निकालपत्र :- (दि.30/11/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) तक्रार स्विकृत करुन सामनेवालांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांना नोटीस लागू झाली. सर्व सामनेवाला हे हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. उभय पक्षकारांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार ही सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या ठेवीच्या रक्कमा अदा नल करुन सेवा न दिलेने दाखल केलेली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) तक्रारदार क्र. 1 ते 6 हे सामनेवाला संस्थेचे ग्राहक असून सदर संस्था सहकार कायदयाने अस्तित्वात आलेली बॅंकींग व्यवसाय करणारी संस्था आहे. सामनेवाला क्र.1 ही पत संस्था असून सामनेवाला क्र. 2 व 3 हे अनुक्रमे सामनेवाला संस्थेचे चेअरमन व व्हा. चेअरमन आहेत. सामनेवाला क्र.1 संस्थेचा कारभार सामनेवाला क्र. 2 ते 14 मार्फत चालतो. संस्थेच्या कारभारास नमुद सामनेवाला वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार असतात. यातील तक्रारदार क्र.1 ही तक्रारदार क्र. 2 व 3 यांची माता असून तक्रारदार क्र. 4 ते 6 यांची अज्ञान पालनकर्ती आहे. त्यामुळे प्रस्तुतचे तक्रारदार हे एकाच कुटूंबातील असलेने व सामनेवाला पत संस्था ही एकच असलेने एकत्रित रित्या तक्रार दाखल केलेली आहे. ब) तक्रारदार यांनी कै.नारायणराव मेढे नागरी सह. पत संस्था मर्या. कोल्हापूर या संस्थेत ठेव रक्कमा ठेवलेल्या होत्या. मात्र नमुद पत संस्था अलिकडेच सोन्यामारुती नागरी सह.पत संस्थेमध्ये विलीन झालेली आहे व नमुद संस्थेचा सर्व कारभार सामनेवाला संस्थेच्या नांवे करुन घेतलेला आहे. प्रस्तुत तक्रारदारांनी सामनेवालां क्र. 2 ते 14 यांचेवर विश्वास ठेवून व त्यांनी दिलेल्या रक्कम परत करणेच्या हमीमुळे ठेवी ठेवलेल्या होत्या. प्रस्तुत तक्रारदाराने सामनेवालांच्या पूर्वीश्रीच्या कै.नारायणराव मेढे सह.पत संस्थेमध्ये पुढील तपशीलाप्रमाणे ठेवी ठेवल्या होत्या. अ. क्र. | तक्रारदाराचे नांव | ठेवीचा प्रकार व ठेव पावती क्र. | ठेव ठेवलेचा दिनांक | मुदत संपलेचा दिनांक | ठेवीची रक्कम | व्याजदर | 01 | सौ.ज्यो.बा.पवार | दामदुप्पट/91425 | 20/02/02 | 20/08/05 | 10,000/- | 20,000/- | 02 | सौ.ज्यो.बा.पवार-मेढे | दामदुप्पट/91659 | 12/04/03 | 12/10/08 | 15,000/- | 30,000/- | 03 | सौ.ज्यो.बा.पवार-मेढे | मुदतबंद/1848 | 08/07/05 | 08/07/07 | 20,000/- | 10 % | 04 | कु.अपर्णा बा.पवार-मेढे | दामदुप्पट/1590 | 06/06/02 | 06/12/06 | 11,000/- | 22,000/- | 05 | कु.अपर्णा बा.पवार-मेढे | दामदुप्पट/1653 | 29/03/03 | 29/09/08 | 15,000/- | 30,000/- | 06 | कु.अपर्णा बा.पवार-मेढे | दामदुप्पट/1745 | 21/03/04 | 21/09/09 | 1,501/- | 3,002/- | 07 | कु.अपर्णा बा.पवार-मेढे | आकर्षकठेव/771 | 05/08/98 | 05/11/08 | 22,100/- | 1,00,000/- | 08 | कु.अपर्णा बा.पवार-मेढे | मुदतबंद/1850 | 08/07/05 | 08/07/07 | 20,000/- | 10 % | 09 | कु.अपर्णा बा.पवार-मेढे | आकर्षकठेव/772 | 05/08/98 | 05/11/08 | 16,575/- | 75,000/- | 10 | कु.अपर्णा बा.पवार-मेढे | आकर्षकठेव/317 | 17/08/94 | 17/08/09 | 11,000/- | 1,00,000/- | 11 | कु.अपर्णा बा.पवार-मेढे | आकर्षकठेव/219 | | ऑगस्ट-05 | 22,718/- | | 12 | धैर्यशिल बा.पवार-मेढे | दामदुप्पट/1499 | 06/06/02 | 06/12/06 | 11,000/- | 22,000/- | 13 | धैर्यशिल बा.पवार-मेढे | दामदुप्पट/1654 | 29/03/03 | 29/09/08 | 15,000/- | 30,000/- | 14 | धैर्यशिल बा.पवार-मेढे | मुदतबंद/1849 | 08/07/05 | 08/07/07 | 20,000/- | 10 % | 15 | धैर्यशिल बा.पवार-मेढे | आकर्षकठेव/665 | 01/11/97 | 01/02/08 | 22,100/- | 1,00,000/- | 16 | धैर्यशिल बा.पवार-मेढे | आकर्षकठेव/225 | | ऑगस्ट-05 | 22,718/- | | 17 | युवराज रा.पिंपळे | आकर्षकठेव/255 | | ऑगस्ट-05 | 20,971/- | | 18 | धनश्री रा.पिंपळे | आकर्षकठेव/261 | | ऑगस्ट-05 | 20,971/- | | 19 | श्रुतिका श्री.पवार-मेढे | आकर्षकठेव/31 | | सप्टेंबर-05 | 15,043/- | |
क) सदर रक्कमांची तक्रारदार ही एक स्त्री असलेने तसेच तक्रारदार क्र. 2 ते 6 यांचे उच्च शिक्षणासाठी रक्कमेची निकडीची गरज असलेने सामनेवालांकडे रक्कमांची मागणी केली असता सदर रक्कमा व्याजासह अदा केल्या नाहीत. सामनेवाला क्र. 2 ते 14 यांनी बेकायदेशीरपणे ठेव रक्कमांचे वाटप केलेले असून तक्रारदारांच्या ठेव रक्कमा परत करणेची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी नमुद सामनेवाला यांची आहे; सदर ठेव रक्कमा व्याजासह परत मिळणेकरिता प्रस्तुतची तक्रार सदर मंचात दाखल करावी लागत आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन आज अखेर व्याजासह होणारी ठेव रक्कम रु.7,67,762/- मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.1,50,000/- तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.12,500/- अशी एकूण रक्कम रु.9,30,262/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह सामनेवालांकडून वसूल होऊन मिळावेत अशी विंनती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (03) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ नमुद ठेव तपशीलाप्रमाणे ठेव पावत्यांच्या सत्यप्रती दाखल केलेल्या आहेत. (04) सामनेवाला क्र. 1 व 2 यांचे लेखी म्हणणेनुसार- अ) तक्रारदाराची तक्रार पूर्णत: चुकीची, रचनात्मक धांदात खोटी आहे. सबब ती सामनेवाला यांना बिलकूल मान्य व कबूल नाही. सामनेवाला त्याचा स्पष्ट शब्दात इन्कार करतात. प्रस्तुतची तक्रार पुढील तांत्रिक मुद्दयांचा विचार करता चालणेस पात्र नाही असे सामनेवाला यांनी आपल्या म्हणणेत म्हटले आहे.सामनेवाला व तक्रारदार यांचेमध्ये ग्राहक व विक्रेता असे नाते निर्माण होत नसलेने चालणेस पात्र नाही. प्रस्तुत कै.नारायण मेढे नागरी सह. पत संस्थेचया संचालकांना आवश्यक पक्षकार केलेले नाही. त्यामुळे नॉन जॉइन्डर ऑफ नेसेसरी पार्टीज ची बाधा येते. सबब तक्रार नामंजूर होणेस पात्र आहे. तक्रारदार क्र.2 ते 6 अज्ञान असलेचे म्हटले आहे. मात्र सामनेवालांच्या माहितीप्रमाणे तक्रारदार हे सज्ञान आहेत. तक्रारदारांचे वय नमुद न करता खोटया मजकूर आधारे तक्रार दाखल केलेली आहे. प्रस्तुत तक्रारदार क्र. 2 ते 6 सज्ञान असलेने त्यांनी तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. परंतु प्रस्तुतची तक्रार त्यांनी दाखल केली नसलेने काढून टाकणेस पात्र आहे. ब) तक्रार अर्ज कलम 2 मधील मजकूर पूर्णत: चुकीचा आहे. तो सामनेवाला यांना मान्य व कबूल नाही. सामनेवालांनी तक्रारदाराकडून कोणतीही वैयक्तिकरित्या रक्कम स्विकारलेली नाही. तसेच तक्रारदाराने कथन केल्याप्रमाणे जर रक्कम संस्थेकडे ठेवल्या असतील तर त्याची कल्पना सामनेवालांना नाही. तक्रारदाराने दाखल केलेल्या पावत्यांचे अवलोकन केले असता प्रस्तुतच्या पावत्या सन-1994 ते 2007 अखेर कै.नारायणराव मेढे पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवल्याचे दिसून येते. के. नारायणराव मेढे ही प्रस्तुतची पत संस्था नमुद सामनेवाला पत संस्थेमध्ये विलीनीकरण झालेले आहे. तक्रारदाराने ठेवी ठेवल्या त्यावेळी कै.नारायणराव मेढे पत संस्था अस्तित्वात होती. त्यावेळी सामनेवाला क्र. 2 ते 14 यांचा काहीही संबंध नव्हता. सबब सामनेवालांच्यावर विश्वास ठेवून व व्याजासह रक्कम परत करणेची हमी दिली तक्रारदाराचे हे कथन खोटे व हास्यास्पद आहे. तक्रारदाराचे पती तसेच दिर सामनेवाला संस्थेचे संचालक चेअरमन होते तसेच त्यांचे घरातील अन्य व्यक्तीही संचालक होत्या. दरम्यानचे काळात कै. नारायण मेढे पत संस्थेवर बाळासो पवार-मेढे, अनंत शंकरराव पोतदार, आनंदराव ज्ञानदेव भोपळे, बाळासाहेब पांडूरंग ढेरे, निनाम अ. रहीम पटवेगार, नारायण शंकरराव जाधव, प्रदिपराव दिनकरराव माने, कादर हमजामलबारी, अरीफ म.गौस बागवान, लैला अन्वर शेख या व्यक्ती नमुद पत संस्थेमध्ये संचालक म्हणून काम करत असताना सदरच्या ठेवी ठेवलेल्या आहेत. सदर संचालक मंडळाने केलेल्या चुकीच्या कारभारामुळे नमुद संस्था अडचणीत येऊन सन-04 पासून सदर संस्था बंद आहे. तक्रारदाराच्या ठेवीस नमुद संचालक जबाबदार आहेत. सदर संचालकांना आवश्यक पक्षकार असतानाही त्यांना जाणूनबुजून पक्षकार केलेले नाही. तक्रारदाराने कै. नारायणराव मेढे पत संस्थेत ठेवी ठेवल्या होत्या हे सर्वसाधारपणे बरोबर आहे. मात्र तक्रारीतील केलेली मागणी चुकीची आहे व रक्कमा वाढवून मागणी केलेली आहे. सदर रक्कमा देय आहेत हे शाबीत करणेची जबाबदारी तक्रारदाराची आहे. क) तक्रारदार क्र.1 या जयश्री दिनकर सावंत नात्याने नणंद यांना कर्जास जामीन आहे. सदर कर्जाच्या वसुलीपोटी कलम 101 प्रमाणे वसुली दाखला क्र.524/(कलम101) (2)/2008 घेतलेला आहे. तक्रारदार क्र.1 यांना जामीनदार या नात्याने जबाबदार धरणेचा आदेश उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांनी दिला आहे. सदर कर्जाची येणे रक्कम 23,028/- व पुढील व्याज असे आहे. सदर वसुली दाखलेप्रमाणे वसुली अधिकारी यांनी तक्रारदाराची ठेव पावती क्र.1669 प्रस्तुत कर्जाचे वसुलीकरिता जप्त करणेचा आदेश दिलेला आहे. ड) तक्रारदार क्र. 2 ते 6 हे सज्ञान आहेत. त्यामुळे तक्रारदार क्र.1 यांना त्यांचेतर्फे तक्रार दाखल करणेचा कोणताही अधिकार नाही. नमुद तक्रारदार अज्ञान असलेबाबत कोणताही पुरावा तक्रारदार क्र.1 यांनी मे. मंचासमोर आणलेला नाही. तसेच तक्रारदार क्र.6 चे वडील श्रीरंग मेढे यांनी नारायण मेढे पत संस्थेकडून कर्ज घेतले होते व सदर कर्जाची सन-2005 रोजी रक्कम रु.25,918/- व त्यापुढील व्याज अशी येणे बाकी आहे. इ) तक्रारदार क्र. 2 ते 6 यांनी आकर्षक ठेव म्हणून ठेव ठेवलेली आहे. मात्र नियमाप्रमाणे संपूर्ण हप्त्याची रक्कम भरलेली नाही. त्यामुळे नियमाप्रमाणे मुदतपूर्व रक्कम मागता येणार नाही. याबाबत एकपेक्षा जास्त हप्ते थकीत गेल्यास मुदतीनंतर मुद्दल रक्कम परत केली जाईल असा नियम आहे. अब्दुलबारी गढवाले विरुध्द नारायण मेढे पत संस्था यामध्ये मे. मंचाने दाखल ग्राहक तक्रारीमध्ये दिलेल्या आदेशाविरुध्द संस्थेने मा.राज्य आयोग,मुंबई यांचेकडे केलेल्या अपीलामध्ये सदर आकर्षक ठेवीची संपूर्ण रक्कम भरली नसलेने भरलेली रक्कम बिनव्याजी परत करणेचा आदेश केलेला आहे. त्यामुळे तक्रारदाराचे मागणीस सामनेवाला जबाबदार नाहीत. तक्रार अर्ज कलम 3 मधील मजकूर पूर्णत: चुकीचा असलेने तो मान्य नाही. नारायण मेढे पत संस्थेमध्ये तक्रारदाराने ठेव ठेवली होती व सदर ठेव रक्कमांचे बेकायदेशीरपणे वाटप केलेचे तक्रारदारास माहित होते; तसेच तक्रारदाराचे पती हेच नमुद संस्थेचे चेअरमन होते. त्यांचेविरुध्द दाद मागण्यास लागू नये म्हणून तक्रारदाराने त्यांना पक्षकार केलेले नाही. तक्रारदाराच्या ठेवी या सामनेवालाने स्विकारलेल्या नाहीत. त्यामुळे सदर रक्क्मांचा वाटप करणेचा प्रश्न येत नाही. सदर संस्था बंद पडणेस व अडचणीत येतेस सदर संस्थेचे संचालक जबाबदार आहेत. ई) दि.25/03/2008 रोजी उपनिबंधक, कोल्हापूर संस्था शहर यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 18(।) अन्वये प्राप्त अधिकारानुसार नमुद नारायण मेढे पत संस्था सामनेवाला क्र.1 पत संस्थेत विलीन करणेचा आदेश केला व त्यानुसार दि.31/03/2008 अखेरच्या ताळेबंदप्रमाणे सर्व मालमत्ता व दायित्व हस्तांतरण/विलीनीकरण/एकत्रितकरण श्री सोन्यामारुती नागरी सह. पत संस्थेमध्ये विलीनीकरण करणेत आले. सदर विलीनीकरणानंतर नमुद नारायण मेढे पत संस्थेच्या रक्कमा वसुली करुन अदा करावयाच्या आहेत. तसेच सदर ठेव रक्कमा अदा करताना 25 टक्के रोख व 75 टक्के ठेव पावतीने किंवा 100 टक्के ठेव पावतीने या दोहोपैकी एका पर्याचा अवलंब करणेचा आहे. सदर संस्था विलीन झाली त्यावेळी रक्कम रु.73,00,000/- ठेव रक्कमा देणे होते. सदर रक्कम रु.55,00,000/- इतकी कर्ज रक्कम येणे होती. रक्कम रु.13,00,000/- मुद्दल वत्यावरील व्याज कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सह.बॅंकेचे कर्ज होते व सदर कर्जासाठी नमुद संस्थेची स्थावर इमारत सिक्युरिटाझेशन खाली जप्त केलेली होती. विलीनीकरणानंतर सदर संस्थेच्या कर्जापोटी रक्कम रु.9,15,020/- एवढी कर्ज रक्कम वसुल केली तसेच सामनेवाला संस्थेने स्वत:कडे रक्क्म रु.21,00,000/- ठेव वाटप केली असून रक्क्म रु.5,00,000/- पावतीच्या स्वरुपात व रक्कम रु.25,00,000/- रोखीच्या स्वरुपात वाटप केले आहे.तसेच नमुद मध्यवर्ती बॅंकेचे कर्ज रक्कम रु.16,28,000/-भरणा केलेले आहे.सामनेवाला पत संस्थेचे स्वत:कडील रक्कम रु.37,00,000/-गुंतलेले आहेत.नमुद नारायण मेढे पत संस्थेची वसुली होईल त्याप्रमाणे सदर संस्थेच्या ठेवीदारांना विलीनीकरणाच्या आदेशाप्रमाणे पावतीच्या स्वरुपात दामदुप्पटीची 7 वर्षे 10 महिन्याची पावती करुन दिली जाईल. तक्रारदार क्र.1 यांचे पतीसह सामनेवाला पत संस्थेमध्ये आले होते. त्यावेळी तक्रारदाराचे पतीचे असलेली मुदत बंद ठेव व सेव्हींग खातेवरील रक्कम दि.09/09/2008 रोजी त्यांना अदा केलेली आहे. तसेच तक्रारदार क्र.1 यांची ठेव पावती क्र./खाते क्र.6/1792, 6/1765 ची ठेव रक्कम दि.22/09/2009 रोजी अदा केलेली आहे व त्यावेळी तक्रारदार क्र. 2 ते 6 यांचे रक्कमेच्या दामदुप्पटीच्या 7 वर्षे 10 महिने मुदतीच्या पावत्या करुन देणेचे ठरले. त्यावेळी तक्रारदार क्र.1 यांनी अन्य तक्रारदार क्र. 2 ते 6 यांना सहीसाठी घेऊन यावे असे सांगितले असता सही साठी घेऊन येतो असे सांगून तक्रारदार गेले व सदरची खोटी तक्रार दाखल केली. नमुद नारायण मेढे पत संस्थेचे ऑडीट झालेले नव्हते व ताळेबंद तयार नव्हता. त्यामुळे येणे वसुल करणे अडचणीचे होते. त्यामुळे विशेष लेखापरिक्षक सहकारी संस्था यांना ऑडीट करुन देय रक्कमेची जबाबदारी नक्की करणेचा आदेश जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी दिला आहे. त्याप्रमाणे ऑडीट करणेचे काम सुरु आहे. सदर ऑडीट पूर्ण झालेवरच देय रक्कमेची जबाबदारी निश्चित होणार आहे. तसेच वसुली झालेशिवाय ठेव रक्कम देणे अडचणीचे आहे. तक्रार अर्ज कलम 4 ते 6 मधील मजकूर पूर्णत: खोटा आहे. सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. तक्रारदार यांनी कलम 7 मध्ये केलेली मागणी पूर्णत: चुकीची व खोटी आहे. प्रस्तुतची खोटी व चुकीची तक्रार दाखल केलेने ती खर्चासह नामंजूर करणेत यावी तसेच सामेनवाला यांना आलेला खर्च देणेचा तक्रारदारांना आदेश व्हावा अशी विंनती सामनेवालांनी सदर मंचास केली आहे. (06) सामनेवालांनी आपल्या म्हणणेच्या पुष्टयर्थ उपनिबंधक यांचा आदेश, तसेच सहकार न्यायालय यांचा आदेश कलम 101 प्रमाणेचा आदेश, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पत्र इत्यादीचे कागदपत्र दाखल केलेली आहेत. (07) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला क्र.1 व 2 यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे तसेच उभय पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. प्रस्तुतची तक्रार मे.मंचात चालणेस पात्र आहे काय? --- होय. 2. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? --- नाही. 3. तक्रारदार ठेव रक्कम मिळणेस पात्र आहेत काय? --- होय. 4. काय आदेश? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- सामनेवाला यांनी दि.26/02/2010 रोजी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. तसेच सदर दिवशी नारायण मेढे पत संस्थेच्या संचालकांना आवश्यक पक्षकार करणेत यावे त्यामुळे न्यायदानास मदत होणार आहे. नमुद पत संस्थेचे चेअरमन तक्रारदार यांचे पती असलेने त्यांना जाणूनबुजून पक्षकार केलेले नाही. त्यामुळे नॉन जॉइन्डर ऑफ नेसेसरी पार्टीचा बाध येतो. सबब सदर संचालक मंडळास आवश्यक पक्षकार म्हणून समाविष्ट करणेचा आदेश व्हावा व तक्रारदाराने तसे न केलेस प्रस्तुतची तक्रार काढून टाकणेचा आदेश व्हावा अशी विंनती केलेली आहे. त्यास दि.19/04/2010 रोजी तक्रारदाराने लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. सदर अर्जावर अंतिम सुनावणीच्या वेळेस युक्तीवाद ऐकणेत आला. तक्रारदाराने दाखल केलेल्या ठेव पावत्यांचे सत्यप्रतिचे अवलोकन केले असता प्रस्तुतच्या ठेव पावत्या हया कै. नारायणराव मेढे नागरी सह. पत संस्था मर्या.कोल्हापूर यांनी दिलेल्या आहेत. सबब सदर ठेव रक्कमा या तक्रारदाराने नमुद संस्थेत ठेवलेल्या होत्या. नमुद मेढे पत संस्था ही सोन्यामारुती नागरी सह. पत संस्थेमध्ये दि.25/03/2008 चे उपनिबंधक, सहकारी संस्था कोल्हापूर शहर कोल्हापूरयांचे आदेशानुसार विलीन करणेत आलेली हेाती. प्रस्तुतच्या ठेवी या तक्रारदाराने थेट सोन्यामारुती पत संस्थेत ठेवलेल्या नसून त्या कै.नारायणराव मेढे पत संस्थेत ठेवलेल्या होत्या. तसेच सामनेवालांनी आपल्या लेखी म्हणणेमध्ये तक्रारदार क्र.1 यांचे पती हे नमुद संस्थेचे चेअरमन होते व अन्य त्यांच्या जवळील व्यक्ती या संचालक म्हणून काम करत होत्या. सत्य वस्तुस्थिती समोर येणेसाठी त्यांना आवश्यक पक्षकार करणे क्रमप्राप्त असतानाही जाणूनबुजून तक्रारदाराने त्यांना पक्षकार केलेले नाही. यावर तक्रारदाराचे वकीलांनी प्रस्तुतची मेढे पत संस्था ही नमुद सामनेवाला क्र.1 पत संस्थेत विलीन झाले असलेने तीचे अस्तित्व राहिलेले नाही. त्यामुळे सदर संस्थेच्या संचालकांनी जर गैरव्यवहार केलेला असेल तरच त्यांना जबाबदार धरता आले असते. तशाप्रकारचा गैरव्यवहार केलेला नाही अथवा सक्षम न्यायालयाने तशी जबाबदारी निश्चित केलेली नसलेने प्रस्तुत संस्थेच्या संचालकांना पक्षकार म्हणून करणेचा दिलेला अर्ज हा तक्रारदारास आर्थिक खर्चात पाडणेकरिता व सुनावणी लांबणेकरिता दिलेला आहे. त्यामुळे प्रस्तुतचा अर्ज नामंजूर करावा अशी विनंती केलेली आहे. सदर दाखल अर्ज व म्हणणे तसेच उभय पक्षांचे युक्तीवाद व वस्तुस्थितीचे अवलोकन केले असता कै.नारायणराव मेढे पत संस्थेच्या संचालकांना सदरच्या तक्रारदाराच्या ठेव पावत्यां त्यांनी दिले असलेने त्यांना पक्षकार करणे आवश्यक असले तरी सदरची संस्था सामनेवाला क्र.1 संस्थेमध्ये विलीन झालेली आहे. तसेच तक्रारदार क्र.1 चे पती सदर संस्थेचे चेअरमन होते. सदरची संस्था सन-2004 मध्ये बंद पडलेली आहे. सदरच्या ठेवी ठेवलेला कालावधी पाहता सदर कालावधीत तक्रारदाराने ठेव रक्कमांची का मागणी केलेली नाही. सदर संस्था बंद पडणेस सामनेवाला क्र.1 ते 14 यांना जबाबदार धरता येणार नाही. सबब सदर कालावधीत नमुद कै.नारायणराव मेढे पत संस्थेच्या ठेवी अदा करणेची जबाबदारी सामनेवाला क्र.1 संस्थेवर येत असली तरी सामनेवाला क्र.1 संस्था अथवा तिचे सामनेवाला क्र; 2 ते 14 पदाधिकारी यांना व्यक्तीश: जबाबदार धरता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदार व सामनेवाला यांच्यामध्ये ग्राहक हे नाते निर्माण होते. कारण विलीनीकरण आदेशानुसार नमुद मेढे पत संस्थेच्या ठेवीदार व कर्जदार यांच्या रक्कमा देणे व वसुल करणेची जबाबदारी सामनेवाला क्र.1 यांनी घेतलेली आहे. सदर विलीनकरण आदेशानुसार ठेव रक्कमा देताना 25 टक्के रोखीत व 75 टक्के पावतीच्या स्वरुपात किंवा 100 टक्के पावतीच्या स्वरुपात देणेचे आहे. त्याप्रमाणे सामनेवाला संस्था ठेव रक्कमा अदा करणेस बांधील आहे. सामनेवालांच्या वकीलांनी आपल्या लेखी म्हणणेमध्ये तक्रारदार क्र. 2 ते 6 सज्ञान असलेचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. त्यामुळे तक्रारदार क्र. 2 ते 6 चे वतीने अपाक म्हणून तक्रारदार क्र.1 यांना प्रस्तुतची तक्रार दाखल करणेचा अधिकार नाही असे प्रतिपादन केले आहे. याचा विचार करता नमुद तक्रारदार क्र. 2 यांचे नांवे दि.17/08/1994 रोजी ठेव पावती क्र;317 आकर्षक मुदत ठेव पावती खाते क्र.13 व्दारे रक्कम रु.11,000/- 15 वर्षे मुदतीने ठेवलेले होते. तसेच दि.05/08/1998 व्दारे सदर ठेव पावती क्र.771 व्दारे 22,100/- ठेवलेले होते. दि.17/08/1994 चा विचार करता तक्रार दाखल केली तारखेपर्यंत 03/10/2009 रोजी नमुद तक्रारदाराचे वय 15 वर्षे दोन महिने होते. याचा विचार करता प्रस्तुतचा तक्रारदार सज्ञान झाला असेल तर सदर ठेव ठेवतेवेळी किमान तीन वर्षाचा असेल तसेच अन्य तक्रारदार क्र. 3 ते 6 बाबतही सामनेवालांनी सज्ञानाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. त्याबाबत तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारदार अज्ञान असलेबाबत त्यांचे जन्म दाखले अथवा तत्सम सबळ पुरावा दाखल करणे क्रमप्राप्त होते. व सदर लेखी पुरावा दाखल करणेस तक्रारदारास कोणतीही अडचण नव्हती कारण तक्रारदाराने सदर ठेव रक्कम मुलांचे उच्च शिक्षणासाठी मिळणे गरजेचे असलेचे नमुद केले आहे. सदर तक्रारदारांचा जन्म दाखला अथवा ते शिकत असलेल्या शैक्षणिक संस्था (शाळा किंवा महाविद्यालय) यांचेकडून वयाबाबतचे बोनाफाईड सर्टीफिकेट घेऊन दाखल करु शकले असते. सामनेवालांनी प्रस्तुत तक्रारदार क्र. 2 ते 6 सज्ञान असलेचा मुद्दा दि.26/02/2010 रोजी दाखल केलेल्या लेखी म्हणणेमध्ये उपस्थित केलेला आहे. त्यास तक्रारदाराने अंतिम सुनावणीपर्यंत सामनेवालांचे म्हणणे खोडून काढणेचे दृष्टीने शपथपत्र (रिजॉइन्डर) दाखल करुन सदरची बाब नाकारलेली नाही. सबब अशा वेळी तक्रारदाराने अज्ञान असलेबाबतचा काटेकोर व स्पष्ट असा वयाचा पुरावा देणे क्रमप्राप्त असतानाही तक्रारदाराने तो दिलेला नाही. यावरुन तक्रारदार क्र. 2 ते 6 हे सज्ञान आहेत हे सामनेवालांचे लेखी म्हणणेतील कथन तक्रारदारास मान्य आहे असेच म्हणावे लागेल. सबब तक्रारदार क्र.2 ते 6 हे सज्ञान आहेत असा निष्कर्ष काढणे चुकीचे होणार नाही. सबब तक्रारदार क्र. 2 ते 6 यांचे वतीने तक्रारदार क्र.1 यांना अपाक म्हणून तक्रार दाखल करता येणार नाही. त्यासाठी तक्रारदार क्र.1 हे तक्रारदार क्र.2 ते 6 यांचे वयाबाबत मौन बाळगतात. सबब तक्रारदार क्र. 2 ते 6 हे सज्ञान असलेने व त्यांच्या तक्रार अर्जावर सहया नसलेने तक्रारदार क्र. 2 ते 6 यांचे वतीने तक्रारदार क्र. 1 यानी दाखल केलेली तक्रार विचारात घेता येणार नाही. फक्त तक्रारदार क्र.1 यांचे ठेवीची तक्रार निर्णीत करणेच्या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदार क्र.1 यांचेच ठेवींची तक्रार सदर मंचासमोर चालणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- मुद्दा क्र. 1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदार क्र.1 यांचे नांवे नमुद नारायणराव मेढे पत संस्थेमध्ये ठेव पावती क्र.1425, 1659 या दामदुप्पट ठेव रक्कमेच्या पावत्या असून दि.20/08/2006 व दि.12/10/2008 रोजी मुदत पूर्ण झालेनंतर मिळणारी रक्कम अनुक्रमे रु;20,000/- व रु.30,000/-दिसून येते. तसेच ठेव पावती क्र.1848 मुदत बंद ठेव रक्क्म रु.20,000/- असून सदर ठेवीची मुदत दि.08/07/2007 रोजी संपत असून सदर ठेव दि.08/0/2005 ते 08/07/2007 अशा 24 महिन्याच्या कालावधीसाठी होती व सदर ठेवीची 10 टक्के व्याजदर दिसून येतो. अशा प्रकारे तक्रारदार क्र.1 यांच्या ठेव पावत्या दिसून येतात. सामनेवालांनी आपल्या लेखी म्हणणेमध्ये तक्रारदार क्र. 1 हया जयश्री दिनकर सावंत यांचे कर्जास जामीनदार आहेत व त्यापोटी तक्रारदाराची ठेव पावती क्र.1669 जप्त करुन घेतलेचे नमुद केले आहे. प्रस्तुत ठेवीची मागणी तक्रारदाराने केलेली नाही ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. विलीनीकरण आदेशानुसार नमुद कै.नारायणराव मेढे पत संस्थेच्या ठेवीदारांना वसुली करुन ठेव रक्कमा अदा करणेच्या आहेत. तसेच विलीनीकरणातील अट क्र.3 चा विचार करता सदर ठेवी या 25 टक्के रोख व 75 टक्के ठेवपावतीने किंवा 100 टक्के ठेव पावतीने देणेच्या आहेत. त्याप्रमाणे अशा प्रकारे ठेव रक्कम देणेस सामनेवालांनी कधीही नकार दिलेला नाही. मात्र सदर ठेव रक्कमा व्याजासहीत रोखीत मागितल्याने ते विलीनीकरणाच्या आदेशाविरुध्द आहे असे युक्तीवादाच्या वेळेस सामनेवालांच्या वकीलांनी प्रतिपादन केलेले आहे. सामनेवाला संस्थेने तक्रारदार क्र.1 चे पती कै. नारायणराव मेढे पत संस्थेचे चेअरमन यांच्या मुदत ठेवी तसेच सेव्हींग खातेवरील रक्कम त्याचप्रमाणे तक्रारदार क्र.1 यांचे ठेव पावती क्र.1792, 1765 यावरील रक्कम अदा केलेली आहे व त्यावेळी त्यांना तक्रारदार क्र. 2 ते 6 यांचे रक्कमेच्या दामदुप्पटच्या 7 वर्षे 10 महिन्याच्या मुदतीच्या पावत्या करुन देणेचे ठरले मात्र तक्रारदार क्र. यांनी नमुद तक्रारदार क्र. 2 ते 6 यांना सहीसाठी घेऊन आले नाहीत हे सामनेवालांचे कथन तक्रारदाराने शपथपत्र देऊन खोडून काढलेले नाही. विस्तृत विवेचन व कागदपत्रांचा विचार करता सामनेवाला यांची कोणतीही सेवात्रुटी दिसून येत नाही. मुद्दा क्र.3 :- तक्रारदार क्र.1 यांचीच तक्रार सदर मंचासमोर चालणेस पात्र आहे याचा विचार करता विलीनीकरण आदेशाप्रमाणे सामनेवाला संस्था मुद्दा क्र.2 मधील नमुद ठेव रक्कमा देणेस जबाबदार आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र. 1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता सदर ठेव रक्कमा देणेस सामनेवाला क्र. 1 ते 14 हे व्यक्तीश: जबाबदार नाहीत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब सामनेवाला संस्थेने विलीनीकरणाच्या आदेशाप्रमाणे प्रस्तुत ठेव रक्कमा अदा कराव्यात या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदार क्र. 2 ते 6 हे अज्ञान असलेबाबतचा वयाचा पुरावा तक्रारदाराने समोर आणलेला नाही. तसेच सामनेवालांनी लेखी म्हणणेत नमुद तक्रारदार सज्ञान असलेचा मुद्दा तक्रारदाराने रिजॉइन्डर दाखल करुन खोडून काढलेला नाही. याचा विचार करता नमुद तक्रारदार हे सज्ञान असलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. त्यामुळे तक्रारदार क्र.1 यांनी नमुद तक्रारदारचे वतीने अपाक म्हणून दाखल केलेली तक्रार कायदयाचे दृष्टीकोनातून ग्राहय धरता येणार नाही. कारण तक्रारदार हे अज्ञान आहेत की सज्ञान आहेत हे दाखवून देणेची जबाबदारी व संधी असूनही तक्रारदाराने सबळ कागदोपत्री पुरावा दाखल करुन सिध्द केलेली नाही. सबब सामनेवालांनी तक्रारदार क्र. 2 ते 6 हे सज्ञान असलेचा आक्षेप हे मंच ग्राहय धरत आहे. मुद्दा क्र.4 :- तक्रारदार क्र.1 हे विलीनीकरणाच्या आदेशाप्रमाणे ठेव रक्कमा मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते. 2.सामनेवाला क्र.1 संस्था यांनी विलीनीकरण आदेशाप्रमाणे तक्रारदारास ठेव पावती क्र.1425, 1659 या दामदुप्पट ठेव पावतीवरील दामदुप्पट रक्कम अनुक्रमे रु.20,000/- व रु.30,000/-अदा कराव्यात. तसेच ठेव पावती क्र.1848 मुदत बंद ठेव रक्कम रु.20,000/- अदा करावी. 3. सामनेवाला संस्थेने तक्रारदारास तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.500/- अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |