::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 20/10/2016 )
आदरणीय सदस्य श्री कैलास वानखडे, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, . .
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडून दि. 27/12/2014 रोजी कागदाचे द्रोण व प्लेट्स तयार करण्याची इलेक्ट्रीक हायड्रॉलीक संयत्र रु. 1,20,000/- ला विकत घेतले. त्या सोबत एक साचा द्रोणाचा व प्रत्येकी साचा पेपर डिश क्र. 6,7 8 सोबत देणार होते. सदर संयत्र सुरु केल्यानंतर, असे लक्षात आले की, विरुध्दपक्षाने सांगितल्या प्रमाणे सदरच्या संयत्राची उत्पादन क्षमता ही एक क्विंटल प्रतिदिवस नसुन ती 10 ते 15 किलो प्रतिदिवस आहे. त्यामुळे विरुध्दपक्षाकडे मौखिक तक्रार केली. सदर तक्रार प्राप्त झाल्यानंतर विरुध्दपक्षाच्या कारागिरांनी सदर संयत्रामधील दोष दुर करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. त्यामुळे सदरचे सयंत्र बदलून त्या ठिकाणी एक संपुर्ण स्वयंचलित संयत्र रु. 10,000/- अतिरिक्त भरल्यानंतर बदलून देतो व सदर संयत्र हे 20000 ते 25000 नग द्रोण प्रतितास एवढे उत्पादन देईल, असे विरुध्दपक्षाने सांगितले. त्या प्रमाणे जुने सयंत्र विरुध्दपक्षाच्या खामगांव या ठिकाणी पोहचते केले व काही दिवसात नविन संयत्र विरुध्दपक्षाने पोहचते केले. परंतु नविन सयंत्राची उत्पादन क्षमता सांगितल्याप्रमाणे नसुन चालु स्थितीत असतांना पट्टा ड्राईव्ह बेल्ट ला नुकसान होत होते. असे तिन बेल्ट विरुध्दपक्षाने बदलून दिले. त्या सेाबत तापमान नियंत्रक, हे देखील खराब झाले, याची सुध्दा मौखिक तक्रार विरुध्दपक्षाकडे केली होती. त्या तक्रारीनुसार विरुध्दपक्षाने सदर सयंत्र दुकानात आणावे, असे सुचविले, परंतु सदर सयंत्र वजनी असल्यामुळे व त्यास नेण्याचा खर्च रु. 3000/- येत असल्याने विरुध्दपक्षाने येवून सदरचे सयंत्र दुरुस्त करुन द्यावे किंवा बदलून द्यावे. परंतु विरुध्दपक्ष यांनी त्यावर लक्ष दिले नाही व बदलून देण्यास नकार दिला. सदरचे सयंत्र हे कार्यरत नसल्यामुळे कच्च्या मालापोटी जमा असलेले रु. 45,000/- परत मागीतले व ती रक्कम विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला परत केली आहे, ते दस्त प्रकरणात दाखल केले आहे. विरुध्दपक्षाने सदर संयत्र हे बदलून दिले नाही व रु. 1,30,000/- परत केले नाही. त्यामुळे विरुध्दपक्षाला वकीलामार्फत नोटीस पाठवावी लागली. सदर नोटीसला विरुध्दपक्षाकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सदर तक्रार मंचात दाखल करावी लागली. तक्रारकर्त्याने प्रार्थना केली की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात यावी व सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 05 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष यांचा लेखीजवाब :-
2. विरुध्दपक्षाने सदर प्रकरणात लेखी जबाब दाखल केला आहे, त्यानुसार त्यांनी तक्रारीतील आरोप नाकबुल केलेले आहेत. विरुध्दपक्षाच्या म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याने द्रोण व प्लेट्स तयार करण्याची हायड्रोलीक मशिन त्याचे व्यवसायीक उत्पादन व उपयोगाकरिता खरेदी केली आहे. त्याचे किराणा दुकानाच्या माध्यमातून द्रोन व प्लेटस विक्री करतो. तक्रारकर्त्याचा मुळ हेतु व्यावसायीक असल्याने ग्राहक या संज्ञेत येत नाही. तक्रारकर्त्याने अनेक क्लिष्ट व आधारहीन मुद्दे उपस्थित केले आहे. सखोल चौकशी, तथ्यांची पडताळणी व पुराव्या विना सदरचे मुद्दे निकाली काढणे शक्य नाही. त्या बाबत पुर्ण अधिकार फक्त दिवाणी न्यायालयालाच आहे. तक्रारकर्त्या सोबत संपुर्ण व्यवहार खामगांव येथे झाला आहे. प्रकरण अकोला येथे दाखल करण्याकरिता कोणतेही कारण मा. मंचाच्या स्थळ सिमेत कधीही घडले नाही. तक्रारकर्त्याचा व्यवसाय व राहण्याचे ठिकाण सुध्दा खामगांव येथे आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाचे पती यांचेशी व्यवहाराचे संबंध दाखविले आहे व त्यांना सदर प्रकरणात पक्ष बनविलेले नाही. तक्रारकर्त्यास बिल क्र. 58 अन्वये द्रोण डाय 4 नग आणि नास्ता प्लेट क्र. 6,7, 8 ची डायसह हायड्रोलिक मशिन रु. 1,20,000/- विक्री केली. या व्यतिरिक्त तक्रारकर्त्याला कोणतीही डाय / साचा किंवा स्वयंचलित मशिन विकली अथवा अधिकची रक्कम घेवून बदलून दिली नाही. तक्रारकर्त्याच्या अडाणीपणामुळे मशिनच्या गॅरंटी कालावधीत किमान 2-3 वेळा मशिन मध्ये बिघाड झाला होता आणि प्रत्येक वेळा मोबदला न घेता ती दुरुस्त करुन दिली. तसेच तक्रारकर्त्याने मशिनच्या वजनाची पावती प्रकरणात दाखल केली आहे, ती पावती मशीनची नसून कच्चा मालाची आहे. तक्रारकर्त्याने कच्चा माल परत करुन पैशांची मागणी केल्यामुळे रु. 45,000/- धनादेश क्र. 001848 अन्वये पैसे परत केले आहे. त्यामुळे सदर तक्रार ही खारीज करण्यात यावी.
3. त्यानंतर तक्रारकर्त्याने प्रतिउत्तर व लेखी युक्तीवाद दाखल केला. तसेच विरुध्दपक्षाने प्रतिज्ञालेख व लेखी युक्तीवाद दाखल केला. तसेच उभय पक्षांनी तोंडी युक्तीवाद केला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. तक्रारकर्त्याची तक्रार व दाखल दस्त, विरुध्दपक्षाचा लेखी जबाब, तक्रारकर्त्याचे प्रतिउत्तर, तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांचा पुरावा, तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांचा लेखी व तोंडी युक्तीवाद, याचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष, कारणे देवून नमुद केला, तो येणे प्रमाणे.
सदर प्रकरणात तक्रारकर्ता याने विरुध्दपक्षाकडून कागदाचे द्रोण व प्लेट्स तयार करणारी मशीन इलेक्ट्रीक हायड्रॉलीक संयत्र दि. 27/12/2014 रोजी रु. 1,20,000/- ला विकत घेतले व त्या सोबत रु. 45000/- कच्चा माल विकत घेतला, त्याची पावती सदर प्रकरणात तक्रारकर्त्याने दाखल केली आहे ( दस्त क्र. 1 ), यावरुन तक्रारकर्ता विरुध्दपक्षाचा ग्राहक आहे, हे सिध्द होते.
तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडून दि. 27/12/2014 रोजी कागदाचे द्रोण व प्लेट्स तयार करण्याची इलेक्ट्रीक हायड्रॉलीक संयत्र रु. 1,20,000/- ला विकत घेतले. त्या सोबत एक साचा द्रोणाचा व प्रत्येकी साचा पेपर डिश क्र. 6,7 8 सोबत देणार होते. सदर संयत्र सुरु केल्यानंतर, असे लक्षात आले की, विरुध्दपक्षाने सांगितल्या प्रमाणे सदरच्या संयत्राची उत्पादन क्षमता ही एक क्विंटल प्रतिदिवस नसुन ती 10 ते 15 किलो प्रतिदिवस आहे. त्यामुळे विरुध्दपक्षाकडे मौखिक तक्रार केली. सदर तक्रार प्राप्त झाल्यानंतर विरुध्दपक्षाच्या कारागिरांनी सदर संयत्रामधील दोष दुर करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. त्यामुळे सदरचे सयंत्र बदलून त्या ठिकाणी एक संपुर्ण स्वयंचलित संयत्र रु. 10,000/- अतिरिक्त भरल्यानंतर बदलून देतो व सदर संयत्र हे 20000 ते 25000 नग द्रोण प्रतितास एवढे उत्पादन देईल, असे विरुध्दपक्षाने सांगितले. त्या प्रमाणे जुने सयंत्र विरुध्दपक्षाच्या खामगांव या ठिकाणी पोहचते केले व काही दिवसात नविन संयत्र विरुध्दपक्षाने पोहचते केले. परंतु नविन सयंत्राची उत्पादन क्षमता सांगितल्याप्रमाणे नसुन चालु स्थितीत असतांना पट्टा ड्राईव्ह बेल्ट ला नुकसान होत होते. असे तिन बेल्ट विरुध्दपक्षाने बदलून दिले. त्या सेाबत तापमान नियंत्रक, हे देखील खराब झाले, याची सुध्दा मौखिक तक्रार विरुध्दपक्षाकडे केली होती. त्या तक्रारीनुसार विरुध्दपक्षाने सदर सयंत्र दुकानात आणावे, असे सुचविले, परंतु सदर सयंत्र वजनी असल्यामुळे व त्यास नेण्याचा खर्च रु. 3000/- येत असल्याने विरुध्दपक्षाने येवून सदरचे सयंत्र दुरुस्त करुन द्यावे किंवा बदलून द्यावे. परंतु विरुध्दपक्ष यांनी त्यावर लक्ष दिले नाही व बदलून देण्यास नकार दिला. सदरचे सयंत्र हे कार्यरत नसल्यामुळे कच्च्या मालापोटी जमा असलेले रु. 45,000/- परत मागीतले व ती रक्कम विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला परत केली आहे, ते दस्त प्रकरणात दाखल केले आहे. विरुध्दपक्षाने सदर संयत्र हे बदलून दिले नाही व रु. 1,30,000/- परत केले नाही. त्यामुळे विरुध्दपक्षाला वकीलामार्फत नोटीस पाठवावी लागली. सदर नोटीसला विरुध्दपक्षाकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सदर तक्रार मंचात दाखल करावी लागली.
विरुध्दपक्षाच्या म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याने द्रोण व प्लेट्स तयार करण्याची हायड्रोलीक मशिन त्याचे व्यवसायीक उत्पादन व उपयोगाकरिता खरेदी केली आहे. तो किराणा दुकानाच्या माध्यमातून द्रोण व प्लेट्स विक्री करतो. तक्रारकर्त्याचा मुळ हेतु व्यावसायीक असल्याने ग्राहक या संज्ञेत येत नाही. तक्रारकर्त्याने अनेक क्लिष्ट व आधारहीन मुद्दे उपस्थित केले आहे. सखोल चौकशी, तथ्यांची पडताळणी व पुराव्या विना सदरचे मुद्दे निकाली काढणे शक्य नाही. त्या बाबत पुर्ण अधिकार फक्त दिवाणी न्यायालयालाच आहे. तक्रारकर्त्या सोबत संपुर्ण व्यवहार खामगांव येथे झाला आहे. प्रकरण अकोला येथे दाखल करण्याकरिता कोणतेही कारण मा. मंचाच्या स्थळ सिमेत कधीही घडले नाही. विरुध्दपक्षाचा व्यवसाय व राहण्याचे ठिकाण सुध्दा खामगांव येथे आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाचे पती यांचेशी व्यवहाराचे संबंध दाखविले आहे व त्यांना सदर प्रकरणात पक्ष बनविलेले नाही. तक्रारकर्त्यास बिल क्र. 58 अन्वये द्रोण डाय 4 नग आणि नास्ता प्लेट क्र. 6,7, 8 ची डायसह हायड्रोलिक मशिन रु. 1,20,000/- विक्री केली. या व्यतिरिक्त तक्रारकर्त्याला कोणतीही डाय / साचा किंवा स्वयंचलित मशिन विकली अथवा अधिकची रक्कम घेवून बदलून दिली नाही. तक्रारकर्त्याच्या अडाणीपणामुळे मशिनच्या गॅरंटी कालावधीत किमान 2-3 वेळा मशिन मध्ये बिघाड झाला होता आणि प्रत्येक वेळा मोबदला न घेता ती दुरुस्त करुन दिली. तसेच तक्रारकर्त्याने मशिनच्या वजनाची पावती प्रकरणात दाखल केली आहे, ती पावती मशीनची नसून कच्चा मालाची आहे. तक्रारकर्त्याने कच्चा माल परत करुन पैशांची मागणी केल्यामुळे रु. 45,000/- धनादेश क्र. 001848 अन्वये पैसे परत केले आहे. त्यामुळे सदर तक्रार ही खारीज करण्यात यावी.
उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मंचाच्या असे निदर्शनास आले की, सदर इलेक्ट्रीक हायड्रॉलीक मशिन ही खामगाव येथील दुकानातून विकत घेतली असली तरी, नंतर सदर मशिन तक्रारकर्त्याने त्याच्या राहत्या घरी कानशिवणी, ता.जि. अकोला येथे आणल्यानंतर त्यातील दोष तक्रारकर्त्याला कानशिवाणी येथे लक्षात आले, तसेच सदर यंत्रावर विरुध्दपक्षाने लेखी जबाबात कबुल केल्याप्रमाणे दोन ते तिन वेळेस दुरुस्तीचे काम कानशिवणी अकोला येथे केले आहे व नोटीस सुध्दा कानशिवणी, अकोला येथून तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला पाठविली आहे. त्यामुळे अंशत: कारण जे घडले ते अकोला जिल्ह्यात घडले आहे. म्हणून अकोला मंचाला सदर तक्रार तपासण्याचे कार्यक्षेत्र आहे, असे मंचाचे मत आहे.
सदर प्रकरणात विरुध्दपक्षाच्या म्हणण्यानुसार वस्तुस्थिती बाबत अनेक क्लिष्ट व आधारहीन मुद्दे उपस्थित केले आहे. परंतु सदर प्रकरणात कोणतेही गुंतागुंतीचे मुद्दे नसल्यामुळे व पुरावा/ पावती मंचात दाखल केल्यामुळे समरी पध्दतीने निकाल देता येईल. तसेच पावतीवर सही ही प्रोप्रायटरची / कल्पना तुषार चिलवंत यांची असल्यामुळे विरुध्दपक्षाच्या पतीचा व तक्रारकर्त्याचा या व्यवहारात कोणताही संबंध येत नाही, म्हणून त्यांना सदर प्रकरणात पक्ष बनविणे आवश्यक नाही, असे मंचाचे मत आहे
तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडून दि. 27/12/2014 ला रु. 1,20,000/- ला इलेक्ट्रीक हायड्रॉलीक सयंत्र विकत घेतले होते. विरुध्दपक्षाने सांगितल्या प्रमाणे सदर सयंत्राची उत्पादन क्षमता एक क्विंटल प्रतिदिवस आहे. परंतु प्रत्यक्षात 10 ते 15 किलो दररोजचे उत्पादन करीत असल्यामुळे अतिरिक्त रक्कम रु. 10,000/- देवून नविन स्वयंचलित सयंत्र घेतले व विरुध्दपक्षाने लेखी युक्तीवादात म्हटले आहे की, तक्रारकर्त्याकडून कुठलेही अतिरिक्त रक्कम न घेता कोणतेही स्वयंचलीत सयंत्र बदलून दिले नाही. परंतु तक्रारकर्त्याने दि. 2/2/2015 रोजी जुने सयंत्र सचिन अढावू यांचे भाड्याचे मालवाहक करुन श्रीनाथ गृहउद्दोग येथे पोहचविण्याचा पुरावा मंचात दाखल केला आहे. त्यामुळे विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला स्वयंचलित सयंत्र बदलून दिलेले आहे, हे स्पष्ट होते.
सदर स्वयंचलित सयंत्रामध्ये सुध्दा बिघाड झाल्याने व विरुध्दपक्षाने सदर मशिन दोन ते तिन वेळा कोणताही मोबदला न घेता दुरुस्त करुन दिलेली आहे. सदर सयंत्रामध्ये वारंवार पट्टा, ड्राईव बेल्ट तुटत होते, त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर सयंत्र बदलून किंवा त्याची किंमत परत मागीतली होती. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडून रु. 45,000/- कच्चा माल विकत घेतला होता, तो माल विरुध्दपक्षाने परत घेवून तक्रारकर्त्याला धनादेशाव्दारे रु. 45,000/- परत केले, त्या डी.डी.ची छायाकिंतप्रत प्रकरणा सोबत जोडली आहे. यावरुन स्पष्ट होते की, जवळपास 6 महिन्यापर्यंत तक्रारकर्त्याचा काहीही कच्चा माल खपला नव्हता. सयंत्राने जर व्यवस्थीत काम केले असते तर त्या रकमेपेक्षा जास्त रकमेचा कच्चा माल तक्रारकर्त्याला लागला असता. यावरुन असे दिसून येते की, सदर सयंत्रात बिघाड असल्यामुळे व ते नादुरुस्त असल्यामुळे सदर कच्चा माल विरुध्दपक्षाने परत घेतला व तक्रारकर्त्याचे रु. 45,000/- परत केले. तसेच विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यावर केलेले आरोप की, सदर सयंत्र हे नातेवाईकांकडून अदलाबदली केले आहे, यामध्ये काही तथ्य वाटत नाही.
तक्रारकर्त्याने युक्तीवादामध्ये सांगितले की, सदर स्वयंचलित सयंत्र हे नादुरुस्त अवस्थेत तक्रारकर्त्याच्या घरी आहे व विरुध्दपक्ष सदर सयंत्र हे बदलून देण्यास किंवा एकुण रक्कम परत करण्यास तयार नाही. तक्रारकर्त्याने सदर सयंत्र हे स्वत:च्या उपजिवीकेसाठी घेतले आहे. त्या सयंत्राव्दारे कोणतेही उत्पादन तक्रारकर्त्याला मिळत नसल्यामुळे तक्रारकर्त्याचे नुकसान होत आहे. त्यामुळे तक्रारकर्ता नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे.
सबब अंतीम आदेश पारीत केला तो येणे प्रमाणे..
::: अं ति म आ दे श :::
- तक्रारकर्त्याची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येते.
- विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला रु. 1,30,000/- ( रुपये एक लाख तिस हजार फक्त ) प्रकरण दाखल तारखेपासून ( दि.21/12/2015 ) प्रत्यक्ष अदाई पर्यंत दरसाल दरशेकडा 8 टक्के दराने व्याजासह परत करावे.
- तक्रारकर्त्याने सदर इलेक्ट्रीक हायड्रॉलीक सयंत्र विरुध्दपक्षाला परत करावे.
- विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 3000/- (रुपये तिन हजार ) व प्रकरण खर्चापोटी रु. 2000/- (रुपये दोन हजार ) द्यावे
- सदर आदेशाची पुर्तता, निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसात करावी.
- सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षांना नि:शुल्क देण्यात याव्या.