Exh.No.53
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र.07/2014
तक्रार दाखल झाल्याचा दि. 25/02/2014
तक्रार निकाल झाल्याचा दि.20/08/2015
श्री. किरण सुभाष भांडारकर
वय सुमारे 52 वर्षे, धंदा – नोकरी,
सौ.स्नेहा किरण भांडारकर
वय 48 वर्षे, धंदा – घरकाम,
दोन्ही रा. संगिता रेसिडेन्सी,
फ्लॅट नं.1 व 2 तळमजला,
न्यु खासकिलवाडा, सावंतवाडी,
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
पिन – 416 510 ... तक्रारदार
विरुध्द
1) श्री संजिव गौरीशंकर प्रधान
वय 62 वर्षे, धंदा – बिल्डर व विकासक,
रा.साईदर्शन अपार्टमेंट, सी - 8,
सबनिसवाडा, सावंतवाडी,
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
2) श्रीम.प्रमिला ज्ञानदेव रावराणे
वय 68 वर्षे, धंदा – घरकाम,
रा.11/52, इचलकरंजी, ता.हातकणंगले,
जि. कोल्हापुर.
3) श्री अमोल दत्ताराम जामदार
वय 52 वर्षे, धंदा – ठेकेदार
रा.हॅपी व्हॅली, बिल्डिंग नं.19/201,
टिकू जिनी वाडी रोड, मानपाडा ठाणे,
अ.नं.1 हे स्वतःकरीता व
अ.नं.2 व 3 करीता कुलअखत्यारी ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्यक्ष
2) श्रीमती वफा ज. खान, सदस्या.
तक्रारदारतर्फे वकील श्री अमित सुकी
विरुद्ध पक्ष क्र.1 तर्फे वकील श्री जावेद एम.सय्यद.
निकालपत्र
(दि.20/08/2015)
द्वारा : श्री कमलाकांत धर्माजी कुबल, प्रभारी अध्यक्ष
1) प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने विरुध्द पक्षाविरोधी दाखल केली असून विहीत मुदतीत बांधकाम पूर्ण न करता रितसर ताबा दिला नाही, तसेच साठेकरारातील व बंधनाम्यातील अटी-शर्ती पूर्ण केल्या नाहीत म्हणून मंचासमोर दाखल केली आहे.
2) सदर तक्रारीचा थोडक्यात तपशील असा -
तक्रारदार न्यु खासकिलवाडा, सावंतवाडी येथील रहिवाशी आहेत. गाव मौजे चराठे (म्युनिसिपल हद्द सावंतवाडी) स.नं.31 अ हिस्सा नं.16/3 क्षेत्र 0-02-55 पो.ख.0-00-57 आकार 0-01 पै. सिटी सर्व्हे नं.4299 या वर्णनाची मिळकत विरुध्द पक्ष क्र.2 व 3 यांच्या मालकीची असून त्यात बांधलेल्या ‘संगीता रेसिडन्सी’ ही इमारत व तळमजल्यावरील सदनिका क्र.1 व 2 संदर्भात प्रस्तुत तक्रार आहे. सदर मिळकत विरुध्द पक्ष क्र.2 व 3 यांच्या प्रत्यक्ष मालकी व कब्जाभोग्याची असल्याने त्यांनी ती मिळकत विकसित करण्याच्या दृष्टीने विरुध्द पक्ष क्र.1 ला संगीता रेसिडन्सी नावाची तळमजला अधिक दोन मजले इमारत बांधून त्या इमारतीमध्ये सदनिका विकण्याची योजना केली. बांधकाम योजनेसाठी उप विभागीय अधिकारी, सावंतवाडी यांजकडून बिनशेती परवानगी मिळवून जुलै 2010 पासून इमारतीच्या बांधकामास सुरुवात केली. तक्रारदाराला सदनिका खरेदी करावयाची असल्याने विरुध्द पक्षाकडून सदनिका क्र.1 ज्याचे बिल्टअप क्षेत्र 410 चौ.फुट (47.40 चौ.मी.) कार्पेट क्षेत्र 353 चौ.फुट (32.80 चौ.मी.) याप्रमाणे दोन्ही सदनिका एकूण रक्कम रु.11,10,000/- एवढया रक्कमेस विकत घेण्याचे मान्य केल्यावरुन विरुध्द पक्ष यांनी दि.16/11/2010 रोजी दस्त क्र.1922/2010 ने साठेखत लिहून दिले. सदरच्या साठेखतात कबुल केल्याप्रमाणे आजपर्यंत तक्रारदार यांनी वेळोवेळी सदनिकेच्या मोबदल्याच्या रक्कमेपैकी 95% रक्कम विरुध्द पक्ष क्र.1 यांना अदा केलेली आहे. साठेखतात कबुल केल्याप्रमाण्ो साठेखताच्या तारखेपासून 12 महिन्यात सदनिकेचे सर्व काम पूर्ण करुन रितसर ताबा तक्रारदार यांना देण्याचे मान्य केले होते. मात्र विरुध्द पक्षाने कबुल केल्याप्रमाणे विहीत मुदतीत सदनिकेचे बांधकाम पूर्ण केलेले नाही व 38 महिने उलटून गेले तरी तक्रारविषयक इमारतीतील वादातीत सदनिकेचे बांधकाम अपूर्णच होते; त्यामुळे तक्रारदाराला विरुध्द पक्षाकडून रितसर ताबा मिळालेला नाही. नोव्हेंबर 2011 पासून ताबा आज देतो उद्या देतो असे सांगून काम पूर्ण करण्यास विरुध्द पक्ष टाळाटाळ करु लागले. त्या कालावधीत तक्रारदार भाडयाच्या खोलीत रहात होते. त्यानंतर विरुध्द पक्ष 1 ची पत्नी विरुध्द पक्ष 1 च्या आजारपणाचे कारण सांगून तक्रारदाराबरोबर उर्मटपणे वागू लागली. काही कालावधीनंतर विरुध्द पक्ष क्र.1 यांनी दि.31/5/2013 रोजी बंधनामा लिहून दिला व बंधनाम्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत शिल्लक व अपुरी राहिलेली सदनिकेच्या आतील व बाहेरील कामे पूर्ण करुन देतो असे मान्य केले होते. सदर सदनिकेचा रितसर ताबा न दिल्याने तक्रारदार यांनी त्यांचे विधिज्ञांमार्फत विरुध्द पक्षाला दि.19/9/2013 रोजी नोटीस दिली. त्याला विरुध्द पक्षाने उत्तर देतांना शिल्लक 5% रक्कमेची मागणी केली व सदरची रक्कम न दिल्यास साठेखत रद्द करण्याची धमकी दिली. त्या नोटीशीस तक्रारदाराने पुन्हा दि.17/10/2013 रोजी विधिज्ञांमार्फत उत्तर दिले व सदनिकेची जी जी कामे अपूर्ण आहेत ती 15 दिवसांत पूर्ण करण्यासंबंधाने कळविले. तथापि अदयाप खाली नमुद कामे विरुध्द पक्षाने पूर्ण केलेली नाहीत.
i) सदनिकेच्या बाथरुमचे व टॉयलेटच्या खिडक्यांचे स्लायडिंगचे व दरवाजाचे काम अपूर्ण आहे. मास्टर बेडरुममधील खिडकीला स्लायडिंग व काचा बसविलेल्या नाहीत.
ii) सदनिकेच्या खिडक्यांचे स्लायडिंग लॉक हे कन्सिलचे न बसवता मारुती लॉक बसविले तसेच स्लायडिंग पट्टयांना स्क्रु घट्ट व निट न बसविल्यामुळे स्लायडिंग गॅप दिसते.
iii) सदनिकेची बाल्कनी अरुंद असून बाल्कनीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रील व सेफ्टी डोअर बसविलेला नाही.
iv) पावसाळयात टेरेसच्या आऊटलेट पाईपचे सर्व पाणी सदनिकेच्या मुख्य दरवाजाच्या सज्जावर पडते. त्यामुळे दरवाजा फुगतो व नीट बंद होत नाही.
v) प्लंबिंगचे काम दर्जेदार न केल्याने पाण्याची गळती होऊन भिंतीना ओल येते.
vi) तळमजल्यावरील पाण्याच्या साठवणूकीची टाकी व गच्चीवरील टाकी या ठिकाणचे नळजोडणीचे काम अपूरे आहे, टाक्या झाकल्या नसल्याने आरोग्याला अपायकारक आहेत.
vii) पंपरुम बांधलेला नाही, पंपाची इलेक्ट्रीक फिटिंग केलेली नाही
viii) इमारतीच्या बाहेरील मोकळया जागेत सपाटीकरण केलेले नाही व सिमेंटचा कोबा केलेला नसल्याने इमारतीभोवती पाणी साठते.
ix) इमारतीच्या चतुःसिमा निश्चित केलेल्या नसून कंपाउंड वॉल घातलेली नाही.
x) खिडक्यांना ग्रील मार्बलचे बॉर्डरिंग करण्याचे कबुल करुन कडाप्पाचे बॉर्डरिंग बसविण्यात आलेले आहे. इमारतीच्या प्रथमदर्शनी जिन्याला कठडा नाही, किचन, बाथरुम, टॉयलेट येथे बसविलेल्या टाईल्स सुमार दर्जाच्या असून, लाकूड काम निकृष्ट दर्जाचे आहे.
xi) टेरेस बेकायदेशीरपणे विरुध्द पक्ष नं.3 च्या ताब्यात दिलेली आहे. सदर नमूद त्रुटी विरुध्द पक्षाकडून दूर होऊन मिळणेबाबत तक्रारदाराने मंचाला विनंती केलेली आहे.
3) विरुध्द पक्ष यांनी तक्रारविषयक इमारतीचा नगरपालिकेकडील पूर्णत्वाचा दाखला (completion certificate) मिळवून घेऊन तक्रारदाराच्या तक्रारविषयक सदनिकांचा रितसर ताबा देवविण्यात यावा व अंतीम खरेदीखत पूर्ण करुन मिळावे अशी विनंती केलेली आहे. तक्रारदार हे विरुध्द पक्षाला उर्वरीत देय रक्कम सदनिकांचा रितसर ताबा देतेवेळी देणेस तयार आहेत असेही कथन केलेले आहे.
4) तक्रारदाराने आपल्या तक्रारीत शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाईची रक्कम रु.2,50,000/-, नोव्हेंबर 2011 ते मे 2013 पर्यंत अन्यत्र भाडयाच्या जागेत राहत होते, त्याबद्दल भाडयापोटी रु.45,000/-, तक्रारीचा खर्च रु.10,000/- विरुध्द पक्ष यांचेकडून वसुल होऊन मिळावा अशी मंचाकडे मागणी केलेली आहे.
5) तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ नि.4 वर एकूण 14 कागदपत्रे तसेच नि.34 वर 10 फोटोग्राफ्स दाखल केलेले आहेत. तक्रारदारतर्फे सुरेश भिमराव भोसले त्याच इमारतीतील सदनिकाधारक यांचे काम अपूर्ण असल्याबाबतचे शपथपत्र (नि.30) दाखल केलेले आहे.
6) विरुध्द पक्ष 1 ते 3 यांना नोटीस प्राप्त होऊनही दि.23/4/2014 पर्यंत हजर राहिले नव्हते. त्यामुळे विरुध्द पक्ष 1 ते 3 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत केला. विरुध्द पक्ष 1 हे आजारपणाच्या कारणाने उशीराने दि.24/09/2014 रोजी हजर होऊन त्यांनी नि.19 वर त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले ते न्यायहितार्थ स्वीकारण्यात आले.
7) नि.19 वर विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी त्यांचे लेखी म्हणणे सादर केलेले असून तक्रारदाराची तक्रार खोटी व खोडसाळ असल्याचे नमूद केले आहे. मात्र सदनिका खरेदी विक्रीचा व्यवहार झाल्याचे मान्य केले आहे. साठेखतातील अटी व शर्तीप्रमाणे विरुध्द पक्ष 1 यांना देय असलेल्या एकूण रक्कमेपैकी 5% रक्कम रु.55,000/- तक्रारदार यांनी दिलेली नाही. साठेखतातील नमूद सर्व बांधकामे पूर्ण केलेली असून विरुध्द पक्ष 1 हे डायबेटीस, हायपरटेंशन, हार्ट ट्रबल, पार्कीसन्स याने आजारी असल्याने ते मानसिकदृष्टया अपंग आहेत. त्यांना चालणे फिरणे शक्य नाही त्यामुळे सदनिकेच्या बांधकामाला उशीर झाला. तरीसुध्दा आवश्यक असणा-या सर्व सुखसोयी विरुध्द पक्ष 1 ने पूर्ण केलेल्या आहेत. सदर इमारतीच्या पूर्णत्वाकरीता विरुध्द पक्ष 1 यांनी नगरपालिका, सावंतवाडी याजकडे अर्ज केलेला आहे. परंतु सदरील पूर्णत्वाचा दाखला मिळू नये यासाठी तक्रारदार यांनी नगरपरिषदेकडे खोटया व खोडसाळ तक्रारी करुन नगरपालिकेच्या अधिका-यावर दबाव टाकीत आहेत. त्यामुळे सदर दाखला मिळणेस उशीर होत आहे असे कथन केले आहे.
8) तक्रारदाराने विरुध्द पक्ष नं.1 यांना मानसिक व शारीरिक त्रासात टाकलेबद्दल रु.1 लाख मिळावेत व खर्चासहीत तक्रार फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे.
9) आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ नि.26 वर एकूण 5 कागदपत्रे, नि.35 वर मुख्याधिकारी, नगरपरिषद सावंतवाडी यांचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, आरोग्य विभागाचा ना हरकत दाखला व नि.52 वर वैदयकीय सर्टीफिकेटस/बीले इ. एकूण 8 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. नि.20 वर प्रकृती अस्वास्थ्यामुळे सदर केसचे कामकाज पहाणेसाठी कुलमुखत्यार म्हणून आपल्या पत्नीला निर्देशीत केले आहे.
10) प्रकरणातील दोन्ही बाजुंच्या कागदोपत्री पुराव्यांचा व शपथपत्राचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत येत आहे.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार हा विरुध्द पक्ष यांचा ग्राहक आहे काय ? | होय. |
2 | विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेत त्रुटी निर्माण केली आहे काय ? | अंशतः होय.. |
3 | आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
-–
11) मुद्दा क्रमांक 1 – तक्रारदार व विरुध्द पक्ष यांच्यामध्ये खरेदी विक्रीसंदर्भात नि.4/1 वर साठेकरार आहे. त्याला अनुसरुन सदनिकेच्या मुल्याच्या रक्कमा पोच केल्याच्या पावत्या दाखल करण्यात आलेल्या आहेत. व सदर रक्कम स्वीकारल्याचे विरुध्द पक्षाने मान्य केलेले आहे. त्या दोहोंमध्ये विक्रेता-ग्राहक नाते निर्माण झाल्याचे प्रत्यही दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहेत.
12) मुद्दा क्रमांक 2 - साठेकरारातील अटीप्रमाणे 12 महिन्यात व बंदनाम्यातील अटीप्रमाणे 15 दिवसांत उर्वरीत बांधकाम पूर्ण करुन देऊ असे असे विरुध्द पक्ष 1 ने लेखी लिहून दिलेले आहे. त्याप्रमाणे विरुध्द पक्षाच्या म्हणण्यानुसार त्याने ते पूर्ण केलेले आहे. विरुध्द पक्ष 1 हे प्रकृती अस्वास्थामुळे विहित मुदतीत काम करु शकलेले नाहीत. त्याची कारणमिमांसा करतांना मंचासमोर विरुध्द पक्ष 1 त्याही अवस्थेत हजर राहिलेले होते व आपले मेडिकलचे दाखले दाखल केले. त्यामुळे मंचाची खात्री पटली की, पार्कीसन्ससारख्या दुर्दम्य आजारामुळेच विरुध्द पक्ष 1 सदनिकेमधील बांधकाम विहित मुदतीत पूर्ण करु शकलेले नाहीत. दुसरा मुद्दा असा की, तक्रारदार हे सदर सदनिकेमध्ये गेली दिडवर्षे वास्तव्यास आहेत हे नगरपरिषदेच्या कागदोपत्री पुराव्यावरुन दिसून येते. त्यामुळे एखादया सदनिकेत वास्तव्य असले की छोटया मोठया दुरुस्त्या अनुषंगिक असतात त्या गृहीत धराव्या लागतात. मात्र नगरपरिषदेकडून completion certificate घेऊन तक्रारदारांच्या नावे सदनिकेचे खरेदीखत करुन देणे ही विरुध्द पक्ष 1 ते 3 यांची कायदेशीर जबाबदारी आहे आणि ती सेवेतील अंशतः त्रुटी आहे. ती त्यांनी पुर्ण करायला हवी होती.
13) मुद्दा क्रमांक 3 - i) तक्रारदाराने विरुध्द पक्ष 1 च्या कुलअखत्यारपत्राबाबत मुद्दा उपस्थित केलेला आहे. त्या कुलअखत्यारपत्राचे वाचन केले असता केवळ ग्राहक मंचासमोर चालणा-या केससाठीच त्यांनी आपल्या पत्नीला प्रकृती अस्वास्थामुळे कुलअखत्यारी नेमलेले आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने दिलेले या प्रकरणातील सर्व पुरावे वैध व कायदेशीर मानणे क्रमप्राप्त आहे.
ii) नि.23 वर तक्रारदाराने कमीशनचा अर्ज दाखल केलेला होता. सदर अर्जातील सामुहिक सुविधांचा विचार करता तक्रारदाराने इमारतीमध्ये राहणा-या इतर सर्व सदनिकाधारकांना पक्षकार म्हणून सामील करुन घेतलेले नसल्याने सदरचा कोर्ट कमीशनचा अर्ज फेटाळण्यात आला.
iii) नि.35 वर नगरपरिषदेने जा.क्र.2403/12-03-2015 इमारतीच्या बांधकामास दिलेल्या बांधकाम परवानगीनुसार इमारतीचे बांधकाम पूर्ण केलेले आहे. त्यानुसार आरोग्य विभागाचा ना हरकत दाखला दाखल केलेला आहे. त्याप्रमाणे नि.52 वर सावंतवाडी नगरपरिषदेने (भाग वापर प्रमाणपत्र) दिलेले आहे. सदर दोन्ही कागदोपत्री पुराव्यावरुन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्याचे दिसून येते.
iv) साठेकरारातील अटीप्रमाणे 5% रक्कम रु.55,000/- तक्रारदाराने विरुध्द पक्ष 1 ला दिलेली नाही. वास्तविक साठेकरारातील अट क्र.3 प्रमाणे सदनिकेमध्ये वास्तव्यास गेल्यानंतर सदर रक्कम विरुध्द पक्षाला देणे क्रमप्राप्त होते. सदर गोष्ट अटींचा भंग करणारी आहे. साठेकरारातील मुद्दा क्र.6 मध्ये खरेदी देणार व खरेदी घेणार यांच्या दरम्यान झालेल्या साठेखताच्या दिनांकापासून 12 महिन्यांच्या आत सदनिकेचे काम करुन सदनिकेचा कब्जा खरेदी देणार यांनी खरेदी घेणार यांस द्यावयाचा होता. मात्र त्यामध्ये असेही नमूद आहे की, हा कालावधी कच्चा माल, सिमेंट, लोखंड, बांधकामासाठी आवश्यक पाणीपुरवठा, शासकीय निर्बंध अगर नैसर्गिक आपत्ती हयांचेवर अवलंबून राहिल व त्याहीपुढे साठेखतामध्ये नमूद केलेली पूर्ण रक्कम न दिल्यास कब्जा मिळणार नाही. हया बाबी विचारात घेता तक्रारदाराने 5% रक्कम अद्यापही दिलेली नाही; व विरुध्द पक्ष क्र.1 हे दुर्धर आजाराने पिडीत असल्याने त्यांची बांधकाम पूर्ण न झाल्याची असहायता दिसून येते. ते कारण मंचाला पुराव्यादाखल केलेल्या कागदपत्रावरुन मान्य करावे लागते.
v) तक्रारदाराने दाखल केलेले फोटोग्राफ्स त्याच इमारतीचे आहेत, याबाबत फोटोग्राफरचे शपथपत्र अत्यावश्यक होते ते तक्रारदाराने दाखल केलेले नाही.
vi) तक्रारदाराने भाडयाच्या जागेत राहत असलेबाबत कोणताही लिखित पुरावा (उदा.भाडे पावती, करार) दाखल केलेला नाही.
14) वरील सर्व बाबींचा साकल्याने विचार करता मंचासमोर खालील बाबी स्पष्ट होतात. विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी विहीत मुदतीत सदनिकेच्या बांधकामातील त्रुटी पूर्ण केलेल्या नाहीत. मात्र कालांतराने त्या पूर्ण झाल्यामुळेच तक्रारदार सदर सदनिकेत वास्तव्यास गेलेला आहे, आणि गेले दिड वर्ष सदर सदनिकेत राहत आहे. त्यामुळे तक्रारदाराने आपल्या तक्रार अर्जात मागणी केलेली शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाईची रक्कम रु.2,50,000/- अवास्तव वाटते. तसेच भाडयाच्या जागेसंबंधाने कोणताही लिखित पुरावा दाखल केलेला नसल्याने सदर मागणी अमान्य करण्यात येते. परिणामतः हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- आदेश -
1) तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी 45 दिवसांत नगरपरिषद अथवा तत्सम सरकारी यंत्रणेमार्फत करण्यात येणा-या तांत्रिक बाबी पूर्ण करुन घेऊन तक्रारदाराला अंतीम खरेदीखत करुन देण्यात यावे, खरेदीखत होणेपूर्वी करारातील उर्वरीत 5% रक्कम रु.55,000/- (रुपये पंचावन्न हजार मात्र) तक्रारदाराने विरुध्द पक्ष 1 ते 3 यांना दयावेत.
3) विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी वैयक्तिक वा संयुक्तपणे तक्रारदारास झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी व प्रकरण खर्चापोटी भरपाई रु.25,000/- (रुपये पंचवीस हजार मात्र)दयावेत.
4) सदर आदेशाची पुर्तता विरुध्द पक्ष यानी उपरोक्त विहित मुदतीत न केल्यास तक्रारदार विरुध्द पक्ष यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्वये तक्रारदार यांचेविरुध्द दाद मागू शकतील.
5) मा.राज्य आयोग, मुंबई यांचे परिपत्रक्र क्र.राआ/महा/आस्था/-3/जि.मं.कामकाज/परिपत्रक/2014/3752 दि.05 जुलै 2014 नुसार उभय पक्षकारांनी 45 दिवसानंतर म्हणजेच दि.07/10/2015 रोजी आदेशाची पुर्तता झाली किंवा नाही ? हे कळवणेसाठी या मंचासमोर हजर रहावे असे आदेश देण्यात येतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 20/08/2015
Sd/- Sd/-
(वफा ज. खान) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्या, प्रभारी अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.