नि.30 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 106/2010 नोंदणी तारीख - 6/4/2010 निकाल तारीख - 9/7/2010 निकाल कालावधी – 93 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ 1. जयवंतराव केशवराव देशमुख 2. उज्वला जयवंतराव देशमुख 3. अभिजीत जयवंतराव देशमुख सर्व रा. लोकमान्य कॉलनी, आगाशिवनगर, कराड जि. सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री.विनय मुळे) विरुध्द 1. श्रीमंत मालोजीराजे सहकारी गृहतारण संस्था मर्या.फलटण तर्फे मॅनेजर संभाजीराव संपतराव शिंदे 2. संस्थापक चेअरमन, दुर्योधन दत्तात्रय रणनवरे ----- जाबदार क्र.2 (एकतर्फा) 3. व्हा.चेअरमन, शंतनु दुर्योधन रणनवरे दोघे रा. दत्तकृपा लक्ष्मीनगर, गोळीबार मैदान, फलटण जि. सातारा ----- जाबदार क्र.1 व 3 (अभियोक्ता के.व्ही.सटाले) 4. अध्यक्ष प्रशासकीय मंडळ प्रकाश एन. रणवरे जिल्हा उपनिबंधक सह.सोसा.मार्केट यार्ड फलटण ता. फलटण जि. सातारा ----- जाबदार क्र.4 न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांनी जाबदार संस्थेमध्ये वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव म्हणून ठेवलेल्या आहेत. सदरच्या ठेवींची मुदत संपलेली आहे. मुदत ठेव पावतीची मुदत संपलेनंतर देय होणा-या रकमेची मागणी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे केली. तथापि जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीवर व्याजसहित देय झालेली रक्कम देण्यास टाळाटाळ केली. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना देण्यात यावयाची रक्कम न दिल्यामुळे सेवेत त्रुटी केली आहे. अर्जदार हे जाबदार संस्थेचे ग्राहक आहेत. त्यामुळे जाबदार संस्थेकडून मुदत ठेव पावतीची एकूण देय रक्कम वसूल होऊन मिळण्यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज केला आहे. सदरचे अर्जामध्ये अर्जदार यांनी एकूण रक्कम रु. 10,81,746/- ची व्याजासह मागणी केलेली आहे. 2. जाबदार क्र.1 व 3 यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.17 ला दाखल करुन अर्जदारचे तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे. जाबदार संस्था ही ठेवीदारांकडून ठेवी स्वीकारुन गरजू सभासदांना त्यांचे अडीअडचणींप्रमाणे घरदुरुस्ती व घरबांधणी यासाठी कर्जपुरवठा करते. परंतु सदरचे कर्जाची परतफेड जाबदार संस्थेच्या सभासदांनी वेळेत केली नाही. त्यामुळे जाबदार संस्थेने त्यांचेविरुध्द वसुली दावे दाखल केलेले आहेत. त्यांचेकडून जसजशी वसुली होईल त्याप्रमाणे ठेवीदार यांना रकमा परत करण्यात येतील. जवळजवळ 80 टक्के ठेवीदांरांच्या रकमा परत केलेल्या आहेत. अर्जदार हा जाबदार यांचा सभासद असलेने प्रस्तुतचा वादविषय सहकार न्यायालय यांचे कक्षेत येतो. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांचे कथन आहे. 3. जाबदार क्र.4 यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.20 ला लेखी म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांचे कथनानुसार जाबदार क्र.4 यांची सहायक निबंधक सहकारी संस्था, फलटण यांनी जाबदार संस्थेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्षपदी नेमणूक केलेली आहे. परंतु जाबदार सोसायटीचा चार्ज अद्याप जाबदार क्र.4 यांना दिलेला नाही. त्यामुळे जाबदार संस्थेचे रेकॉर्ड व चार्ज जाबदार क्र.4 यांचे ताब्यात नसल्यामुळे अर्जदार यांची रक्कम देणेची जबाबदारी जाबदार क्र.4 यांची नाही. सबब ठेवपरतीची जबाबदारी जाबदार क्र.4 यांचेवर बसवू नये असे जाबदार क्र.4 यांनी कथन केले आहे. 4. जाबदार क्र.2 यांनी प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस स्वीकारली नाही. नोटीस न स्वीकारलेबाबतचा पोस्टाचा शेरा असलेला लखोटा नि.24 ला दाखल आहे. परंतु जाबदार क्र.2 हे या प्रकरणात हजर झालेले नाहीत वा त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत व शपथपत्र दाखल केलेले नाही. सबब त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 5. अर्जदार व जाबदार यांनी दाखल केलेली शपथपत्रे तसेच दाखल कागदपत्रे पाहणेत आली. 6. जाबदार क्र.1 व 3 यांनी त्यांचे कैफियतीमध्ये असे कथन केले आहे की, कर्जदार सभासदांनी वेळेवर कर्जाची परतफेड न केल्याने संस्थेची आर्थिक स्थिती ढासळली आहे. कर्जदारांकडून जसजशी वसुली होईल त्याप्रमाणे ठेवीदारांच्या रकमा परत करण्यात येत आहे. परंतु सदरची कारणे ही ठेव रक्कम परत न करण्यास कायदेशीर कारणे होऊ शकत नाही. ठेवीची मुदत संपलेनंतर अगर संपणेपूर्वी ठेव रक्कम व्याजासह परत मिळण्याचा अर्जदार यांना कायद्यानेच अधिकार आहे. तथापि, अर्जदार यांचे शपथपत्र, जाबदार यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रे पाहता असे दिसून येते की, जाबदार यांनी अर्जदार यांना देय असलेली रक्कम देण्यास टाळाटाळ केलेली आहे. थोडक्यात जाबदार क्र. 1 ते 3 यांनी अर्जदार यांना द्यावयाच्या सेवेत कमतरता केलेली आहे. सबब या प्रकरणी मंचाचे असे स्पष्ट मत झाले आहे की, अर्जदार यांना जाबदार यांनी कबूल केलेली सेवा म्हणजे ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेवर व्याजासहित देय झालेली रक्कम ठेवींची मुदत संपलेनंतर दिलेली नाही. अशा प्रकारे अर्जदार हे जाबदार क्र. 1 ते 3 यांचेकडून रक्कम मिळणेस पात्र आहेत असे दिसून येत आहे. 7. तसेच अर्जदार व जाबदार यांचेमधील वाद हा सहकारी संस्थेचा सभासद व सहकारी संस्था यांचेमधील वाद नसून तो ठेवीदार ग्राहक व सहकारी संस्था यांचे दरम्यानचा वाद आहे. त्यामुळे अर्जदार यांचे प्रस्तुतचे तक्रारअर्जाचा निर्णय करण्याचे अधिकार क्षेत्र या मंचास आहे. 8. जाबदार क्र.4 यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये असे कथन केले आहे की सहायक निबंधक, सहकारी संस्था, फलटण यांनी जाबदार क्र.4 यांची जाबदार संस्थेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. परंतु जाबदार संस्थेचा कार्यभार अद्यापही जाबदार क्र.4 यांना देण्यात आलेला नाही. जाबदार क्र.4 यांनी सदरचे कथनाचे पृष्ठयर्थ नि.2 सोबत सहायक निबंधक, सहकारी संस्था फलटण यांचा आदेश दाखल केला आहे. तसेच जाबदार क्र.4 यांनी जाबदार क्र.1 यांना संस्थेचा कार्यभार सुपूर्त करणेबाबत पाठविलेले दि. 5/4/2010 चे पत्र दाखल केले आहे. सदरचे पत्र पाहता जाबदार संस्थेचा कार्यभार अद्यापही जाबदार क्र.4 यांना सुपूर्त केला नसल्याचे दिसून येते. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार यांची ठेवरक्कम परत करण्यास जाबदार क्र.4 यांना जबाबदार धरता येणार नाही असे या मंचाचे मत आहे. 9. एक गोष्ट नमूद करणे जरुरीचे आहे की, जाबदार क्र. 2 जे श्रीमंत मालोजीराजे सहकारी गृहतारण संस्था या संस्थेचे संस्थापक चेअरमन आहेत, अशा या जबाबदारीच्या पदावर काम करणा-या व्यक्तीने प्रस्तुतचे कायदेशीर प्रकरणाची नोटीस/सूचना स्वीकारणे व नेमलेल्या तारखांना या मंचासमोर हजर होणे जरुरीचे होते. तथापि, कसलेही संयुक्तिक कारण जाबदार क्र. 2 यांचेतर्फे याकामी पुढे येत नाही की, जेणेकरुन जाबदार क्र. 2 हे याकामी गैरहजर राहिलेले आहेत. जाबदार यांनी अर्जदार यांचे अर्जातील कोणतेही कथन नाकारलेले अथवा खोडून काढलेले नाही. सबब, अर्जदार यांचे या अर्जातील कथनानुसार अर्जदार यांनी विनंती कलमामध्ये केलेली विनंती अंशतः मान्य करणे जरुरीचे आहे. 10. या सर्व कारणास्तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्यात येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज जाबदार क्र. 1 ते 3 यांचेविरुध्द अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. अर्जदार यांचा तक्रारअर्ज जाबदार क्र.4 यांचेविरुध्द नामंजूर करणेत येत आहे. 3. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. अ. ठेवपावती क्र. 030861, 030862, 030863, 030864, 030865, 030866, 030860, 030859, 030867 वरील मूळ रकमा ठेवपावतीमध्ये नमूद केल्याप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्याव्यात तसेच ठेवीची मुदत संपलेनंतरचे तारखेपासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्केंप्रमाणे व्याजासह द्याव्यात. ब. मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- द्यावेत. क. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- द्यावेत. 4. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि.9/7/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Mr. V.D.Deshmukh, PRESIDENT | Mr. S. K. Kapse, MEMBER | |