुन पिक परिस्थितीचा पंचनामा केला. त्या पंचनाम्याप्रमाणे मक्याचे दाणे भरण्याचे प्रमाण कमी आहे. त्या बाबत समितीने, सदर शेत जमीन ही उताराची असल्यामुळे पाणी साचल्यामुळे दाणे कमी भरण्याची शक्यता वर्तविली आहे. परंतु तशी परिस्थिती नव्हती व नाही, समितीने दिलेला अभिप्राय हा चुकीचा आहे. वरील परिस्थितीवरुन सामनेवाले क्र.१ कंपनीचे बियाणे हे निकृष्ट दर्जाचे होते. सामनेवाले क्र.१ व २ यांनी संगनमताने फसवणूक केली आहे व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सामनेवाले हे नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत. सदरची नुकसान भरपाई देण्यास सामनेवाले यांनी टाळाटाळ केली आहे.
सबब सामनेवाले यांचेकडून, वैयक्तिक किंवा संयुक्तिक रित्या नुकसानीपोटी रक्कम रु.७५,०००/-, मानसिक शारीरिक त्रासाकामी रक्कम रु.२४,०००/- व्याजासह मिळावेत तसेच अर्जाचा खर्च मिळावा अशी तक्रारदारांची विनंती आहे.
(३) तक्रारदार यांनी नि.नं.३ वर शपथपत्र दाखल केले असून, नि.नं.५ वरील दस्तऐवज यादीसोबत एकूण सात कागदपत्रे छायांकीत स्वरुपात दाखल केली आहेत. त्यात ७/१२ उतारा, पावती, कृषिअधिकारी यांना दिलेले पत्र, पंचनाम्याची प्रत, इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे.
(४) सामनेवाले नं.१ हे प्रकरणात हजर झाले आहेत. परंतु त्यांनी अद्यापही खुलासा दाखल केलेला नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्द नि.नं.१ वर “नो-से” आदेश, तसेच सामनेवाले क्र.२ यांनी मंचाची नोटीस स्वीकारली आहे. परंतु ते मंचात हजर झाले नाहीत. म्हणून त्यांचे विरुध्द नि.नं.१ वर “एकतर्फा” आदेश, दि.१६-०९-२०१३ रोजी पारित करण्यात आला आहे.
(५) तक्रारदारांचा अर्ज, शपथपत्र, दाखल कागदपत्र पाहता तसेच तक्रारदारांच्या विद्वान वकीलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)तक्रारदार हे सामनेवाले नं.१ व २ यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय. |
(ब)सामनेवाले यांच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होते काय ? | : नाही. |
(क)आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे. |
विवेचन
(६) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.२ यांच्याकडून सामनेवाले क्र.१ यांनी उत्पादीत केलेले मक्याचे बियाणे, कमांडो लॉट नंबर १९८८ हे पाच किलो, रक्कम रु.८००/- किमतीस दि.११-०६-२०११ रोजी खरेदी केले आहे. त्या बाबतची पावती नि.नं.५/२ वर दाखल आहे. सदर पावतीचा विचार करता तक्रारदार हे सामनेवाले यांचे “ग्राहक” असल्याचे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. “अ” चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(७) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार यांनी सदर बियाण्याची त्यांचे शेतात लागवड केली. परंतु त्याचे अपेक्षेप्रमाणे उत्पादन आले नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे. त्याकामी तक्रारदार यांनी दि.०९-११-२०११ रोजी कृषिअधिकारी पंचायत समिती, साक्री यांच्याकडे अर्ज दिला आहे. सदर अर्ज नि.नं.५/४ वर दाखल आहे. या अर्जाप्रमाणे कृषि अधिकारी यांनी पिक परिस्थितीचा पंचनामा केला असून त्याची प्रत नि.नं.५/६ वर दाखल आहे. सदर पंचनाम्याचे अवलोकन केले असता त्यामध्ये खालील विवेचन नमूद केलेले आहे.
“आज दि.२५-११-२०११ रोजी तक्रारीत प्रक्षेत्राची पाहणी केली असता तक्रारदार शेतक-याने सांगितलेनुसार तक्रारीत वाण (कमांडो) ची लागवड दि.१४-०६-२०११ रोजी केल्याची सांगितले. सद्यस्थितीत पिकाची काढणी झाली असून शेतामध्ये मका पिकाची काढलेल्या कणसाच्या ढीगामधून १० कणसाची रॅण्डम पध्दतीने निरिक्षणे घेतली असता कणसाची सरासरी लांबी १७ से.मी. आढळून आली. त्यामध्ये दाणे ची संख्या सरासरी ४५० इतकी आढळूण आली. संबंधित उत्पादक कंपनीने पुरविलेल्या कायीक गुणधर्मानुसार नॉर्मल कणसाची लांबी २२ से.मि. व एका कणसामध्ये दाणे भरणेचे प्रमाण ६४० इतके आहे. घेतलेल्या निरिक्षणावरुन व आजूबाजूच्या शेतक-यांने दिलेल्या लेखी जबाबावरुन सदर शेत उताराकडील बाजूस असल्याने व कणसात दाणे भरणेचे वेळेस शेतात पाणी साचले असल्याचे सांगितले असल्याने दाणे भरणेचे प्रमाण व कणसाची लांबी कमी प्रमाणात असल्याचे समितीचे मत आहे.”
या पंचनाम्याप्रमाणे असे दिसते की, तक्रारदारांनी सदर बियाण्यापासून मक्याचे उत्पादन घेतले आहे व त्यातील काढलेल्या कणसांच्या ढिगामधून १० कणसांची समितीने रॅण्डम पध्दतीने पाहणी केली आहे. त्यात मक्याच्या कणसाची लांबी २२ सें.मि. इतकी नसून ती १७ सें.मि. इतकी आढळून आलेली आहे. सदर बाब ही तक्रारदाराचे शेत हे उताराकडील बाजूस आहे, व असे असल्याने कणसाचे दाणे भरतेवेळी शेतात पाणी साचल्याने दाणे भरण्याचे प्रमाण व कणसाची लांबी कमी प्रमाणात आली आहे. असे सदर समितीने मत हे निरिक्षणावरुन व आजूबाजूच्या शेतक-यांच्या लेखी जबाबावरुन दिलेला आहे. सदर पंचनाम्यामध्ये सामनेवाले यांनी उत्पादीत व विक्री केलेल्या मका बियाण्यात दोष आहे असे निदर्शणास आलेले नसून बियाण्यात दोष आहे असे अहवालात नमूद केलेले नाही.
समितीच्या या पंचनाम्याचा विचार करता, सामनेवाले यांच्या बियाण्यामध्ये दोष आहे हे पुराव्यानिशी सिध्द होत नाही. तसेच तक्रारदार यांनी सामनेवालेंच्या बियाण्यात दोष आहे या बाबतचा कोणताही पुरावा दिलेला नाही. केवळ पंचनाम्याचा आधार घेऊन दोष असल्याचे तक्रारीत नमूद केलेले आहे. परंतु सदरचा पंचनामा हा सकृतदर्शनी पुरावा नाही. याचा विचार करता सामनेवालेंच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होत नाही. तक्रारदार यांनी तक्रार सिध्द केलेली नसल्यामुळे तक्रार रद्द होण्यास पात्र आहे असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. “ब” चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
(८) वरील सर्व बाबीचा विचार होता, तक्रारदारांची तक्रार रद्द करणे योग्य होईल असे या मंचाचे मत आहे. सबब खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज रद्द करण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दिनांकः १७/०२/२०१४
(श्री.एस.एस.जोशी) (सौ.व्ही.व्ही.दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.