निकाल (घोषित द्वारा – श्रीमती ज्योती पत्की, सदस्य ) या तक्रारीची माहिती थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, त्याने गेरअर्जदार विश्वकर्मा नागरी सहकारी पतसंस्था (यापुढे “पतसंस्था” असा उल्लेख करण्यात येईल) यांच्याकडून सन 2006 मध्ये रक्कम रु 2,00,000/- चे कर्ज घेतले; कर्ज मंजूर होण्यापूर्वी त्याने पतसंस्थेत दिनांक 22/8/2005 रोजी रक्कम रु 50,000/- 78 महिन्याच्या कालावधीसाठी मुदतठेव ठेवली आणि रक्कम रु 20,000/- चे शेअर्स घेतले तसेच सदर कर्जापोटी सिक्युरिटी म्हणून देवगिरी नागरी सहकारी बँकेचे चार कोरे धनादेश क्र 001641, 001642 आणि 001643 तसेच 001644 अनामत ठेवले होते. पतसंस्थेने दिनांक 25/8/2006 रोजी मंजूर कर्ज रकमेपैकी रु 20,000/- शेअर्सची रक्कम वजा करुन रु 1,80,000/- धनादेशाद्वारे कर्ज म्हणून दिले व ही रक्कम त्याचे देवगिरी बँकचे खात्यामध्ये त्याच दिवशी जमा झाली. तक्रारदाराने दिनांक 28/8/2006 रोजी देवगिरी बँकेतील त्याचे खाते तपासले असता खात्यामध्ये रु 43,345/- एवढीच रक्कम शिल्लक असल्याचे आढळून आले. त्याने याबाबत बँकेत चौकशी केली असता पतसंस्थेच्या चेअरमनने त्याच्या खात्यातून रु 1,40,000/- काढून नेल्याचे समजले. पतसंस्थेच्या चेअरमनने कर्ज मंजूर झाल्यापासून तीन दिवसाचे आत त्याने दिलेला धनादेश क्र 001641 द्वारे रु 1,40,000/- बेकायदेशीररित्या काढून घेऊन तक्रारदाराची फसवणूक केली आहे. तक्रारदाराने पतसंस्थेच्या चेअरमनकडे वारंवार रु 1,40,000/- आणि सिक्यरिटी म्हणून दिलेले कारे धनादेश परत मिळावेत याकरीता पाठपुरावा केला. परंतु त्यांनी दाद दिली नाही. तक्रारदाराने पतसंस्थेस मुदत ठेवीची रक्कम, शेअर्सची रक्कम आणि 3 कोरे धनादेश परत मिळावेत म्हणून कायदेशीर नोटीस दिली. परंतु गैरअर्जदार पतसंस्थेने कोण्ताही प्रतिसाद दिला नाही. अशा प्रकारे गैरअर्जदार पतसंस्थेने त्यास त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदराने गैरअर्जदार पतसंस्थेकडून मुदतठेवीची रक्कम रु 50,000/-, शेअर्सची रक्कम रु 40,000/-, बेकायदेशिर त्याचे खात्यातून काढलेली रक्कम रु 1,40,000/- आणि तीन कोरे धनादेश परत मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार विश्वकर्मा नागरी सहकारी पतसंस्था यांना नोटीसची बजावणी होऊनही ते मंचात गैरहजर राहिले म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा प्रकरण चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला. तक्रारदाराने पुरावा म्हणून दाखल केलेले स्वत:चे शपथपत्र व कगदपत्रांची मंचाने पाहणी केली. तकारदाराच्या वतीने अड दिग्रजकर यांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. तक्रारदाराने गैरअर्जदार पतसंस्थेकडे दिनांक 22/8/2005 रोजी 78 महिन्याच्या कालावधीसाठी रक्कम रु 50,000/- मुदतठेव ठेवली आणि दिनांक 20/7/2006 रोजी रक्कम रु 20,000/- चे शेअर्स घेतल्याचे पावत्यांवरुन दिसुन येते. परंतु तक्रारदाराने गैरअर्जदार पतसंस्थेकडून सन 2006 मध्ये रक्कम रु 2,00,000/- चे कर्ज घेतले आणि सदर कर्जाच्या सिक्युरिटीसाठी देवगिरी बँकेचे चार कोरे धनादेश पतसंस्थेस दिले या संबंधीचा कोणताही पुरावा दाखल केला नाही. तक्रारदाराने दाखल केलेल्या त्याचे देवगिरी बँकेच्या खाते उतारा-यावरुन दिनांक 25/8/2006 रोजी अशोक पगारे यांनी धनादेशाद्वारे रक्कम रु 1,40,000/- काढल्याचे दिसून येते. परंतु तक्रारदाराने या संदर्भात अशोक पगारे यांचा व पतसंस्थेचा काय संबंध आहे या बाबत काहीही पुरावा दाखल केला नाही त्यामुळे अशाक पगारे यांना कोणत्या संदर्भात रक्कम दिली याचा बोध होत नाही. तक्रारदाराने पतसंस्थेच्या चेअरमनने रक्कम रु 1,40,000/- बेकायदेशीर वसुल केले आहेत आणि कर्ज रकमेसाठी सिक्युरिटी म्हणून तीन कोरे धनादेश पतसंस्थेस दिले आहेत यासंबंधी कोणताही पुरावा दाखल न केल्यामुळे त्याची ही मागणी मंजूर करणे उचित ठरणार नाही. तक्रारदाराने पतसंस्थेकडून शेअर्सची रक्कम रु 40,000/- परत मिळावेत अशी मागणी केली आहे. तक्रारदाराने दिनांक 20/7/2006 रोजी रक्कम रु 20,000/- चे शेअर्स घेतल्याचे पावतीवहरुन दिसून येते. परंतु पतसंस्थेने रु 2,00,000/- चे कर्ज देताना रु 20,000/- शेअर्सची रक्कम कपात करुन रु 1,80,000/- चे कर्ज दिले या संदर्भात तक्रारदाराने कोणताही पुरावा दाखल केला नाही. शेअरहोल्डर हा पतसंस्थेचा भागीदर असल्या कारणाने शेअर्सची रक्कम तक्रारदारास परत करावी असा आदेश देण्याचे अधिकार या मंचाला नाहीत. तक्रारदारास पतसंस्थेकडून शेअर्सची रक्कम परत मागावयाची असेल तर सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचेकडे अर्ज करणे आवश्यक आहे असे आमचे मत आहे. तक्रारदाराने गैरअर्जदार पतसंस्थेकडे दिनांक 22/8/2005 रोजी रक्कम रु 50,000/- 78 महिन्याच्या कालावधीसाठी मुदत ठेव स्वरुपात ठेवल्याचे पावतीवरुन स्पष्ट दिसुन येत असल्यामुळे तक्रारदाराने 78 महिने पूर्ण होण्यापूर्वी सदर रकमेची मागणी पतसंस्थेकडे केली असून पतसंस्थेने सदर रक्कम तक्रारदारास परत करणे आवश्यक होते. तक्रारदाराने वारंवार मुदत ठेव रक्कम रु 50,000/- ची मागणी करुनही गैरअर्जदार पतसंस्थेने मुदत ठेवीची रक्कम तक्रारदारास परत न देऊन त्रुटीची सेवा दिलेली आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते. 2. गैरअर्जदार विश्वकर्मा नागरी सहकारी पतसंस्थेने तक्रारदारास मुदत ठेव रु 50,000/- निकाल कळाल्यापासून 30 दिवसाचे आत द्यावेत. 3. गैरअर्जदार विश्वकर्मा नागरी सहकारी पतसंस्थेने तकारदारास तक्रारीच्या खर्चापोटी रु 2,000/- निकाल कळाल्यापासून 30 दिवसाचे आत द्यावेत. 4. उभयपक्षांना आदेश कळविण्यात यावा. (श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्री डी.एस देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष UNK
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |