द्वारा-श्रीमती अंजली देशमुख, मा. अध्यक्ष
:- निकालपत्र :-
दिनांक 30 डिसेंबर 2011
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार आणि जाबदेणार यांच्यात घराचे वाढीव बांधकामासंदर्भात दिनांक 24/10/2009 रोजी करार झाला. करारानुसार बांधकामाचा अपेक्षित खर्च रुपये 13,83,860/-ठरला होता. त्यापैकी तक्रारदारांनी वेळोवेळी जाबदेणार यांना 80 टक्के म्हणजेच रुपये 11,15,088/- इतकी रक्कम दिली. घराचे फक्त स्ट्रक्चर उभरले, विटकाम व प्लास्टर अर्धवट ठेऊन निघून गेले. 7 महिने उलटून गेले तरी बांधकाम पूर्ण केले नाही. म्हणून दिनांक 10/6/2010 रोजी तक्रारदारांनी पत्र पाठवून जाबदेणार यांना उर्वरित बांधकाम पूर्ण करण्यास सांगितले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार जाबदेणार त्यांचा मोबाईल बंद ठेवत, घरातील मंडळीं त्यांचा ठावठिकाणा माहित नाही असे सांगत, साईटवर येत नसत, त्यामुळे जाबदेणार यांच्याशी संपर्क साधणे कठीण झाले होते. जाबदेणार यांनी बांधकाम पूर्ण न केल्यामुळे उर्वरित बांधकाम तक्रारदारांनी श्री. पराग लकडे यांच्याकडून पूर्ण करुन घेतले. त्यामुळे श्री. लकडे यांना रुपये 3,44,915/- अदा करावे लागले, ती रक्क्म तसेच इलेक्ट्रिकल, ग्रील, प्लंबर, पेंटर, अॅल्युमिनिअम विंडो व लोखंडी दरवाजे यासर्वांवर एकत्रित रुपये 5,70,987/-खर्च करावा लागला. तसचे टाईल्स, प्लंबींग, सिंक भांडे, ग्रेनाईट, व किरकोळ खर्च एकूण रुपये 2,22,091/- खर्च आला. त्यामुळे एकूण रुपये 7,93,078/- खर्च तक्रारदारांना करावा लागला. तसेच जाबदेणार यांना तक्रारदारांनी रुपये 11,15,088/-अदा केलेले होते. ही रक्कम अधिक रुपये 7,93,078/- एकूण रुपये 19,08,166/- तक्रारदारांना खर्च आला. जाबदेणार यांनी एस्टिमेट रुपये 13,93,860/-दिलेले होते. एस्टिमेट पेक्षा रुपये 5,14,306/- अधिक खर्च आला. जाबदेणार यांनी अर्धवट बांधकाम केल्यामुळे हा खर्च तक्रारदारांना सहन करावा लागला म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रुपये 5,14,306/- व्याजासह, नुकसान भरपाईपोटी रुपये 40,000/- व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांना नोटीस पाठविली असता ती “unclaimed” या पोस्टाच्या शे-यासह परत आली. म्हणून दिनांक 30/6/2011 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. तक्रारदार आणि जाबदेणार यांच्यात दिनांक 24/10/2009 रोजी झालेल्या करारनाम्याची मंचानी पाहणी केली असता आर.सी.सी तसेच सुपर स्ट्रक्चर मटेरिअलसहित बांधकामाचा मटेरिअल व लेबर सहित खर्च रुपये 13,93,860/- नमूद करण्यात आलेला आहे. आर.सी.सी व इतर बांधकामाचे मटेरिअल खडी, सिमेंट, वाळू, स्टिल इ. तसेच लेबर कामासाठी लागणारे साहित्य, हत्यारे जाबदेणारांचे ठरले होते. करारनाम्यात “बांधकामाची पूर्ण जबाबदारी बिल्डरची असेल बांधकाम चांगल्या दर्जाचे मटेरीअल वापरुन बांधकाम सुरु झाल्यापासून 4 महीन्यात पूर्ण करुन देणार ” असे स्पष्ट नमूद करण्यात आल्याचे दिसून येते. कराराखाली उभय पक्षकारांनी स्वाक्षरी केलेली आहे. जाबदेणार यांनी ठरल्याप्रमाणे 4 महिन्यांच्या आत बांधकाम पूर्ण केले नाही, उलट ठरलेल्या रकमेपैकी 80 टक्के रक्कम उचलली व अर्धवट बांधकाम टाकून निघून गेले. म्हणून तक्रारदारांनी जाबदेणार यांना दिनांक 10/6/2010 रोजी, दिनांक 24/6/2010 रोजी पत्रे पाठवून उर्वरित बांधकामाचा तपशिल देऊन बांधकाम पूर्ण करण्यास सांगितल्याचे दाखल पत्रांवरुन दिसून येते. जाबदेणार यांनी नोटीस द्वारे तक्रारदारांच्या पत्रांना उत्तर दिल्याचे दिसून येते. सदर नोटीस मध्ये तक्रारदारांनी प्लास्टरपोटी रुपये 1,39,386/- जाबदेणार यांना देण्याचे ठरले होते. त्यापैकी फक्त रुपये 1,00,000/-तक्रारदारांनी दिल्याचे त्यात नमूद करण्यात आलेले आहे तसेच फरशीच्या कामापोटी जाबदेणार यांनी रुपये 1,39,386/- ची मागणी केल्याचे त्यात नमूद करण्यात आलेले आहे. परंतू या रकमांची मागणी जाबदेणार यांनी तक्रारदारांकडे कधी केली होती, त्यासंदर्भातील पुरावा नोटीस सोबत देण्यात आलेला नाही. तसेच किती काम पूर्ण झाले होते त्यासंदर्भातील पुरावा नोटीस सोबत देण्यात आलेला नाही. याउलट तक्रारदारांकडून जाबदेणार यांनी उचललेल्या रकमेचा पुरावा, बँक स्टेटमेंट तक्रारदारांनी दाखल केलेले आहे. तक्रारदारांनी उर्वरित बांधकाम पूर्ण करुन घेण्यासाठी श्री. पराग लकडे यांना रुपये 3,44,915/- अदा केले. त्यासंदर्भात श्री. पराग लकडे यांनी शपथपत्र दाखल केलेले आहे. सदरहू शपथपत्रात श्री. पराग लकडे यांनी जाबदेणार यांनी केलेल्या कामाची किंमत रुपये 7,50,000/- ते रुपये 8,00,000/- होती असे नमूद केलेले आहे. प्रत्यक्षात जाबदेणार यांनी तक्रारदारांकडून रुपये 11,15,088/- घेतल्याचे दिसून येते. करारात ठरल्याप्रमाणे चार महिन्यांच्या आत जाबदेणार यांनी बांधकाम पूर्ण केले नाही ही बाब स्पष्ट होते. जाबदेणार यांच्या सेवेतील ही त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारदारांनी इलेक्ट्रिकल वर्क, ग्रील वर्क, प्लंबर, रंगकाम, अॅल्युमिनिअम विंडोज व लोखंडी दरवाजे, टाईल्स, प्लंबींग मटेरिअल, ग्रेनाईट खरेदी, सिंक भांडे खरेदी खर्च करावा लागला त्याची बिले/पावत्या दाखल केलेल्या आहेत. यासर्वांवरुन तक्रारदारांना जाबदेणार यांच्याबरोबर ठरलेल्या करारापेक्षा रक्कम रुपये 5,14,306/- अतिरिक्त खर्च करावा लागला हे दिसून येते. जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटींमुळे, बांधकाम अर्धवट सोडून गेल्यामुळे तक्रारदारांना निश्चितच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला असेल असे मंचाचे मत आहे. म्हणून नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 10,000/- जाबदेणार यांनी तक्रारदारांना दयावी असा आदेश देण्यात येत आहे. तक्रारदारांनी नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 40,000/- व कोर्टाचा खर्च रुपये 25,000/- ची केलेली मागणी अवास्तव आहे असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
2. जाबदेणार यांनी तक्रारदारांना रक्कम रुपये 5,14,306/- 9 टक्के व्याजासह दिनांक 29/4/2011 ते संपूर्ण रक्कम तक्रारदारांना प्राप्त होईपर्यन्त आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत करावी.
3. जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 10,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत करावी.
4. जाबदेणार यांनी तक्रारदारांना तक्रारीचा खर्च रुपये 1,000/- अदा करावा.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.