अति. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 146/2012 तक्रार दाखल तारीखः- 19/05/2012
तक्रार निकाल तारीखः- 19/08/2013
कालावधी 1 वर्ष 3 महिना --दिवस
नि. 15
कै.जे.एल.पाटील,
वारस – लक्ष्मी जगन्नाथ पाटील,
किंवा शांताराम जगन्नाथ पाटील,
उ.व. 60, धंदा – घरकाम ----- तक्रारदार
रा. पाचोरा, गणेश कॉलनी, (अॅड. हेमंत भंगाळे)
ता. पाचोरा, जि. जळगांव.
विरुध्द
श्री. मुकूंद बिल्दीकर,
उ.व. 45, धंदा – नोकरी,
आशिर्वाद ड्रीम सिटी, पाचोरा, ----- सामनेवाला
(एकतर्फा)
नि का ल प त्र
श्री. मिलिंद सा. सोनवणे, अध्यक्ष ः प्रस्तुत तक्रार तक्रारदार यांनी, सामनेवाला
यांनी सदोष सेवा दिल्याच्या कारणावरुन ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 नुसार, दाखल केलेली आहे.
2. तक्रारदाराचे म्हणणे थोडक्यात असे की, जगन्नाथ एल. पाटील हे त्यांचे पती होते. दि. 23/08/2007 रोजी, रु. 25,000/- इतकी रक्कम भरुन त्यांनी सामनेवाल्यां कडून
प्लॉटची बुकींग केली होती. मात्र दि. 24/03/2011 रोजी तक्रारदाराचे पती श्री. जे.एल.पाटील यांचे निधन झाल्यानंतर सामनेवाल्याने एन ऐ करुन सदर प्लॉट चा ताबा देण्यास टाळाटाळ केली तुमचे पती मयत झाले असुन आता पैसे मिळणार नाहीत, असा पवित्रा सामनेवाल्यांनी घेतला आहे. पैसे परत मिळावे यासाठी दि. 13/04/2012 रोजी तक्रारदाराने सामनेवाल्यांस पैसे परत मिळण्याबाबत नोटीस देवूनही त्यांना पैसे परत मिळालेले नाहीत. त्यामुळे प्रस्तृत तक्रार त्यांनी दाखल केलेली आहे.
3. सामनेवाल्याला नोटीस मिळूनही तो हजर न झाल्याने दि. 15/04/2013 रोजी प्रस्तृत तक्रार त्याच्या विरुध्द एकतर्फा चालविण्यात यावी असे आदेश पारीत करण्यात आले.
4. तक्रारदारातर्फे शांताराम जगन्नाथ पाटील यांचे म्हणणे ऐकण्यात आले. तक्रारदाराने तक्रार पृष्ठयर्थ सामनेवाल्यास पाठविलेली नोटीस नि.क्र. 05. त्याचप्रमाणे सामनेवाल्याकडे रु. 25,000/- जमा केल्याची पावती. नि.क्र. 05/अ जगन्नाथ लोटन पाटील यांचा मृत्यू दाखला नि.क्र. 05/ब दाखल केलेले आहे.
5. निष्कर्षासाठीचे मुदे व त्यावरील आमचे निष्कर्ष कारणांसहीत खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1. तक्रारदार हा सामनेवाल्यांचा होय
ग्राहक आहेत काय ?
2. सामनेवाल्यांनी तक्रारदारास सेवा
पुरविण्यात कमतरता केलेली आहे काय ? होय
3. आदेशाबाबत काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
का र ण मि मां सा
मुद्दे क्र. 1 बाबत
6. तक्रारदार हे सामनेवाल्याचे ग्राहक आहेत या बाबत तक्रारदाराने तिचे पती जगन्नाथ लोटन पाटील यांचा मृत्यू दाखल नि.क्र. 05/ब दाखल केलेला आहे. तक्रारदाराने तिचे पती जगन्नाथ लोटन पाटील यांनी सामनेवाल्यांच्या आर्शिवाद ड्रीम सिटी मध्ये सर्वे नं. 232 मधील प्लॉट क्र. 17 अ हा बुक केला व त्यापोटी रु. 25,000/- जमा केले. या बाबत पावती नि.क्र. 05/अ दाखल केलेली आहे. वरील पुरावा सामनेवाल्याने हजर होवून नाकारलेला नाही. पावती नि.क्र. 05/अ मध्ये सर्वे नं. 232 मधील प्लॉट क्र. 17 अ या पोटी रु. 25,000/- स्विकारण्यात आले ही बाब स्पष्टपणे दिसुन येते. परिणामी तक्रारदारांच्या पतीने सामनेवाल्याच्या आर्शिवाद ड्रीम सिटी मध्ये प्लॉट बुक केला व तो त्यांचा ग्राहक होता असा निष्कर्ष निघतो. तक्रारदारांच्या पतीच्या निधना नंतर ग्राहक संरक्षण कायदा कलम – 2 (1) ब (v) नुसार तक्रारदार या देखील सामनेवाल्याचे ग्राहक ठरतात यास्तव मुदा क्र. 1 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दे क्र. 2 बाबत
7. तक्रारदाराने त्याच्या पुराव्यात प्रतिज्ञापत्रावर नमूद केलेले आहे की पतीच्या निधना नंतर सामनेवाल्याकडे जमा असलेली रक्कम रु. 25,000/- परत मागितली असता ती आजतागायत सामनेवाल्यांने परत केलेली नाही. त्याबाबत नोटीस पाठवुनही सामनेवाल्याने दखल घेतलेली नाही. सामनेवाल्याने वरील पुरावा हजर होवून नाकारलेला नाही. यास्तव सामनेवाल्याने प्लॉट एन ऐ करुन तक्रारदार यांना दिलेला नाही, ही बाब मान्य करावी लागेल. अशा परिस्थीतीत सामनेवाला एन ऐ केलेला प्लॉट तक्रारदारास देत नसल्यास त्याने जमा केलेली रु. 25,000/- तक्रारदारास परत मागितल्यावरही न देवून सेवेत कमतरता करीत आहे. असा निष्कर्ष निघतो यास्तव मुदा क्र. 2 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दे क्र. 3 बाबत
8. मुदा क्र. 1 व 2 चे निष्कर्ष होकारार्थी दिलेले आहेत. ही बाब विचारात घेता असे स्पष्ट होते की, तक्रारदार सामनेवाल्याचे ग्राहक आहेत. जमा केलेली रक्कम रु. 25,000/- परत न करुन सामनेवाल्याने सेवेत कमतरता केलेली आहे. त्यामुळे तक्रारदाराचा अर्ज मंजुर होण्यास पात्र ठरतो. तक्रारदाराने रक्कम रु. 25,000/- दि. 23/08/2007 पासुन द.सा.द.शे. 18 टक्के व्याजाने परत मिळावेत अशी मागणी केलेली आहे. मात्र प्रस्तृत तक्रारीतील व्यवहार पाहता द.सा.द.शे. 18 टक्के हा व्याजाचा दर अवाजवी ठरेल. आमच्या मते रक्कम रु. 25,000/- दि. 23/08/2007, म्हणजेच सामनेवाल्याने पैसे स्विकारल्याच्या दिनांकापासुन द.सा.द.शे. 10 टक्के परत करण्याचे आदेश न्यायसंगत ठरतील. त्याचप्रमाणे तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारीरीक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणुन रु. 7000/- व प्रस्तृत तक्रारीचा खर्च रु. 5000/- मंजुर करणे देखील न्यायास धरुन होईल. यास्तव मुदा क्र. 3 च्या निष्कर्षा पोटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आदेश
1. सामनेवाल्यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास रक्कम रु. 25,000/- दि. 23/08/2007 पासुन द.सा.द.शे. 10 टक्के व्याजाने अदा करावेत.
2. सामनेवाल्यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी पोटी रू. 7,000/- व अर्ज खर्चापोटी रू. 5,000/- अदा करावेत.
3. निकालपत्राच्या प्रती उभय पक्षांस विनामुल्य देण्यात याव्यात.
(श्री.मिलींद सा सोनवणे) (श्री. सी.एम.येशीराव )
अध्यक्ष सदस्य
अति. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव