निकालपत्र :- (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1, 2, 3, 5 ते 11 यांनी एकत्रित म्हणणे दाखल केले. तसेच, सामनेवाला क्र.17 ते 20 यांनीही एकत्रित म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाला क्र.12 व 16 यांनी त्यांचे स्वतंत्र म्हणणे दाखल केले आहे. उर्वरित सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, उभय पक्षकार गैरहजर आहेत. त्यामुळे हे मंच उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे प्रस्तुतच्या तक्रारीमध्ये निकाल पारीत करीत आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडे दामदुप्पट ठेवीच्या स्वरुपात रक्कम ठेवलेली आहे, तिचा तपशील खालीलप्रमाणे :- अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | ठेव तारीख | मुदतपूर्ण तारीख | मुदतपूर्ण रक्कम | 1. | 000120 | 6000/- | 13.01.2000 | 14.01.2005 | 12000/- |
(3) सदर ठेवींतक्रारदारांचे अडीअडचणीचे वेळी व कुटुंबाचे हिताकरिता उपयोगी याव्यात म्हणून सामनेवाला संस्थेकडे ठेवलेल्या आहेत. सदर ठेवींची मुदत संपल्यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्थेकडे रक्कमांची वेळोवेळी लेखी व तोंडी मागणी केली आहे. तथापि, सामनेवाला यांनी संस्थेची आर्थिक परिस्थिती अडचणीची असलेचे कारण देवून उडवाउडवीची उत्तरे दिली व चालढकल करणेचा प्रयत्न केला. त्यामुळे तक्रारदारांना प्रचंड आर्थिक ओढाताण होवून मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. सबब, तक्रारदारांनी व्याजासह ठेव रक्कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. (4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत ठेव पावत्या, व ठेवी परत मिळणेबाबत केलेला पत्रव्यवहार इत्यादींच्या सत्यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (5) सामनेवाला क्र.1, 2, 3 5 ते 11 यांनी त्यांच्या एकत्रित म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, प्रस्तुत सामनेवाला क्र.2 ते 12 हे नविन संचालक मंडळ दि.03.06.2001 रोजी अस्तित्त्वात आले. विनायक बालाजी या नांवाने नविन संस्थेचे रुपांतर करणेत आले, त्यापूर्वीचे संचालक मंडळ पुढीलप्रमाणे होते :- 1. श्री.शंकरराव पिराजी साळोखे, चेअरमन 2. सौ.माधुरी शंकरराव साळोखे, संचालिका 3. श्री.रामंचद्र पिराजी साळोखे, चेअरमन यांचे भाऊ 4. सौ.हेमा रामचंद्र साळोखे, चेअरमन यांच्या भावजय 5. श्री.शिवमुर्ती शिवपुत्र हिरेमठ 6. श्री.शिवाजी बंडू पाटील 7. श्री.संदिप शंकरराव कागवाडे 8. श्री.जितेंद्र वासुदेव नाईक 9. श्री.विष्णुदास वसंतराव देसाई (6) सदरचे संचालक मंडळ अस्तित्त्वात होते. या मंडळाने ठेवीच्या रक्कमा परत केल्या नाहीत व कर्ज हे जवळचे नातेवाईकांना बेकायदेशीर वाअप केल्यामुळे वसुली झाली नाही. संस्थेची 100 टक्के थकबाकी राहिली म्हणून तत्कालिन संचालक मंडळ व असिस्टंट रजिस्ट्रार, गडहिंग्लज यांचे दरम्यान चर्चा होवून नविन संचालक मंडळ करण्याचे ठरले व मागील सर्व व्यवहारास वर नमूद नांवे केलेले संचालक मंडळ जबाबदार राहील असेही ठरले व तसे त्यांनी मान्य केलेले आहे. या संचालक मंडळातील चेअरमन, श्री.शंकरराव पिराजी साळोखे हेच त्यावेळी एकतर्फी कारभार पहात होते. चर्चेचेवेळी नविन संचालक मंडाळा त्यांनी संभाजीराजे पतसंस्था, गडहिंग्लज यांचेकडे बालाजी पतसंस्थेची रक्कम रुपये 2 लाख ठेव शिल्लक असल्याचे दाखवून रेकॉर्ड पूर्ण देतो असे सांगून लागलीच सदरची ठेव रक्कम गुपचूपपणे संचालक मंडळांची मंजुरी नसतांना काढून त्यांचे स्वत:चे घरातच पत्नी, सुन व मुलगे यांना वाटप केली. त्यामुळे तक्रारदारांच्या ठेवी देण्याची सर्व जबाबदारी तत्कालिन संचालक मंडळ व विशेषत: चेअरमन, श्री.शंकरराव पिराजी साळोखे यांची होती व आहे. तसेच, दि.08.12.2005 रोजी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, गडहिंग्लज यांचे आदेशान्वये अवसायानात काढून तत्कालिन संचालकांवर कर्ज व ठेवीच्या रक्कमांची जबाबदारी निश्चित केली आहे. (7) सामनेवाला क्र.1, 2, 3 5 ते 11 हे त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, दि.01.04.2000 ते दि. 31.03.2001 पर्यन्तच्या लेखापरिक्षणामध्ये संस्था 100 टक्के थकबाकीत आहे, बरेच रेकॉर्ड अपूर्ण आहे, ठेव रुपये 4,54,564/- व कर्जवाटप रुपये 7,01,802/- सर्व व्यवहार रोखीने व संशयास्पद आहेत या प्रकारचे आक्षेप आहेत. रोजकिर्द पान नं.23 दि.31.05.2001 रोजी शिल्लक NIL असलेने तशी नोंद लिहून मागील ठेवी व कर्जास जबाबदार मागील संचालक मंडळ राहील अशी नोंद ठेवून सामनेवाला क्र.2 यांनी चार्ज घेतलेला आहे. त्यामुळे तक्रारदारांची रक्कम परत करण्याची जबाबदारी प्रस्तुत सामनेवाला यांनी नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर व्हावी अशी विनंती केली आहे. (8) सामनेवाला क्र.1, 2, 3 5 ते 11 यांनी त्यांचे जादा म्हणणे दिले आहे. ते त्यांच्या जादा पुढे सांगतात, सहाय्यक निबंधक, गडहिंग्लज यांनी थकित कर्जाच्या व ठेवीच्या परतफेडीसाठी जा.क्र.65, ता.03.05.2006 रोजी तत्कालिन संचालक मंडळ जबाबदार धरले आहे व तसे जुन्या संचालकांना कळविले आहे. त्यामुळे तक्रारदारांच्या ठेवीस तत्कालिन संचालक मंडळास जबाबदार धरणेत यावी अशी विनंती केली आहे. (9) सामनेवाला क्र.1, 2, 3, 5 ते 11 यांनी त्यांच्या जादा म्हणण्यासोबत सहायक निबंधक, गडहिंग्लज यांचे दि.03.05.2006, दि.08.12.2005 चे आदेश, दि.06.06.2005 रोजीचा अंतरिम आदेश व दि. 12.04.2005 रोजीचा मध्यतरीय आदेश इत्यादीच्या झेरॉक्स प्रती दाखल केलेल्या आहेत. (10) सामनेवाला क्र. 17 ते 20 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सामनेवाला क्र.1 संस्थेचे विद्यमान चेअरमन व मॅनेजर यांनी उपनिबधंक, गडहिंग्लज यांच्या संगनमताने बेकायदेशीर कृत्य करण्याच्या हेतूने संस्थेच्या नांवात बदल केला. ठेवी स्विकारणे, ठेवी परत देणे, कर्ज वाटपन करणे, कर्ज वसूल करणे, संस्थेस येणा-या आर्थिक अडचणीस स्वत: जबाबदार राहणे इत्यादी जबाबदा-या स्विकारुन संस्था चालविण्यासाठी घेतली. सन 2001 पासून सदर संस्थेचे संपूर्ण व्यवहार सामनेवाला क्र.1 ते 11 यांनी संगनमताने केलेले आहेत व करीत आहेत, त्याचेशी सामनेवाला क्र.17 ते 20 यांचा काहीही संबंध नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. (11) सामनेवाला क्र.12, शंकरराव पिराजी साळुंखे यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, विद्यमान चेअरमन हे केडीसी बँकेमध्ये नोकरीस असल्याने त्यांनी सहकार खाते व नियम यांची माहिती तसेच सहाय्यक निबंधक, गडहिंग्लज यांचे छुपे सहकार्य याद्वारे संस्था मोडीत काढली. कर्ज वसुली न करणे, शिल्लक रक्कमेची उधळपट्टी करुन त्यांनी ही वेळ आणली आहे. सदरील ठेवी कधी स्विकारल्या याची माहिती उर्वरित संचालकांना नाही. संस्थेचे ऑडीट वेळोवेळी झाले असून पुढील कारभारास चेअरमन व मॅनेजर जबाबदार आहेत. संस्था अवसायानात काढलेबाबत ऐकीवात आहे, परंतु संचालकांना माहिती नाही. गैरव्यवहार, अवास्तव खर्च व जबाबदारी नाकारणेसाठी विद्यमान चेअरमन व मॅनेजर यांनी सर्व बनाव केलेला आहे. सबब, प्रस्तुत सामनेवाला यांचे नांव खटल्यातून वगळणेत यावे अशी विनंती केली आहे. (12) सामनेवाला क्र.16, शिवमुर्ती शिवपुत्र हिरेमठ यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारीस मुदतीचा बाध येतो. सामनेवाला संस्था अवसायानात काढली असून तिचा संपूर्ण कारभार प्रशासकांमार्फत चालविला जातो. प्रशासकांना पक्षकार केले तर त्यांचे ताब्यात असलेले सर्व कागदोपत्री पुरावे मंचासमोर येणार आहेत. प्रस्तुतचे सामनेवाला हे संस्थेचे दैनंदिन कामकाज अथवा व्यवहार पहात नव्हते, तक्रारीतील व्यवहाराची कोणतीही कायदेशीर जबाबदारी प्रस्तुत सामनेवाला यांचेवर नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. (13) या मंचाने तक्रारदारांच्या वकिलांचा युक्तिवाद सविस्तर व विस्तृतपणे ऐकलेला आहे. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्थेमध्ये ठेव रक्कमा ठेवलेल्या आहेत; सदर ठेव पावत्यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्थेमध्ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. सदर ठेव रक्कमांच्या मुदती संपून गेलेल्या आहेत व सदर रक्कमांची तक्रारदारांनी व्याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. सामनेवाला क्र.1, 2, 3, 5 ते 11 यांनी त्यांच्या म्हणण्यात व सामनेवाला क्र.12, 16, 17 ते 20 यांनी त्यांच्या म्हणण्यात तक्रारदारांच्या ठेव रक्कमा देणेची जबाबदारी एकमेकांवर ढकलेली आहे. तथापि, सदर सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यासोबत कोणत्या कालावधीत कोणते संचालक मंडळ कार्यरत होते याबाबतचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तसेच, त्यांनी त्यांचे म्हणणे शपथेवर दाखल केलेली नाहीत. त्यामुळे सदर सामनेवाला यांच्या कथनावर विश्वास ठेवणेकरिता कोणतेही कारण या मंचास दिसून येत नाही. तसेच, त्यांच्या म्हणण्यातील कथनांचा तक्रारदारांच्या तक्रारींशी कोणताही दुरान्वयेदेखील संबंध नसल्याचे स्पष्ट होते. (14) तक्रारदारांच्या व्याजासह ठेव रक्कमा सामनेवाला यांनी न देवून त्यांच्या सेवेत त्रुटी केली आहे. तथापि, प्रस्तुत तक्रारीतील सामनेवाला यांची नांवे पहाता सामनेवाला क्र.13 म्हणून खुद्द प्रस्तुत तक्रारीतील तक्रारदारांचे नांव नमूद दिसते. तसेच, प्रस्तुत तक्रारीसोबत दाखल केलेल्या ग्राहक तक्रार क्र.401 ते 403 व 405/05 या तक्रारींमध्येही प्रस्तुत तक्रारीतील तक्रारदार, सौ.माधुरी शंकरराव साळोखे यांना सामनेवाला क्र.13 म्हणून पक्षकार केलेचे दिसून येते. सदर तक्रारींमध्ये सौ.माधुरी साळोखे यांनी सामनेवाला क्र.13 म्हणून म्हणणेही दाखल केले आहे. इत्यादी विवेचन विचारात घेता तक्रारदार, सौ.माधुरी शंकरराव साळोखे या सामनेवाला संस्थेच्या संचालक असलेबाबत स्पष्ट होत आहे. त्यामुळे सामनेवाला संस्थेच्या संचालकांची तक्रारदारांच्या ठेव रक्कमा अदा करणेबाबतची जबाबदारी निश्चित करीत असताना इक्विटीचा विचार करुन सामनेवाला क्र.1 ते 20 या पदाधिका-यांना/संचालकांना वैयक्तिकरित्या जबाबदार न धरता केवळ संयुक्तिकरित्या जबाबदार धरणेत यावा या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. असे जरी असले तरी, सामनेवाला-शिवमुर्ती शिवपुत्र हिरेमठ यांना तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रारींत सामनेवाला क्र.4 व 16 असे दोनवेळा सामनेवाला म्हणून पक्षकार केले आहे. तक्रारदारांनी दोनपैकी एक नांव कमी केलेले नाही. प्रस्तुत प्रकरणी एकाच पक्षकाराला दोनदा जबाबदार धरणे संयुक्तिक होणार नसल्याने सामनेवाला क्र.4 व 16-शिवमुर्ती शिवपुत्र हिरेमठ यांना प्रत्यक्षात एकदाच वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार धरणेत यावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (15) तक्रारदार यांनी प्रस्तुत कामी दाखल केलेल्या ठेव पावत्यांच्या सत्यप्रतींचे अवलोकन केले तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडे दामदुप्पट ठेवीच्या स्वरुपात रककम ठेवलेचे दिसून येते. सदर दामदुप्पट ठेव पावती क्र.000120 ची मुदत संपलेली आहे असे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे सदर दामदुप्पट ठेव पावतीवरील मुदतपूर्ण रक्कम रुपये 12,000/- (रुपये बारा हजार फक्त) मुदत संपलेल्या तारखेपासून (दि.15.01.2005) द.सा.द.शे.6 टक्के व्याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (16) तक्रारदारांनी ठेव रक्कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह रक्कमा परत न दिल्याने सदर रक्कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे एकत्रित आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. (2) सामनेवाला क्र.1 ते 20 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदारांना दामदुप्पट ठेव पावती क्र.000120 वरील दामदुप्पट रक्कम रुपये 12,000/- (रुपये बारा हजार फक्त) द्याव्यात. सदर रक्कमेवर दि.15.01.2005 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के व्याज द्यावे. (3) सामनेवाला क्र.1 ते 20 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |