(आदेश पारित द्वारा मा. सदस्या, कु. वर्षा ओ. पाटील)
- आदेश -
तक्रारकर्त्याने सदरची तक्रार विरूध्द पक्षाने त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी केल्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ता हा मौजा फुटाळा, पो. सौंदड (रेल्वे), ता. सडक अर्जुनी, जिल्हा गोंदीया येथील रहिवासी असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर त्याचे धान्य विक्रीचे दुकान आहे आणि हा व्यवसाय तो स्वतःच्या उदरनिर्वाहसाठी करतो.
3. विरूध्द पक्ष हे वजन काटा विक्री करणारा दुकानदार आहे. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाकडून दिनांक 07/01/2013 रोजी इलेक्ट्रॉनिक काटा नग 1 मॉडेल AT-1530-Aiwa 30 Kg. रू. 4,500/- ला खरेदी केला. सदरचे बिल पृष्ठ क्र. 10 वर आहे.
4. त्यानंतर तक्रारकर्त्याचा वजनकाटा दिनांक 20/02/2013 रोजी बिघडल्यामुळे तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाला त्याबाबतची सूचना दूरध्वनीद्वारे कळविली. परंतु विरूध्द पक्षाने त्याची दखल घेतली नाही आणि त्यांची वस्तू दुरूस्त करून दिली नाही. अशाप्रकारे विरूध्द पक्ष आपल्या सेवेमध्ये त्रुटी देत आहेत.
5. त्यानंतर तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाला एक पत्र पाठवून वस्तूची दुरूस्ती करून देण्याबद्दल मागणी केली. ते पत्र पृष्ठ क्र. 13 वर दाखल आहे. त्यानंतर पुन्हा तक्रारकर्त्याने वैधमापन शास्त्र यांना सुध्दा एक पत्र पाठविले ते पृष्ठ क्र. 16 वर आहे. तरी सुध्दा विरूध्द पक्षाने त्यांची वस्तू दुरूस्त करून दिली नाही किंवा त्याबाबतची कोणतीही दखल घेतली नाही.
6. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला आवश्यक ती सेवा प्रदान करण्यामध्ये कसूर केल्याने तक्रारकर्त्याने नुकसानभरपाई म्हणून रू. 12,500/- मिळण्यासाठी दिनांक 09/10/2013 रोजी न्याय मंचात तक्रार दाखल केली आहे.
7. तक्रारकर्त्याची तक्रार विद्यमान न्याय मंचाने दिनांक 26/02/2014 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना दिनांक 28/02/2014 रोजी मंचामार्फत नोटीस बजावण्यात आली. विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष यांनी हजर होऊन दिनांक 16/04/2014 रोजी त्यांचा लेखी जबाब दाखल केला. तो पृष्ठ क्र. 22 वर आहे.
8. विरूध्द पक्ष यांनी त्यांच्या लेखी जबाबात तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे खंडन केले असून असे म्हटले आहे की, तक्रारकर्त्याने 30 किला क्षमतेच्या वजनकाट्याची दिनांक 07/01/2013 रोजी रू. 4,500/- इतक्या किमतीत विरूध्द पक्ष यांच्याकडे तोंडी मागणी केली होती आणि त्याआधारे तक्रारकर्त्याने रू. 1,450/- किमतीचा जुना एल. जी. कंपनीचा काटा व रू. 1,050/- रोख दिले होते व रू. 2,000/- दिनांक 16/01/2013 रोजी देण्याचे ठरविले होते. परंतु तक्रारकर्त्याने रू. 2,000/- दिनांक 16/01/2013 रोजी न देता दिनांक 26/01/2013 रोजी दिले. त्यानंतर तक्रारकर्त्याने वजनकाट्यात बिघाड असल्याचे विरूध्द पक्ष यांना सांगितले तेव्हा विरूध्द पक्ष यांनी आपल्या दुकानातील इंजिनिअरला दिनांक 12/02/2013 व 15/02/2013 रोजी तक्रारकर्त्याकडे पाठविले. तेव्हा तक्रारकर्ता एकदा शेतात गेला होता व दुस-यांदा बाहेरगांवी गेलेला होता. विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दूरध्वनीद्वारे कळविले की, वजनकाटा प्रयोगशाळेत घेऊन आल्यावरच पूर्णपणे दुरूस्त होईल. परंतु तक्रारकर्ता वजनकाटा घेऊन प्रयोगशाळेत आला नाही असेही त्यांनी आपल्या लेखी जबाबात म्हटलेले आहे.
9. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत काटा खरेदी बिल क्र. 494 पृष्ठ क्र. 10 वर, काटा खरेदीचे कच्चे बिल पृष्ठ क्र. 11 वर, उर्वरित रक्कम रू. 2,000/- दिल्याची पावती पृष्ठ क्र. 12 वर, विरूध्द पक्ष यांना पाठविलेले रजिस्टर्ड पत्र पृष्ठ क्र. 13 वर, विरूध्द पक्ष यांना पाठविलेल्या पत्राची पोस्टाची पावती पृष्ठ क्र. 14 वर, विरूध्द पक्ष यांना पत्र मिळाल्याची पोचपावती पृष्ठ क्र. 15 वर, वैधमापन शास्त्र विभाग यांना पाठविलेले पत्र पृष्ठ क्र. 16 वर याप्रमाणे कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केलेली आहेत.
10. सदरहू प्रकरणात तक्रारकर्ता किंवा त्यांच्या वतीने युक्तिवादाच्या वेळेस कुणीही हजर झाले नाहीत.
11. विरूध्द पक्ष यांनी आपला लेखी युक्तिवाद दाखल केलेला असून तो पृष्ठ क्र. 33 वर आहे. विरूध्द पक्ष यांनी आपल्या लेखी युक्तिवादात असे म्हटले आहे की, Aiwa 30 Kg. चा वजनकाटा दिनांक 07/01/2013 रोजी रू. 4,500/- मध्ये तक्रारकर्त्याने ऑर्डर केला. ज्यामध्ये तक्रारकर्त्याने रू. 1,450/- मध्ये एक जुना एल. जी. कंपनीचा काटा व रू. 1,050/- नगदी आणि रू. 2,000/- दिनांक 16/01/2013 रोजी देण्याचे ठरविले. परंतु ती रक्कम विरूध्द पक्षाला दिनांक 26/01/2013 रोजी प्राप्त झाली. त्यानंतर तक्रारकर्त्याने वजनकाट्यामध्ये बिघाड असल्याची तक्रार केल्यावर विरूध्द पक्ष यांनी वजनकाट्याच्या दुरूस्तीकरिता दिनांक 12/02/2013 व 15/02/2013 रोजी त्यांच्या इंजिनिअरला तक्रारकर्त्याच्या घरी पाठविले. परंतु तक्रारकर्ता एकदा शेतामध्ये व दुस-यांदा बाहेरगांवी गेल्याचे सांगण्यात आल्याचे त्यांनी आपल्या लेखी युक्तिवादात म्हटले आहे. पुढे त्यांनी आपल्या लेखी युक्तिवादात असेही म्हटले आहे की, काटा इथे आणला तर दुरूस्त करून देतील किंवा आवश्यकता वाटल्यास काटा बदलवून देतील. तसेच वजनकाटा परत करीत असतील तर पैसे कापून उर्वरित रक्कम तक्रारकर्त्याला परत करतील.
12. तक्रारकर्त्याचा तक्रारअर्ज, विरूध्द पक्ष यांचा लेखी जबाब, तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे तसेच विरूध्द पक्ष यांचा लेखी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? | होय |
2. | विरूध्द पक्ष यांनी न्यूनतापूर्ण सेवा दिली आहे काय? | होय |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
13. तक्रारकर्ता हा मौजा फुटाळा, पो. सौंदड, ता. सडक अर्जुनी, जिल्हा गोंदीया येथील रहिवासी असून तो आपले किराणा व धान्य विक्रीचे दुकान स्वतःच्या उपजिविकेकरिता चालवितो आणि तो दारिद्र्य रेषेखालील असल्याबद्दल त्याने ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत यांच्याकडील प्रमाणपत्र सदरहू प्रकरणात दाखल केलेले आहे ते पृष्ठ क्र. 18 वर आहे. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक वजनकाटा मॉडेल AT-1530-Aiwa 30 Kg. रू. 4,500/- इतक्या किमतीत दिनांक 07/01/2013 रोजी खरेदी केला. त्याबद्दलचे बिल पृष्ठ क्र. 10 वर आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरूध्द पक्ष यांचा ग्राहक आहे आणि म्हणून मुद्दा क्र. 1 हा होकारार्थी दर्शविण्यात येतो.
14. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांच्याकडून खरेदी केलेल्या वजनकाट्यामध्ये दिनांक 20/02/2013 रोजी बिघाड (त्रुटी, दोष) आढळून आला. त्याबाबतची माहिती तक्रारकर्त्याने दूरध्वनीद्वारे विरूध्द पक्ष यांना दिली. परंतु विरूध्द पक्ष यांनी त्याची लागलीच दखल घेतली नाही किंवा तो वजनकाटा त्वरित दुरूस्त करून दिलेला नाही. त्यानंतर तक्रारकर्त्याने दिनांक 05/03/2013 रोजी विरूध्द पक्ष यांना पत्र पाठविले. ते पृष्ठ क्र. 13 वर आहे. परंतु विरूध्द पक्ष यांनी त्याकडेही दुर्लक्ष केले आणि तक्रारकर्त्याला कुठल्याही प्रकारची सेवा पुरविली नाही. याउलट विरूध्द पक्षाने आपल्या लेखी जबाबात व युक्तिवादात असे सांगितले की, विरूध्द पक्षाने आपल्या इंजिनिअरला वजनकाटा दुरूस्तीकरिता तक्रारकर्त्याच्या घरी पाठविले, परंतु तक्रारकर्ता घरी नव्हता तसेच वजनकाटा दुरूस्त करून द्यायवास किंवा रक्कम परत करावयास तयार आहेत असे त्यांनी आपल्या युक्तिवादात म्हटले आहे. परंतु संपूर्ण दस्तऐवजावरून आणि विरूध्द पक्ष यांच्या लेखी उत्तरावरून असे दिसून येते की, तक्रारकर्त्याने वेळोवेळी वजनकाटा दुरूस्तीची मागणी केली असतांनाही विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याची मागणी पूर्ण केली नाही. तसेच तक्रारकर्ता हा अपंग असल्यामुळे कुठे बाहेर जाऊ शकत नाही. यावरून असे दिसून येंते की, विरूध्द पक्ष यांनी सर्व प्रकारची टाळाटाळ करून आपल्या सेवेमध्ये न्यूनतापूर्ण अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे.
15. विरूध्द पक्ष यांनी त्यांच्या इंजिनिअरला तक्रारकर्त्याच्या घरी वजनकाटा दुरूस्तीकरिता पाठविले ही बाब सिध्द करण्याकरिता विरूध्द पक्ष यांनी असा कुठलाही पुरावा, इंजिनिअरचे शपथपत्र किंवा कोणतेही दस्तऐवज दाखल केलेले नाहीत. त्यांच्या इंजिनअरला तक्रारकर्त्याच्या घरी पाठविल्याबाबत त्यांनी फक्त तोंडी सांगितले. यावरून असे दिसून येते की, विरूध्द पक्ष यांनी आपल्या सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे. म्हणून मुद्दा क्र. 2 होकारार्थी ठरविण्यात येतो. तक्रारकर्त्याची तक्रार व संपूर्ण दस्तऐवज पाहता तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याकडील सदोष इलेक्ट्रॉनिक वजनकाटा मॉडेल AT-1530-Aiwa 30 Kg. परत घ्यावा व सदर वजनकाट्याची किंमत रू. 4,450/- तक्रारकर्त्याला अदा करावी.
3. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू. 3,000/- तक्रारकर्त्याला द्यावे.
4. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्त्याला रू. 2,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.