नि.31
मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य - श्री के.डी.कुबल – रजेवर
मा.सदस्या - श्रीमती वर्षा शिंदे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 1349/2008
तक्रार नोंद तारीख : 05/12/2008
तक्रार दाखल तारीख : 17/12/2008
निकाल तारीख : 10/07/2013
----------------------------------------------
1. श्री जयवंत बाळासाहेब पवार
2. श्री राजेंद्र धनाप्पा जेवूर
3. श्री काशिनाथ गोविंदराव नरहीरे
4. सौ विमल काशिनाथ नरहीरे
5. श्री महेश बाळासाहेब उगाणे
6. श्री बाबासाहेब जोतीराम मोहिते
7. श्री बाळासाहेब यशवंत खोत
सर्व रा. यशवंत अपार्टमेंट, बुधवार पेठ,
पाटील गल्ली, मिरज ....... तक्रारदार
विरुध्द
1. श्री सिदगोंडा आनगोंडा पाटील
2. श्री सदाशिव आनगोंडा पाटील
3. श्रीमती अनुसया आनगोंडा पाटील
सर्व रा. यशवंत अपार्टमेंट, बुधवार पेठ,
पाटील गल्ली, मिरज
4. श्री हेमंत पांडुरंग भोसले
रा.गाडवे प्लॉट, वखार भाग एरिया,
मिरज जि. सांगली ........ सामनेवाला
तक्रारदार तर्फे : अॅड श्री एन.पी.मेडसिंगे
जाबदारक्र.1, 2 तर्फे: अॅड ए.एस.कुडचे
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. सदस्या : श्रीमती वर्षा शिंदे
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने, तक्रारदाराचे नावे फ्लॅटचे खरेदीपत्र होऊनही मिळकत पत्रिकेवर तक्रारदाराचे नाव नोंद होत नाही, तसेच भोगवटा प्रमाणपत्र व बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिलेला नाही, फ्लॅटधारकांची सोसायटी स्थापन केलेली नाही, सुमार दर्जाचे काम केल्याने स्लॅब गळतो, भिंतीत पाणी मुरल्याने त्या ओल्या होवून इमारतीस धोका निर्माण करुन सामनेवालाने सेवेमध्ये त्रुटी ठेवलेने दाखल केली आहे.
सामनेवाला क्र.1 ते 4 यांना नोटीस आदेश झाला. सामनेवाला क्र.1 ते 4 वकीलांमार्फत मे.मंचासमोर उपस्थित राहिले. नि.15 ला सामनेवाला क्र.4 यांनी लेखी म्हणणे दाखल केले. नि.26 वर तक्रारदाराचा लेखी युक्तिवाद दाखल आहे. सामनेवाला क्र.4 यांनी नि.30 वर लेखी युक्तिवाद दाखल केला. तक्रारदार व सामनेवाला क्र.4 यांचा अंतिम युक्तिवाद ऐकणेत आला.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात हकीकत अशी -
तक्रारदार क्र.1 ते 7 हे यशवंत अपार्टमेंट, बुधवार पेठ, पाटील गल्ली, मिरज येथील रहिवासी असून, सामनेवाला क्र.1 ते 3 हे जागामालक व विकसक आहेत. सामनेवाला क्र.4 आर्किटेक्ट आहेत. जिल्हा तुकडी सांगली तालुका पोट तुकडी मिरज पैकी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील मिरज शहरातील बुधवार पेठ भागातील सि.स.नं. 7202, क्षेत्र 150.5 चौ.मी. सि.स.नं. 7203, क्षेत्र 150.5 चौ.मी. या सामनेवाला क्र.1 ते 3 यांच्या मालकीच्या मिळकती एकमेकांस लागून आहेत. सदर मिळकती विकसीत करुन सामनेवाला यांनी यशवंत अपार्टमेंट ही बहुमजली इमारत उभारली. सामनेवाला यांनी सदर इमारतीमधील फ्लॅटची विक्री तक्रारदारांना केली. सदर फ्लॅट तक्रारदारांनी सामनेवालाकडून खरेदी केले. त्याचा तपशील खालीलप्रमाणे -
अ.क्र. |
मालकाचे नाव |
मजला |
फ्लॅट नं. |
क्षेत्र |
खरेदी किंमत |
खरेदी दिनांक |
1 |
जयवंत बाळासाहेब पवार |
पहिला |
एफ-3 |
59.94 |
4,21,000 |
3/8/07 |
2 |
राजेंद्र धानाप्पा जेवूर |
दुसरा |
एफ-8 |
58.29 |
5,00,000 |
23/8/07 |
3 |
बाळासाहेब भूपाल मल्लेवाडे |
पहिला |
एफ-4 |
58.09 |
4,00,000 |
17/5/06 |
4 |
काशिनाथ गोविंद नरहीरे
सौ विमल काशिनाथ नरहीरे |
दुसरा |
एफ-6 |
54.82 |
4,00,000 |
26/6/07 |
5 |
महेश बाळासाहेब उगाणे |
दुसरा |
एफ-9 |
51.57 |
4,00,000 |
17/10/07 |
6 |
बाळासाहेब यशवंत खोत |
पहिला |
एफ-2 |
56.22 |
4,00,000 |
3/7/07 |
7 |
बाबासाहेब जोतिराम मोहिते |
दुसरा |
एफ-7 |
59.94 |
4,00,000 |
|
प्रस्तुत इमारतीचे बांधकाम सामनेवाला क्र.4 यांचे देखरेखीखाली झाले आहे. प्रस्तुत तक्रारदारांनी नोंद खरेदी दस्ताने खरेदी केले आहे. सामनेवाला यांनी ठरलेप्रमाणे बांधकाम साहित्य वापरुन मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे बांधकाम करण्याचे बंधन सामनेवालांवर आहे. तसेच तक्रारदारांची नावे प्रॉपर्टी कार्डास लावणेसाठीची सर्व पूर्तता करण्याचे कायदेशीर दायित्व सामनेवाला यांचेवर आहे. तसेच त्यांनी फ्लॅटधारकांची सोसायटी स्थापन करुन नोंदणी करणेची जबाबदारी पार पाडलेली नाही. त्यामुळे सामाईक सोईसुविधांचा उपभोग घेणे अशक्य झाले आहे.
वर नमूद मिळकतीवर एकत्रितपणे बांधकाम केले आहे, मात्र सि.स.नं. चे एकत्रिकरण करुन घेणे आवश्यक होते. फ्लॅट बुकींगचे वेळी सदर मिळकतीचे एकत्रीकरण 6 महिन्यांत होईल असे सांगितले होते व त्या मिळकतीचा उतारा मिळेल असेही सांगितले होते. मात्र सामनेवालांनी सदर एकत्रीकरण न केलेने तक्रारदारांची नावे मिळकत पत्रिकेवर नोंद झालेली नाहीत. खरेदीपत्राच्या तारखेस फ्लॅटचा कब्जा दिलेला आहे. मात्र बांधकाम पूर्णत्वाचा दाखला व भोगवटा प्रमाणपत्र दिले नाही. याउलट सामनेवालांनी तक्रारदाराची दिशाभूल करुन महानगरपालिका बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न जोडता स्वतःच सही करुन पूर्णत्वाचा दाखला दिला आहे असे भासवून तक्रारदाराची फसवणूक करुन दूषित सेवा दिली आहे.
तक्रारदाराने करारात ठरलेप्रमाणे संपूर्ण रक्कम सामनेवालास अदा केल्या आहेत. मात्र सामनेवाला यांनी ठरलेप्रमाणे बांधकाम साहित्य न वापरता अत्यंत हलक्या दर्जाचे सिमेंट वापरल्याने तक्रारदाराचे फ्लॅटचा स्लॅब गळत आहेत. तसेच पावसाचे पाणी भिंतीत मुरुन भिंती ओल्या झाल्या आहेत. त्यामुळे इमारतीच्या सुरक्षिततेस व अस्तित्वास धोका निर्माण झाला आहे. सामनेवालांनी तक्रारदाराकडून घेतलेल्या रकमेचा हिशोब न ठेवता अपहार केला आहे. त्याचेकडे रकमांचा हिशोब व खातेउतारा मागितला असता त्यास उडवाउडवीची उत्तरे दिली आहे व सदर बाबींची पूर्तता करणेसाठी जादा रु.10,000/- ची मागणी केली आहे.
तक्रारदाराने सारखा तगादा लावल्यानंतर सामनेवालाने दि.15/5/07 ला डिक्लेरेशन दाखल केले आहे. मात्र ते त्यांनी विनंत्या करुनही प्रॉपर्टी कार्डला नोंदवलेली नाही. त्यामुळे तक्रारदारांची नावे प्रॉपर्टी कार्डला नोंद होत नाहीत. सामनेवाला यांनी तक्रारदारांना सदर अपार्टमेंटचे टेरेस समाईक आहे असे सांगून करारपत्रावेळी खरेदी किंमत ठरविली आहे. त्याचा डीड ऑफ डिक्लेरेशनमध्ये उल्लेख असूनही सदर टेरेस समाईक वापरास हरकत घेतली आहे. सदर समाईक वापराचा टेरेस सामनेवालाने भाडयाने रिलायन्स कंपनीला टेलिफोन टॉवर उभारणेसाठी देवून तक्रारदारांची घोर फसवणूक केली आहे. सामनेवालाने दूषित सेवा देवून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे.
वर नमूद अपार्टमेंटमध्ये करारपत्र व डिक्लेरेशनप्रमाणे 71.46 चौ.मी. पार्कींगसाठी जागा सोडणेबाबत स्पष्ट नमूद केले आहे. तथापि प्रत्येक जागेवर 30 चौ.मी. पेक्षाही कमी जागा सोडली आहे. त्यामुळे वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करणे अडचणीचे व गैरसोयीचे झाले असून वाहने रस्त्यावर लावणे भाग पडत आहे. तसेच जिन्यावर कडाप्पा फरशी घालणेचे नमूद केले आहे. मात्र जिन्याच्या टप्प्यावर कडाप्पा फरशी घातलेली नाही. प्रत्येक फ्लॅटमध्ये टॉयलेट युनिटच्यावरती स्लॅब टाकणे आवश्यक होते, मात्र सामनेवालांनी स्लॅब टाकलेला नाही. सामनेवालाने नमूद केलेप्रमाणे अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन दूषित सेवा दिली आहे तसेच सदर मागण्यांबाबत पाठपुरावा केला असता त्यास सामनेवालाने दाद न दिल्याने प्रस्तुतची तक्रार या मंचात दाखल करणे भाग पडले. सबब जाबदार यांचेकडून घडलेल्या सेवेतील त्रुटी दूर होवून मिळाव्यात तसेच सदरच्या त्रुटी या दुरुस्तीपात्र नसून प्रत्येक वर्षी दुरुस्ती करणे गरजेचे असलेने सदरील तक्रारदारांची तक्रार खर्चासह मंजूर करुन त्रुटी दुरुस्तीसाठी नुकसान भरपाईपोटी प्रत्येकी रु.2 लाख, आर्थिक शारिरिक व मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.10,000/- देणेचा सामनेवाला यांना हुकूम व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
3. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीच्या पुष्ठयर्थ नि.5 वरील कागदयादीप्रमाणे यशवंत अपार्टमेंटचे डिक्लेरेशन डीड, महानगरपालिका यांचेकडून प्राप्त खुलासा, वाद मिळकतीचे कलर फोटो अशी एकूण 5 कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. सामनेवाला क्र.1 व 3 यांच्या नोटीस लिफाफे इंटीमेशन देवूनही न स्वीकारलेचे शे-यानीशी परत आले आहेत. मात्र नि.10 ला दि.19/3/09 चे अर्जाने सामनेवाला क्र.1 ते 3 हजर होऊन त्यांनी म्हणणे देण्यास मुदत मागितली. त्यांनी नि.11 वर वकीलपत्र दाखल केले आहे. रोजनाम्याप्रमाणे सामनेवालांविरुध्द दि.21/5/09 रोजी नो से आदेश पारीत झाला आहे. तसेच नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत केला आहे. सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. तसेच कोणताही पुरावा दाखल केलेला नाही तसेच युक्तिवादही केलेला नाही.
5. सामनेवाला क्र.4 वकीलामार्फत हजर होवून त्यांनी नि.30 ला लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्यांचे लेखी म्हणणेनुसार, त्यांनी तक्रारदाराची तक्रार मान्य केले कथनाखेरिज परिच्छेदनिहाय नाकारली आहे. तक्रारदार केव्हाही सामनेवालांचे ग्राहक नव्हते व नाहीत. सामनेवालांनी तक्रारदारास केव्हाही सेवा पुरविलेली नाही. तक्रारदार व सामनेवाला यांचेत कोणताही करार, व्यवहार, देवाणघेवाण झालेली नाही, त्यांचा दुरान्वयेही संबंध आलेला नाही. तक्रारदाराने निष्कारण सामनेवालास पक्षकार केले आहे. सामनेवाला प्रस्तुत प्रकरणी आवश्यक पक्षकार नाहीत. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, मिळकती नं.7202 व 7203 या मिळकतीवर एकत्रित बांधावयाच्या इमारतीचा प्लॅन सामनेवाला क्र.4 ने सामनेवाला क्र. 1 ते 3 यांनी सांगितलेप्रमाणे तयार करुन दिले आहे. सदर प्लॅन काढून महानगरपालिकेकडून ते मंजूर करुन घेणेची जबाबदारी सामनेवालांचेवर होती. त्याप्रमाणे प्लॅन मंजूर करुन दिला आहे.
प्रस्तुत इमारतीचे बांधकाम करणे अगर त्यावर देखरेख ठेवणेची जबाबदारी सामनेवाला क्र.4 वर नव्हती. सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी स्वतःचे जबाबदारीवर सर्व बांधकाम स्वतः आवश्यक ते मटेरिअल आणून बांधले आहे. त्यांनी स्वतः बिल्डर या नात्याने बांधकाम केले आहे. बांधकाम पूर्ण झालेनंतर सामनेवाला क्र.1 ते 3 व त्यांचे खरेदीदार यांनी बांधकामात काही फेरबदल केले असलेस त्याची माहिती सामनेवाला क्र.4 ला नाही. सामनेवाला क्र.4 यांनी तक्रारीत नमूद मिळकतीचा कोणताही भाग विकलेला नाही. त्यामुळे प्रॉपटीसंदर्भात नाव लावणे व त्याअनुषंगिक कोणतीही जबाबदारी सामनेवालावर येत नाही. वर नमूद सि.स.नंबरचे एकत्रित करणेचा हक्क अधिकार केवळ सामनेवाला क्र.1 ते 3 यांना आहे.
सामनेवाला क्र.4 यांनी बांधकाम, देखरेख केलेली नसलेने साहित्य खरेदी करणे, हिशेब देणे इ. चा प्रश्न उद्भवत नाही. सामनेवाला क्र.4 यांनी साईट सुपरवायझर अगर साईट इंजिनिअर अगर बिल्डर म्हणून कोणतीही कृती केली नव्हती, केवळ आर्कीटेक्ट म्हणून काम पाहिले आहे. सामनेवाला क्र.1 ते 3 चे सूचनेप्रमाणे प्लॅन करुन दिला व इमारतीचे स्टील डिझाईन श्रीराम जोशी यांचेकडून सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी करुन घेतले आहे. इमारतीचे बांधकाम सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी केले असलेने त्याअनुषंगिक सर्व जबाबदा-या त्यांचेवर आहेत. प्रॉपर्टी कार्डात तक्रारदाराची नावे दाखल करणे, इमारतीचे डिक्लेरेशन नोंदवणे, याची सर्व जबाबदारी मालक अगर विकसक आणि बिल्डर या नात्याने सामनेवाला क्र.1 ते 3 यांचेवर येते. सबब मान्य केले वस्तुस्थितीखेरिज तक्रारदारांनी सामनेवाला क्र.4 विरुध्द केलेल्या तक्रारी नाकारल्या आहेत. सामनेवाला क्र.4 याने तक्रारदार त्यांचे ग्राहक नाहीत. तक्रारदार क्र.1 ते 7 यांनी यशवंत अपार्टमेंटमधील वेगवेगळया सदनिका घेतल्या आहेत त्यामुळे त्यांनी स्वतंत्र अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. सदर तक्रारदारांनी एकत्रित येवून केलेला अर्ज Misjoinder of necessary parties या तत्वाने बाधीत असल्याने तक्रार चालणेस पात्र नाही. सामनेवाला क्र.4 यांनी व्यवसायात चांगला नावलौकीक मिळविला असल्याने सदर खोटया तक्रारीमुळे त्यांचे नावलौकीकास बाधा निर्माण झाली आहे. त्यामुळे सामनेवालास संबंधीत व्यक्ती व ग्राहकांकडून विचारणा होवू लागली आहे. त्यामुळे तक्रारदाराचा अर्ज खर्चासह नामंजूर करुन तक्रारदाराकडून सामनेवाला क्र.4 यांना प्रत्येकी रु.3,000/- ची कॉम्पेन्सेटरी कॉस्ट देणेबाबत हुकूम व्हावा अशी विनंती सामनेवाला क्र.4 ने केली आहे.
6. सामनेवाला क्र.4 यांनी आपले म्हणणेचे पुष्ठयर्थ नि. 16 ला केवळ शपथपत्र दाखल केले आहे.
7. तक्रारदाराची तक्रार, सामनेवालेचे म्हणणे, उभय पक्षांचा युक्तिवाद व दाखल पुरावे यांचा विचार करता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षाकरिता उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. तक्रारदार हे सामनेवालाचे ग्राहक होतात काय व प्रस्तुत वाद हा
ग्राहकवाद आहे काय ? होय.
2. प्रस्तुत तक्रारीस मिस-जॉइंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्वाचा
बाध येतो काय ? नाही.
3. प्रस्तुतचा तक्रारअर्ज मुदतीत आहे काय ? होय.
4. सामनेवाला यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली होय. सामनेवाला क्र.1
आहे काय ? ते 3 यांनी.
5. तक्रारदारांनी सुमार बांधकामाबाबत केलेल्या मागण्या
मान्य होण्यास ते पात्र आहेत काय ? होय.
6. तक्रारदारांनी मागणी केल्याप्रमाणे रक्कम मिळणेस ते पात्र
आहेत काय ? होय.
7. अंतिम आदेश खालीलप्रमाणे
कारणे
मुद्दा क्र.1
8. सामनेवाला क्र.1 ते 3 हे जागा मालक आहेत. जिल्हा तुकडी सांगली तालुका पोट तुकडी मिरज पैकी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील मिरज शहरातील बुधवार पेठ भागातील सि.स.नं. 7202, क्षेत्र 150.5 चौ.मी. सि.स.नं. 7203, क्षेत्र 150.5 चौ.मी. या सामनेवाला क्र.1 ते 3 यांच्या मालकीच्या मिळकती एकमेकांस लागून आहेत. सदर मिळकत सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी विकसीत केली आहे. त्याचे कुलमुखत्यारपत्र सामनेवाला क्र.2 व 3 यांनी सामनेवाला क्र.1 सिदगोंडा आदगोंडा पाटील यांना दिले आहे. ते नि.5 सोबत दाखल आहे. सामनेवाला क्र.4 हे आर्किटेक्ट असून सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे त्यांनी प्लॅन तयार करुन तो महानगरपालिकेकडून मंजूर करुन घेतला आहे. तसेच इमारतीचे स्टील डिझाईन श्रीराम जोशी यांचेकडून करुन घेतले आहे ही वस्तुस्थिती सामनेवाला क्र.4 ने त्याचे म्हणणेत मान्य केली आहे. तसेच बांधकाम, देखरेख, साहित्य खरेदी, हिशोब यांच्याशी त्याचा दुरान्वयेही संबंध नसलेचे शपथेवर प्रतिपादन केले आहे तर सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी स्वतः जागा मालक विकसक व बांधकाम व्यावसायिक या नात्याने स्वतः बांधकाम, साहित्य खरेदी व अनुषंगिक काम केले आहे. यावरुन तसेच दाखल पुरावे नि.28 वरील दाखल खरेदीपत्रावरुन सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी त्यांचे मिळकती विकसीत करुन यशवंत अपार्टमेंट इमारतीचे बांधकाम करुन तक्रारदारांना सदर इमारतीमधील फ्लॅटची मोबदला रक्कम घेवून तक्रारदार क्र.1 ते 7 यांना फ्लॅटची विक्री केली आहे हे स्ष्ट होते. त्याचा तपशील खालीलप्रमाणे -
अ.क्र. |
मालकाचे नाव |
मजला |
फ्लॅट नं. |
क्षेत्र |
खरेदी किंमत |
खरेदी दिनांक |
1 |
जयवंत बाळासाहेब पवार |
पहिला |
एफ-3 |
59.94 |
4,21,000 |
3/8/07 |
2 |
राजेंद्र धानाप्पा जेवूर |
दुसरा |
एफ-8 |
58.29 |
5,00,000 |
23/8/07 |
3 |
बाळासाहेब भूपाल मल्लेवाडे |
पहिला |
एफ-4 |
58.09 |
4,00,000 |
17/5/06 |
4 |
काशिनाथ गोविंद नरहीरे
सौ विमल काशिनाथ नरहीरे |
दुसरा |
एफ-6 |
54.82 |
4,00,000 |
26/6/07 |
5 |
महेश बाळासाहेब उगाणे |
दुसरा |
एफ-9 |
51.57 |
4,00,000 |
17/10/07 |
6 |
बाळासाहेब यशवंत खोत |
पहिला |
एफ-2 |
56.22 |
4,00,000 |
3/7/07 |
7 |
बाबासाहेब जोतिराम मोहिते |
दुसरा |
एफ-7 |
59.94 |
4,00,000 |
3/7/07 |
तसेच नि.5/2 ला दाखल असलेल्या डिक्लेरेशनवरती मूळ सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी ओनर, डेव्हलपर बिल्डर अशी नोंद केली आहे. तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी व्यवसाय-शेती व सामनेवाला क्र.3 यांनी घरकाम असे नि.1 वर नमूद केले असले तरी सामनेवाला क्र.4 चे शपथेवरील प्रतिपादनानुसार तसेच नि.5/2 वरील डिक्लेरेशननुसार सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी विकसक व बिल्डरची भूमिका बजावलेली दिसते. सामनेवाला क्र.1 ते 3 हे हजर झाले परंतु त्यांनी लेखी म्हणणे व पुरावा दाखल केला नाही. हरकत नोंदविलेली नाही. सबब Opponent No.1 to 3 are stepping in the shoes of Developer/Builder. सबब सामनेवाला क्र.1 ते 3 हे विकसक व बांधकाम व्यावसायिक असलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सामनेवाला क्र.4 यांनी आर्किटेक्ट म्हणून प्रस्तुत इमारतीचा आराखडा केलेला असलेने तक्रारदार त्याचे लाभार्थी असलेने ते सामनेवाला क्र.1 ते 4 यांचे ग्राहक होतात या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
9. तसेच प्रस्तुत वाद हा सुमार दर्जाचे बांधकाम, स्लॅबगळती, भिंतींना ओलावा, जिन्याला कडाप्पा न बसवणे, बांधकाम परीपूर्ती दाखला न देणे, भोगवटा प्रमाणपत्र न देणे, पुरेसे पार्कींग न देणे, मिळकतीचे एकत्रिकरण न करणे इ. कारणास्तव असलेने सदरचा वाद हा ग्राहकवाद होतो या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
मुद्दा क्र.2
10. सामनेवाला क्र.4 याने प्रस्तुत तक्रारीस मिस-जॉइंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्वाचा बाध येत असल्याने प्रस्तुत तक्रार चालणेस पात्र नाही असा आक्षेप घेतलेला आहे. याचा विचार करता, मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता तसेच तक्रारदार क्र. 1 ते 7 हे फ्लॅटधारक ग्राहक असलेने तसेच ते एकाच यशवंत अपार्टमेंटमधील रहिवासी असून त्यांचे तक्रारीत साम्य आहे तसेच मागणीही समान आहे, सामनेवालाही समान व एकच असलेने एकत्रित तक्रार दाखल केली आहे. सामनेवाला क्र.4 यांनी तक्रारदार क्र.1 ते 7 यांनी स्वतंत्र तक्रार दाखल करावयास हवी होती असा आक्षेप घेतला आहे. मात्र ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12क प्रमाणे (to avoid multiplicity of suits) संयुक्त दाद (common relief) मागता येते. याचा विचार करुन तत्कालीन मंचाने प्रस्तुतची तक्रार स्वीकृत करुन घेतलेली आहे. सबब सामनेवाला क्र.4 चा सदरचा आक्षेप हे मंच फेटाळत आहे व प्रस्तुतची तक्रार चालणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
मुद्दा क्र.3
11. मुद्दा क्र.2 मधील तक्त्यातील नोंदीनुसार तक्रारदाराने खरेदीपत्रान्वये खरेदी केलेल्या दिवशीच फ्लॅटचा तक्रारदारांचे कब्जात आहेत. सर्वसाधारणपणे प्रस्तुत फ्लॅट जुलै 2007 मध्ये तक्रारदारांच्या कब्जेत आले व प्रस्तुतची तक्रार दि.5/12/08 रोजी दाखल असून ती दि.17/12/08 रोजी स्वीकृत केली आहे. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार दोन वर्षाचे आत असल्याने मुदतीत आहे तसेच प्रस्तुत तक्रारीस सातत्याने कारण (continuous cause of action) घडत असल्यामुळे प्रस्तुतची तक्रार मुदतीत आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
मुद्दा क्र.4
12. अ. तक्रारदार हे, सामनेवाला क्र.4 हे नमूद अपार्टमेंटचे आर्किटेक्ट लाभार्थी ग्राहक आहेत. मात्र तक्रारदार व सामनेवाला क्र.4 यांचेमध्ये कोणतेही करारमदार झालेले नाहीत. तसेच सामनेवाला क्र.1 ते 3 व सामनेवाला क्र.4 यांच्याबाबत झालेले करारमदारही सदर मंचासमोर आलेले नाहीत. सामनेवाला क्र.4 यांचे शपथेवरील कथनाप्रमाणे त्यांनी केवळ नमूद सि.स.नं.7202 व 7203 या एकत्रित मिळकतीवर बांधावयाच्या यशवंत अपार्टमेंट या इमारतीचा प्लॅन हा सामनेवाला क्र.1 ते 3 यांचे सूचनेप्रमाणे बनविला व तो नमूद महानगरपालिकेकडून मंजूर करुन घेतलेला आहे. तसेच नमूद इमारतीचे स्टील डिझाईन श्रीराम जोशी यांचेकडून बनवून घेतल्याचे प्रतिपादन केले आहे. इतक्यापुरताच सामनेवाला क्र.4 यांचा संबंध दिसून येतो. सामनेवाला क्र.4 यांनी नमूद अपार्टमेंटचे बांधकाम, त्यावर देखरेख व त्याअनुषंगिक बांधकाम व्यावसायिक म्हणून कार्य केलेबाबतचा कोणताही ठोस पुरावा तक्रारदाराने मे.मंचासमोर दाखल केलेला नाही. तसेच इमारतीचे आराखडयात सामनेवाला क्र.4 ने काही दोष निर्माण केला असल्याचेही निदर्शनास आलेले नाही त्यामुळे सामनेवाला क्र.4 यांचेविरुध्दचे तक्रारदारांचे सदर बांधकाम अनुषंगाने सेवेत त्रुटी ठेवलेबाबतचे कथन हे मंच ग्राहय धरु शकत नाही. सबब सामनेवाला क्र.4 यांना सेवेतील त्रुटीबाबत जबाबदार धरता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
सामनेवाला क्र.1 ते 3 नि. 10 च्या अर्जाने व नि.11 चे वकीलपत्राने हजर झालेले आहेत. दि.21/5/2009 रोजी नो से व एकतर्फा आदेश नि.1 वर त्यांचेविरुध्द तत्कालीन मंचाने पारीत केला आहे. वस्तुतः सामनेवाला क्र. 1 ते 3 यांनी हजर होवून तक्रारदाराची तक्रार पुराव्यानिशी खोडून काढण्याची त्यांना पुरेपूर संधी असतानाही केवळ अर्ज व वकीलपत्र दाखल करणेव्यतिरिक्त इतर तारखांना सातत्याने गैरहजर राहिले आहेत. यावरुन सामनेवाला क्र.1 ते 3 यांना तक्रारदाराची तक्रार मान्य आहे असा निष्कर्ष काढणे चुकीचे होणार नाही. सबब सामनेवाला क्र.1 ते 3 यांना तक्रारदारांची तक्रार मान्य आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
ब. सामनेवाला क्र. 1 ते 3 यांनी सि.स.नं. 7202 व 7203 या मिळकतीवर एकत्रितरित्या प्लॅन मंजूर करुन अपार्टमेंट बांधकाम केले आहे. प्रस्तुत बांधकामाचे प्रारंभ प्रमाणपत्र दि.4/1/2006 रोजी घेतलेले आहे. मात्र सदर मिळकतीचे एकत्रीकरण करुन घेतलेले नाही. तशी नोंद मिळकतपत्रिकेवर केली नसलेने तक्रारदारांची नि.28 प्रमाणे खरेदीखते होऊनही मिळकतपत्रिकेत त्यांची मालक म्हणून नोद होत नाही ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. सबब तक्रारदारास आश्वासित केलेप्रमाणे सामनेवाला यांनी सदर मिळकतीचे एकत्रिकरण न करता खरेदीखत करुन दिलेने सेवात्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
क. सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी सदर खरेदीखत करतेवेळी बांधकाम परिपूर्ती/पूर्णत्वाचा दाखला भोगवटा प्रमाणपत्र दिलेले नाही तर स्वतःचे सहीने बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देवून तक्रारदारांची दिशाभूल केलेचे नि.28 वरील खरेदीपत्र पान 8 वरती प्रस्तुत बांधकाम पूर्ण करुन फ्लॅटचा कब्जा तक्रारदारांचे ताब्यात देण्याबाबतची नोंद केली आहे. मात्र महानगरपालिकेचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला/प्रमाणपत्र सदर खरेदीपत्रास न जोडून तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे.
ड. सामनेवाला क्र. 1 ते 3 यांनी नमूद अपार्टमेंटमधील फ्लॅटची विक्री केली आहे. नि.5/2 डिड ऑफ डिक्लेरेशनच्या कागदपत्रांमध्ये Exh-B यशवंत अपार्टमेंटच्या सोसायटीचे बायलॉज दाखल आहेत. सदर कागद डीड ऑफ डिक्लेरेशनसोबत जोडलेली आहेत. मात्र सदर अपार्टमेंटमधील फ्लॅटधारकांची सोसायटीचे नोंदणी प्रमाणपत्र करुन दिलेले नाही ही सामनेवालाचे सेवेतील त्रुटी आहे.
इ. नि. 5/2 वरील मरज 1870/44/48 चे अवलोकन केले असता प्लॅनवर 5965 x 10830 या मापाचे पार्कींग क्षेत्र नोंदविलेले दिसते. तसेच मरज 1870/3/48 मधील पान 4 वरील 4 थ्या कलमामध्ये Area admeasuring under parking built up 71.46 Sq.Mts. constituted general and common area and facilities अशी नोंद आहे. मात्र तक्रारदारास देण्यात आलेले क्षेत्र हे 30 चौ.मी.पेक्षाही कमी आहे. वाहन बाहेर लावावे लागते त्यामुळे वाहनाची सुरक्षितता राहिलेली नाही, या शपथेवरील कथनाचा विचार करता सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी प्लॅनप्रमाणे धारकाला पार्कींग जागा न देवून सेवेत त्रुटी केली आहे.
फ. सामनेवाला क्र. 1 ते 3 यांनी सुमार बांधकाम (substandard Construction) केले आहे. यामध्ये तक्रारदारांच्या फ्लॅटच्या स्लॅबला गळती आहे, तसेच भिंतीत पाणी मुरुन ओल धरलेली आहे, टॉयलेटच्या वर स्लॅब टाकलेला नाही, जिन्यांच्या टप्प्यावर कडाप्पा फरशी बसविलेली नाही, इ. बांधकामाच्या त्रुटींबाबत व दर्जाबाबत तक्रार केलेली आहे. नि.5/3 तसेच नि.28 वर दाखल फोटो, फोटोग्राफरचे बिलाची पावती दाखल केलेली आहे. तसेच नि.24 चे फेरिस्तसोबत तक्रारदाराने श्री सुनिल सातपुते, Consultant Architect, Interior Designer and Valuer यांचा अहवाल दाखल केला आहे. सदरचे अहवालामध्ये श्री सातपुते यांनी खालील त्रुटींचा उल्लेख केला आहे.
1. The brick masonry walls and plastering has found cracks.
2. Doors of W.C. and bathrooms are decayed.
3. Ceramic tiles of flooring broken and found cracks.
4. Leakages are found in R.C.C. slabs.
5. Sanitary pipes are found leakages.
As per my knowledge and experience, the construction of above mentioned apartment is unsatisfactory.
तक्रारदारांनी दाखल केलेले नि. 5/3 व 28 वरील फोटो व नि.24 वरील अहवाल यावरुन स्लॅबला गळती असलेचे तसेच भिंतीमध्ये ओल असलेचे स्पष्ट निदर्शनास येते. नि.5/2 वरील डिक्लेरेशनमधील क्लॉज 15 मधील स्पेसिफिकेशन अनुक्रमांक 24 वर टॉयलेटच्या वर स्लॅब टाकणेबाबत स्पष्टपणे नमूद केले आहे. तसेच प्रस्तुत क्लॉज 15 मधील स्पेसिफिकेशन अनुक्रमांक 11 वर जिन्याच्या टप्प्यावर (पाय-या) कडाप्पा फरशी बसविणेबाबत स्पष्टपणे नमूद केले आहे. मात्र सामनेवाला याने अशी वस्तुस्थिती असतानाही टॉयलेटच्या वरती स्लॅब टाकला नाही, तसेच जिन्याच्या टप्प्यांवर कडाप्पाच्या फरशा बसविलेल्या नाहीत, तसेच सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी हजर होवूनही म्हणणे दाखल करुन तक्रारदाराची सदर तक्रार खोडून काढलेली नाही. तक्रारदारांनी सदर बाबी शपथेवर कथन केल्या आहेत, त्यामुळे सामनेवाला याने सदर बांधकामाच्या सोईसुविधा देण्यामध्ये कसूर केली आहे यास पुष्टी मिळते.
ग. तक्रारदाराने सदर अपार्टमेंटचा टेरेस हा समाईक वापराचा असल्याचे कथन केलेले आहे. नि.5/2 वर दाखल डिक्लेरेशनमधील Chapter VI Clause 7 Regarding the amenities in building, staircase, terrace and electric connections of the building shall be common. या तरतुदीचा विचार करता तक्रारदारांचे या कथनास पुष्टी मिळते मात्र सामनेवाला याने टेरेस वापरण्यास दिलेला नाही याउलट रिलायन्स कंपनीला टॉवर उभारणीसाठी प्रस्तुतचा टेरेस भाडयाने दिल्याचे कथन केले आहे. युक्तिवादाचे वेळेस नमूद टॉवर उभारणीसाठी टेरेसवरती बीम व इतर अनुषंगिक बांधकाम केले आहे व सदर बांधकाम फोडाफोडी करुन काढणे अशक्य आहे ते काढण्याचे झाले तर बिल्डींगला धोका पोचण्याची शक्यता आहे असे निवेदन केले आहे, याचा विचार करता तक्रारदाराने नि.5/1ए खाली प्रस्तुत टेरेस उभारणीसाठी वर नमूद अपार्टमेंटवर टॉवरला परवाना न देण्याबाबत माहिती अधिकाराखाली अर्ज दिलेला होता. त्यास दि.1/9/2008 अन्वये सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने तक्रारदारांना दि.15/8/08 चे अर्जास माहिती अधिकारात उत्तर दिलेले आहे. सदर उत्तरामध्ये नमूद मिळकतीमध्ये टॉवर उभारणेसाठी बांधकाम परवाना अपेक्षिलेची नोंद आढळून येत नाही. त्यामुळे परवानगी देणेबाबत कार्यवाही करण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे नमूद केले आहे. नि.28 सोबत दाखल केलेल्या फोटोचे अवलोकन केले असता टेरेसवरती तोडफोड झाल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येते. तसेच प्रस्तुत माहिती अधिकारात अर्ज दिल्यामुळेच नमूद टॉवर उभारला गेला नाही मात्र त्यामध्ये टेरेसचे नुकसान झाले आहे व अनुषंगाने संपूर्ण इमारतीस धोका निर्माण झाला आहे. तक्रारदारांच्या या कथनास प्रस्तुत पुराव्यामुळे पुष्टी मिळते. सबब तक्रारदार हे नमूद इमारतीमध्ये फ्लॅटधारक असूनही व सदर टेरेस हा समाईक वापरासाठी असूनही त्यांना मज्जाव करुन रिलायन्ससारख्या कंपनीला सदर टेरेस टॉवरसाठी भाडयाने देणे हे सामनेवाला यांच्या सेवेतील गंभीर त्रुटी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
ह. सामनेवाला याने सुमार दर्जाचे बांधकाम केले आहे तसेच तक्रारदारांना हिशेब दिलेला नाही, असे कथन केले आहे याचा विचार करता खरेदीपत्राप्रमाणे मोबदला स्वीकारुन सामनेवाला याने तक्रारदारांना खरेदीच्या दिवशीच फ्लॅटचा कब्जा दिलेला आहे. बांधकाम साहित्य खरेदी करणे, बांधकाम साहित्य व इतर अनुषंगिक खरेदी हा सामनेवालांचा व्यावसायिक प्रश्न आहे त्यांचा व्यावसायिक आर्थिक बाबींचा हिशोब तक्रारदारांना मागता येणार नाही. तक्रारदाराकडून मोबदला घेवून द्यावयाच्या सुविधांमध्ये ज्या त्रुटी केलेल्या आहेत, त्या त्रुटी दूर करुन मागण्याचा अधिकार निश्चितच तक्रारदारांना आहे. तसेच प्रस्तुत त्रुटी सामनेवालाने दूर न केल्यास सदर त्रुटी दूर करण्यासाठी येणारा अंदाजित खर्च मागण्याचा सुध्दा अधिकार तक्रारदारांना आहे. याचा विचार करता व्यावसायिक हिशोबाची केलेली तक्रारदारांची मागणी हे मंच ग्राहय धरु शकत नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मात्र वर नमूद त्रुटी दुर करुन घेण्याचा त्यांचा अधिकार मान्य करण्यात येतो तसेच सदर त्रुटी सामनेवालाने दूर न केल्यास त्यासाठी येणा-या अंदाजित खर्चांच्या रकमा मागण्याचा अधिकार तक्रारदारांना येतो या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
वरील संपूर्ण सेवात्रुटीसाठी सामनेवाला क्र.1 ते 3 यांना वैयक्तिक व संयुक्तरित्या जबाबदार धरण्यात येत आहे.
मुद्दा क्र.5
13. मुद्दा क्र.4 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता सामनेवाला याने सुमार दर्जाचे बांधकाम केल्यामुळे सदर बांधकामात झालेल्या उणिवा दूर करणेबाबतची मागणी तसेच सदर उणिवा दूर न झाल्यास त्या दूर करणेसाठी येणा-या अंदाजित खर्चाची मागणी मान्य करण्याच्या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
अ. सामनेवाला यांनी सि.स.नं.7202 व 7203 या मिळकतींचे एकत्रिकरण करावे व तशा नोंदी मिळकत पत्रकी करुन तक्रारदारांची नावे सदर मिळकत पत्रकावर नोंद करुन द्यावीत. त्यास लागणारे अपेक्षित सहकार्य तक्रारदारांनी सामनेवाला यांना करावे.
ब. सामनेवाला यांनी तक्रारदारांना सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला व भोगवटा प्रमाणपत्र द्यावे.
क. सामनेवाला याने तक्रारदारांची सोसायटी स्थापन करुन त्याची नोंदणी करुन द्यावी.
ड. डिक्लेरेशनमध्ये नमूद केलेप्रमाणे तक्रारदारांना पार्कींगचे क्षेत्र उपलब्ध करुन द्यावे.
इ. सामनेवाला यांनी तक्रारदारांनी सुमार बांधकामाबाबत तक्रारीमध्ये केलेल्या मागण्यांची खालीलप्रमाणे पूर्तता करुन द्यावी.
1. स्लॅबची गळती काढून द्यावी.
2. भिंतीत पाणी मुरुन ओलावा आलेला आहे सबब, सदर भिंतींचा ओलावा कायमस्वरुपी
काढून टाकण्यासाठी चांगल्या प्रकारचे गिलावा (plastering) करुन द्यावे.
3. जिन्याच्या टप्प्यांवर कडाप्पा फरशी बसवून द्यावी.
4. टॉयलेटच्या वरती लॉफ्ट-वजा-स्लॅब घालून द्यावा.
फ. तक्रारदारांना समाईकात टेरेस वापरण्यास उपलब्ध करावा. त्यांना कोणत्याही प्रकारे मज्जाव करु नये. तसेच टेरेसवर झालेली तोडफोड अथवा अनावश्यक बांधकाम काढून टेरेस इमारतीस धोका न पोचता सुस्थितीत करुन द्यावा.
वरीलप्रमाणे अ ते फ मधील त्रुटी सामनेवाला याने दूर करुन द्याव्यात या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
मुद्दा क्र.6
14. अ. तक्रारदाराने त्याचे तक्रारीतील विनंती कलम 7 अ मध्ये सदर त्रुटी दुरुस्तीपात्र नसून प्रत्येक वर्षी दुरुस्ती करणे गरजेचे असल्यामुळे तक्रारदाराने नुकसान भरपाईपोटी रु. 2 लाखची मागणी केली आहे मात्र त्यासंदर्भात कोणतेही एस्टिमेट दिलेले नाही त्यामुळे तक्रारदाराची सदरची मागणी तंतोतंत मान्य करता येणार नाही. मात्र कलम 5 मधील अ ते फ या उणिवा सामनेवाला याने दूर न केल्यास सदर उणिवा दूर करण्यासाठी येणारा तत्कालीन वाजवी खर्च सामनेवाला याने तक्रारदारांना देणेचा आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
ब. सामनेवाला याने सेवेत गंभीर त्रुटी केल्यामुळे तक्रारदारांना मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासास सामोरे जावे लागले याचा विचार करता प्रत्येक तक्रारदारास प्रत्येकी रु.20,000/- अदा करावेत. तसेच तक्रारीच्या खर्चापोटी प्रत्येक तक्रारदारास प्रत्येकी रु.2,000/- अदा करावेत.
प्रस्तुत सेवात्रुटीसाठी सामनेवाला क्र.1 ते 3 हे वैयक्तिक व सुंयुक्तरित्या जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदारांची तक्रार खर्चासह मंजूर करणेत येत आहेत.
2. तक्रारदार यांना सामनेवाला नं.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या निष्कर्षातील नमूद मुद्दा क्र.5 मधील अ ते फ मधील त्रुटींची पूर्तता करुन द्यावी. सदर पूर्तता न केल्यास कलम 6अ प्रमाणे खर्चाची रक्कम तक्रारदारांना अदा करावी.
3. तक्रारदार यांना सामनेवाला नं.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या निष्कर्षातील नमूद मुद्दा क्र.6ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे आर्थिक, शारिरिक, मानसिक त्रासापोटी रु.20,000/- प्रत्येकी व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- प्रत्येकी अदा करावेत.
4. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार नं.1 ते 3 यांनी या आदेशाच्या तारखेपासून 45 दिवसांत करणेची आहे.
5. जाबदार यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. 10/07/2013
( वर्षा शिंदे ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या अध्यक्ष