::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये, मा. सदस्या. किर्ती गाडगीळ (वैदय)
१. अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
२. अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे आहे की, दिनांक 11/12/2015 रोजी अर्जदाराने वैदयकीय कोटयात पी.एन.आर क्रं 6649430712 नुसार गैरअर्जदाराकडुन टिकीट काढली असता आर.एल.डब्लु.एल/49 अशी स्थिती होती त्यामुळे अर्जदाराने मा. हंसराज अहीर, राज्य मंत्री, यांनी विआयपी कोटयात आरक्षण देण्या संबंधी दिलेले पत्र व टिकीट गैरअर्जदाराला नियमानुसार पाठविले. अर्जदार दिनांक 13/12/2015 रोजी चंद्रपुर ते वर्धा प्रवास करून वर्धा येथे पोहचल्यावर मोबाईल वर आरक्षण स्थिती डब्लुएल असुन आरक्षण चार्ट तयार झाल्याचे कळल्यावर अर्जदाराने गैरअर्जदाराला फोन करून टिकीट का कर्न्फम झाली नाही असे विचारले असता योग्य उत्तर न मिळाल्यामुळे कंट्रोल रूमला फोन पुन्हा लावला असता श्रीमान राव साहेब आरक्षणाबद्दल पाहतात असे सांगितले गेले. अर्जदाराने राव साहेबांना फोन लावल्यावर त्यानी सांगितले की अधिवेशन चालु असल्यामुळे मुख्यमंत्र्यानी आमदारांना आरक्षण दयायचे आहे, असे सांगितल्यामुळे अर्जदाराचे आरक्षण कर्न्फम झाले नाही व तुम्ही टिसीशी बोलुन घ्या असे सांगितले. अर्जदाराने तेथील टिसी धीरज कुमार यांना त्यांची अडचण सांगुनही टिसी ने त्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे अर्जदाराला पुढिल प्रवास पुर्ण रात्र एसी-3 मध्ये गेट जवळ बसुन काढावा लागला त्यामुळे दिनांक 14/12/2016 रोजी अर्जदाराची प्रकृती हालवल्यामुळे अर्जदार दवाखान्यात भर्ती झाले व हॉस्पीटलचे बिल 16,840.89/- आले व औषधीला 46,136/- रूपये लागले. अर्जदाराला दर महिन्याला दवाखान्याचा खर्च 2,770/- रूपये येतो. परंतु प्रवासात त्रास झाल्यामुळे अर्जदाराला हा खर्च सहन करावा लागला.प्रवासात झालेल्या त्रासाबद्दल दिनांक 20/12/2015 रोजी मध्य रेल्वे नागपूरकडे तक्रार दिली असता दिनांक 22/01/2016 रोजी रेल्वे प्रबंधक नागपूर यांनी त्यांच्या आरक्षण कार्यालयाच्या चुकीमुळे अर्जदाराला बर्थ दिला गेला नाही, असे पत्र अर्जदाराला दिले. अर्जदाराने सदर तक्रार गैरअर्जदाराविरूध्द नुकसान भरपाई पोटी मंचात दाखल केलेली आहे. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदाराने अर्जदाराला नुकसान भरपाई पोटी 60,000/- रूपये देण्यात यावे.
३. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होवून त्यांचे उत्तर दाखल केले. गैरअर्जदाराने तक्रारीत असा आक्षेप घेतला की, अर्जदाराने गैरअर्जदाराला वैयक्तीक रित्या पक्ष केलेले असल्यामुळे व योग्य पक्षकाराला पक्ष म्हणुन तक्रारीत जोडलेले नसल्यामुळे सदर तक्रार खारीज करण्यात यावी. तसेच त्यांच्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, गैरअर्जदार हे विआयपी कोटया प्रमाणे आरक्षण त्यांच्या नियमाप्रमाणे देत असतात. जर एखादया वेळेस ईमरजन्सी कोटा रिकामा असेल तर तो इतर पॅसेन्जरला शासकीय कामासाठी, कुटुंबासाठी किंवा आजारपणाच्या कारणावरून दिला जाऊ शकतो. ईमरजन्सी कोटा हा रेल्वे बोर्डाच्या गाईड लाईन प्रमाणे दिला जातो. रेल्वे ही जनरल लोकांसाठी ईमरजन्सी कोटा देण्याची जवाबदारी घेत नाही. सदर तक्रारीत रेल्वे ने कोणतीही सेवेत न्युनता दिली नाही तसेच रेल्वे प्रशासकाने त्यासाठी कोणतीही शुल्क स्वीकारले नाहीत त्यामुळे अर्जदाराची सदर तक्रार खारीज करण्यात यावी.
४. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे
मुद्दे निष्कर्ष
१) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
२) गैरअर्जदाराने अर्जदाराला कराराप्रमाणे न्युनतापूर्ण
सेवा दिली आहे का ? होय
३) आदेश ? अंशत: मान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. १ बाबत ः- अर्जदाराने गैरअर्जदाराकडुन दिनांक 11/12/2015 रोजी वैदयकीय कोटयात पी.एन.आर क्रं 6649430712 नुसार गैरअर्जदाराकडुन टिकीट काढले ही बाब गैरअर्जदारांना मान्य असुन त्याबद्दल अर्जदाराने तक्रारीत दस्तावेज दाखल केलेले असल्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे सबब मुद्दा क्रं 1 चे उत्तर होकारार्थी नमुद करण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. २ बाबत ः- अर्जदाराने सदर तक्रार गैरअर्जदाराच्या वैयक्तीक नावाने पक्षकार केले असले तरी गैरअर्जदार हे रेल्वेचे प्रतीनिधी म्हणुन काम पाहत असल्यामुळे वैयक्तीक नावाने पक्ष केल्याने गैरअर्जदार हे अनावश्यक पक्षकार आहे ही बाब न्यायोचीत नाही. सबब गैरअर्जदार यांनी सादर केलेला आक्षेप अर्ज निकाली काढण्यात येतो. अर्जदाराने दिनांक 11/12/2015 रोजी अर्जदाराने वैदयकीय कोटयात पी.एन.आर क्रं 6649430712 नुसार गैरअर्जदाराकडुन टिकीट काढली असता आर.एल.डब्लु/49 अशी स्थिती होती त्यामुळे अर्जदाराने मा. हंसराज अहीर, राज्य मंत्री, यांनी विआयपी कोटयात आरक्षण देण्यासंबंधी दिलेले पत्र व टिकीट गैरअर्जदाराला नियमानुसार पाठविले. या सर्व बाबी गैरअर्जदाराला मान्य असुन त्यांनी त्यांच्या उत्तरात व शपथपत्रात त्याचा उल्लेख केलेला आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराला पत्र दिनांक 22/01/2016 रोजी पाठवुन ही बाब कबुल केली आहे की, गैरअर्जदाराच्या आरक्षण कार्यालयाच्या कर्मचाराच्या चुकीमुळे अर्जदाराला बर्थ दिला गेला नाही व त्याबद्दल कर्मचा-यावर अनुशासनात्मक कार्यवाही केली गेली. गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेल्या सदर पत्रावरून मंच या निष्कर्शास पोहचले आहे की, अर्जदाराने विआयपी कोटयात टिकीट कर्न्फम करण्याकरिता वैदयकीय प्रमाणपत्र जोडुनही गैरअर्जदाराच्या कर्मचा-याच्या चुकीमुळे अर्जदाराचे टिकीट कर्न्फम न झाल्यामुळे त्याला प्रवासात झालेल्या त्रासापोटी गैरअर्जदार हे जवाबदार असुन त्यांनी सेवेत न्युनता दिली आहे ही बाब सिध्द होत असल्यामुळे मुद्दा क्रं 2 चे उत्तर होकारार्थी नमुद करण्यात येत आहे.
- मुद्दा क्रं. 1 ते 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. ग्राहक तक्रार क्र. २३/२०१६ अंशत: मान्य करण्यात येते.
२. गैरअर्जदाराने अर्जदाराला कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
२. गैरअर्जदाराने अर्जदाराला नुकसानभरपाईपोटी रक्कम रूपये 50,000/- आदेशप्राप्ती दिनाकापासून 30 दिवसाच्या आत अदा करावी.
३. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
कल्पना कि. जांगडे (कुटे) उमेश वि. जावळीकर किर्ती प्र. गाडगिळ (वैदय)
सदस्या अध्यक्ष सदस्या