आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. एम. जी. चिलबुले
विरूध्द पक्ष यांनी सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्यामुळे तक्रारकर्त्यांनी सदरहू तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्त्यांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. विरूध्द पक्ष क्रमांक 1 श्री. गंजवार्ड मॉं वैष्णव सेवा समिती यांनी दिनांक 06 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर, 2014 या कालावधीत मॉं वैष्णोदेवी दर्शन सहल आयोजित केली होती व सदर सहलीत सहभागी होणा-या यात्रींना चहा, कॉफी, नास्ता, जेवण, राहण्याची व्यवस्था तसेच हेलीकॉप्टर व्यवस्था आणि रेल्वेने जाणे-येणेची सुविधा/सेवा पुरिवण्याचे आश्वासन दिले होते व त्यासाठी संस्थेच्या नफ्यासह तक्रारकर्ते क्रमांक 1 ते 5 कडून प्रत्येकी रू. 13,000/- आणि तक्रारकर्ते क्रमांक 6 ते 11 कडून प्रत्येकी रू. 19,000/- असे एकूण रू. 1,79,000/- घेतले होते.
3. विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने वरील यात्रेसाठी विरूध्द पक्ष क्रमांक 2 कडून सर्वसुविधांनी युक्त स्पेशल ट्रेन बुक केली होती व त्यासाठी विरूध्द पक्ष क्रमांक 2 ने विरूध्द पक्ष क्रमांक 1 कडून रू. 76,13,850/- घेतले होते आणि दिनांक 05 नोव्हेंबर 2014 रोजी वरील यात्रेसाठी स्पेशल ट्रेन गोंदीया येथे उपलब्ध करून देण्याचे कबूल केले होते.
4. दिनांक 5 नोव्हेंबर, 2014 रोजी विरूध्द पक्ष क्रमांक 2 ने विरूध्द पक्ष क्रमांक 1 च्या मागणीप्रमाणे गोंदीया येथे स्पेशल ट्रेन पाठविली परंतु त्यांत जनरल पॅन्ट्री कार (स्वयंपाकगृह) नव्हते. ट्रेनमध्ये ए. सी. पॅन्ट्रीकार होती परंतु त्यांत जेवण तयार करण्याची सोय नव्हती, फक्त जेवण गरम करता येत होते. त्यामुळे विरूध्द पक्ष क्रमांक 1 यांनी कोणताही पर्याय न स्विकारता यात्रा रद्द केली. सदर यात्रा वेळेवर रद्द केल्याने तक्रारकर्त्यांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास झाला असून विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 हे योग्य सेवा पुरविण्यात असमर्थ ठरल्याने त्यास जबाबदार आहेत.
तक्रारकर्त्यांनी विरूध्द पक्ष क्रमांक 1 कडे दिलेले पैसे परत मागितले असता त्यांनी ते दिले नाही म्हणून दिनांक 25/11/2014 रोजी दोन्ही विरूध्द पक्षांना नोटीस पाठविली. परंतु त्यांनी त्यास उत्तर दिले नाही आणि नोटीसची पूर्तताही केली नाही
तक्रारकर्ते क्रमांक 1 ते 11 हे मंचासमोर एकत्र हजर राहू शकत नाही म्हणून तक्रारकर्ते क्रमांक 2 ते 11 यांनी तक्रारकर्ता क्रमांक 1 उमेश भंवरलाल मालपानी यांना त्यांचे वतीने सदर तक्रार दाखल करण्यासाठी आममुखत्यारपत्र दिले आहे व त्यांनी सर्वांच्या वतीने सदरची तक्रार दाखल केली आहे.
तक्रारकर्त्यांनी तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
1. तक्रारकर्त्यांकडून घेतलेली रक्कम रू. 1,79,000/- द. सा. द. शे. 10% व्याजासह परत करण्याचा विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 विरूध्द आदेश व्हावा.
2. शारीरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू. 1,65,000/- देण्याचा विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 विरूध्द आदेश व्हावा.
5. तक्रारीचे पुष्ठ्यर्थ तक्रारकर्त्यानी विरूध्द पक्षाने दिलेले ओळखपत्र, कायदेशीर नोटीस, पोष्टल पावती, विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्या पोचपावत्या, आममुखत्यारपत्र, Passenger Travel Document, वर्तमानपत्राचे कात्रण इत्यादी दस्तावेज दाखल केले आहेत.
6. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी स्वतंत्र लेखी जबाबाद्वारे तक्रारीस सक्त विरोध केला आहे.
विरूध्द पक्ष क्रमांक 1 चे म्हणणे असे की, तक्रारकर्ता क्रमांक 1 ने तक्रारकर्ता क्रमांक 2 ते 11 साठी जो आममुखत्यारनामा दाखल केला आहे त्यावर अज्ञान तक्रारकर्ता क्रमांक 4 व 5 च्या सह्या आहेत. कायद्याने अज्ञान व्यक्ती असा कोणताही दस्त निष्पादित करू शकत नाही. म्हणून सदर आममुखत्यारनाम्याचा दस्त खोटा व बनावट असल्याने विधीग्राह्य नाही. तसेच सदर दस्त निष्पादित करण्यासाठी कोणतीही व्यक्ती नोटरी श्री. बी. व्ही राजनकर, गोंदीया यांचेसमक्ष हजर झाली नव्हती आणि वास्तवात सदर आममुखत्यारनाम्यावर सह्या देखील केलेल्या नाहीत.
विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने दिनांक 06/11/2014 ते 13/11/2014 या कालावधीत वैष्णोदेवी येथे यात्रा सहल काढण्याचे व त्यासाठी विरूध्द पक्ष क्रमांक 2 कडून स्पेशल ट्रेन मिळविण्याचे प्रस्तावित केले होते ही बाब मान्य केली आहे. परंतु विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने तक्रारीत नमूद केलेल्या सर्व सुविधा यात्रेत सहभागी होणा-या लोकांना देण्याचे कबूल केले होते हे अमान्य केले आहे. तसेच विरूध्द पक्षाने सदर यात्रेसाठी तक्रारकर्त्यांकडून तक्रारीत नमूद केलेली किंवा कोणतीही रक्कम स्विकारली असल्याचे नाकबूल केले आहे. विरूध्द पक्ष क्रमांक 1 आणि तक्रारकर्ते यांचेमध्ये सदर यात्रा खर्चाबाबत पैसे देण्या-घेण्याचा कोणताही व्यवहार झाल्याचे आणि त्यामुळे तक्रारकर्ते व विरूध्द पक्ष यांचेत सेवा विकत घेणारे व सेवादाता असा कोणताही संबंध असल्याचे नाकबूल केले आहे.
विरूध्द पक्ष क्रमांक 1 यांनी वैष्णोदेवी यात्रेसाठी विरूध्द पक्ष क्रमांक 2 कडे स्पेशल ट्रेन बुक केली होती परंतु विरूध्द पक्ष क्रमांक 2 ने सदर ट्रेन मध्ये कराराप्रमाणे पॅन्ट्री कार (स्वयंपाकगृह) पुरविली नाही आणि कराराचा भंग केला म्हणून विरूध्द पक्ष क्रमांक 1 ला यात्रा सहल नेणे शक्य झाले नाही आणि नाईलाजास्तव यात्रा रद्द करावी लागली. तक्रारकर्ते मागणीप्रमाणे कोणतीही दाद मिळण्यास पात्र असल्याचे विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने नाकबूल केले आहे.
विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने लेखी जबाबात पुढे म्हटले आहे की, तक्रारकर्त्यांनी जे ओळखपत्र दाखल केले आहेत ते विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने कधीही निर्गमित केलेले नव्हते तर ते प्रकाश कथरानी आणि नरेश बंग यांनी तक्रारकर्त्यांना दिले होते. तक्रारकर्त्यांपैकी कोणीही विरूध्द पक्ष क्रमांक 1 कडे यात्रेत सामील होण्यासाठी आले नव्हते व त्यांनी विरूध्द पक्ष क्रमांक 1 ला कोणतीही रक्कम दिली नाही म्हणून ते विरूध्द पक्ष क्रमांक 1 चे ग्राहक नाहीत आणि त्यामुळे विरूध्द पक्ष क्रमांक 1 कडून सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार घडण्याचा प्रश्नच उद्भवला नाही.
विरूध्द पक्ष क्रमांक 1 चे पुढे म्हणणे असे की, तक्रारकर्त्यांनी ज्या प्रकाश कथरानी आणि नरेश बंग यांना पैसे दिले व ज्यांनी तक्रारकर्त्यांना ओळखपत्र दिले ते सदर तक्रारीत आवश्यक पक्ष आहेत, परंतु त्यांना सदर तक्रारीत सामील न केल्याने Non-joinder of necessary parties च्या तत्वाने सदर तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. विरूध्द पक्ष क्रमांक 2 ने कराराप्रमाणे स्वयंपाकगृहाची सोय असलेली पॅन्ट्रीकार न पुरविल्यामुळे यात्रा सहल रद्द करावी लागली असल्याने जर तक्रारकर्त्यांना काही शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रास झाला असेल तर त्यास विरूध्द पक्ष क्रमांक 1 जबाबदार ठरत नाही. तक्रारकर्त्यांनी विरूध्द पक्ष यांचेविरूध्द खोटी तक्रार दाखल केली असल्याने ती खारीज करण्याची विनंती केली आहे.
विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने आपल्या कथनाचे पुष्ठ्यर्थ खालील दस्तावेज दाखल केले आहेत.
1. गॅस वितरकाने रेल्वे प्रशासनास दिलेले पत्र (दि. 08/09/2014)
2. स्पेशल ट्रेन तिकीट
3. विरूध्द पक्ष 1 ने रेल्वे प्रशासनास दिलेले पत्र (दि. 06/11/2014)
4. विरूध्द पक्ष 1 ने रेल्वे प्रशासनास दिलेले पत्र (दि. 14/11/2014)
5. श्री. पी. डी. कथरानी यांचे शपथपत्र.
7. विरूध्द पक्ष क्रमांक 2 ने आपल्या लेखी जबाबात नमूद केले आहे की, तक्रारकर्ते व विरूध्द पक्ष क्रमांक 1 मध्ये काय करार झाला व पैशाची काय देवाण-घेवाण झाली याची त्यांना कोणतीही माहिती नाही व त्या व्यवहाराशी विरूध्द पक्ष क्रमांक 2 चा कोणताही संबंध नाही, त्यामुळे तक्रारकर्ते हे विरूध्द पक्ष क्रमांक 2 चे ग्राहक नाहीत. विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने वैष्णोदेवी यात्रेसाठी विरूध्द पक्ष क्रमांक 2 कडे स्पेशल ट्रेन बुक केली होती हे त्यांनी मान्य केले आहे. मात्र विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने मागणी केल्याप्रमाणे स्वयंपाकाची सोय असलेली पॅन्ट्री कार सदर ट्रेनमध्ये उपलब्ध करून देण्याचे विरूध्द पक्ष क्रमांक 2 ने कबूल केल्याचे अमान्य केले आहे. दिनांक 05/11/2014 रोजी विरूध्द पक्ष क्रमांक 2 ने 18 कोचेससह LHB पॅन्ट्रीकार असलेली स्पेशल ट्रेन विरूध्द पक्ष क्रमांक 1 ला उपलब्ध करून दिल्याचे कबूल केले आहे. परंतु नेहमीच्या स्वयंपाकगृहाची सोय असलेल्या पॅन्ट्रीकार ऐवजी LHB पॅन्ट्रीकार पुरविल्यामुळे विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने ट्रेनचे बुकिंग रद्द केल्याचे म्हटले आहे. विरूध्द पक्ष क्रमांक 2 विरूध्द तक्रारीत लावलेले आरोप व केलेली मागणी नाकबूल केलेली आहे. तक्रारकर्त्यांचा विरूध्द पक्ष क्रमांक 2 बरोबर सेवा पुरविण्याचा कोणताही करार नसल्याने ते ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2 (1) (d) प्रमाणे त्यांचे ग्राहक नाहीत, म्हणून त्यांचेविरूध्द सदर तक्रार चालविण्याची मंचाला अधिकारकक्षा नसल्याने तक्रारकर्त्यांची तक्रार खारीज होण्यास पात्र असल्याचे म्हटले आहे. तक्रारकर्ते क्रमांक 2 ते 11 यांनी तक्रार दाखल करण्यासाठी तक्रारकर्ता क्रमांक 1 ला आममुखत्यारपत्र दिल्याचे नाकबूल केले आहे.
8. तक्रारकर्ते व विरूध्द पक्ष यांच्या परस्पर विरोधी कथनांवरून तक्रारीच्या निर्णितीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्ते विरूध्द पक्षांचे ग्राहक आहेत काय? आणि सदर तक्रार चालविण्याची मंचाला अधिकारकक्षा आहे काय? | नाही |
2. | तक्रारकर्ते मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहेत काय? | निष्कर्ष नोंदविण्याची आवश्यकता नाही |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | अंतिम आदेशाप्रमाणे |
- कारणमिमांसा –
9. मुद्दा क्रमांक 1 बाबतः- विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांचा प्रमुख आक्षेप असा की, वैष्णोदेवी यात्रेसाठी तक्रारकर्त्यांकडून त्यांना कोणतीही रक्कम मिळाली नसल्याने व सदर यात्रेसाठी त्यांनी तक्रारकर्त्यांना कोणत्याही सुविधा पुरविण्याचा करार केला नाही म्हणून तक्रारकर्ते व विरूध्द पक्ष यांच्यामध्ये ग्राहक संरक्षण अधिनियमाचे तरतुदीप्रमाणे ग्राहक व सेवादाता असा कोणताही संबंध नसल्याने मंचाला सदरची तक्रार चालविण्याची अधिकारकक्षा नाही.
सदर मुद्दयावर तक्रारकर्त्यांच्या अधिवक्त्यांनी आपल्या युक्तिवादात सांगितले की, विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने 6 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर, 2014 या कालावधीत वैष्णोदेवी यात्रेचे आयोजन केले होते आणि यात्रेकरूंना जाणे-येणे, चहा, नास्ता, दुध, जेवण व राहण्याची सुविधा पुरविण्याचे कबूल केले होते व त्यासाठी गोंदीया येथून यात्रेत सहभागी होणा-या तक्रारकर्ता क्रमांक 1 ते 5 कडून प्रत्येकी रू. 13,000/- आणि कोलकाता येथे राहणा-या तक्रारकर्ता क्रमांक 6 ते 11 कडून प्रत्येकी रू. 19,000/- असे एकूण रू. 1,79,000/- घेतले होते आणि तक्रारकर्त्यांना यात्रेत सामील होण्यासाठी ओळखपत्र दिले होते, ते तक्रारकर्त्यांनी दस्त क्रमांक 1/1 ते 1/11 वर दाखल केले आहेत. सदर यात्रेसाठी विरूध्द पक्ष क्रमांक 2 कडे रू. 76,13,850/- भरून स्पेशल ट्रेन बुक केली होती व ट्रेन दिनांक 05/11/2014 रोजी गोंदीया येथे आली. परंतु त्यात स्वयंपाक करता येईल अशी पॅन्ट्रीकार नसल्याने विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने यात्रा रद्द केली. तक्रारकर्त्यांनी विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 ला दिनांक 25/11/2014 रोजी नोटीस पाठवून दिलेले पैसे परत करण्याची विनंती केली. सदर नोटीसची प्रत दस्त क्रमांक 2 वर, पोष्टाच्या पावत्या दस्त क्रमांक 3 वर आणि पोचपावत्या दस्त क्रमांक 4 व 5 वर दाखल आहेत.
त्यांनी आपल्या युक्तिवादात पुढे सांगितले की, आपल्या प्रतिउत्तरात तक्रारकर्त्यांना ओळखपत्र प्रकाश काथरानी यांनी दिल्याचे स्पष्टपणे नाकारले असून विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने नोटीसला उत्तर न देता स्वतःची जबाबदारी टाळण्यासाठी प्रकाश काथरानीचे खोटे शपथपत्र दाखल केल्याचे व त्यासाठी विरूध्द पक्ष क्रमांक 1 आणि प्रकाश काथरानीवर खोटा दस्तावेज तयार केल्याबद्दल आणि शपथपत्रावर खोटी साक्ष दिल्याबद्दल (Perjury) कारवाईस पात्र असल्याचे शपथपत्रावर म्हटले असल्याने त्यांच्या म्हणण्यावर गैरविश्वास दाखविण्याचे कारण नाही.
याउलट विरूध्द पक्ष क्रमांक 1 च्या अधिवक्त्यांनी आपल्या युक्तिवादात सांगितले की, तक्रारकर्त्यांनी विरूध्द पक्ष 1 ला सदर यात्रेसाठी तक्रारीत नमूद केलेले पैसे दिल्याबद्दल कोणतीही पावती दाखल केली नाही तसेच त्यांच्या कथनाला पुष्टीकारक कोणताही पुरावा नाही. विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने आपल्या लेखी जबाबात तक्रारकर्त्यांकडून विरूध्द पक्ष 1 ला कोणतेही पैसे मिळाले नसल्याचे शपथपत्रावर म्हटले असून तक्रारकर्त्यांनी दाखल केलेले ओळखपत्र देखील विरूध्द पक्ष क्रमाक 1 ने निर्गमित केले नसल्याचे म्हटले आहे. तक्रारकर्त्यांनी सदर ओळखपत्र प्रकाश कथरानी यांचेकडून मिळविल्याचे व त्यापोटी विरूध्द पक्ष क्रमांक 1 ला कोणतेही पैसे मिळाले नसल्याचे म्हटले आहे. प्रकाश कथरानी यांचे शपथपत्र विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने आपल्या कथनाचे पुष्ठ्यर्थ पुरावा म्हणून दाखल केले आहे. त्यात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, विरूध्द पक्ष क्रमांक 1 ही कोणताही नफा न घेता भाविकांसाठी यात्रा सहलीचे आयोजन करते व त्यासाठी आवश्यक असलेली खर्चाचीच रक्कम सहभागी यात्रेकरूंकडून घेते. सदर यात्रेसाठी 125 यात्रेकरूंची नोंदणी व यात्रेदरम्यान व्यवस्थेची जबाबदारी विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने त्यांचेवर सोपविली होती. त्यांचे मित्र नरेश बंग यांनी त्यांचे नातलग असलेले उमेश भंवरलाल मालपानी आणि त्यांचेसोबत 10 यात्रींना सदर यात्रेत सामील करून घेण्याची विनंती केल्याने सदर साक्षीदाराचे कोट्यातून त्यांना यात्रेत सामील करण्यात आले होते व त्यासाठी सदर यात्रींचे नांव, फोटो इत्यादी माहिती ओळखपत्र बनविण्यासाठी नरेश बंग यांनी आणून दिली. त्याप्रमाणे सदर 11 लोकांकडून यात्रेसाठी कोणतीही अनुदान राशी मिळाली नसतांना सदर ओळखपत्र देण्यांत आले असून आजपर्यंत देखील त्यांचेकडून यात्रा खर्चापोटी अनुदान राशी शपथकर्त्यास प्राप्त झाली नसल्याने ती विरूध्द पक्ष क्रमांक 1 श्री. गंजवार्ड मॉं वैष्णोदेवी सेवा समितीला देण्यात आलेली नाही.
विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने सदरचे शपथपत्र लेखी जबाबासोबत दाखल केले असून प्रकाश कथरानी यांना सदर तक्रारीत आवश्यक पक्ष म्हणून सामील केले नसल्याने तक्रार Non-joinder of necessary parties च्या तत्वाने सदर तक्रार खारीज होण्यास पात्र असल्याचे म्हटले असतांना सुध्दा तक्रारकर्त्यांनी प्रकाश कथरानी यांना विरूध्द पक्ष म्हणून जोडले नाही किंवा त्यांची उलट तपासणी घेऊन त्यांचे शपथपत्रातील कथन खोटे असल्याचे सिध्द केले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी विरूध्द पक्ष क्रमांक 1 ला यात्रा खर्चापोटी रू. 1,79,000/- दिल्याचे सिध्द करणारा कोणताही पुरावा नाही व म्हणून तक्रारकर्ते हे ग्राहक संरक्षण अधिनियमाचे कलम 2 (1) (d) प्रमाणे विरूध्द पक्ष क्रमांक 1 चे ग्राहक नसल्याने सदरची तक्रार चालविण्याची मंचाला अधिकारकक्षा नसल्याने तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
विरूध्द पक्ष क्रमांक 2 च्या अधिवक्त्यांनी आपल्या युक्तिवादात सांगितले की, तक्रारकर्ते व विरूध्द पक्ष क्रमांक 2 यांच्यामध्ये रेल्वे ट्रेन पुरविण्याबाबत कोणताही करार नाही आणि त्यासाठी त्यांना तक्रारकर्त्यांकडून कोणतीही रक्कम मिळाली नसल्याने तक्रारकर्ते तक्रारकर्ते हे ग्राहक संरक्षण अधिनियमाचे कलम 2 (1) (d) प्रमाणे विरूध्द पक्ष क्रमांक 1 चे ग्राहक नसल्याने सदरची तक्रार चालविण्याची मंचाला अधिकारकक्षा नाही.
ग्राहक संरक्षण अधिनियमाचे कलम 2 (1) (d) प्रमाणे ग्राहकाची व्याख्या खालीलप्रमाणे आहेः-
2 (1) (d) “Consumer” means any person who…
(i) -
(ii) Hires or avails of any services for a consideration which has been system of deferred payment and includes any beneficiary of such services other than the person who hires or avails of the services for consideration paid or promised, or partly paid and partly promised, or under any system of deferred payment, when such services are availed of with the approval of the first-mentioned person but does not include a person who avails of such services for any commercial purpose.
वरील व्याख्येप्रमाणे ग्राहक म्हणजे ज्यांनी पैसे देऊन सेवा विकत घेतली आहे अशी व्यक्ती.
सदरच्या प्रकरणात तक्रारकर्त्यांनी विरूध्द पक्ष क्रमांक 1 ला वैष्णोदेवी यात्रेसाठी रू. 1,79,000/- दिले असल्याचा दावा केला असला तरी त्याबाबत कोणतीही पावती किंवा अन्य पुष्टीकारक पुरावा सादर केलेला नाही. याउलट विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने ज्या साक्षीदार प्रकाश कथरानीचे शपथपत्र दाखल केले आहे त्यांनी सदर यात्रेसाठी तक्रारकर्त्यांना त्यांनी नरेश बंग यांच्या विनंतीवरून ओळखपत्र दिलेले आहेत मात्र त्यासाठी सहयोग राशीची रक्कम तक्रारकर्त्यांकडून मिळाली नसून ती विरूध्द पक्ष क्रमांक 1 ला दिलेली नसल्याचे म्हटले आहे. लेखी जबाबात विरूध्द पक्षाने सदर बचाव घेऊन देखील तक्रारकर्त्यांनी शपथकर्ता प्रकाश कथरानी यांना विरूध्द पक्ष म्हणून जोडले नाही किंवा त्यास उलट तपासणीसाठी बोलावून त्यांचे शपथपत्रातील म्हणणे खोटे असल्याचे सिध्द केले नाही. म्हणून सदर यात्रेसाठी तक्रारकर्त्यांनी विरूध्द पक्ष क्रमांक 1 ला रू. 1,79,000/- दिल्याबाबत विधीग्राह्य पुरावा उपलब्ध नसल्याने तक्रारकर्ते ग्राहक संरक्षण अधिनियमाचे कलम 2 (1) (d) प्रमाणे विरूध्द पक्ष क्रमांक 1 तसेच विरूध्द पक्ष क्रमांक 2 चे ग्राहक असल्याचे सिध्द होत नाही व म्हणून सदरची तक्रार चालविण्याची मंचाला अधिकारकक्षा नाही. करिता मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्ष नकारार्थी नोंदविला आहे.
10. मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबतः– मुद्दा क्र.1 वरील निष्कर्षाप्रमाणे तक्रारकर्ते हे विरूध्द पक्षांचे ग्राहक असल्याचे सिध्द न झाल्याने सदरची तक्रार चालविण्याची मंचाला अधिकारकक्षा नसल्याने मुद्दा क्र. 2 वर विवेचन करुन त्यावर निष्कर्ष नोंदविण्याची आवश्यकता नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन खालील आदेश पारित करण्यात येत आहे.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्यांची ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 खाली दाखल करण्यात आलेली तक्रार खारीज करण्यात येते.
2. तक्रारीचा खर्च ज्याचा त्याने सोसावा.
3. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.
4. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्यांना परत करावी.