द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, मा. अध्यक्ष यांचेनुसार
निकालपत्र
दिनांक 24 फेब्रुवारी 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी मौजे शिवणे येथील स्थावर मिळकत गट नं.14 हिस्सा नं. 7/ अ, 8/2/1/1 मधील जाबदेणार यांनी बांधलेल्या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील 500 चौ.फुट क्षेत्राची आर.सी.सी [सांगाडा] असलेली सदनिका रक्कम रुपये 1,60,000/- ला विकत घेण्याचे ठरविले. तक्रारदार व जाबदेणार यांच्यात दिनांक 17/6/1999 रोजी नोटराईज करार झाला. तक्रारदारांनी जाबदेणार यांना रक्कम रुपये 1,00,000/- दिले व उर्वरित रक्कम रुपये 60,000/- तक्रारदारांनी जाबदेणार यांना करारापासून दोन महिन्यांत देण्याचे ठरले होते. त्यानंतर जाबदेणार तक्रारदारांना खरेदीखत करुन देणार होते. अर्धवट बांधकाम तक्रारदारांनी पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी स्विकारली होती. त्यानुसार तक्रारदारांनी बांधकाम पूर्ण केले. परंतू जाबदेणार यांनी खरेदीखत करुन दिले नाही. तक्रारदारांनी जाबदेणार यांना उर्वरित रक्कम रुपये 60,000/- दिली. जाबदेणार यांनी तक्रारदारांना दिनांक 24/1/2002 रोजी नोंदणीकृत करार करुन दिला. तक्रारदारांनी अनेक वेळा जाबदेणार यांना सांगूनही त्यांनी सदनिकेचे नोंदणीकृत खरेदीखत करुन दिले नाही. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून नोंदणीकृत खरेदीखत करुन मागातत, तसेच करारात ठरल्याप्रमाणे सदरील मिळकतीवर मौजे शिवणे ग्रामपंचायतीमध्ये तक्रारदारांच्या नावाची नोंद होण्यास सहकार्य करण्याचे आदेश मागतात, तसेच नुकसान भरपाई पोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून जाबदेणार यांच्याविरुध्द मंचाने एकतर्फा आदेश पारीत केला.
3. तक्रारदार आणि जाबदेणार यांच्यात दिनांक 17/6/1999 रोजी नोंदणीकृत करार झाला. दिनांक 24/1/2002 रोजीच्या नोंदणीकृत करारामध्ये जाबदेणार यांनी तक्रारदारांकडून सदनिकेची संपूर्ण रक्कम रुपये 1,60,000/- मिळाल्याचे नमूद केल्याचे दिसून येते. अनेक वेळा मागणी करुनही जाबदेणार यांनी तक्रारदारांना नोंदणीकृत खरेदीखत करुन दिलेले नाही आणि मौजे शिवणे, ग्रामपंचायतीमध्ये तक्रारदारांच्या नावाची नोंद केलेली नाही. त्यासाठी तक्रारदारांनी जाबदेणार यांना नोटीस सुध्दा दिल्याचे दिसून येते. पूर्ण रक्कम घेऊन नोंदणीकृत करारनामा करुनसुध्दा जाबदेणार यांनी तक्रारदारांना नोंदणीकृत खरेदीखत करुन दिलेले नाही ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केल्याचे दिसून येते. म्हणून जाबदेणार तक्रारदारांना नुकसान भरपाई देण्यास जबाबदार ठरतात. म्हणून मंच जाबदेणार यांना असा आदेश देतो की त्यांनी तक्रारदारांना नोंदणीकृत खरेदीखत करुन दयावे व नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 10,000/- दयावेत.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येते.
[2] जाबदेणार यांनी तक्रारदारांना मौजे शिवणे येथील स्थावर मिळकत गट नं
14, हिस्सा नं 7/अ, 8/2/1/1 वर बांधकाम केलेल्या पहिल्या मजल्यावरील 500 चौ.फुट सदनिकेचे नोंदणीकृत खरेदीखत आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत करुन दयावे.
[3] जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावा.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.