::: नि का ल प ञ :::
(आयोगाचे निर्णयान्वये, सौ. कल्पना जांगडे (कुटे), मा. सदस्या,)
(पारीत दिनांक ०७/०७/२०२२)
१. प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा २०१९ चे कलम ३५ अन्वये दाखल केलेली असून तक्रारीचा आशय खालिल प्रमाणेः-
२. तक्रारकत्याने विरुध्द पक्षांकडून दिनांक २९/१०/२०२१ रोजी रुपये २९,७२५/- ला लिथीयम अयन बॅटरी ४८ व्होल्ट ३० एम्पीयर खरेदी केली. तक्रारकर्त्याने पहिल्यांदा बॅटरी बोलावली तेव्हा दिनांक २९/१०/२०१९ रोजी त्यांचे बॅक खाते क्रंमाक ५०१००२२९०४७९१५ मध्ये रुपये १५,३००/- जमा केले परंतू विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास फक्त रुपये ३०००/- ची पावती दिली. तक्रारकर्त्यास बॅटरी मिळाली पंरतू ती चार्जिगला लावल्याबरोबर जळाली त्यामूळे त्यांनी कंपनीसोबत स्वतः बोलणे केले व त्यांचे सुचनेनुसार कंपनीला जळालेली बॅटरी व खराब झालेले चार्जर परत केले. त्यानंतर तक्रारकर्त्यास विरुध्द पक्ष क्रमांक २ यांचे कडून फोन आला की त्यांनी रुपये १४,४२५/-दिले तरच त्यांना बॅटरी व चार्जर मिळेल, त्यामुळे तक्रारकर्त्याने परत दिनांक १६/०१/२०२१ रोजी रुपये १४,४२५/- रक्कम ऑनलाईनव्दारे विरुध्दपक्ष यांचेकडे जमा केली व त्यानंतर विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्यास बॅटरी व चार्जर पाठविले. परंतू पाठविलेली बॅटरी व चार्जर हे सुध्दा निकृष्ट दर्जाचे पाठविल्यामुळे बॅटरी ही दहा मिनीटानंतर लगेच डिस्चार्ज व्हायची त्यामुळे तक्रारकर्त्याची गाडी ही फक्त २ कि.मी. चालायची व बॅटरी संपून जायची. त्यामूळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष यांचे सोबत बोलणे केले पंरतू त्यांचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक १४/०६/२०२१ रोजी विरुध्दपक्ष यांना रजिस्टर पोष्टाने पत्र पाठविले परंतू ते पत्र सुध्दा त्यांनी स्विकार न करता परत केले, म्हणून तक्रारकर्त्याने इमेल व्दारे विरुध्द पक्षांकडे पुन्हा तक्रार केली, त्यावर सुध्दा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तक्रारकर्त्याने उपरोक्त बॅटरी व चार्जर बद्दलची माहिती भद्रावती ग्राहक संघटनेकडे दिली परंतू त्याला सुध्दा विरुध्दपक्ष यांनी प्रतिसाद न देता उलट तुम्हाला जे करायचे आहे ते करा अशी धमकी दिली. सबब तक्रारकर्त्याने आयोगासमोर प्रस्तूत तक्रार दाखल केली असून त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ यांचेकडून लिथीयम आयन बॅटरी ४८ व्होल्ट ३० एम्पीयर ही बॅटरी रुपये २९,७२५/- ला खरेदी केली ती रक्क्म परत मिळावी तसेच विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई रक्कम रुपये २५,०००/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये १०,०००/- विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्त्यास दयावी.
३. तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांना नोटीस काढण्यात आली. विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांना नोटीस प्राप्त होऊन ते आयोगासमक्ष प्रकरणामध्ये उपस्थित न झाल्यामुळे त्यांचे विरुध्द दिनांक १९/०४/२०२२ रोजी निशानी क्रमांक १ वर प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
४. तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार, दस्तावेज तसेच तक्रारीतील मजकूराला तक्रारकर्त्याचे शपथपञ समजण्यात यावे अशी पुरसीस दाखल केली आणि तक्रारकर्त्याचा तोंडी युक्तिवाद यावरुन खालिल मुद्दे आयोगाच्या विचारार्थ घेण्यात आले व त्याबाबतची कारणमीमांसा आणि निष्कर्ष पुढीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे निष्कर्षे
१. तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष क्र. १ व २ यांचे होय
ग्राहक आहेत काय ॽ
२. विरुध्द पक्ष क्र. १ व २ यांनी तक्रारकर्त्याप्रति होय
न्युनतापूर्ण सेवा दिली आहे काय ॽ
३. आदेश काय ॽ अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
मुद्दा क्रमांक १ बाबतः-
५. तक्रारकर्ता यांनी अनुक्रमे दिनांक २९/१०/२०१९ व दिनांक १६/०१/२०२१ रोजी विरुध्द पक्षांकडून तक्रारकर्त्याचे मोपेडकरीता लिथीयम अयन ४८ व्होल्ट ३० एम्पीयर बॅटरी व चार्जर करिता रुपये १५,३००/- विरुध्दपक्ष क्रमांक १ यांचेकडे एचडीएफसी बॅंकेतून जमा केले आणि दुस-यांदा मोबाईलव्दारे ऑनलाईन पेमेंट करुन रक्कम रुपये १४,४२५/- विरुध्दपक्ष क्रमांक २ कडे जमा केले याबाबतची दस्ताऐवज प्रकरणात दाखल केले आहे यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षांचा ग्राहक आहे, हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक २ बाबतः-
६. तक्रार व त्यामधील दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता यांनी पहिल्यांदा विरुध्द पक्षांकडून दिनांक २९/१०/२०१९ रोजी मोपेड करिता घेतलेली उपरोक्त बॅटरी ही चार्जिगला लावल्याबरोबर जळाली त्यामूळे त्यांनी कंपनीसोबत स्वतः बोलणे केले व त्यांचे सुचनेनुसार कंपनीला जळालेली बॅटरी व खराब झालेले चार्जर परत केले. त्यानंतर तक्रारकर्त्यास विरुध्द पक्ष क्रमांक २ यांचे कडून फोन आला की त्यांनी रुपये १४,४२५/- दिले तरच त्यांना बॅटरी व चार्जर मिळेल, त्यामुळे तक्रारकर्त्याने परत दिनांक १६/०१/२०२१ रोजी अतिरिक्त रक्कम रुपये १४,४२५/- ऑनलाईनव्दारे विरुध्दपक्ष यांचेकडे जमा केली व त्यानंतर विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्यास बॅटरी व चार्जर पाठविले परंतु पाठविलेले बॅटरी व चार्जर सुध्दा निकृष्ट दर्जाचे आहे. बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावरही फक्त २ घंटे चालायची व त्यानंतर ती डिस्चार्ज व्हायची अशा प्रकारे फक्त ७ दिवस ती बॅटरी चालली. परंतु विरुध्द पक्षांनी दुस-यांदा पाठविलेली बॅटरी सुध्दा तशीच होती आणि लवकरच डिस्चार्ज होत होती. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांना रजिस्टर्ड पञ पाठविले तसेच दिनांक २१/०९/२०२१ रोजी मेल सुध्दा केला परंतु विरुध्द पक्षांनी त्याला उत्तर दिले नाही. तक्रारकर्त्याने प्रकरणात विरुध्द पक्षांना पाठविलेले पञ, पोस्टाची पावती, मेल ची प्रत दाखल केली आहे. त्यानंतर तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षांविरुध्द भारतीय ग्राहक परिषदेकडे तक्रार केली परंतु विरुध्द पक्षांनी तिथे सुध्दा प्रतिसाद दिला नाही. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास पहिल्यांदा तसेच दुस-यांदा सुध्दा दिलेली बॅटरी व चार्जर ही खराब व निकृष्ट दर्जाचे दिले हे स्पष्ट होते तसेच तक्रारकर्ता यांनी त्यांचेकडे खराब बॅटरी व चार्जरचे पैसे परत मागितल्यावरही दिले नाही तसेच उत्तरही दिले नाही असे करुन विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याप्रति सेवेत न्युनता दर्शविली हे सिध्द होते या निष्कर्षाप्रत आयोग आले आहेत. तक्रारकर्त्याचा आक्षेप विरुध्द पक्षांनी तक्रारीत उपस्थित राहून खोडून काढलेला नाही तसेच आपल्या बचावाचे समर्थनार्थ कोणतेही म्हणणे प्रकरणात दाखल केले नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत वरील बाबींचा विचार करता तक्रारकर्ता हे विरुध्द पक्षांकडून खराब बॅटरी व चार्जर दिल्याने ते बदलवून नवीन मिळण्यास तसेच झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यास पाञ आहे. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक ३ बाबतः-
७. मुद्दा क्रमांक १ व २ च्या विवेंचनावरुन आयोग खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश
- तक्रारकर्त्याची तक्रार क्र. १८९/२०२१ अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांनी वैयक्तिक वा संयुक्तरित्या तक्रारर्त्याला वादातील बॅटरी व चार्जर बदलवून द्यावी व त्याऐवजी दोष नसलेली दुसरी नवीन बॅटरी व चार्जर द्यावे.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांनी वैयक्तिक वा संयुक्तरित्या तक्रारकर्त्याला शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये ५,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- द्यावे.
- उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावेत.