(द्वारा- श्रीमती ज्योती पत्की, सदस्य) या तक्रारीची माहिती थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराने गैरअर्जदार क्र.1 एक्सप्लोरा डिझाईन स्कुल, शाखा औरंगाबाद या संस्थेत ग्राफिक्स, अनिमेशन व वेब डिझायनिंगचे कोर्ससाठी रक्कम रु.35,000/- (2) त.क्र.674/08 फीस भरली होती. गैरअर्जदाराने सदर कोर्ससाठी एकूण फीस रु.52,000/- निश्चित केली होती. गैरअर्जदार क्र.1 हे गैरअर्जदार क्र.2 यांचे फ्रॅंचायजी आहेत. तक्रारदाराने दि.20.12.2006 रोजी गैरअर्जदाराने वृत्तपत्रात छापलेली जाहिरात वाचून सदर कोर्ससाठी प्रवेश घेण्याचे ठरविले. प्रवेश घेतेवेळेस गैरअर्जदाराने तक्रारदारास एकूण 23 सॉफ्टवेअर शिकविले जातील आणि कोर्स पूर्ण होताच कोणत्याही कंपनीत तुम्हाला नोकरी लावून दिली जाईल असे सांगितले. तक्रारदार गैरअर्जदाराकडे दि.15.01.2007 पासून नियमितपणे शिकवणी वर्गात उपस्थित राहत होते. प्रवेश घेतल्यानंतर साधारण दिड ते दोन महिन्यानंतर तक्रारदारास या कोर्ससाठी संगणक खराब होणे, अप्लीकेशन प्रॉब्लेम, शिक्षणासाठी पुरेशा पुस्तकांचा अभाव, संगणक कायमचा बंद राहणे आणि प्रभुत्व नसलेले शिक्षक अशा अनेक अडचणी दिसून आल्या. त्याने याबाबत गैरअर्जदाराकडे तक्रार केली, परंतु गैरअर्जदाराकडून या अडचणी सोडविण्यात आल्या नाहीत. गैरअर्जदाराने स्पोकन इंग्लीश व स्केचिंग हा विषय पुर्णतः शिकविला नाही, कोणतेही प्रोजेक्ट घेतले नाहीत व इंडस्ट्रीअल ट्रेनिंग दिलेली नाही. गैरअर्जदाराने खोडसाळपणाने दि.27.08.2008 रोजी फीस देण्याबाबत नोटीस दिली. गैरअर्जदाराने माहिती पुस्तिकेत नोंदविल्याप्रमाणे सदर कोर्स 14 महिन्यात पुर्ण शिकविणे आवश्यक असतानाही दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटला असतानाही कोर्स पुर्ण केला नाही. गैरअर्जदाराच्या चुकीमुळे तक्रारदाराचा दोन वर्षाचा कालावधी वाया गेला. गैरअर्जदाराने कोर्स वेळेत पुर्ण न करुन तक्रारदारास त्रुटीची सेवा दिलेली आहे. म्हणून तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून फीसची भरणा केलेली रक्कम रु.35,000/- व मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.50,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी लेखी निवेदन दाखल करुन तक्रारदाराची संपूर्ण तक्रार अमान्य केली आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदारास आमची संस्था हमखास नोकरी लावून देते असे आश्वासन दिलेले नाही. तक्रारदारास अहमदाबाद येथील संस्थेने दिलेल्या माहिती पुस्तिकेत सांगितल्याप्रमाणे एकूण 12 सॉफ्टवेअर शिकविणे अपेक्षित होते व तक्रारदारास विहित वेळेत संपूर्ण 12 सॉफ्टवेअर शिकवून पूर्ण केले आहेत. तक्रारदारास एखादा विषय सॉफ्टवेअर न समजल्यास किंवा कमी समजल्यास त्यास दुस-यांदा पुन्हा शिकविण्यात आला आहे. तक्रारदाराने असाईनमेंट प्रोजेक्ट दाखल केला नाही, म्हणून त्यास विचारणा करुन खुलासा मागविण्यात आला आणि उर्वरीत फीस रक्कम रु.17,100/- भरण्याबाबत दि.27.08.2008 रोजी त्याचे वडिलाचे नावे पत्र पाठविण्यात आले. सदरील कोर्सची फीस हप्त्याने भरावयाची होती. तक्रारदाराने ठरलेली (3) त.क्र.674/08 फीस रक्कम रु.52,000/- पैकी रक्कम रु.35,000/- चा भरणा केलेला आहे. तक्रारदाराने फीसची उर्वरीत रक्कम भरली नसतानाही जुलै 2008 पर्यंत त्याचा कोर्स पूर्ण झालेला आहे. तक्रारदाराने संपूर्ण कोर्स पूर्ण करुन घेतला व उर्वरीत फीस रक्कम रु.17,100/- देणे लागू नये म्हणून ही खोटी व बनावट तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार दंडासह खारीज करण्यात यावी अशी मागणी गैरअर्जदाराने केली आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी लेखी निवेदन दाखल करुन तक्रार अमान्य केली आहे. गैरअर्जदार क्र.1 हे त्यांचे फ्रँचायजी आहेत व दोघांचे मधे झालेल्या करारातील कलम 13.24 प्रमाणे विद्यार्थ्याने कोठेही तक्रार दाखल केल्यास, वाद उदभवल्यास अथवा कोर्टाची कायदेशीर कार्यवाहीची नोटीस आल्यास त्याची पूर्णपणे जबाबदारी गैरअर्जदार क्र.1 यांच्यावर राहील. गैरअर्जदार क्र.1 आणि तक्रारदार यांच्यामधील वादास गैरअर्जदार क्र.2 यांना जबाबदार धरता येणार नाही. तक्रारदार हे त्यांचे ग्राहक नाहीत. म्हणून त्यांच्या विरुध्द ही तक्रार नामंजूर करावी अशी मागणी गैरअर्जदाराने केली आहे. दोन्ही पक्षांनी दाखल केलेल्या शपथपत्र व कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदाराच्या वतीचे अड.राहुल जोशी आणि गैरअर्जदार क्र.1 च्या वतीने अड शेखर अग्रवाल यांनी युक्तिवाद केला. गैरअर्जदार क्र.2 च्या वतीने लेखी युक्तिवाद दाखल करण्यात आला. तक्रारदाराने ग्राफिक्स, अनिमेशन व वेब डिझायनिंग या कोर्ससाठी गैरअर्जदार क्र.1 एक्सप्लोरा डिझाईन स्कुल यांचेकडे प्रवेश घेतला व निश्चित केलेली फीस रक्कम रु.52,000/- पैकी रक्कम रु.35,000/- जमा केले या विषयी वाद नाही. गैरअर्जदाराचे म्हणण्यानुसार सदर कोर्समधे 12 सॉफ्टवेअर शिकवले जातील व तक्रारदारास 12 सॉफ्टवेअर विहित वेळेत शिकवून पूर्ण केले आहेत. परंतू याबाबत तक्रारदाराने दाखल केलेल्या दि.20.12.2006 रोजीच्या वृत्तपत्रातील जाहिरातीमधे सदर कोर्समधे 23 सॉफ्टवेअर शिकवले जातील आणि सदर कोर्स 14 महिन्यात पूर्ण झाल्यानंतर नोकरीचे अपॉईटमेंट लेटर दिले जाईल असे स्पष्ट नमुद केलेले आहे. त्यामुळे गैरअर्जदाराचे सदर कोर्समधे 12 सॉफ्टवेअर शिकवले जातील या म्हणण्यामधे काहीही तथ्य दिसून येत नाही. आणि यावरुन गैरअर्जदाराने तक्रारदारास त्यांच्या जाहिरातीमधे नमुद केल्याप्रमाणे पूर्ण कोर्स न शिकवता अर्धा कोर्स शिकवल्याचे स्पष्ट होते. सदर कोर्स 14 महिन्यात पूर्ण करणे आवश्यक असतानाही गैरअर्जदाराने त्यापेक्षा जास्त कालावधीत देखील कोर्स शिकवून पूर्ण केलेला नाही. त्यामुळे गैरअर्जदाराने तक्रारदारास कंपनीत नोकरी लावून (4) त.क्र.674/08 देण्याचा प्रश्न उदभवत नाही आणि ही विद्यार्थ्यांची एक प्रकारे घोर फसवणूक आहे. वृत्तपत्रामधे मोठी जाहिरात देऊन विद्यार्थ्यांना कोर्स करण्यासाठी व कोर्स पूर्ण झाल्यावर नोकरी दिली जाईल असे आमिष दाखवून प्रवेश घेण्यासाठी भरीस घातले जाते. आणि अशा जाहिराती बघून विद्यार्थी सदर कोर्स करण्यासाठी प्रवेश घेतात आणि तेथेच त्यांची फसवणूक होते. तक्रारदाराने सदर कोर्ससाठी एकूण निश्चित केलेली फीस रु.52,000/- पैकी रु.35,000/- गैरअर्जदाराकडे भरलेले आहेत, परंतू गैरअर्जदारांनी पूर्ण कोर्स शिकवलेला नसल्यामुळे तक्रारदाराने उर्वरीत रक्कम रु.17,100/- देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. तक्रारदाराकडून फीसची अर्ध्यापेक्षा जास्त रक्कम घेऊन जाहिरातीत व माहिती पुस्तिकेत दर्शविल्याप्रमाणे सदर कोर्स वेळेत किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीत देखील शिकविलेला नाही ही गैरअर्जदाराच्या सेवेतील त्रुटी आहे. सदर कोर्स पूर्ण केल्यावर नोकरीची हमी गैरअर्जदाराने दिलेली असल्यामुळे त्यांच्या भुलथापाला बळी पडून तक्रारदाराने कोर्स करण्यासाठी प्रवेश घेतला परंतू सदर कोर्स अर्धवट शिकवल्यामुळे त्याच्या आशा आकांक्षावर पाणी पडले आणि त्याचा दोन वर्षाचा कालावधी वाया गेला आहे. गैरअर्जदाराच्या अनुचित व्यापार पध्दती व सेवेतील त्रुटीमुळे तक्रारदाराचे वर्ष वाया गेले त्यासाठी गैरअर्जदारच जबाबदार आहेत असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारदाराने कोर्स करण्यासाठी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे प्रवेश घेतलेला असल्यामुळे आणि त्यांनी कोर्स अर्धवट शिकवल्यामुळे त्यांच्या या कृत्यास गैरअर्जदार क्र.2 यांना जबाबदार धरता येणार नाही. म्हणून त्यांचे विरुध्द कोणताही आदेश पारीत करण्यात येत नाही. गैरअर्जदाराने तक्रारदारास पूर्ण कोर्स शिकविलेला नाही व अर्धा कोर्स शिकवलेला असल्यामुळे तक्रारदार भरलेली फीसची रक्कम रु.35,000/- पैकी अर्धी फीस रु.17,500/- परत मिळण्यास पात्र आहेत. सदर कोर्स अर्धवट झालेला असल्यामुळे तक्रारदार मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- मिळण्यास देखील पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. म्हणून खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येतो. आदेश 1) तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार क्र.1 एक्सप्लोरा डिझाईन स्कुल शाखा औरंगाबाद यांनी तक्रारदारास भरलेली फीस रक्कम रु.35,000/- पैकी अर्धी फीस रक्कम रु.17,500/- निकाल कळाल्यापासून एक महिन्यात द्यावी. (5) त.क्र.674/08 3) गैरअर्जदार क्र.1 एक्सप्लोरा डिझाईन स्कुल शाखा औरंगाबाद यांनी तक्रारदारास मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- असे एकूण रुपये 6,000/- निकाल कळाल्यापासून एक महिन्यात द्यावेत. 4) संबंधितांना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |