निकालपत्र :- (दि.09/09/2010) (व्दारा-श्री एम.डी.देशमुख,अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1, 2 व 5 हे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. शेष सामनेवाला यांना प्रस्तुत कामी नोटीस लागू होऊनही ते सदर कामी हजर झाले नाहीत किंवा त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले नाही. सबब सामनेवाला क्र.3, 4, 6 ते 13 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करणेत आला. सुनावणीचे वेळेस तक्रारदाराचे वकील व सामनेवाला क्र.1 व 2 चे वकील यांनी युक्तीवाद केला. (2) यातील तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी :- यातील सामनेवाला क्र.1 चे सामनेवाला क्र.2 व सामनेवाला क्र.3 हे अनुक्रमे चेअरमन व व्हा.चेअरमन आहेत तर सामनेवाला क्र.4 ते 13 हे संचालक आहेत. यातील तक्रारदार यांनी सामनेवाला पत संस्थेत मुदत बंद ठेव स्वरुपात रक्कमा ठेवलेल्या होत्या. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव ठेवल्याचा दि. | ठेवीची मुदत संपलेचा दि. | ठेवलेली रक्कम | व्याजदर | 01 | 8641 | 06/12/05 | 06/12/06 | 10,000/- | 10 % | 02 | 8642 | 06/12/05 | 06/12/06 | 12,390/- | 10 % | 03 | 7160 | 05/12/05 | 05/12/06 | 32,661/- | 10 % |
(3) सदर ठेवींच्या मुदती संपलेनंतर तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे व्याजासह ठेव रक्कमांची तोंडी व लेखी मागणी केली असता सामनेवाला यांनी त्या परत करणेस टाळाटाळ केली व असमर्थता दर्शविली. तसेच तक्रारदार यांना सामनेवाला संस्थेने व संचालकांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. सदर ठेवींच्या रक्कमेची तक्रारदारांना अत्यंतिक आवश्यकता आहे. तरीही सामनेवाला यांनी तक्रारदाराची रक्कम अदा केलेली नाही. सबब तक्रारदाराची एकूण मुदत बंद ठेव रक्कम रु55,051/- त्यावर 18 टक्के प्रमाणे व्याज, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- सामनेवाला यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्या वसुल होऊन मिळणेकरिता सदरील तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केलेला आहे. (4) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत मुदत बंद ठेव पावत्यांच्या सत्यप्रती व ठेव रक्कमेबाबत सामनेवाला यांना तक्रारदाराने पाठविलेली वकीलांमार्फतची नोटीस, सदर नोटीसची रजि. ए.डी.ची पोहोच पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.शपथपत्र व रिजॉइन्डर दाखल केले आहे. (5) या मंचाने सामनेवाला यांना नोटीसा पाठविल्या असता सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाला क्र.5 हे त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले व त्यांनी म्हणणे दाखल केले. सामनेवाला क्र. 3, 4 व 6 ते 13 यांना मंचातर्फे नोटीस लागू होऊनही ते सदर कामी हजर झालेले नाहीत किंवा त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले नाही. (6) सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी एकत्रित म्हणणे दाखल केले आहे. त्यांनी सदर म्हणण्यात तक्रारदाराची तक्रार ठेवीच्या रक्कमा वगळता नाकारलेली आहे. ते आपल्या म्हणण्यात पुढे सांगतात, सामनेवाला क्र.5,10 व 12 यांनी पूर्वीच राजीनामे दिलेले आहेत. त्यामुळे Mis Joinder of Parties या तत्वानुसार सदरची तक्रार नामंजूर होणेस पात्र आहे. सामनेवाला संस्थेने ठेवीच्या रक्कमेपेक्षा कमी रक्कमेची कर्जे दिलेली असून ती सर्व सुरक्षीत कर्जे आहेत. सामनेवाला संस्थेमध्ये कोणताही भ्रष्टाचार, गैरव्यवहार झालेला नव्हता व नाही. इतर पत संस्थेतील अनेक गैरव्यवहारामुळे ठेवीदारांनी एकदम ठेवीच्या रक्कमेची मागणी केल्यामुळे व ठेवीच्या मागणीच्या प्रमाणात वुसली होत नसल्याने सदर परस्पर विरोधी दृश्य दिसते. तसेच सामनेवाला संस्थेच्या कर्जदारांनी सहकार न्यायालय व इतर न्यायालयातून मनाई आदेश आणल्यामुळे सामनेवाला संस्थेचे वसूलीचे काम ठप्प झालेले आहे. सामनेवाला संस्थेने कर्जदारांचे विरुध्द महाराष्ट्र सहकारी कायदा कलम 101 अन्वये 150 पेक्षा अधिक दाखले मिळवलेले असून 200 प्रकरणे वसुलीसाठी दाखल आहेत. सदर वसूलीमधून रु.4 कोटी 50 लाख येणे आहेत. तसेच दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर कोल्हापूर यांचेकडे प्रलंबीत प्रकरणामध्ये स्थगिती आदेश असून सदरच्या प्रकरणात रु. 7 लाख येणे आहे. सध्याच्या पत संस्थेची घसरलेली आर्थिक परिस्थिती लक्षात घेता पूर्वीच्या दराप्रमाणे ठेवीदारांना व्याज देता येणे अशक्य आहे. या गोष्टीचा मा. राज्य आयोग यांनी देखील विचार करुन ठेवींच्या व्याजदरामध्ये कपात करणेचे आदेश दिलेले आहेत. (7) सामनेवाला क्र.1 व 2 आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, ग्राहक मंचामध्ये तक्रार फक्त दोन वर्षाच्या कालावधीमध्येच दाखल करता येते. तथापि सदरची तक्रार ही त्यानंतर दाखल झालेली आहे. त्यामुळे सदरची तक्रार नामंजूर होण्यास पात्र आहे. तसेच सदरची तक्रार ही कालबाहय झालेली आहे. त्याबाबत तक्रारदाराने कोणताही अर्ज दिलेला नाही. अशा केसेसमध्ये मा.राष्ट्रीय आयोग यांनी तक्रारी फेटाळलेल्या आहेत. सबब तक्रारदाराची तक्रार फेटाळणेत यावी अशी विनंती सामनेवाला क्र.1 व 2 यांनी सदर मंचास केली आहे. (8) सामनेवाला क्र.1 व 2 यांनी आपले लेखी म्हणणेसोबत कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत. (9) सामनेवाला क्र.5 यांनी आपल्या लेखी म्हणण्यात तक्रारदाराची तक्रार नाकारलेली आहे. ते आपल्या कथनात पुढे सांगतात, सदर सामनेवाला यांची सामनेवाला संस्थेवर संचालक म्हणून निवड झाली होती. परंतु सदर सामनेवाला यांनी सामनेवाला संस्थेमध्ये पुरेसा वेळ देता येत नसल्याने दि.25/01/2007रोजी राजीनामा दिला आहे व तो दि.27/02/2007 रोजी मंजूर झाला आहे. त्यामुळे सदर सामनेवाला हे सामनेवाला संस्थेमध्ये गेलेले नाहीत किंवा कोणत्याही सभेस हजर राहीलेले नाहीत. अगर संस्थेच्या कोणत्याही कामकाजाबाबत कोणताही संबंध आलेला नाही. प्रस्तुत सामनेवाला यांचेवर सहकार कायदयातील तरतुदीनुसार संस्थेच्या गैरव्यवहाराचे कारणावरुन कोणतीही जबाबदारी निश्चित झाले नसल्याने सामनेवाला यांचे राजीनाम्यानंतर संस्थेच्या सर्व प्रकारच्या जबाबदारीतून ते मुक्त झाले आहेत.तसेच जोपर्यंत प्रस्तुत सामनेवाला यांचेवर सहकार कायदयातील तरतुदीप्रमाणे जबाबदारी निश्चित होत नाही. तोपर्यंत ठेवीदारांची ठेव परत करणेसंबंधीची जबाबदारी प्रस्तुत सामनेवाला यांची नाही. सबब प्रस्तुत सामनेवाला यांना तक्रारदाराच्या ठेवीची रक्कम देणेस जबाबदार धरता येणार नाही. सबब सदर सामनेवाला क्र. 5 यांना सदर कामातून वगळणेत यावे तसेच तक्रारदारने प्रस्तुत सामनेवाला यांना जाणीवपूर्वक गोवले असल्याने तक्रारदार यांनी प्रस्तुत सामनेवाला यांना कॉम्पेंसेंटरी कॉस्ट म्हणून रु.5,000/- देणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती सामनेवाला क्र.5 यांनी सदर मंचास केली आहे. (10) सामनेवाला क्र.5 यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत सामनेवाला संस्थेला व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,कोल्हापूर यांना राजीनामा दिलेचे पत्र, राजीनामा मंजूर झालेबाबतचे सामनेवाला संस्थेच्या ठरावाची प्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (11) तक्रारदाराचा तक्रार अर्ज, शपथपत्र व दाखल कागदपत्रे, सामनेवाला क्र. 1 व 2 व 5 यांचे लेखी म्हणणे व सामनेवाला क्र.5 यांनी दाखल केलेली कागदपत्रे, तसेच तक्रारदाराचे वकील व सामनेवाला क्र.1व 2 चे वकील यांचा युक्तीवाद याचा या मंचाने साकल्याने विचार करता तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे मुदत बंद ठेव स्वरुपात रक्कमा ठेवलेल्या आहेत. सदर ठेवींच्या मुदती संपलेल्या आहेत व तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे वारंवार मागणी करुनही त्या सामनेवाला यांनी परत केलेल्या नाहीत असे निदर्शनास येते. त्यामुळे तक्रारदारांना त्यांच्या व्याजासह ठेव रक्कमा मिळविणेकरिता या मंचासमारे तक्रार अर्ज दाखल करणे भाग पडले आहे. (12) सामनेवाला क्र.1 व 2 यांनी आपल्या लेखी म्हणण्यात तक्रारदाराची ठेव रक्कम मान्य केली आहे. सामनेवाला यांनी आपल्या म्हणणेत सदरची तक्रार ही दोन वर्षाच्या आतील नसलेने कालबाहय झालेली असलेचे कथन केले आहे. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदारांची ठेव रक्कम तक्रार दाखल करेपर्यंत न दिलेने तक्रारीस कारण घडतच आहे. सबब सदरची तक्रार ही मुदतीत आहे. तसेच सामनेवाला क्र.5, 10 व 12 यांनी राजीनामा दिलेचे म्हटले आहे. परंतु त्याबाबत त्यांनी कोणताही पुरावा सदर मंचासमोर आणलेला नाही.तसेच राजीनामा दिलेने सदर संचालकांची जबाबदारी संपत नाही. कारण सदर ठेव ठेवलेच्या कालावधीत सदरचे संचालक कार्यरत होते. तक्रारदारने दाखल केलेल्या मुदत बंद ठेव पावती क्र.8641 व 8642 चे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्यांच्या मुदती संपलेल्या आहेत. सबब सदर ठेव पावतीवरील रक्कम रु.12,390/-, 10,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. त्यामुळे सदर रक्कमेवर ठेव कालावधीकरिता ठेव पावतीवर नमुद व्याजदराप्रमाणे व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सदर रक्कमेवर मुदत संपले तारखेपासून म्हणजे दि.06/12/2006 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच मुदत बंद ठेव पावती क्र.7160 चे अवलोकन केले असता सदर ठेव पावतीची मुदत संपलेची दिसून येते. सबब सदर ठेव पावतीवरील रक्कम रु.32,661/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. त्यामुळे सदर रक्कमेवर ठेव कालावधीकरिता ठेव पावतीवर नमुद व्याजदराप्रमाणे व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सदर रक्कमेवर दि.05/12/2006 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याज मिळणेस तक्रारदार पात्र असलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (13) सामनेवाला क्र.5 यांनी त्यांचे लेखी म्हणणेत संचालक पदाचा राजीनामा दिलेचे कथन केले आहे. परंतु तक्रारदाराने जेव्हा ठेव रक्कम ठेवली त्यावेळी सदर सामनेवाला हे संचालक होते. त्यामुळे प्रस्तुत सामनेवाला यांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही. तसेच सामनेवाला क्र.3,4, 6 ते 13यांना नोटीस लागू होऊनसुध्दा ते सदर कामी हजर झालेले नाहीत किंवा त्यांनी आपले लेखी म्हणणेही दाखल केलेले नाही. तसेच सामनेवाला यांचे वर्तणूकीवरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या ठेव खातेची रक्कम परत करणेकरिता कोणतेही प्रामाणिक प्रयत्न केलेले नाहीत हे स्पष्ट होते. तसेच सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणणे दाखल न करुन त्यांना तक्रारदारची तक्रार मान्य असलेचे दाखवून दिले आहे.सबब सामनेवाला क्र. 1 ते 13 यांना वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदाराच्या व्याजासह मुदत बंद ठेव रक्कमा परत करण्याकरिता जबाबदार धरणेत यावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. (2) सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना खालील कोष्टकातील मुदत बंद ठेव रक्कमा दयाव्यात व सदर रक्कमेवर ठेव कालावधीकरिता ठेव पावतीवर नमुद व्याजदराप्रमाणे व्याज अदा करावे. व मुदत संपले तारखेपासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याज दयावे. अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेवीची मुदत संपलेचा दि. | ठेवलेली रक्कम | व्याजदर | 01 | 8641 | 06/12/06 | 10,000/- | 10 % | 02 | 8642 | 06/12/06 | 12,390/- | 10 % | 03 | 7160 | 05/12/06 | 32,661/- | 10 % |
(3) सामनेवाला क्र. 1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |