आदेश पारित द्वारा मा. सदस्य श्री. एन. व्ही. बनसोड 1. तक्रारकर्त्याने शपथपत्रावर ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अंतर्गत विरूध्द पक्ष डॉ. बी. डी. इखार यांच्या विरूध्द तक्रार दाखल करून मंचास मागणी केली की, विरूध्द पक्ष यांच्या सेवेतील निष्काळजीपणा व त्रुटीमुळे तक्रारकर्त्यास वेगवेगळ्या कारणासाठी झालेला खर्च व नुकसानभरपाई, तक्रारीचा खर्च इत्यादीकरिता रू. 1,81,000/- मिळावेत तसेच आदेशाच्या तारखेपासून 18 टक्के व्याज देखील मिळावे. तक्रारकर्त्याचे म्हणणे थोडक्यात खालीलप्रमाणेः- 2. तक्रारकर्ता हा बाचेवाडी येथील रहिवासी असून श्रीकृष्ण हॉटेल, आसगाव येथे 200/- रूपये रोज याप्रमाणे मजुरी करून उदरनिर्वाह करतो. विरूध्द पक्ष हे व्यवसायाने बी.ए.एम.एस. डॉक्टर असून पूर्व वैद्यकीय अधिकारी आहेत व आसगाव येथे श्री. रूग्णालय व प्रसुतिगृह या नावाने दवाखाना चालवितात तसेच ते वैद्यकीय सल्ला व उपचाराकरिता शुल्क आकारणी करतात. 3. दिनांक 01/10/2010 ला तक्रारकर्ता त्याच्या पायाला फोडे झाले असल्यामुळे उपचाराकरिता विरूध्द पक्ष यांच्या दवाखान्यात गेला. विरूध्द पक्ष यांनी सदर फोडांची तपासणी करून तक्रारकर्त्याच्या उजव्या हातास इंजेक्शन दिले व औषधांची चिठ्ठी लिहून दिली. तक्रारकर्त्याने केलेल्या उपचाराकरिता रू. 30/- इतके शुल्क दिले व तो घरी निघून गेला. 4. सदर इंजेक्शन दिलेल्या हाताला अचानक सूज येऊन अतिशय वेदना होऊ लागल्या. त्यामुळे त्याबाबत विरूध्द पक्ष यांना अवगत करून दिले. मात्र त्यांनी उपचार करण्यास असमर्थता दर्शविली व पवनी येथील दवाखान्यात जाऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला. तक्रारकर्ता पवनी येथील रूग्णालयात उपचारार्थ गेला असता सदर प्रकरण हाताबाहेरचे असल्याचे सांगून भंडारा येथे उपचार घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर भंडारा येथील डॉ. मेघरे यांच्याकडे उपचारार्थ गेला असता त्यांनी देखील प्रकरणातील गांभीर्य पाहून जिल्हा रूग्णालयामध्ये जाण्याचा सल्ला दिला. 5. डॉ. मेघरे यांच्या सल्ल्यानुसार सामान्य जिल्हा ग्रामीण रूग्णालय, भंडारा येथे दिनांक 07/10/2010 रोजी तक्रारकर्त्याला भरती करण्यात आले व उपचारादरम्यान डॉक्टरांनी तक्रारकर्त्याला सांगितले की, विरूध्द पक्ष डॉक्टरांनी हातास दिलेल्या इंजेक्शनची reaction झाल्यामुळे सदर सूज व वेदना झाली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया करून उपचार करण्यात आला. तक्रारकर्ता उपचारार्थ दिनांक 07/10/2010 ते 29/11/2010 या कालावधीत सरकारी रूग्णालयामध्ये भरती होता व शस्त्रक्रिया होऊन देखील सदर उजव्या हाताने कोणतेही काम करण्यास तक्रारकर्ता असमर्थ आहे. 6. तक्रारकर्त्याने दिनांक 01/10/2010 ला विरूध्द पक्ष यांच्याकडून उपचार करून घेतला. त्याकरिता रू. 30/- मोबदला दिला म्हणून तक्रारकर्ता हा विरूध्द पक्ष यांचा ग्राहक ठरतो. विरूध्द पक्ष यांच्या चुकी, निष्काळजीपणा व त्यांनी हलगर्जीपणे केलेल्या उपचारामुळे तक्रारकर्त्याचा उजवा हात कायमचा निकामी होऊन त्या हाताने काम करण्यास तक्रारकर्ता असमर्थ आहे व ही विरूध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटी आहे. तक्रारकर्त्याने स्वतः दिनांक 11/11/2010 रोजी पोलीस स्टेशन, पवनी येथे तक्रार दाखल केली होती. 7. विरूध्द पक्ष यांच्या निष्काळजीपणा व सेवेतील त्रुटीमुळे तक्रारकर्त्यास हात कायमचा गमवावा लागला. त्यामुळे दिनांक 01/10/2010 नंतर तक्रारकर्ता रोजंदारी काम करण्यास असमर्थ ठरला व उत्पन्नाचे साधनाअभावी तक्रारकर्त्यावर उपासमारीची वेळ आली. तक्रारकर्ता दरमहा रू. 5,000/- कमवित होता व दिनांक 01/10/2010 पासून तक्रार दाखल करेपर्यंत तक्रारकर्त्याचे रू. 15,000/- उत्पन्नाचे नुकसान झाले असून उत्पन्नाचे नुकसान सतत होत आहे. सदर हाताची भंडारा सामान्य रूग्णालयात उपचारादरम्यान झालेली शस्त्रक्रिया, कागदपत्रे, त्यावरील झेरॉक्स खर्च, औषधी खर्च याकरिता रू. 2,000/- इतका खर्च झाला. तसेच दिनांक 07/10/2010 ते 29/11/2010 पर्यंत प्रवास खर्च म्हणून रू. 500/- आणि जेवणाच्या डब्याचा खर्च रू. 2,000/- झाला असून तक्रारकर्त्यास शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. त्याला आर्थिक जुळवणूकीकरिता रू. 3,000/- किमतीची सायकल रू. 500/- मध्ये विकावी लागली. भविष्यातील उत्पन्नाची नुकसानभरपाई म्हणून रू. 1,00,000/-, शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रू. 50,000/- आणि तक्रारीचा खर्च रू. 5,000/- अशी एकूण रू. 1,81,000/- ची मागणी तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत केली आहे. 8. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीसोबत विरूध्द पक्ष यांचे दिनांक 01/10/2010 रोजीचे Prescription letter तसेच जनरल हॉस्पिटल, भंडारा येथील डिसचार्ज कार्ड, औषधाची बिले, प्रिस्क्रिप्शन्स, हॉटेल मालकाचे पत्र, पोलीस रिपोर्टची प्रत, वृत्तपत्रातील कात्रणे इत्यादी अनुक्रमे पृष्ठ क्रमांक 10 ते 17 वर दाखल केली आहेत. 9. मंचाने विरूध्द पक्ष यांना नोटीस बजावली. विरूध्द पक्ष यांचे म्हणणे थोडक्यात खालीलप्रमाणेः- 10. तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष मंचाच्या कार्यक्षेत्रात राहात असून घटनेचे कारण मंचाच्या कार्यक्षेत्रात घडले हे तक्रारकर्त्याचे म्हणणे विरूध्द पक्ष यांनी मान्य केले. मात्र तक्रारकर्ता हा श्रीकृपा हॉटेलमध्ये 200/- रूपये प्रति दिवस याप्रमाणे मजुरी करीत होता हे नाकारले. विरूध्द पक्ष यांनी आपल्या उत्तरामध्ये नमूद करून म्हटले की, तक्रारकर्ता हा विना परवाना दारूचा धंदा करतो तसेच सट्टा लावतो. तक्रारीच्या परिच्छेद क्र. 3 च्या उत्तरात विरूध्द पक्षाने त्यांची वैद्यकीय पात्रता, पूर्व वैद्यकीय अधिकारी तसेच रूग्णालय व प्रसुतिगृह चालवून वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे मान्य केले. विरूध्द पक्ष यांनी तक्रारीचा परिच्छेद क्र. 4 खरा आहे असे मान्य केले. त्यात दिनांक 01/10/2010 ची तक्रारकर्त्याची दवाखान्यास भेट, विरूध्द पक्ष यांनी दिलेले इंजेक्शन, औषधी चिठ्ठी तसेच तक्रारकर्त्याने उपचार शुल्कापोटी रू. 30/- दिल्याचे मान्य केले. दिनांक 01/10/2010 ला विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याची तपासणी केल्यावर खालील बाबी आढळल्या. ‘’दोन्ही पायाला चिघळलेले फोडे व सूजन होती म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराच्या उजव्या हाताला टी.टी. चे इंजेक्शन दिले तसेच डाव्या हाताला डायक्लोफिनॅक इंजेक्शन दुखणे व सूजन कमी करण्याकरिता दिले. गैरअर्जदाराने वरील इंजेक्शन व्यतिरिक्त ऍन्टीबायोटिक व दर्दविनाशक गोळ्या दिल्या. तारीख 02/10/2010 ला पुन्हा अर्जदार गैरअर्जदाराकडे आला. त्यावेळी सुध्दा वरील लक्षणे कायम होती म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराच्या कमरेत दोन्ही बाजूला सूजन व दुखणे कमीकरिता इंजेक्शन दिले. त्यावेळी गैरअर्जदाराने फी किंवा खर्च अर्जदाराकडून घेतला नाही. तिस-या दिवशी म्हणजे दिनांक 03/10/2010 ला तक्रारकर्ता गैरअर्जदार यांच्याकडे आला असता लक्षात आले की, त्याच्या उजव्या हाताची सूजन कमी झाली नाही व इन्फेक्शन झालेले दिसले. म्हणून पुढील उपचाराकरिता पवनी येथील सरकारी दवाखान्यात उपचार घेण्यास सांगितले व गैरअर्जदाराने पवनी येथील डॉ. मदनकर, (एम. एस.) यांना फोन करून सूचित केले. पवनी येथील रूग्णालयात जाण्याचे सूचित करण्याचे आधी गैरअर्जदारास असे वाटले की, त्याच्या शरीराला चार ठिकाणी डिस्पोजेबल इंजेक्शन झालेत, पण एकाच हाताला इन्फेक्शन दिसले. त्यामुळे त्यात इन्व्हेस्टीगेशन करून उपचार देणे जरूरीचे आहे. तसेच आसगाव हे लहान गाव असून या गावी इन्व्हेस्टीगेशनची व्यवस्था (Pathology Laboratory) नाही आणि मौजा आसगाव येथे M.B.B.S. असलेला एकही डॉक्टर प्रॅक्टीस करीत नाही’’. 11. विरूध्द पक्ष यांनी तक्रारीचा परिच्छेद क्र. 5 मान्य केला. परिच्छेद क्र. 6 च्या उत्तरातील म्हणणे खरे नाही असे नमूद करून म्हटले की, सामान्य रूग्णालय, भंडारा येथील उपचारादरम्यान डॉक्टरांनी तक्रारकर्त्यास सांगितले की, विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या हातास दिलेल्या इंजेक्शनची प्रतिक्रिया (Reaction) झाल्यामुळे सूज व वेदना झाल्या तसेच तक्रारकर्ता सदर हाताने काम करण्यास असमर्थ आहे हे खोटे आहे असे म्हटले. तक्रारकर्त्याने दिनांक 07/10/2010 ते 29/11/2010 पर्यंत भंडारा येथे उपचार केल्याचे विरूध्द पक्ष यांनी मान्य केले. मात्र तक्रारीचा परिच्छेद क्र. 7, 8 व 9 नाकारला. विरूध्द पक्ष यांनी मान्य केले की, सामान्य रूग्णालय, भंडारा येथील औषध तसेच जेवण्याकरिता रू. 2,000/- पेक्षा जास्त खर्च आला नाही. परिच्छेद क्र. 10 मधील नुकसानभरपाई खोटी व चुकीची आहे असे म्हणून तक्रारीचा परिच्छेद क्र. 11 नाकारला. विरूध्द पक्ष यांनी म्हटले की, तक्रारकर्ता हा रोजंदारीवर शेतीची कामे करतो. तक्रारकर्त्याच्या उजव्या हाताची शक्ती तीळमात्र कमी झालेली नाही. तक्रारकर्ता प्रथमतः विरूध्द पक्ष यांच्याकडे रोगी म्हणून आला होता. विरूध्द पक्ष यांनी म्हटले की, त्यांनी माहिती गोळा केली व असे आढळून आले की, अर्जदाराला मधूमेह आहे. त्यामुळे त्याच्या पायातील फोडांमधून सुक्ष्म जंतू Bacteria ने प्रवेश करून डाव्या हाताच्या इंजेक्शन भागात इन्फेक्शन केले. यात विरूध्द पक्ष यांची कोणतीही चूक नाही. 12. विरूध्द पक्ष यांनी उत्तराच्या परिच्छेद क्र. 15 मध्ये म्हटले की, तक्रारकर्त्याची वैद्यकीय तपासणी करून ज्याप्रकारे भंडारा जिल्ह्यात वैद्यकीय उपचार व काळजी घ्यावयास पाहिजे तेवढी विरूध्द पक्ष यांनी घेतली व कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही व तक्रार खारीज करण्याची मागणी केली. 13. मंचाने, दिनांक 23/03/2011 ला तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला. तक्रारीसोबत असलेल्या कागदपत्रांचे, दस्तऐवजांचे तसेच विरूध्द पक्ष यांनी दाखल केलेल्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्राचे आणि तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या पंजाब राज्य आयोगाच्या दोन निकालपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले. निरीक्षण व निष्कर्ष 14. तक्रारकर्ता हा त्याच्या पायाला फोडे झाल्यामुळे दिनांक 01/10/2010 ला विरूध्द पक्ष यांच्या दवाखान्यात गेला. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या उजव्या हाताला तसेच डाव्या हाताला इंजेक्शन दिले व फार्मसीतून विकत घ्यावयाच्या औषधांची चिठ्ठी लिहून दिली व त्याचे शुल्क रू. 30/- घेतल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे विरूध्द पक्ष यांनी मान्य केले. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2 (1) (ओ) अन्वये मोबदला देऊन दिनांक 01/10/2010 ला विरूध्द पक्ष यांची सेवा प्राप्त केल्यामुळे तक्रारकर्ता विरूध्द पक्षाचा ग्राहक ठरतो. विरूध्द पक्ष यांनी उत्तराच्या परिच्छेद क्र. 4 मध्ये दिनांक 02/10/2010 ला तक्रारकर्त्याकडून फी किंवा खर्च घेतलेला नाही असे नमूद केले आहे. ज्याअर्थी विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याकडून दिनांक 01/10/2010 ला रू. 30/- उपचार शुल्क म्हणून घेतले, त्याअर्थी विरूध्द पक्ष यांनी दिनांक 02/10/2010 ला तक्रारकर्त्याकडून फी किंवा खर्च कां घेतला नाही हे स्पष्ट केले नाही. या एकमेव बाबीचा विरूध्द पक्ष स्वतःच्या बचावार्थ फायदा घेऊ शकत नाही. उलटपक्षी दिनांक 01/10/2010 ला झालेल्या औषधोपचारामुळे झालेला दुष्परिणाम व त्यावर फुंकर घालण्याकरिता, तक्रारकर्त्याची सहानुभूति मिळविण्याकरिता दिनांक 02/10/2010 ला फी घेतली नसेल असे मंचाचे मत आहे. 15. तक्रारकर्त्याने तक्रार दाखल करून सोबत वस्तुनिष्ठ दस्तऐवज दाखल केले. तसेच विरूध्द पक्ष यांनी शपथपत्रावरील उत्तरात वेगवेगळे कथन केले, परंतु त्याच्या पुष्ठ्यर्थ विरूध्द पक्ष यांची क्वालीफिकेशन, हॉस्पिटलचा रेकॉर्ड इत्यादी मंचासमोर नसल्यामुळे माननीय राज्य आयोगाच्या खालील निकालपत्रानुसार संपूर्ण तक्रारीतील प्रकरणाचा शोध घेण्याचा व कसून तपासणी करण्याकरिता खालील महाराष्ट्र राज्य आयोगाचे निकालपत्रास आधारभूत मानले आहे. MSCDRC, Mumbai – 2003 (3) CPR 246 – Vijay Madhao Kher V/s. Dilip Sitaram Raut “If the dispute is brought before Consumer Fora is amenable to its jurisdiction, then it is obligatory upon Fora to probe the same by themselves and resolve it”. 16. विरूध्द पक्ष यांनी उत्तराच्या परिच्छेद क्र. 2 मध्ये नमूद केले की, ‘’हे उल्लेखनीय आहे की, अर्जदार हा बिना परवाना दारूचा धंदा करतो तसेच सट्टा लावतो’’. विरूध्द पक्ष यांनी सदर कथन हे विना वस्तुनिष्ठ पुरावा केलेले आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच सदर तक्रार ही विरूध्द पक्ष यांच्या वैद्यकीय सेवेतील निष्काळजीपणा व ग्राहक सेवेतील त्रुटीबाबत असल्यामुळे विरूध्द पक्ष यांनी सदरचे विधान तक्रारकर्त्याबाबत मंचाची दिशाभूल करण्याच्या एकमेव हेतूने व वस्तुस्थितीस कलाटणी देण्याच्या दृष्टिकोनातून केलेले आहे आणि म्हणून विरूध्द पक्ष यांचे सदर म्हणणे मंचाने नाकारले. 17. तक्रारकर्त्याने त्याच्या युक्तिवादात विरूध्द पक्ष हे बी.ए.एम.एस. डॉक्टर असल्याची माहिती प्राप्त झाल्यामुळे तक्रारीत नमूद केले असे म्हटले व त्यास विरूध्द पक्ष यांनी संमती दिली. तक्रारकर्त्याने पृष्ठ क्रमांक 10 वर दाखल केलेल्या मेडिकल प्रिस्क्रिप्शनचे सुक्ष्म अवलोकन केले असता सदर प्रिस्क्रिप्शनवर विरूध्द पक्ष यांची वैद्यकीय शैक्षणिक पात्रता/योग्यता नमूद केलेली नाही. तसेच याच प्रिस्क्रिप्शनवर एक्स-मेडिकल ऑफिसर असे नमूद आहे. परंतु एक्स-मेडिकल ऑफिसर असल्याबाबत तसेच अनुभवाबाबत स्पष्ट विवेचन केलेले नाही व पुरावा नाही. तसेच विरूध्द पक्ष यांचे स्वतःच्या वैद्यकीय योग्यतेचे प्रमाणपत्र (Degree Certificate), अनुभवाचे प्रमाणपत्र इत्यादीबाबतचा वस्तुनिष्ठ पुरावा मंचासमोर नसल्यामुळे विरूध्द पक्ष यांची शैक्षणिक पात्रता, अनुभव हे मंचास पूर्णतः संशयास्पद व अविश्वसनीय वाटतात. 18. विरूध्द पक्ष यांनी उत्तराच्या परिच्छेद क्र. 4 मध्ये नमूद केले की, मौजा आसगाव येथे एमबीबीएस असलेला एकही डॉक्टर प्रॅक्टीस करीत नाही. या म्हणण्याच्या पुष्ठ्यर्थ कोणताही वस्तुनिष्ठ पुरावा मंचासमोर नाही. उलटपक्षी पृष्ठ क्र. 10 वरील प्रिस्क्रिप्शन लेटर वरून हे स्पष्ट होते की, आसगाव येथे डॉ. जी. एल. कळमकर, एम.एस. (सिनिअर सर्जन) म्हणून विरूध्द पक्ष यांच्यासोबतच कार्यरत आहेत. त्यामुळे सुध्दा आसगाव येथे एमबीबीएस असलेला एकही डॉक्टर प्रॅक्टीस करीत नाही हे म्हणणे चुकीचे व खोडसाळ आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. 19. विरूध्द पक्ष श्री. रूग्णालय व प्रसुतिगृह या नावाने दवाखाना आसगाव येथे चालवित असून बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्टच्या तरतुदीअंतर्गत सदर रूग्णालय व प्रसुतिगृह नोंदणीकृत नाही व रूग्णालयाची नोंदणी नसतांना व विरूध्द पक्ष यांची वैद्यकीय पात्रता संशयास्पद असतांना वैद्यकीय व्यवसाय करणे यावरून विरूध्द पक्ष पूर्णतः अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब करीत आहेत व वैद्यकीय व्यवसायानुसार व्यवसाय करीत नाहीत असे मंचाचे स्पष्ट मत आहे. विरूध्द पक्ष यांच्या संपूर्ण उत्तरात डॉ. जी. एल. कळमकर, एम.एस. (सिनिअर सर्जन) बाबत वस्तुस्थिती स्पष्ट नाही. उलटपक्षी विरूध्द पक्ष डॉ. जी. एल. कळमकर यांच्या वैद्यकीय पात्रतेचा गैरफायदा घेऊन ग्रामीण रूग्णांची दिशाभूल करून वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत असे मंचाचे स्पष्ट मत आहे. सदर प्रकरणी मंचाने माननीय सर्वोच्च न्यायालय व राज्य आयोग यांच्या खालील निकालपत्रास आधारभूत मानलेले आहे. Supreme Court of India – 2004 CTJ 1009 (SC) (CP) - Smt. Savita Garg V/s. Director, National Health Institute. “Once an allegation is made that patient was admitted in a particular hospital & evidence is produced to satisfy that he died because of lack of proper care and negligence , then burden lies on the hospital to justify that there was no negligence on the part of the treating doctor or hospital”. Kerala S.C.D.R.C. – 2010 (3) CPR 192 – Coin Par & Ors. V/s. Cosmopolitan Hospital (P) Ltd. - Non production of case sheet of the patient before the Consumer Disputes Redressal Forum by the concerned hospital is deficiency in service. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचा दिनांक 01/10/2010, 02/10/2010 ला उपचार केल्याबद्दल तसेच दिनांक 03/10/2010 ला पवनी येथील सरकारी दवाखान्यात उपचार घेण्यास सांगितल्याबाबत तसेच पवनी येथील डॉ. मदनकर (एम.एस.) यांना फोनद्वारे सूचित केल्याबाबत नमूद केले. परंतु विरूध्द पक्ष यांनी outdoor case paper/ indoor case paper चा कोणताही दस्तऐवज तसेच पवनी हॉस्पिटल व डॉ. मदनकर यांच्याकडे रेफर केल्याबाबत कोणताही पुरावा किंवा रूग्णाचा केस पेपर मंचासमोर दाखल केलेला नाही. त्यामुळे विरूध्द पक्ष यांचे सदर म्हणणे हे वस्तुनिष्ठ पुराव्याअभावी विश्वसनीय वाटत नाही. तसेच केरळ राज्य आयोगाच्या खालील निकालपत्रानुसार देखील विरूध्द पक्ष यांच्या सेवेत त्रुटी आहे हे मंचासमक्ष स्पष्ट होते व विरूध्द पक्ष यांच्या सेवेत त्रुटी नाही हे सिध्द करण्याची जबाबदारी विरूध्द पक्षाची आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. 20. विरूध्द पक्ष यांनी उत्तराच्या परिच्छेद क्र. 4 मध्ये म्हटले आहे की, ‘त्याच्या शरीराला 4 ठिकाणी डिस्पोजेबल इंजेक्शन झाले पण एकाच हाताला इन्फेक्शन दिसते, त्यामुळे त्याचे इन्व्हेस्टीगेशन करून उपचार देणे जरूरीचे आहे’. डिस्पोजेबल सिरींज व डिस्पोजेबल निडल डॉक्टर वापरतात हे मंचास मान्य आहे. परंतु डिस्पोजेबल इंजेक्शनची संकल्पनाच मंचास काल्पनिक वाटते व डिस्पोजेबल इंजेक्शन वरून विरूध्द पक्षाचे वैद्यकीय अज्ञान स्पष्ट होते. विरूध्द पक्ष यांनी डिस्पोजेबल सिरींजद्वारे इन्जेक्शन तक्रारकर्त्यास दिले किंवा Unsterile (ग्रामीण भागातील पध्दतीनुसार प्रत्येक वेळी निर्जंतुक न करता) सिरींजद्वारे इंजेक्शन दिले व कोणकोणते इंजेक्शन्स व डोजेस तसेच इंजेक्शन हे विरूध्द पक्षाने दिले अथवा त्यांच्या नर्स ने दिले ते वस्तुनिष्ठ पुराव्याअभावी मंचास संशयास्पद वाटते. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या वरील निकालपत्रानुसार तक्रारकर्त्याने वस्तुनिष्ठ दस्तऐवजासह उजव्या हाताला इंजेक्शनमुळे झालेल्या reaction ची बाब व इतर बाबींविषयी स्पष्ट आरोप केल्यानंतर विरूध्द पक्ष यांनी योग्यप्रकारे उपचार केले व त्यांच्या कार्यपध्दतीमध्ये निष्काळजीपणा नाही हे सिध्द करण्याची जबाबदारी विरूध्द पक्ष यांची असतांना विरूध्द पक्ष यांनी त्यांच्या ताब्यातील वस्तुनिष्ठ पुरावे मंचासमोर दाखल करणे तसेच तज्ञाचा अहवाल दाखल करणे मंचाच्या संक्षिप्त कार्यपध्दतीत अभिप्रेत असतांनाही हॉस्पिटल केस पेपर दाखल न करणे यावरून विरूध्द पक्ष मंचापासून वस्तुस्थिती लपवित आहेत असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच खालील निकालपत्रास आधारभूत मानून हे मंच विरूध्द पक्ष यांच्या विरूध्द Adverse Inference काढत आहे. AIR – 1968 Supreme Court 1413 – Gopal Krushnaji Ketkar V/s. Mohd. Haji Latif - A party in possession of best evidence which could throw light on issue in controversy with holding it. Court ought to draw an adverse inference against him, notwithstanding that onus of proof does not lie on him. Party cannot rely on abstract doctrine of onus of proof or on the fact that he was not called upon to produce it. SCDRC Kerala – 2007 CTJ 1222 – Bank of Baroda V/s. A. Sureshkumar - The settled position of law is that it is the duty of the other party which is in possession of documents considered to be helpful in doing justice in the cause to produce the same. 21. मंच, “The synopsis of Forensic Medicine & Toxicology by Dr. K. S. Narayan Reddy, 19th addition 2005” या पुस्तकाच्या Medical Law & EthicChapter-3, page 23 मध्ये मेडिकल रेकॉर्डबाबत खालीलप्रमाणे स्पष्टपणे नमूद आहे. Medical Records :- The minimum requirement of accurate medical records are: (1) an exhaustive history, (2) a description of the present disease or injury, (3) the report of physical examination showing objective findings and subjective complaint, (4) diagnostic aids used and any reports received concerning the patient, (5) impression of diagnosis, (6) treatment, including medicines prescribed, and any procedures recommended or performed. In emergency cases, specific clinical data and observations should be noted periodically. The omission of essential details from the notes may cast a doubt on the truthfulness of the witness. वरील परिच्छेदावरून हे स्पष्ट होते की, विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचा आजार व उपचार तसेच त्याला देण्यात आलेला सल्ला यासंदर्भात आवश्यक रेकॉर्ड ठेवणे गरजेचे असतांना तसे न करणे हे विरूध्द पक्ष यांचे कृत्य ग्राहक सेवेतील त्रुटी व निष्काळजीपणा आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. 22. तक्रारकर्त्याने त्यास माहिती प्राप्त झाल्याच्या आधारावर युक्तिवादात विरूध्द पक्ष बी.ए.एम.एस. असल्याचे नमूद केले व तक्रारकर्त्याचे हे म्हणणे विरूध्द पक्ष यांनी मान्य केले. त्यावरून हे स्पष्ट होते की, विरूध्द पक्ष हे तथाकथित आयुर्वेदिक विषयाचे पदवीधारक असूनही त्यांनी ऍलोपॅथी औषधांद्वारे तक्रारकर्त्याचा वैद्यकीय उपचार केलेला आहे हे त्यांनी दाखल केलेल्या उत्तरातील कथनावरून व तक्रारकर्त्यास दिलेल्या प्रिस्क्रिप्शन (पृष्ठ क्र. 7) वरून स्पष्ट होते. याकरिता मंच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या खालील निकालपत्रातील Ratio विचारात घेत आहे. 1996 (3) CPR 205 (SC) - Poonam Verma V/s. Ashwin Patel & Ors. 1. A person who is registered as a Homoeopathic Practitioner can practice Homoeopathy only and he cannot be registered under the Indian Medical Council Act, 1956 or under the State Medical Council Acts, because of the restriction or registration of persons not possessing the requisite qualification. 2. When the law, under which a person was registered as a Medical Practitioner, required him to practice in Homoeopathy only, he was under a statutory duty not to enter the field of any other system of Medicine and when he trespassed into a prohibited field, without being qualified in that system, his conduct amounted to an actionable negligence. 3. A person who does not have knowledge of a particular system of Medicine but practices in that system is a Quack and a mere pretender to medical knowledge or skill. 4. Negligence as a tort is the breach of a duty caused by omission to do something which a reasonable man would do, or doing something which a prudent and reasonable man would not do, The definition involves the following constituents 1. a legal duty to exercise due care, (2) breach of the duty and (3) Consequential damages. त्याचप्रमाणे मंचाने, माननीय राष्ट्रीय आयोग यांच्या खालील निकालपत्रास देखील आधारभूत मानलेले आहे. NCDRC – 2010 CTJ 166 – Dr. Arun Devangan V/s. Madhu (Preeti Chandel). सदर निकालपत्रातील डॉक्टर हा सुध्दा आयुर्वेदिक डॉक्टर असतांना स्त्रीरोग तज्ञाची प्रॅक्टीस करीत होता. त्यात सुध्दा वरील माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रास आधारभूत मानण्यात आलेले आहे. मंचाने सदर तक्रारीशी साम्य असलेल्या वस्तुस्थितीशी जुळणा-या खालील निकालपत्रांना आधारभूत मानलेले आहे. State Commission, Bhopal – 2005 CTJ 525 – Smt. L. Blatwati V/s. Rajendra Kumar Thakarey – Prescribing treatment in allopathy of which the prescriber had no knowledge is medical negligence/deficiency in service and Opp. Party is liable to pay compensation and cost to nurture the loss cause to the complainant. NCDRC 2007 (3) CPJ 340 – P.N.Thakur (Prof.) V/s. HansCharitableHospital - सदर निकालपत्रातील तक्रारीत विरूध्द पक्ष हा युनानी डॉक्टर असून त्याने ऍलोपॅथी औषधांचा वापर केलेला आहे. त्यात खालीलप्रमाणे प्रमाणित केलेले आहे. This is a case of total callousness, ignorance and lack of medical ethics on the part of opposite parties resulting in the death of young person. NCDRC – 2007 (4) CPJ 295 – Sher Singh (Dr.) V/s. Billu Khan - Treatment-Ayurvedic Physician administered injection- Resulted in swelling, pain and numbness – Compensation awarded by Forum – Order up held in appeal – Hence revision – As per Supreme Court judgment Homeopathist practicing allopathy in contravention of Indian Medical Council Act, is actionable negligence – R.P. dismissed. NCDRC – 2007 (1) CPJ 31 – KarunaHospital V/s. Kochurani Jose & Ors. - Treatment by quack, impersonating himself as doctor – lack of requisite qualification – Resulted in death of patient very same day – Medical negligence proved – entitlement to compensation. ह्या तक्रारीतील डॉक्टर हे तथाकथित बी.ए.एम.एस. असून त्यांनी सुध्दा तक्रारकर्त्याच्या उजव्या हाताला इंजेक्शन दिले होते व इतर ऍलोपॅथी औषधांचे प्रिस्क्रिप्शन दिले आणि उजव्या हाताला दिलेल्या इंजेक्शनमुळे तक्रारकर्त्यास इंजेक्शन abscess झाले होते. म्हणून उपरोक्त निकालपत्रे सुध्दा सदर तक्रारीस लागू पडतात असे मंचाचे स्प्ष्ट मत आहे. होमिओपॅथीप्रमाणेच विरूध्द पक्ष आयुर्वेदिक डॉक्टरने ऍलोपॅथीची प्रॅक्टीस व औषधोपचार करणे हे भोंदूपणाचे कृत्य असून वैद्यकीय सेवेतील निष्काळजीपणास दोषी ठरतात असे मंचाचे मत आहे. 23. तक्रारकर्त्याने खालील दोन निकालपत्रे दाखल केली आहेत. 1. PunjabState Consumer Disputes Redressal Commission, Chandigarh – I (2001) CPJ 197 – Avtar Singh Bhatora V/s. Dr. Swarn Parkash Garg. - Medical Negligence – Deficiency in Service – Doctor not qualified and authorised to practice in Allopathic system of medicines – Prescribed Allopathic drugs for minimizing chest pain – Pain aggravated – Prima facie case of medical negligence established – Complainant entitled to get compensation. 2. PunjabState Consumer Disputes Redressal Commission, Chandigarh – I (1998) CPJ 181 – Kharaiti Lal V/s. Kewal Krishan Negligence/Deficiency in service – Compensation – Injection administered for abdominal pain – Injection administered in artery instead of vein – Fingers amputed – Loss of fingers on account of development of gangrene – Result of wrongly administered injection – Negligence/deficiency proved – Compensation granted. तक्रारकर्त्याने दाखल केलेली दोन्ही निकालपत्रे सदर तक्रारीतील वस्तुस्थितीस लागू पडत असल्यामुळे मंचाने उपरोक्त दोन्ही निकालपत्रे तक्रार निकाली काढण्याकरिता गृहित धरली आहेत. वरील निकालपत्रे व विवेचनावरून हे स्पष्ट झाले की, विरूध्द पक्ष हे तथाकथित आयुर्वेदिक डॉक्टर असून ज्या विषयाचे (Pathy) ज्ञान नाही, त्या Allopathy ची ते प्रॅक्टीस करतात हे कायदाबाह्य आहे तसेच तो गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून ते Quacks आहेत असे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या वरील निकालपत्रावरून स्पष्ट झाल्यामुळे विरूध्द पक्ष यांनी अनुचित वैद्यकीय पध्दतीचा अवलंब केलेला आहे आणि विरूध्द पक्ष यांचे हे कृत्य निष्काळजीपणाचे तसेच ग्राहक सेवेतील गंभीर अशी त्रुटी असल्याचे द्योतक आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. 24. विरूध्द पक्ष यांनी शपथपत्रावरील उत्तराच्या परिच्छेद क्र. 15 मध्ये नमूद केले की, तक्रारकर्त्याची वैद्यकीय तपासणी करून ज्या प्रकारे भंडारा जिल्ह्यात वैद्यकीय उपचार व काळजी घ्यावयास पाहिजे तेवढी विरूध्द पक्ष यांनी घेतली व त्याप्रमाणे उपचार केला असून त्यामध्ये कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही. वरील विवेचनामध्ये हे स्पष्ट झाले की, विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याची तपासणी, उपचार, काळजी, सल्ला इत्यादीबाबतचा कोणताही दस्तऐवज दाखल केलेला नाही. तसेच भंडारा जिल्ह्यात प्रचलित असलेली उपचार पध्दती, घ्यावयाची काळजी, याबाबत कोणत्याही वैद्यकीय तज्ञाचे मत/दस्तऐवज मंचासमोर नसल्यामुळे विरूध्द पक्ष यांचे कथन हे पूर्णतः तथ्थ्यहीन ठरते. विरूध्द पक्ष यांनी उत्तराच्या परिच्छेद क्र. 14 मध्ये तक्रारकर्त्याला मधुमेह असल्याबद्दल व फोडांमधून सुक्ष्म जंतू (बॅक्टेरिया) ने प्रवेश करून डाव्या हाताच्या इंजेक्शन भागात इन्फेक्शन केले असे नमूद केले आहे. विरूध्द पक्ष यांचे हे म्हणणे कोणत्या आधारावर/पुस्तकाच्या आधारावर करीत आहे हे मंचासमोर स्पष्ट केलेले नाही, त्यामुळे विरूध्द पक्ष यांचे हे म्हणणे तथ्थ्यहीन ठरते. विरूध्द पक्ष यांचेनुसार फोडांमधून सुक्ष्म जंतू (बॅक्टेरिया) ने प्रवेश करून डाव्या हाताच्या इंजेक्शन भागात इन्फेक्शन केले असे शपथपत्रात नमूद केले, जेव्हा की, तक्रारीतील वाद हा उजव्या हाताला दिलेल्या इंजेक्शनमुळे तक्रारकर्त्याच्या उजव्या हाताला इंजेक्शन abscess झाल्याबाबत व उजवा हात निकामी झाल्याबाबत आहे व डाव्या हाताला इंजेक्शन भागात इन्फेक्शन झाल्याबाबत कुठलीही नोंद शासकीय रूग्णालयाच्या डिसचार्ज कार्ड मध्ये नाही व विरूध्द पक्षाच्या स्वतःच्याच कथनानुसार विरोधाभासी आहे. त्यामुळे सुध्दा विरूध्द पक्ष यांचे कथन पूर्णतः खोडसाळ व सत्याची कास नसल्याचे स्पष्ट होते म्हणून मंचाने विरूध्द पक्ष यांचे म्हणणे अविश्वसनीय असल्यामुळे नाकारले. तसेच पायातील फोडांमुळे व पायातून गेलेल्या बॅक्टेरियामुळे पायास अपाय कां झाला नाही हे विरूध्द पक्ष यांनी स्पष्ट केले नाही. परंतु विरूध्द पक्ष यांचे हे म्हणणे सुध्दा सत्य कथन नसून तक्रार दाखल केल्यानंतर स्वतःच्या बचावार्थ पूर्ण विचारांती केलेले कथन आहे व त्याबाबत स्वतःचे मत सिध्द करण्याकरिता वैद्यकीय पुस्तकांचा तसेच वैद्यकीय तज्ञाचे मत मंचासमोर दाखल करणे संयुक्तिक असतांना ते दाखल न केल्यामुळे सुध्दा उत्तराच्या परिच्छेद क्र. 14 मधील विरूध्द पक्ष यांचे म्हणणे तथ्थ्यहीन ठरते. 25. तक्रारकर्त्याने तक्रारीत स्पष्ट केले की, त्याच्या पायाला फोडे झाल्यामुळे तो उपचारार्थ विरूध्द पक्ष यांच्या दवाखान्यात गेला होता. विरूध्द पक्ष यांनी म्हटले की, त्याच्या दोन्ही पायाला चिघळलेले फोडे व सूजन होती. तक्रारकर्त्याच्या उजव्या हाताला टी.टी. चे इंजेक्शन दिली व डाव्या हाताला डायक्लोफिनॅक इंजेक्शन दुखणे व सूजन कमी करण्याकरिता दिले तसेच ऍन्टीबायोटिक व दर्दविनाशक गोळ्या दिल्या. दिनांक 02/10/2010 ला दिनांक 01/10/2010 ची लक्षणे कायम असल्यामुळे तक्रारकर्त्याच्या कमरेत दोन्ही बाजूला इंजेक्शन दिले. तक्रारकर्ता हा पवनी येथील सरकारी रूग्णालयात तसेच डॉ. मेघरे, भंडारा यांच्या रूग्णालयात उपचारार्थ गेला असता तक्रारकर्त्याच्या प्रकरणातील गांभीर्य पाहून भंडारा सामान्य रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. दोन्ही पक्षानी पृष्ठ क्र. 11 वर दाखल सामान्य रूग्णालय, भंडारा येथील डिसचार्ज कार्ड मान्य केले. त्यातील Diagnosis च्या समोर injection abscess on right arm with cellulites = Dm = ARF (Acute renal failure) असे नमूद आहे. तसेच ऑपरेशन नोटस् मध्ये 2 ठिकाणी ऑपरेशन करण्यात आल्याची नोंद आहे. त्याचप्रमाणे रूग्णालयातून सुटी होतेवेळी तक्रारकर्त्याने जखमेच्या ड्रेसिंग करून घेण्याबाबत नोंदी आहेत. ज्याअर्थी तक्रारकर्ता हा निव्वळ पायास असलेल्या फोडाच्या उपचाराकरिता विरूध्द पक्ष यांच्याकडे गेला त्याअर्थी विरूध्द पक्ष यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी तक्रारकर्त्याच्या उजव्या हाताला टी.टी. चे इंजेक्शन दिले व त्याच हाताला इंजेक्शन abscess झाले व cellulites झाले तसेच ARF चा आजार जडला. यावरून हे स्पष्ट होते की, विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या उजव्या हाताला दिलेल्या इंजेक्शन मुळेच इंजेक्शन abscess झाले व severe abscess infection मुळे पूर्ण शरीरावर सूज येऊन cellulites तसेच ARF झाले व त्याचे उपचाराकरिता दिनांक 07/10/2010 ते 29/11/2010 म्हणजेच एकूण 54 दिवस शासकीय रूग्णालयात तक्रारकर्त्याला उपचार घ्यावे लागले. यावरून सुध्दा उजव्या हाताला झालेल्या इंजेक्शन abscess मुळे तक्रारकर्त्यास cellulites व Acute renal failure सारख्या गंभीर आजारास बळी पडावे लागले असे मंचाचे मत आहे. सदर उजव्या हातास दिलेल्या टी.टी.च्या इंजेक्शनमुळे तक्रारकर्त्यास इंजेक्शन abscess,cellulites व Acute renal failure हे आजार जडले नाहीत हे सिध्द करण्याची जबाबदारी विरूध्द पक्ष यांची होती. ती पार पाडण्यास विरूध्द पक्ष पूर्णतः अपयशी ठरले. याकरिता मंचाने माननीय राष्ट्रीय आयोग व राज्य आयोग यांच्या खालील निकालपत्रांना आधारभूत मानले आहे व सदर तक्रारीस Doctorine of Res-Ipsa-Loquitor चे तत्व लागू होते असे मंचाचे मत आहे. 1. NCDRC – 2004 CTJ 553 (CP) – Regi Mathew V/s. Radha Krishan - Wherein by applying doctrine of Res-Ipsa-Loquitor i.e. things speaks for themselves, they held that doctor is responsible for negligent treatment given to the patient and directed to pay compensation. It is further held that once the circumstances showed that there is prima facie negligence, it is for the respondent i.e. operating surgeon to rebut the charges providing proper expert opinion. 2. NCDRC - 2002 (2) CPR 138 – Janak Kantimathi Nathan V/s. Murlidhar Eknath Masane - When the patient suffering EPILEPSY was admitted in hospital and within two days he died. Then principal of res-ipsa-loquitorcould be invoked. 3. Kerala State Consumer Disputes Redressal Commission – 2004 CTJ 688 - Dr. G. Gangadharan V/s. K. A. Abdul Salam - When direct evidence is not available to substantiate the plea of negligence against the doctor for reasons beyond the control of the complainant, the doctrine of res-ipsa-loquitor comes into play. तक्रारकर्त्याने दाखल केलेली पंजाब राज्य आयोगाची निकालपत्रे तसेच वर नमूद माननीय सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय आयोग यांची निकालपत्रे सदर तक्रारीस आधारभूत मानणे मंचास संयुक्तिक वाटते व विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या उजव्या हातास दिलेल्या इंजेक्शनमुळेच तक्रारकर्त्याचा आजार व त्रास कमी न होता इंजेक्शन abscess झाले व इतर गंभीर स्वरूपाचा आजार झाला. त्यामुळे तक्रारकर्त्यास दिनांक 07/10/2010 ते 29/11/2010 या अवधीत सामान्य रूग्णालय भंडारा येथे उपचार घ्यावा लागला. त्यामुळे विरूध्द पक्ष यांच्या सेवेत निष्काळजीपणा व गंभीर स्वरूपाची त्रुटी आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. 26. तक्रारकर्त्याने, तो आसगाव येथील श्रीकृष्ण हॉटेलमध्ये दोनशे रूपये रोजाने काम करीत होता असे म्हटलेले आहे. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या अनुक्रमे पृष्ठ क्रृ 13 वरील हॉटेल मालकाच्या पत्रावरून हे सपष्ट होते की, तक्रारकर्ता हा श्रीकृष्ण हॉटेल, आसगाव येथे नोकर होता व दिनांक 01/10/2010 पासून आजारामुळे हॉटेलमध्ये उपस्थित राहू शकला नाही. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचे सदर म्हणणे नाकारले असून उलट तक्रारकर्ता हा विना परवाना दारूचा धंदा करतो तसेच सट्टा लावतो असे गंभीर स्वरूपाचे आरोप तक्रारकर्त्यावर केले आणि उत्तराच्या परिच्छेद क्र. 12 मध्ये म्हटले की, तक्रारकर्ता रोजंदारीवर शेतीचे काम करीत असून तक्रारकर्त्याच्या उजव्या हाताची शक्ती तीळमात्र कमी झालेली नाही. तक्रारकर्ता हा युक्तिवादाच्या वेळी मंचासमोर उपस्थित होता. मंचाने तक्रारकर्त्याचा उजवा हात प्रत्यक्ष पाहिला. त्यावरून उजव्या हाताचा खांदा व ढोपर यांच्यामध्ये एक आणि ढोपराच्या खाली एक असे दोन ऑपरेशन झाल्याचे स्पष्ट दिसत होते तसेच त्या हाताच्या मोबिलिटीवर पूर्णतः परिणाम झालेला होता व तो हात ढोपरापासून योग्य प्रकारे मोडू सुध्दा शकत नव्हता. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या उजव्या हाताची शक्ती तीळमात्र कमी झाली नाही व तो शेतीचे काम करीत आहे हे विरूध्द पक्ष यांचे म्हणणे पूर्णतः प्रथमदर्शनी तथ्थ्यहीन ठरते तसेच वस्तुनिष्ठ पुराव्याअभावी सुध्दा तथ्थ्यहीन ठरते. विरूध्द पक्ष यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ठ्यर्थ माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 2010 CTJ 868 SC (CP) – V. Krishnarao V/s. NikhilSuperSpecialityHospital या निकालपत्रास आधारभूत मानून म्हटले की, विरूध्द पक्ष यांच्या सेवेत व उपचारात निष्काळजीपणा नाही. सदर निकालपत्राचे सुक्ष्म अवलोकन केले असता माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सदर निकालपत्र विरूध्द पक्ष यांच्या म्हणण्यास आधारभूत ठरत नाही, कारण माननीय राष्ट्रीय आयोग व राज्य आयोग यांच्या वरील निकालपत्रावरून सदर तक्रारीस Res-Ipsa-Loquitor चे तत्व लागू होते. तसेच मंचासमोर वस्तुस्थिती स्पष्ट असल्यामुळे मंचाने तक्रारकर्त्यास तज्ञाचा अहवाल दाखल करण्याबाबत सूचित केले नाही व ते योग्यच होते हे विरूध्द पक्षाने दाखल केलेल्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या वरील निकालपत्राने निर्धारित केलेले आहे. विरूध्द पक्ष यांनी सादर केलेल्या निकालपत्रात Doctorine of Res-Ipsa-Loquitorचे महत्व आदेशाच्या परिच्छेद क्रमांक 43 ते 48 वर नमूद आहे व हे तत्व सदर तक्रारीस आधारभूत ठरते. माननीय सर्वोच्च न्यायालयाने वरील निकालपत्रातच खालीलप्रमाणे निर्देश दिलेले आहेतः- Experts opinion is needed to be obtained only in appropriate cases of medical negligence and the matter may be left to the discretion of the Consumer Forums especially when the retired Judges of the Supreme Court and High Courts are appointed to head the National Commission and the State Commission. There cannot be a mechanical or strait jacket approach that each and every case of alleged medical negligence must be referred to experts for evidence. Time has come to reconsider the parameters set down in Bolam test as a guide to decide cases on medical negligence and specially in view of Article 21 of the Constitution of India which encompasses within its guarantee, a right to medical treatment and medical care. 27. तक्रारकर्ता हा दिनांक 01/10/2010, 02/10/2010 व 03/10/2010 ला विरूध्द पक्ष यांच्या देखरेखीखाली उपचार घेत होता. नंतर पवनी येथील सरकारी रूग्णालयात तसेच भंडारा येथील डॉ. मेघरे यांच्या दवाखान्यात गेला होता, परंतु त्यांनी सामान्य रूग्णालय, भंडारा येथे जाण्यास सांगितले. त्यानंतर दिनांक 07/10/2010 ते 29/11/2010 पर्यंत सरकारी रूग्णालयात भरती होता याबाबत दोन्ही पक्षामध्ये वाद नाही. तक्रारकर्ता हा सामान्य रूग्णालयात उपचार करीत असतांना त्याने सरकारी रूग्णालयाव्यतिरिक्त रू. 1,322.65 ची औषधे खरेदी केली होती हे अनुक्रमे पृष्ठ क्र. 12 वर दाखल केलेल्या दस्तऐवजावरून सिध्द होते. तसेच तक्रारकर्ता हा भंडारा येथील रूग्णालयामध्ये भरती असतांना निश्चितच त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबियांना बाचेवाडी येथून भंडारा येथे ये-जा करण्याकरिता प्रवास खर्च रू. 500/- व जेवण्याच्या डब्याकरिता (रूग्ण व त्याच्या सोबतची व्यक्ती) रू. 2,000/- खर्च आल्याचे विरूध्द पक्ष यांनी जरी नाकारले असले तरी सदर खर्च मंचास अतिशय जुजबी व विश्वसनीय वाटतो. तक्रारकर्त्यानुसार त्याचे दिनांक 01/10/2010 ते 01/01/2011 पर्यंत रू. 15,000/- उत्पन्नाचे नुकसान झाले व पुढील भविष्यातील उत्पन्नाचे नुकसान म्हणून रू. 1,00,000/- तसेच शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रू. 50,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रू. 5,000/- मिळावे अशी तक्रारकर्त्याने मागणी केली आहे. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या बिलांवरून औषधांचा खर्च म्हणून रू. 1,322.65 (450 + 193.65 + 90 + 169 + 420) तसेच प्रवास खर्च रू. 500/- आणि जेवण्याच्या डब्याचा खर्च रू. 2,000/- तक्रारकर्त्यास विरूध्द पक्ष यांनी देणे संयुक्तिक होईल असे मंचाचे स्पष्ट मत आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाचे खालील निकालपत्रानुसार वेगवेगळ्या मथळ्याखाली वास्तविकतेनुसार नुकसानभरपाई देता येते असे प्रमाणित केलेले आहे. 2004 – CTJ 605 SC (CP) – Gaziabad Development Authority V/s. Balbir Singh 2006 – CTJ 4 (SC) CP – BiharState Housing Board V/s. Arun Bakshy – Award of compensation by a Judicial Forums must be under separate heads and must vary from case to case depending on the facts of each case. तसेच माननीय राष्ट्रीय आयोग यांनी NCDRC – 2007 (1) CPJ 31 – KarunaHospital V/s. Kochurani Jose & Ors. या प्रकरणात उत्पन्नाची नुकसानभरपाई निर्धारित करण्याची पध्दत प्रमाणित केलेली आहे. तक्रारकर्ता तक्रार दाखल करते वेळी 50 वर्षे वयाचा असून पुढील आठ वर्षे म्हणजे वयाच्या 58 वर्षे पर्यंत सक्रिय कार्यरत राहिला असता. वरील विवेचनावरून हे स्पष्ट झाले की, तक्रारकर्त्याच्या उजव्या हाताची मोबिलिटी पूर्णपणे संपुष्टात आल्यामुळे निश्चितच तक्रारकर्ता सक्रियपणे भविष्यातील जीवनात काम करू शकणार नाही व त्याच्या उत्पन्नाचे निश्चितच नुकसान होईल आणि त्यास पुढे सुध्दा शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागणार आहे या तक्रारकर्त्याच्या म्हणण्याशी मंच सहमत आहे. तक्रारकर्त्याने तो दोनशे रूपये रोजाने कार्यरत होता असे म्हटले. जरी शंभर रूपये रोज प्रमाणे वर्षाचे 365 दिवसांपैकी 300 दिवस कार्यरत राहिला असता तर रू. 100 x 300 दिवस x 8 वर्षे = रू. 2,40,000/- होतात. तक्रारकर्त्याने रू. 15,000/- व रू. 1,00,000/- ( रू. 1,15,000/-) ची मागणी केली. ती मंचास रास्त वाटते. तक्रारकर्त्यास व त्याचे कुटुंबियांस दिनांक 01/10/2010 पासून तक्रार दाखल करेपर्यंत झालेल्या व भविष्यात होणा-या शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रू. 30,000/- नुकसानभरपाई देणे संयुक्तिक होईल असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारीचा खर्च म्हणून रू. 2,000/- विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास देणे योग्य होईल असे मंचाचे मत आहे. करिता खालील आदेश. आदेश तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 1. विरुद्ध पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास औषधोपचाराकरिता आलेला खर्च रू. 1,322/- द्यावा. 2. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास भंडारा येथील रूग्णालयात भरती असतांना झालेला प्रवास खर्च व जेवण खर्च याकरिता रू. 2,500/- द्यावे. 3. विरूध्द पक्ष यांच्या उपचारातील निष्काळजीपणा व हलगर्जीपणामुळे तक्रारकर्त्याच्या आजाराने गंभीर स्वरूप घेतले व त्याला दिनांक 07/10/2010 ते 29/11/2010 पर्यंत रूग्णालयात भरती राहावे लागले. त्यामुळे तक्रारकर्त्याचे झालेले उत्पन्नाचे नुकसान व भविष्यातील उत्पन्नाची नुकसानभरपाई म्हणून रू. 1,15,000/- तसेच शारीरिक व मानसिक त्रास इत्यादीकरिता नुकसानभरपाई म्हणून रू. 30,000/- विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला द्यावे. 4. विरुद्ध पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारीच्या खर्चापोटी तक्रारकर्त्याला रू. 2,000/- द्यावे. 5. वरील आदेशाची अंमलबजावणी विरूध्द पक्ष यांनी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आंत करावी. अन्यथा विरूध्द पक्ष हे वरील आदेश क्र. 1, 2 व 3 मधील रकमेवर द.सा.द.शे. 9 टक्के दराने तक्रारकर्त्याच्या हाती रक्कम पडेपर्यंत व्याज देण्यास बाध्य राहतील.
| HONABLE MR. N. V. BANSOD, MEMBER | HONABLE MRS. R. D. KUNDLE, PRESIDENT | HONABLE MRS. Geeta R Badwaik, Member | |