निकालपत्र ः- द्वारा- मा.अध्यक्ष, श्री.आर.डी.म्हेत्रस. 1. तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे- तक्रारदार प्रकाश हा तक्रारीत नमूद केलेंल्या पूनम अपार्टमेंट, प्लॉट 104, सेक्टर 2, कोपरखैरणे, नवी मुंबई सदनिका क्र.401 मधील रहिवासी आहे. त्याने सदरील फ्लॅट जाने. 2006 मध्ये रिसेलमध्ये खरेदी केला आहे. तो वरील मजल्यावर आहे. त्याला कॉमन टेरेस आहे. जुन जुलै 06 मध्ये झालेल्या पावसामुळे टेरेसवरुन सदनिकेत गळती झाली. त्यासंदर्भात सोसायटीला त्वरीत कळवणेत आले. नंतर 13-8-06 रोजी वार्षिक सभेत एक पत्र चेअरमन श्री.तावडे व सहखजिनदार श्रीराम अय्यर याना दिले. तक्रारदाराचे या विषयासंदर्भात त्याची नोंद जनरल बॉडीने घेतली. तक्रारदाराच्या पत्नीने व सासूने सोसायटीला असे कळवले की, सोसायटीच्या संबंधित पदाधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या हॉलचे सिलींग व रुमचा काही भाग कोसळला. त्याचे फोटो येथे दाखल आहेत. ही बाब सोसायटीचे निदर्शनास आणली. सिव्हील इंजिनियर्स जे तक्रारदाराचे मित्र आहेत त्यानी त्याची पहाणी केली. त्यावेळी त्याना असे आढळले की, सदनिकेवरील सिलींगचे स्टील रॉडस हे सोसायटीच्या टेरेसच्या लिकेज प्रॉब्लममुळे गंजले आहेत. त्यांनी असे सांगितले की, जोवर टेरेसचे काम पूर्ण होंत नाही तसेच टेरेसच्या संरक्षक भिंतीचे काम जोवर नीट होत नाही तोवर आतील काम करुन काही फायदा होणार नाही. जर ते काम नाही केले तर दरवर्षी पावसाळी सिझनमध्ये हीच परिस्थिती येईल. त्यावेळी पाऊस खूप असल्याने तक्रारदाराने स्वखर्चाने रु.20,000/- खर्चून सिलिंगचे अंतर्गत काम करुन घेतले कारण त्याला तशी गरज होती. दरम्यानचे काळात चेअरमन व खजिनदार यांनी असे आश्वासन दिले की नियमाप्रमाणे आम्ही काम करु. त्यांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही, त्यांनी सिव्हील इंजिनियरची नियुक्ती करणेचे टाळले. 2. त्याचे असे म्हणणे आहे की, पाऊस संपल्यावर त्याने स्वखर्चाने आतील काम करन घेतले त्यासाठी रु.15,000/- घालवले व ते करण्यापूर्वी त्याने सोसायटीला सूचना दिली होती, तसेच वॉड ऑफिसर नवी मुंबई व जॉईंट रजिस्ट्रार को.ऑप.सोसायटी यांनाही कळवले होते. कोणी एक भोसले जॉइंट रजिस्ट्रार यानी असे सांगितले की, पावसापासून बचाव करणेसाठी पत्र्याची शेड घालावी व त्यासाठी त्याला रु.40,535/- खर्च येईल असे समजले. ही बाब त्याने सोसायटीचे कानावर घातली. सोसायटीकडून त्याला शेड बांधणेबाबत काही प्रतिसाद आला नाही म्हणून त्याने एक पत्र 6-5-09 ला सोसायटीला दिले. त्या पत्रास सोसायटीने उत्तर दिले. व त्याचेवर टिका केली. तसेच त्यानी सोसायटीने त्यांना या गोष्टीची जाणीव असल्याचे कबूल केले. त्याचबरोबर त्यांनी असेही कळवले की, सदनिका क्र.400 ते 404 मधील सभासद हे 2007 पासून मिटींगला येत नाहीत. हे त्यांचे कथन खोटे आहे. त्याने वार्षिक सभेची प्रत सोबत जोडली आहे. यावरुन एक बाब दिसून येते की, टेरेसच्या स्लॅबचे डॅमेज झाले आहे, तेथील स्टील रॉड गंजले आहेत, सोसायटी मात्र या विषयाकडे गांभीर्याने पहात नाही. याउलट ती सभासदांना दोष देत आहे. 2002 पासून सोसायटी काही कारवाई करीत नाही. त्यांनी वास्तविक या बाबीवर पूर्वीच कारवाई करणे आवश्यक होते. योग्य कारवाई न करता ते तात्पुरती मलमपटटी करीत आहेत. अशा प्रकारे त्यांनी नीट दुरुस्ती न करता सन 07-08 मध्ये इमारत दुरुस्तीसाठी रु.2,42,000/- खर्ची टाकले आहेत. तक्रारदाराच्या सदनिकेबाबत घटना जुलै 08 मध्ये घडली आहे. 3. सामनेवालेने टेंडर्स कोटेशन्स न मागवता रु.2,42,000/- खर्च केला आहे. त्यानी जर गांभीर्यपूर्वक काम केले असते तर हा प्रसंग आला नसता. तक्रारदाराने याबाबत संबंधित अधिका-यांकडे तक्रार करुन ही बाब निदर्शनास आणली आहे. सोसायटीला अनेकदा पत्रे देऊन सोसायटीने मात्र 6-5-09 चे पत्राचे उत्तर दिले आहे. 4. कागदपत्राची तपासणी केली सता असे दिसते की, इमारतीचे बांधकाम 96 साली झाले असून तशी ओ.सी. याकामी दाखल आहे. स्टील गंजण्याची घटना 2002 ला झाली आहे. यावरुन असे दिसते की 6 वर्षाचे काळातच इमारत खराब झाली आहे, याचा अर्थ असा की, वरील मजल्यावरील स्लॅबचे काम हे योग्य मटेरियल न वापरता करण्यात आले आहे. त्यामुळे सभासदांचे जिवीतमान धोक्यात आले आहे, त्यासंदर्भात त्यांनी फोटो पण दाखल केले आहेत. 5. तक्रारदारानी स्वतःहून दुरुस्तीसाठी रु.78,535/- चा खर्च केला आहे. त्याने स्वतःहून स्वतःच्या सदनिकेपुरती शेडही घातली आहे. 6. या सर्वामुळे त्याला खूप मनस्ताप सोसावा लागला आहे, त्यामुळे त्याने केलेल्या खर्चाची मागणी तो करीत आहे, तसेच त्याच्या सासूलाही त्रास होऊन ती आजारी पडली. त्याला कायदेशीर करवाई करणे भाग पडत असल्याने त्याला खर्च करावा लागला व त्याच्या कुटुंबाला जो मानसिक त्रास सोसावा लागत आहे त्यापोटी त्याने रु.3,50,000/-ची मागणी केली आहे. अशी त्याची एकूण मागणी रु.4,50,235/-ची मागणी करीत आहे. ते त्याना सोसायटीच्या ऑफिसच्या संबंधीत अधिका-यांकडून मिळावी. तरी त्याची अशी विनंती की, सामनेवालेना त्यांनी सोसायटीच्या दुरुस्तीचे काम विशेषतः कॉमन टेरेस, पॅराफिट वॉल, नियमाप्रमाणे सोसायटी फंडातून करणेबाबत आदेश करावेत. व ते काम सोसायटीचे नियमाप्रमाणे करावे. हे व्यक्तीशः शक्य नसेल तर दरवर्षी प्रत्येक सभासदाकडून मासिक वर्गणी जमा करुन त्यातून हे काम पुरे करावे. तक्रारदारास मासिक मेंटेनन्स चार्जेस भरणेची परवानगी मिळावी. 7. तक्रारीसोबत त्याने नि.2 अन्वये पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. नि.3 वर त्याने पुराव्याचे कागद दाखल केले आहेत ते पान 1 ते 34 अखेर आहेत. त्यात मिटींगचे इतिवृत्त, फोटो, पत्रे, आलेली उत्तरे, सिडकोच्या ऑफिसरांचे पत्र, ओ.सी. प्लॅस्टर पडल्याचे फोटो, दुरुस्तीची बिले, मेडिकल बिले यांचा समावेश आहे. 8. सामनेवालेस नोटीस काढण्यात आली. सामनेवाले 4 ने हजर होऊन त्याने नि.5 अन्वये म्हणणे दाखल केले व नि.6 अन्वये प्रतिज्ञापत्र दिले आहे. 9. सोसायटीचे वतीने श्री.सुनिल गिते यांनी वकीलपत्र दाखल करुन त्यांनी नि.18 अन्वये म्हणणे दिले आहे. सोबत नि.9 अन्वये प्रतिज्ञापत्र दिले आहे. 10. तक्रारदारानी 11-1-11 रोजी अर्ज देऊन सामनेवाले 4 विरुध्दची तक्रार मागे घेत असल्याचे व त्याचे नाव कमी करत असल्याचे कळवले. तक्रारदारानी पुन्हा सामनेवालेनी म्हणणे दिल्यावर आपले जादा म्हणणे नि.11 व 14 अन्वये दिले. 11. सामनेवाले 4 चे म्हणण्याबाबत जे म्हणणे दिले आहे त्याचा विचार करणेचे कारण नाही कारण सामनेवाले 4 चे नाव तक्रारीतून वगळणेत आले आहे. सामनेवाले 1 ते 3 यांच्या म्हणण्याला तक्रारदारानी जे म्हणणे दिले त्यासोबत काही पावत्या, नियमावली, इ.दाखल केले आहेत. सामनेवालेनी पुन्हा प्रतिज्ञापत्र नि.20 अन्वये दिले आहे. सोबत त्यांनी 2008 व 09 चे सोसायटीचे हिशोब नि.ए ला दाखल केले. नि.बी ला त्यांनी काम केले याबाबत ज्या व्यक्तीकडून काम केलें त्याचे सामानाचे बील दाखल केलें ते नि.20 ई लगत आहे, तसेच सर्व मेंबर्सच्या सहया असलेले इतिवृत्त 15-4-07 तारखेचे दाखल केलें आहे. 12. सामनेवाले 1 ते 3 चे थोडक्यात खालीलप्रमाणे म्हणणे आहे- तक्रारदाराची तक्रार ही पूर्णतः खोटी आहे. अदयापही सोसायटीस कन्व्हेनियन्स किंवा लीज डीड हे बिल्डरतर्फे झालेले नाही त्यामुळे मोठया दुरुस्त्या करण्याचा अधिकार सोसायटीला नाही. कारण टेरेस व त्यावरील ओपन एरिया हा बिल्डरचा आहे. तरीही सामनेवाले हे नियमित मेंटेनन्स करत आहेतच त्याबाबत ते जादा खर्च लावत नाहीत. प्रत्येक पावसाळयापूर्वी आवश्यक त्या दुरुस्त्या केल्या जातात. तरीही त्यांनी तक्रारदारास असे सांगितले की, तो स्वतःच्या अखत्यारीत एन.एम.एम.सी.ची परवानगी घेऊन त्याचे सदनिकेच्या टेरेसवर शेड टाकू शकतो. तक्रारदारानेही त्यावर कायमची शेड टाकल्याचे नमूद केलें आहे व त्याबाबत तक्रारदारानी असे म्हटले आहे की, ही शेड मी जॉइंट रजिस्ट्रारच्या लॉ ऑफिसरने सांगितल्याप्रमाणे केल्या आहेत. त्याचे हे कृत्य बेकायदेशीर आहे कारण अशी परवानगी देण्याचा अधिकार सोसायटीस नाही. तो नवी मुंबई महापालिकेने देणे आवश्यक आहे. त्याची या इमारतीमध्ये बांधकामाचे वेळी कमी दर्जाचा माल वापरला आहे ही जी तक्रार आहे त्याबाबत सोसायटीला जबाबदार धरता येणार नाही. तसेच तक्रारदार हा ऑक्युपन्सी प्रमाणपत्राबाबतही तक्रार करत आहे. तक्रारदार हा सामनेवालेकडून रु.30,000/- मागत आहे. त्याची ही कृती चुकीची आहे. त्याची ही मागणी चुकीची आहे कारण ती वैयक्तीक स्वरुपाची आहे. त्याने तक्रार ही कमिटी मेंबरच्या नावे दाखल केली आहे. तक्रारदारानी हे वार्षिक सर्वसाधारण सभा 08 व 09 सालची सुरु होण्यापूर्वी ए.जी.एम.चे पुस्तक ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याची त्याच्या सासूबाबतची मेडिकलबाबतची तक्रार त्यांना मान्य नाही. जर तक्रारदारास काही त्रास झाला असेल तर ती त्याची जबाबदारी आहे त्यासाठी त्याला कमिटीला जबाबदार धरता येणार नाही. या तक्रारीस नॉन जॉइंडर ऑफ नेसेसरी पार्टीची बाधा येते. त्याला ही तक्रार दाखल करणेचा अधिकार नाही. तक्रारीस मुदतीची बाधा आहे. तक्रारदार हा सामनेवालेंनी त्यास दोषपूर्ण सेवा दिल्याचे शाबीत करु शकत नाही, तसा पुरावा त्याने दिलेला नाही. सबब या कारणास्तव त्याची तक्रार खर्चासह फेटाळून लावावी अशी त्यांची मागणी आहे. 13. याकामी उभय पक्षांचे युक्तीवाद ऐकले. त्यानी दाखल केलेली कागदपत्रे वाचली. यावरुन सदर तक्रारीच्या निराकरणार्थ खालील मुददे उपस्थित होतात- मुददा क्र.1- तक्रारदारास सामनेवालेकडून दोषपूर्ण सेवा दिली गेली आहे काय? उत्तर - व्यक्तीशः नाही. मुद्दा क्र.2- तक्रारदारांचा अर्ज त्यांच्या मागणीप्रमाणे मंजूर करणे योग्य होईल काय? उत्तर - अंतिम आदेशात नमूद केल्याप्रमाणे. विवेचन मुद्दा क्र.1- 14 तक्रारदारांची तक्रार सामनेवालेंविरुध्द त्यानी दोषपूर्ण सेवा दिल्याबाबत आहे. तक्रारदाराने बिल्डर डेव्हलपर याला याकामी सामील केले होते. त्याचे नाव नंतर का कमी केले याचा खुलासा नाही. त्यामुळे तक्रार ही सामनेवाले 1 ते 3 यांचेविरुध्द रहाते. त्याने तक्रार ही चेअरमन, सेक्रेटरी, खजिनदार यांना व्यक्तीशः दोषी धरुन केली आहे ते चुकीचे आहे. सोसायटी ही कायदयाने प्रस्थापित झालेली व्यक्ती असल्यामुळे तिचे कामकाजाबाबत पदाधिका-यांना जबाबदार धरणे योग्य होणार नाही. त्याने तक्रार ही सोसायटीविरुध्द करणे आवश्यक होते. तशी ती त्याने केलेली नाही. त्यामुळे व्यक्तीशः संबंधित चेअरमन, सेक्रेटरी, खजिनदार यांना जबाबदार धरता येणार नाही. जी जबाबदारी आहे ती सोसायटीवर येते. सोसायटी म्हणून त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली आहे का याचा विचार करणे आवश्यक आहे कारण तक्रारदार हा सोसायटीचा सभासद आहे व तो मेंटेनन्स चार्जेस देत आहे त्यामुळे व सोसायटीच्या इमारतीचे रक्षण होण्याच्या दृष्टीने त्याने संबंधित सोसायटीकडे तक्रार करणे रास्त आहे. त्याने या सोसायटीत जी सदनिका खरेदी केली आहे ती रिसेलची आहे. मूळ बिल्डर डेव्हलपरकडून त्याने खरेदी केलेली नाही ही बाब येथे विचारात घेणे आवश्यक आहे. पावसाळयात गळती होऊन त्याचे कुटुंबाला काही त्रास झाला तर त्याची जबाबदारी ही सोसायटीवर येणार नाही. कारण खरेदी घेतेवेळी त्याने या बाबी पारखून घेणे आवश्यक होते असे मंचाचे मत आहे. त्याने डॉ.अथोनी डिसोझा यांचेकडील मेडिकल प्रमाणपत्र 3-1-09 चे दाखल केले आहे पण त्याचे सासूला जो त्रास झाला त्याबाबत सोसायटीला दोषी धरता येईल का हा मुद्दा आहे. मंचाचे मते केवळ गळती झाल्यामुळे सासूला त्रास झाला म्हणून सोसायटीला जबाबदार धरणे योग्य होणार नाही. तक्रारदाराने एकूण रु.78,535/-चा खर्च केल्याचे त्याचे म्हणणे आहे. वास्तविक रिसेल सदनिका खरेदी करताना ती कंडीशनमध्ये आहे का नाही या बाबी पारखून घेणे आवश्यक होते. जर त्याने सदनिकेवर काही खर्च केला असेल तर ती रक्कम देणेची जबाबदारी सोसायटीवर येईल का हा मुद्दा आहे. मंचाचे मते ही जबाबदारी सोसायटीवर येणार नाही. मंचाला सोसायटीने त्याला दोषपूर्ण सेवा दिली आहे का नाही हे पहाणेचे आहे. त्याबाबतीत सोसायटीने त्यांची झालेली इतिवृत्ते, त्यांनी केलेला खर्च, त्यांनी घेतलेल्या सभा इ.कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यावरुन असे दिसते की, सोसायटी दरवर्षी मेंटेनन्स चाजेसपोटी खर्च करीत आहे, त्याने टेरेस दुरुस्तीसाठी खर्च केल्याची बिले दाखल केली आहेत, तसेच त्यांनी त्याबाबतीतील हिशोबाच्या प्रती दाखल केल्या आहेत. तक्रारदाराने स्वतः तक्रारीसोबत सोसायटी मेंटेनन्ससाठी खर्च करत असलेबाबत सन 07 व 08 मधील इन्कम अँड एक्स्पेंडिचरचे अकौंट दाखल केले आहे. विशेष म्हणजे तो सी.ए.ने सर्टिफाईड केला आहे. अशा परिस्थितीत सोसायटी त्याला व्यक्तीशः दोषपूर्ण सेवा देत असल्याचे म्हणता येईल का? मंचाचे मते याचे उत्तर नाही असे आहे. सामनेवालेनी मिटींगमध्ये झालेले ठराव दाखल केले आहेत त्याकडे तक्रारदाराने मंचाचे लक्ष वेधले. त्यात असे म्हटले आहे की, टेंपररी सोल्यूशन्स कॅरीड आऊट बट फॉर द टाईम बिइंग बट फॉर द मेजर रिपेअर्स वुई विल हॅव टु वेट फॉर सम मोअर टाईम. हा ठराव 06 चा आहे. त्यानंतर दुरुस्त्या करण्यात आल्याचे इनकम अँड एक्स्पेंडिचर अकौंटवरुन दिसते. अशा परिस्थितीत सामनेवालेनी दोषपूर्ण सेवा दिल्याचे मानता येणार नाही. तक्रारदारानी सामनेवालेंकडे अनेकदा पत्रव्यवहार केल्याचे दिसते. सामनेवालेंनीही काही प्रमाणात दुरुस्ती केल्याचे दिसून येत आहे. तक्रारदारांनी स्वतःच्या सदनिकेवर शेडही घातली आहे. तक्रारदारानी ज्या पध्दतीने मागणी केली आहे त्याचा विचार करुन त्याचा विचार करुन अर्ज मंजूर करता येईल का नाही हे ठरवणे आवश्यक आहे. सामनेवालेनी तक्रारदारास दोषपूर्ण सेवा दिली नसल्याचे मंचाचे मत आहे. त्यांनी केलेंल्या दुरुस्तीस तोच जबाबदार आहे. कारण त्याने रिसेलमध्ये सदनिका खरेदी केल्या आहेत. त्याबाबतचा दोष सोसायटीवर लावता येणार नाही. सोसायटी आपल्या परीने दुरुस्ती करीतच आहे. ही बाब त्याने दाखवलेल्या कागदांवरुन दिसते. त्यामुळे त्याची खर्चाची मागणी मान्य करता येणार नसल्याचे मंचाचे मत आहे. त्याची दुसरी मागणी विचार करण्यासारखी आहे. त्याने संपूर्ण इमारतीची कॉमन टेरेसचे पॅराफिट वॉलची दुरुस्ती करुन मागितली असून ती सोसायटीने स्वखर्चाने करावी अशी मागणी आहे. याबाबतीतील कागदांवरुन असे दिसते की, सोसायटीने जरी दुरुस्त्या केल्या असल्या तरी पूर्णपणे गळती थांबेल असे काम झालेले नाही. इमारतीचे रक्षण करणेची जबाबदारी सोसायटीवर आहे. केवळ वरवरची मलमपटटी करुन चालणार नाही. दरवर्षी त्याच त्या बाबींवर खर्च करणेही योग्य होणार नाही त्यामुळे तक्रारदारानी जी क्र.2ची मागणी केली आहे ती मंजूर करावी असे मंचाचे मत आहे. या दुरुस्तीस लागणारा खर्च प्रत्येक सभासदाकडून सोसायटीने वसूल करुन घेण्याचा आदेश करणे योग्य होईल असे मंचाचे मत आहे. त्याचबरोबर इमारत जर 4-5 वर्षात खराब होत असेल तर त्यांनी बिल्डरवरही कारवाई करणे आवश्यक असल्याचे मंचाचे मत आहे. त्यामुळे त्याचा अर्ज त्याने केलेंल्या वैयक्तिक खर्चाबाबतची मागणी सोडून इतर मागण्या मंजूर कराव्यात असे मंचाचे मत आहे. त्याला न्यायिक खर्चापोटी रु.5,000/- दयावेत या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. 15. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहे- -ः आदेश ः- तक्रारदारांचा अर्ज खालीलप्रमाणे मंजूर करणेत येत आहे. 1. सामनेवाले 1 ते 3 म्हणजेच सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी व खजिनदार यांना सोसायटीसाठी असे आदेशित करणेत येते की त्यांनी संबंधित इमारतीचे टेरेस व पॅराफिट वॉलचे काम योग्य प्रकारे गळती होणार नाही अशा प्रकारे आदेश पारित तारखेपासून 3 महिन्यात करुन घ्यावे व त्याचा होणारा खर्च प्रत्येक सभासदाकडून वसूल करुन घ्यावा. 2. तक्रारदाराच्या कथनाप्रमाणे या इमारतीस निकृष्ट मटेरियल वापरले असेल तर त्यानी संबंधित् बिल्डरविरुध्द योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. 3. पूनम सोसायटीने तक्रारदारास न्यायिक खर्चापोटी रु.5,000/-दयावेत. 4. सदर आदेशाच्या सत्यप्रती सर्व पक्षकाराना पाठवण्यात याव्यात. ठिकाण- कोकणभवन, नवी मुंबई. दि. 3-3-11 (ज्योती अभय मांधळे) (आर.डी.म्हेत्रस) सदस्या अध्यक्ष अति.ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवी मुंबई.
| Hon'ble Mrs.Jyoti A.Mandhle, MEMBER | Hon'ble Mr. R. D. Mhetras, PRESIDENT | , | |