निकालपत्र
(द्वारा- मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी)
(१) सामनेवाले यांनी पैसे देऊनही मोटारसायकलचा विमा वेळेत काढला नाही व आर.टी.ओ. ची नोंदणी वेळेत करुन दिली नाही, मोटार सायकल हरविल्यानंतर त्याची कागदपत्रे मागणी करुनही दिली नाहीत या कारणावरुन तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये या मंचात दाखल केला आहे.
(२) तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्यांनी हिरो होंडा मोटारसायकल घेण्यासाठी सामनेवाले क्र.१ यांच्याकडे दि.१५-११-२०१० रोजी रु.१०,०००/-, दि.०२-१२-२०१० रोजी रु.३०,०००/- आणि दि.०४-१२-२०१० रोजी रु.६,०००/- जमा केले होते. त्या बाबतच्या पावत्या सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदार यांना दिल्या होत्या. दि.०२-१२-२०१० रोजी सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदार यांना हिरोहोंडा कंपनीची मोटारसायकल चेसीस क्रमांक एबीसीएचए १० एफवाय एएचएल २९२७३ आणि इंजिन क्रमांक एचए १० ईएएएचएल ५२२४१ ही ताब्यात दिली. त्यासोबत सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारादार यांना डिलेव्हरीचे चलनही दिले. सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदार यांच्याकडून मोटारसायकलीच्या विम्याचे आणि आर.टी.ओ. नोंदणीचे पैसे घेतले होते. मात्र त्यांनी मोटारसायकलीचा तातडीने विमा काढून दिला नाही व आर.टी.ओ.ची नोंदणी करुन दिली नाही. दि.३१-१२-२०१० रोजी सायंकाळी ७.०० वाजच्या सुमारास तक्रारदार यांनी त्यांची नवी मोटारसायकल त्यांच्या घरासमोर हॅण्डल लॉक करुन लावली. दि.०१-०१-२०११ रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास त्यांना त्यांची मोटारसायकल जागेवर नसल्याचे आढळून आले. त्याबाबत परिसरात तपास करुनही मोटारसायकल सापडली नाही. म्हणून तक्रारदार यांनी दि.०१-०१-२०११ रोजी दोंडाईचा पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली. या घटनेबाबत तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ व २ यांनाही कळविले. सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदार यांना चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचा दि.०१-०१-२०११ रोजी विमा काढल्याचे कळविले आणि त्याच दिवशी त्याची कव्हरनोट सुपूर्द केली. वास्तविक दि.०४-१२-२०१० पर्यंतच सामनेवाले क्र.१ व २ यांना तक्रारदार यांनी मोटारसायकलची संपूर्ण किंमत, विम्याची रक्कम व आर.टी.ओ. नोंदणीची रक्कम दिली होती. त्यानंतरही सामनेवाले क्र.१ व २ यांनी वेळेत विमा काढला नाही व आर.टी.ओ.ची नोंदणी करुन दिली नाही. यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे ध्यानात आल्यावर तक्रारदार यांनी त्यांना नोटीस बजावली. सामनेवाले क्र.१ व २ यांनी नवीन हिरोहोंडा मेाटरसायकल द्यावी किंवा त्याची किंमत अदा करावी या मागणीसाठी तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे. त्यासोबत त्यांनी तक्रारीचा खर्च आणि मानसिक व शारीरिक त्रासापोटीचा खर्च रु.१०,०००/- देण्याची मागणी केली आहे.
(३) तक्रारदार यांनी तक्रारीसोबत पोलिसात दिलेली फिर्याद, घटनास्थळाचा पंचनामा, सामनेवाले क्र.२ यांनी दिलेले विक्री प्रमाणपत्र, सामनेवाले क्र.१ यांनी दिलेले डिलेव्हरी चलन, विमा कंपनीची कव्हरनोट, सामनेवाले क्र.२ यांच्या नावाचे टॅक्स इनव्हाईस, सामनेवाले क्र.२ यांच्या नावाचे टि.सी.प्रमाणपत्र, फॉर्म नं.१९, सामनेवाले क्र.२ यांच्याकडे जमा केलेल्या रकमेच्या पावत्या आदी कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
(४) सासमनेवाले क्र.१ व २ यांनी हजर होऊन आपला संयुक्त खुलासा दाखल केला. त्यात म्हटले आहे की, तक्रारदार यांच्या तक्रारीतील मजकूर खोटा आणि लबाडीचा आहे. तक्रारदार यास विकलेल्या वाहनाचा विमा काढण्याची जबाबदारी व आर.टी.ओ. नोंदणीची जबाबदारी सामनेवाले यांची नाही. तक्रारदार यांना वाहन खरेदी आणि विक्रीचे चांगले ज्ञान आहे. तक्रारदार यांनी सन २०१० मध्ये वाहन घेतले आणि सन २०११ मध्ये त्याची नोंदणी करायचे ठरविले होते. त्यामुळे त्यांच्याच सांगण्यावरुन दि.०१-०१-२०११ रोजी त्यांना विक्री प्रमाणपत्र देण्यात आले. तक्रारदार यांनी जे पैसे भरले होते ते वाहनाची किंमत आणि त्यांनी वाहनासाठी लावलेल्या एक्सेसरीजचे होते. वाहन चोरीस गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर दि.०१-०१-२०११ रोजी तक्रारदार यांनीच त्या वाहनाचा विमा काढला आणि ही बाब सामनेवाले यांच्यापासून लपवून ठेवली. एवढेच नाही तर त्यांनी उशिराने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यामुळे तक्रारदार याची तक्रार खर्चासह रद्द करावी, अशी मागणी सामनेवाले यांनी केली आहे.
(५) सामनेवाले यांनी खुलाशासोबत तक्रारदार याला पाठविण्यात आलेल्या नोटिसचे उत्तर, पोहोचपावती, पोलिसातील फिर्याद आदी कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
(६) तक्रारदार यांची तक्रार, त्यासोबत त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, तक्रारदार यांच्यातर्फे प्रश्नावलीद्वारे तपासण्यात आलेला साक्षीदार, त्याने दिलेली उत्तरे, सामनेवाले यांनी दाखल केलेला खुलासा, त्यासोबत त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता आणि उभयपक्षाच्या विद्वान वकिलांनी केलेला युक्तिवाद ऐकला असता आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय |
(ब)सामनेवाले यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत कसूर केली आहे काय ? | : होय |
(क)तक्रारदार हे त्यांची मागणी मंजूर होऊन मिळण्यास पात्र आहेत काय ? | : होय |
(ड)आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(७) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – सामनेवाले क्र.२ हे हिरोहोंडा कंपनीचे अधिकृत विक्रेते आहेत. सामनेवाले क्र.१ हे सामनेवाले क्र.२ यांचे उपविक्रेते आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ यांच्याकडून मोटारसायकलची खरेदी केली. त्याबाबतची रोख रक्कम त्यांनी सामनेवाले क्र.१ यांच्याकडे जमा केली. त्याच्या पावत्याही सामनेवाले क्र.१ यांनी दिल्या आहेत. त्या पावत्या तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केल्या आहेत. सामनेवाले क्र.१ यांनी संबंधित मोटारसायकल सामनेवाले क्र.२ यांच्याकडून घेतली होती किंवा त्यांच्या तर्फे विक्री केली होती. सामनेवाले क्र.२ यांनी सदर मोटारसायकलचे विक्री प्रमाणपत्र बनविले आहे. तक्रारदार यांच्या मोटारसायकलचा विमाही सामनेवाले क्र.२ यांच्यामार्फतच उतरविण्यात आला होता. यावरुन तक्रारदार हे सामनेवाले क्र.१ व २ यांचे ग्राहक असल्याचे सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(८) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार यांनी सन २०१० साली वाहन घेतले. मात्र त्यांना त्याची नोंदणी सन २०११ मध्ये करायची होती. त्यामुळे त्यांच्याच सांगण्यावरुन तक्रारदार यांना दि.०१-०१-२०११ रोजी विक्री प्रमाणपत्र देण्यात आले व त्याच दिवशी वाहनाचा विमा उतरविण्यात आला, असे सामनेवाले यांनी त्यांच्या खुलाशात म्हटले आहे. तथापि, सामनेवाले यांनी जाणीवपूर्वक वाहनाचा विमा उशिराने उतरविला व आर.टी.ओ.ची नोंदणी तातडीने करुन दिली नाही अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता आमच्या असे निदर्शनास आले की, तक्रारदार यांनी दि.१५-११-२०१० रोजी सामनेवाले क्र.१ यांच्याकडे रु.१०,०००/-, दि.०२-१२-२०१० रोजी रु.३०,०००/- आणि दि.०४-१२-२०१० रोजी रु.६,०००/- जमा केले होते. त्याबाबतच्या पावत्याही सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदार यांना दिल्या आहेत. सामनेवाले क्र.१ यांनी दि.०२-१२-२०१० रोजी संबंधित वाहन तक्रारदार यांच्या ताब्यात दिले आहे. त्याचे डिलेव्हरी चलनही तक्रारदार यांनी दाखल केले आहे. त्या चलनावर तक्रारदार व सामनेवाले क्र.१ यांच्या स्वाक्ष-या आहेत. यावरुन तक्रारदार यांनी दि.०४-१२-२०१० पर्यंत सामनेवाले क्र.१ यांच्याकडे रु.४६,०००/- एवढी रक्कम जमा केल्याचे दिसते आणि त्याबदल्यात त्यांना वाहन ताब्यात मिळाल्याचेही दिसते. पूर्ण रक्कम मिळाल्यानंतर आणि वाहन ताब्यात दिल्यानंतर सामनेवाले क्र.१ व २ यांनी लगेच तक्रारदार यांच्या वाहनाचा विमा उतरवून देणे आवश्यक होते आणि त्याचबरोबर विक्री प्रमाणपत्र बनवून आर.टी.ओ.ची नोंदणी करुन देणे आवश्यक होते. ग्राहकाच्या वाहनाचा विमा उतरविण्याची जबाबदारी आणि आर.टी.ओ. नोंदणी करुन देण्याची जबाबदारी विक्रेत्याची नाही असा बचाव सामनेवाले क्र.१ व २ यांनी आपल्या खुलाशात घेतला आहे. मात्र असे असले तर, त्यांनी तक्रारदार यांच्याकडून जास्तीची रक्कम का स्वीकारली ? याबाबतचे स्पष्टीकरण दिलेले नाही. त्याचबरोबर दि.०१-०१-२०११ रोजी तक्रारदाराच्या वाहनाचा विमा उतरविण्यात आला त्याची रक्कमही सामनेवाले क्र.२ यांच्याकडूनच देण्यात आल्याचे साक्षीदाराच्या साक्षीवरुन स्पष्ट होत आहे. सामनेवाले क्र.१ व २ यांनी खुलाशात उल्लेख केला आहे की, तक्रारदार यांच्याकडून जी जास्तीची रक्कम स्वीकारण्यात आली ती त्यांच्या वाहनाला बसविण्यात आलेल्या एक्सेसरीजपोटी घेण्यात आली होती. मात्र त्या बाबतचा कोणताही पुरावा, बिले सामनेवाले यांनी दाखल केलेली नाहीत. तक्रारदार यांच्यातर्फे प्रश्नावलीद्वारे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या शाखा व्यवस्थापकांची साक्ष तपासण्यात आली. त्यात तीन प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर श्री.रविंद्र केशव बोकाडे यांनी शपथपत्रासोबत उत्तरे दिली आहेत. ते प्रश्न व उत्तरे पुढील प्रमाणे.
प्रश्न क्र.१ : मोटारसायकल पॅशन प्रो ची पॉलिसी कव्हरनोट नंबर ८८९०० दि.०१-०१-२०११ रोजी कोणी काढली ?
उत्तर : भगवान शिवाजी माळी यांची मोटारसायकल पॅशन प्रो ची कव्हर नोट नंबर ८८९०० हि दि.०१-०१-२०११ रोजी नवकार ऑटो धुळे येथील कर्मचा-याने युनायटेड इंन्शुरन्स कंपनीचे विकास अधिकारी, श्री.दिलीप वाघ यांचेतर्फे काढली होती.
प्रश्न क्र.२ : कव्हर नोट नंबर ८८९०० या पॉलिसीचे पैसे कोणी भरले व किती भरले ?, रोख स्वरुपात भरले कि चेक द्वारे ?, चेक नंबर, दिनांक व रक्कम ?
उत्तर : नवकार ऑटो धुळे यांनी कव्हरनोट नंबर ८८९०० या कव्हर/पॉलिसीचे पैसे/रक्कम आय.डी.बी.आय.बॅंक शाखा धुळे चा रक्कम रु.१९,४८९/- चा चेक क्रमांक १०२९४२ दि.३०-१२-२०१० अन्वये भरले. सदर रक्कम ही १८ कव्हरनोट मिळून एकत्र भरणा केली आहे. या रकमेतच वरील कव्हरनोट नंबर ८८९०० ची रक्कम रु.१०६४/- सुध्दा जमा आहे व ही रक्कम वरील चेक प्रमाणे भरणा केली गेली आहे.
प्रश्न क्र.३ : कव्हर नोट नंबर ८८९०० ही किती वाजता काढली गेली ? (दि.०१-०१-२०११ रोजी)
उत्तर : कव्हर नोट नंबर८८९०० ही दि.०१-०१-२०११ रोजी सकाळी ११.०० वाजता काढली आहे.
वरील मुद्यांचा विचार करता सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदार यांच्या वाहनाचा विमा उतरविण्याची व आर.टी.ओ. नोंदणी करुन देण्याची जबाबदारी स्वीकारली होती व ती त्यांनी लगेच पूर्ण केली नाही हे दिसून येते. सामनेवाले क्र.१ व २ यांनी खुलाशात म्हटल्यानुसार तक्रारदार यांनी सन २०१० मध्ये वाहन ताब्यात घेऊन सन २०११ मध्ये त्याची नोंदणी करण्याचे ठरविले असले तरी, सामनेवाले क्र.१ व २ यांनी अशा नियमबाह्य कामास पाठींबा देणे किंवा सहकार्य करणे आवश्यक नव्हते. नियमाप्रमाणे सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदार यांच्या वाहनाचा विमा तातडीने उतरवून देणे व तातडीने त्याची आर.टी.ओ. नोंदणी करुन देणे आवश्यक होते, असे आम्हाला वाटते. म्हणूनच सामनेवाले क्र.१ व २ यांनी त्यांच्या सेवेत कसूर केली आहे हे स्पष्ट होते असे आम्हाला वाटते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(९) मुद्दा क्र. ‘‘क’’ – तक्रारदार हे सामनेवाले क्र.१ व २ यांचे ग्राहक आहेत, हे स्पष्ट झाले आहे. सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत कसूर केला आहे हेही स्पष्ट झाले आहे. तक्रारदार यांनी पूर्ण रक्कम रोख भरल्यानंतर सामनेवाले क्र.१ व २ यांच्याकडून वाहन ताब्यात घेतले. त्या बाबतचे डिलेव्हरी चलन त्यांना देण्यात आले. पैसे भरल्याच्यापावत्या देण्यात आल्या. असे असतांना सामनेवाले क्र.१ व २ यांनी लगेच तक्रारदार यांच्या वाहनाचा विमा उतरवून देणे आणि आर.टी.ओ. नोंदणी करुन देणे आवश्यक होते. मात्र त्यात त्यांनी कुचराई केल्याचे दिसून येते. तक्रारदार यांच्यातर्फे प्रश्नावलीद्वारे तपासण्यात आलेल्या साक्षीदाराने, तक्रारदार यांच्या वाहन विम्याचे पैसे कोणी भरले आणि ते कोणत्या दिवशी भरण्यात आले हेही स्पष्ट केले आहे. या सर्व मुद्यांचा विचार करता तक्रारदार यांची तक्रार मंजूर करण्यात यावी या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. त्याचबरोबर तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.१,०००/- आणि तक्रारीचा खर्च रु.५००/- मिळाला पाहिजे असेही आम्हाला वाटते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘क’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(१०) मुद्दा क्र. ‘‘ड’’ – उपरोक्त सर्व विवेचनावरुन हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
(१) तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
(२) सामनेवाले क्र.१ व २ यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या, या आदेशाच्या दिनांकापासून पुढील ३० दिवसांचे आत...
(अ) तक्रारदार यांना यापूर्वी दिलेल्या मॉडेलची व तेवढ्याच किंमतीची नवीन मोटारसायकल द्यावी.
किंवा
(ब) तक्रारदार यांनी सामनेवालेंकडे जमा केलेली रक्कम रु.४६,०००/- (अक्षरी रक्कम रुपये सेहचाळीस हजार मात्र) तक्रारदारांना परत द्यावी.
(३) तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी १,०००/- (अक्षरी रक्कम रुपये एक हजार मात्र) व तक्रारीचा खर्च ५००/- (अक्षरी रक्कम रुपये पाचशे मात्र) द्यावा.
धुळे.
दिनांक : २१-०७-२०१४