जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –53/2011 तक्रार दाखल तारीख –05/05/2011
सौ.रेखा भ्र.दत्तात्रय लोले
वय 25 वर्षे,धंदा घरकाम ..तक्रारदार
रा.इचलकंरजी ह.मु.वडवणी
द्वारा मोहन दिवटे, राममंदिरा मागे वडवणी
ता.वडवणी जि.बीड
विरुध्द
1. श्री गणेश क्लिनिक,
बीड रोड माजलगांव तर्फे
डॉ.सौ.निर्मला भ्र.आर.बजाज
गणेश क्लिनिक, बीड रोड, माजलगांव
ता.माजलगांव जि.बीड ...सामनेवाला
2. डॉ.आर.बी.बजाज,
रा.बीड रोड,माजलगांव ता.माजलगांव जि.बीड.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.के.यू.शिरोडकर
सामनेवाले क्र.1 व 2 तर्फे :- अँड.एल.आर.बजाज
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
सामनेवाले यांचे श्री गणेश क्लिनिक या नांवाचे क्लिनिक आहे. सामनेवाले क्र.2 हे सामनेवाले क्र.1 यांना वेळोवेळी औषधोपचार देताना मदत करतात.
तक्रारदार इंचलकंरजी येथील रहिवासी आहेत. तिला तिचे विवाहापासून कू.पुजा पि.दत्तात्रय लोले नांवाची मुलगी झाली होती. ती 4-5 वर्षाची होती तिचे व तिचे पतीचे संबंध बिघडल्यामुळे तक्रारदाराला तिचे पतीने मुलगी पुजा सह साडेतिन वर्षापुर्वी माहेरी हाकलून दिले. तेव्हापासून ती पुजासह माहेरी राहत होती. तिला तिचे जिवनात पुजा या मुलीशिवाय काहीही आधार नाही.
दि.04.10.2004 रोजी तक्रारदार तिची मुलगी पुजासह वडवणी जिल्हा बीड येथे तिची बहीण सौ.संगिता गणेश बागडे व मेहुणा गणेश बापूराव बागडे यांना भेटण्यासाठी गेली होती. दूसरे दिवशी पुजाला ताप आल्याने सौ.संगिताला घेऊन सामनेवालेचे दवाखान्यात तपासणीसाठी गेले असता त्यांनी औषध गोळया देऊन परत पाठविले.सामनेवाला यांनी दिलेल्या औषधाने पुजाला फरक पडला नाही. त्यामुळे दि.06.10.2004 रोजी पून्हा पुजाला उपचारासाठी तक्रारदारांनी सामनेवालाकडे नेले.त्यावेळी त्यांनी पुजाला त्यांचे दवाखान्यात भरती करुन घेतले. तक्रारदाराकडील रक्कम रु.5,000/- अँडव्हान्स रक्कम घेतली. सामनेवाला यांनी सांगितलेली औषधे तक्रारदारांनी सामनेवाला यांचे औषधी दुकानात रु.2,000/-ची खरेदी केली. तथापि पुजाचा ताप कमी झाला नाही. तिची प्रकृती जास्तच खालावली, तक्रारदार व तिच्या बहीणीने डॉक्टरला विचारले की, पुजाचे प्रकृतीत सुधारणा न होता प्रकृती खालावत चालली आहे. तिला आम्ही बीडला घेऊन जाण्यास तयार आहोत. सामनेवाला क्र.2 इन्कार केला. सामनेवाला क्र.2 ने सांगितले की, तूम्ही काही काळजी करु नका दोन दिवसांत तूम्हाला फरक जाणवू लागेल. दि.06.10.2004 रोजी दुपारी सामनेवाला क्र.2 ने बजाज मेडीकल मधून तक्रारदाराला इंजेक्शन घेऊन दयावयास सांगितले. त्याप्रमाणे इंजेक्शन खरेदी करुन सामनेवाला क्र.2 यांना दिले. रात्री 10 ते 11 वाजणेचे सुमारास वर असलेल्या त्यांचे घरात गेली, इंजेक्शन दिल्यानंतर थोडयाच वेळात पूजा पाणी पाणी करु लागी, हातपाय मोठयामोठयाने आपटू लागली. त्यावेळी तक्रारदारांनी नर्सला बाईना बोलावण्यास सांगितले. तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 यांना घरी जाऊन सांगितले की पुजाला त्रास होत आहे तिला बघा,त्यावेळी सामनेवाला क्र.2 ने तक्रारदारांना सांगितले की, मी ऐवढया रात्री खाली येत नाही. आताच वर आले आहे, सकाळी पाहते म्हणून निघून गेली. काही वेळाने पुजेची हालचाल बंद पडली, हातपाय थंड पडून लागले.त्यावेळी तक्रारदाराने दवाखान्यातील नर्सला सांगितले, नर्सने पुजाचे हाताला, पायाला हात लावून पाहिले, नाडीला हात लावून पाहिले व सामनेवाला क्र.2 ला बोलावून आणले, त्यांनी पूजाला तपासले त्यावेळी तक्रारदार, तिची बहीण, आई वडील व मेव्हणे हे त्यावेळी घाबरुन गेले होते. सामनेवाला क्र.1 व2 तेथे आले व त्यांनी शांत राहा म्हणून सांगितले. पुजाला आम्ही ऑक्सीजन लावतो म्हणून मधल्या खोलीत नेले. तक्रारदारांनी खोलीत जाण्याचा प्रयत्न केला असता सामनेवाला यांनी त्यांना नकार दिला. सामनेवाला क्र.2 ने नर्सला सांगितले की, पुजाचे केस पेपर घेऊन या म्हणून नर्सने पुजाचे पंलगावरील सर्व केस पेपर घेऊन सामनेवाला क्र.1यांना दिले. सामनेवाला क्र.1 त्यानंतर खोलीतून बाहेर येऊन एका को-या फार्मवर सही मागू लागली, तेव्हा तक्रारदाराला संशय आला की, पुजाला काही तरी झाले असावे म्हणून तक्रारदार व तिचे वडीलांनी कारण विचारले असता सामनेवाला क्र.1 ला उत्तर देता आले नाही. सामनेवाला यांनी चूकीचा औषधउपचार पुजा वरती केला, पुजाला योग्य वेळी योग्य सेवा दिली नाही व सेवा देण्यास कसूर केला. मात्र पुजाला दि.06.10.2004 रोजी भरती करताना फि बददल रु.5,000/- घेतले तरी देखील सामनेवाला यांनी दूर्लक्ष करुन निष्काळजीपणा केला, त्यामुळे पुजाचा मृत्यू झाला. सामनेवाला क्र.1 ने तक्रारदार समक्ष पुजाची हालचाल बंद झाल्यानंतर, व तिचे हातपाय थंड पडल्यानंतर कोणतीही औषधोउपचार न करता तिचे तळपायास इंजेक्शन दिले. तक्रारदार ही अबला स्त्री आहे. तिला तिचा पती नांदवत नाही. तिच्या पुजाशिवाय तिला काहीही जवळचे नाही. तक्रारदारानी पुजाचा खाणपिणे, कपडे इत्यादी खर्च करुन लहानाचे मोठे केले. सामनेवाला यांनी निष्काळजीपणा करुन सेवेत कसूर केल्याने तक्रारदाराचे मानसिक, शारीरिक नूकसान झाले. पुजाचे निधनामूळे तक्रारदार आजारी पडले. त्यामुळे तिचा औषधोपचार रु.5,000/- खर्च करावा लागला. तिला मानसिक वेदना झाल्यामुळै रु.1,00,000/- चे नूकसान झाले. तिच्या वृध्दापकाळामध्ये तिला विचारणार कोणी नाही म्हणून ती त्रासून गेली आहे. भविष्यात अंधार झाला. यामुळे सदर कार्यवाही दाखल करण्यासाठी योग्य ते कागदपत्र दाखल करण्यासाठी प्रकरण दाखल करण्यासाठी रु.,25,000/- खर्च लागला तो मागण्याचा तिला अधिकार आहे. तक्रारदाराचे सर्व मार्गानी मिळून होणा-या नूकसानी बददल रु.4,00,000/- मागण्यास हक्कदार आहेत. तक्रारदाराने नूकसान भरपाईची मागणी केली असता त्यांनी नकार दिला. त्यामुळे कायदेशीर नोटीस पाठवून तरी त्यांनी नूकसान भरपाई तक्रारदाराला दिली नाही. दि.27.4.2005 रोजी सामनेवाला कडे जाऊन तक्रारदाराने विनंती केली आम्हाला कोणताही आधार राहिलेला नाही तथापि, सामनेवाला यांनी स्पष्टपणे इन्कार केला.विनंती की, सामनेवालाकडून तक्रारदारास रु.4,00,000/- नूकसान भरपाई देण्यात यावी, तसेच तक्रारीचा खर्च रु.25,000/- देण्यात यावा.
सामनेवाला यांनी त्यांचा एकत्रित खुलासा दि.11.11.2005 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. क्लिनिक असल्याचे विधान बरोबर आहे. सामनेवाला क्र.2 हे सदर क्लिनिकचे प्रोप्रायटर असून सामनेवाला क्र.1 त्यांना मदत करते. दि.05.10.2004 रोजी मयतास ताप आला होता. त्यासाठी आवश्यक तो औषधोउपचार दिल्यानंतर तक्रारदारांनी तिच्या इच्छेने पेंशटला घरी नेले होते. त्यानंतर त्यांनी सामनेवाला यांना मयताच्या तब्येतीच्या बाबतीत त्या दिवसाला काही कळविले नाही. दि.06.10.2004 रोजी मयताला सामनेवाला यांचे दवाखान्यामध्ये सकाळी 9 वाजता आणले. त्यावेळी तिला ताप होता व वांत्या होत होत्या. तक्रारदारांना त्यावेळी मयतास Intermittent fever एक वर्षापासून असल्याचे व त्याबाबत तिच्यावर बीड येथे उपचार चालू असल्याचे सामनेवाला यांनी सांगितले. त्यानंतर आवश्यक तो औषधोउपचार क्लिनिक मध्ये सूरु करण्यात आला. पेंशटची योग्य ती काळजी तिच्या तापा संदर्भात घेण्यात आली. तिचा ताप त्यादिवशी संध्याकाळी सात वाजेला नियंत्रित झाला. पेंशटचे उपचारासाठी सामनेवाला यांनी इतर अनुभवी आणि जेष्ठ वैद्यकीय व्यावसायिक माजलगांव यांचा सल्ला घेतला आणि त्यांचा परिणाम म्हणून ताप नियंत्रणात आला. संध्याकाळी सात वाजेपर्यत पेंशट शुध्दीवर होता. पेंशटची प्रकृतीत सुधारणा होत होती. म्हणून तक्रारदाराच्या विनंतीवरुन संमतीवरुन पेंशटला रात्रीला क्लिनिकमध्ये ठेवण्यात आले. मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास दि.04.10.2004 रोजी पेंशटची प्रकृती खालावत गेली आणि त्यावेळी जेष्ठ वैद्यकीय व्यावसायीक यांना सामनेवाला यांनी बोलावले, त्यांचा सल्ला घेतला अशा त-हेने सामनेवाला यांनी पूर्ण काळजी आणि परिश्रम घेऊन आवश्यक ते उपचार केलेले आहेत. परंतु पेंशटच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही.उलटपक्षी आवश्यक तो उपचार केल्यानंतर पेंशटची तब्येत आणखी खालावली.सदर उपचाराला पेंशटने कोणताही प्रतिसाद दिला नाही. शेवटी पेंशटचा मृत्यू झाला. सदरचा मृत्यू हा सामनेवाला यांचे निकाष्ळजीपणामुळें किंवा चूकीच्या उपचारामुळे झालेला नाही.
तक्रारदारांनी रक्कम रु.5,000/- सामनेवालाकडे जमा केले हे चूकीचे विधान आहे. तसेच रक्कम रु.2,000/-ची औषधी विकत घेतली हे विधान चूकीचे आहे.सामनेवाला यांचे स्वतःचे आक्षेपित औषधाचे दूकान नाही.
त्यादिवशी आक्षेपित महिला नर्स हजर नव्हती. तसेच तक्रारदारांनी पेंशटला बीड येथे नेण्यासाठी विनंती केल्याचे विधान खोटे आहे. सदरची तक्रार ही तक्रारदारांनी असद हेतूने पैसे उकळण्यासाठी सामनेवाला यांचे विरुध्द दाखल केली आहे.सामनेवाला यांनी पेंशट वरती उपचार करताना पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. आवश्यक ते उपचार वेळोवेळी केलेले आहेत. पेंशट अत्यंत अशक्त होती. तिने औषधांना प्रतिसाद दिला नाही. पेंशटला क्रोनिक फिव्हर असल्याचा इतिहास होता. तो ताप कमी जास्त होत होता. तक्रारदारांनी उपचारासाठी सहमती दिली. सामनेवाला यांचे उपचारावर विश्वास दाखवला म्हणून पेंशटचा योग्य निदानासाठी मेंदूचा सिटीस्कॅन करण्याचा सल्ला सामनेवाला यांनी दिला होता.त्यानुसार उपचार तापाच्या चढउतारावर करायचा होता. परंतु तक्रारदारांनी सदर सल्लाला योग्य तो प्रतिसाद दिला नाही.उलट विनंती केली की, त्यांचे स्तरावरुन त्यांनी उपचार करावा.
सामनेवाला क्र.2 हे पात्रताधारक वैद्यकीय व्यावसायीक आहेत. त्यांनी एम.बी.बी.एस. चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर वैद्यकीय व्यवसायास माजलगांव येथे खाजगी क्लिनिक द्वारे गणेश क्लिनिक नांवाच्या क्लिनिक द्वारे 1977 पासून वैद्यकीय व्यवसाय सूरु केला आहे.सामनेवालाकडे जास्त अनूभव आणि कौशल्य आहे.सामनेवाला यांचे क्लिनिक आणि राहते घर एकाच ठिकाणी आहे.मदतीसाठी किंवा सल्ल्यासाठी सामनेवाला यांनी इतर वैद्यकीय व्यावसायीक क्रोनिक पेंशंटच्या वेगवेगळया आजारासाठी बोलावले व त्यांची मदत व मार्गदर्शन घेतात.तसेच त्यांचे कामाबददल व त्यांचे कौशल्याबदद्ल वैद्यकीय अधिकारी सरकारी दवाखानामध्ये असलेले यांनी सुध्दा प्रशंसा केलेली आहे. सामनेवाला क्र.1 हे वैद्यकीय व्यावसायीक आहेत त्यांनी त्यांचा वैद्यकीय अभ्यासक्रम बीएससी (ओ.टी) शासकीय वैद्यकीय कॉलेज आणि दवाखाना नागपूर येथे पूर्ण केलेले आहे. तसेच त्यांनी डि.एच.एम.एस. ही पदवी 1980 मध्ये घेतलेली आहे.तेव्हापासून त्या सामनेवाला क्र.2 बरोबर वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. त्यांना वैद्यकीय क्षेत्राचा चांगला अनुभव आहे. तक्रार खर्चासह रदद् करण्यात यावी आणि सामनेवाले यांना रक्कम रु.10,000/- खर्च मिळावा
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्र, तक्रारदाराचे शपथपत्र, तक्रारदाराचे साक्षीदार वडील मोहन ज्योतीराव दिवटे यांचे शपथपत्र, तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद, सामनेवाले यांचा खुलासा, शपथपत्र, दाखल कागदपत्र, सामनेवाले यांचे साक्षीदार डॉ.रामप्रसाद गणेशलाल कलंत्री वैद्यकीय व्यावसायीक माजलगांव यांचे शपथपत्र, सामनेवाले यांचा लेखी युक्तीवाद यांचे सखोल वाचन केले.
सदरची तक्रार दि.4.6.2005 रोजी दाखल झाली होती. ती दि.14.6.2006 रोजी प्रथमतःनिकाली होऊन रद्द करण्यात आली होती. सदर निकालाचे विरुध्द तक्रारदारांनी प्रथम अपिल नंबर 1293/06 चे दि.24.6.2006 रोजी अपिल दाखल केले होते.सदरचे अपिल दि.4.3.2011 रोजी निकाली झाले व त्यानुसार सदरची तक्रार ही फेर चौकशीसाठी पून्हा बोर्डावर दि.05.05.2011 रोजी घेण्यात आली.
या संदर्भात तक्रारदारांना त्यांचा पुरावा देण्यासाठी पुरेसा वेळ संधी न दिल्यांचे मुददयावर सदरची तक्रार फेर चौकशीसाठी न्यायमंचात आली. या संदर्भात तक्रारदारांना त्यांचा पुरावा देण्याबददल सांगितले असता.तक्रारदारांनी त्यांचा पुरावा म्हणून वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय माजलगांव यांचे दि.27.9.2006 रोजीचा निष्कर्ष अहवालाची प्रमाणित प्रत दाखल केली व त्यानंतर तिचे स्वःतचे त्या संदर्भात शपथपत्र दिलेले आहे. सामनेवाला यांनी या संदर्भात त्यांचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. लेखी यूक्तीवाद दिलेला आहे.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता सामनेवालाच्या क्लिनिक मध्ये तक्रारदाराची मुलगी पुजा दि.04.10.2004 रोजी ताप आल्याने औषधोपचारासाठी नेले असता सामनेवाला यांनी पुजास औषधी लिहून दिले. त्यानंतर दि.06.10.2004 रोजी पुजाला वरील औषधीचा फरक न पडल्याने सामनेवालाकडे नेले असता सामनेवाला यांनी क्लिनिकमध्ये पुजाला भरती करुन घेतले व तिचेवर औषधउपचार केले असता संध्याकाळी सात वाजता तिचा ताप केली झाला होता व तिला पूढील उपचारासाठी दवाखान्यात ठेवण्यात आले होते. रात्रीला तक्रारीतील विधानाप्रमाणे सामनेवाला क्र.2 हिने अंदाजे 10-11 वाजणेच्या सुमारास इंजेक्शन देऊन त्यावरती गेल्यानंतर थोडयाच वेळात पुजा पाणी पाणी करुन लागली व हातपाय मोठयाने आपटू लागली. त्यावेळी तक्रारदाराने नर्सला मॅडमला बोलावण्यासाठी सांगितले, तक्रारदार स्वतः सामनेवाला क्र.1 यांना भेटून पुजाला खुप त्रास होत असल्याबददल सांगितले परंतु सामनेवाला क्र.2ने तक्रारदारांना एवढया रात्री ते खाली येत नाहीत,सकाळी पाहू म्हणून त्या निघून गेल्या. काही वेळाने पुजेची हालचाल बंद पडली, हातपाय थंड पडू लागले. तक्रारदाराने नर्सला सांगितले. नर्सने पुजाला हात लावून पाहिले व सामनेवाला क्र.2 ला बोलावून आणले. त्यांनी पुजेला तपासले व ऑक्सीजन लावतो म्हणून पुजाला मधल्या खोलीत घेऊन गेले. तसेच त्यावेळी सामनेवाला क्र.2 ने नर्सकडून पूजेचे केस पेपर मागवून घेतले. त्यानंतर थोडयाच वेळात पुजाचा मृत्यू झाला. सदरच्या मृत्यू हा सामनेवाला यांचे निष्काळजीपणामुळे झाला असल्याची तक्रारदाराची तक्रार आहे. पूजेची हालचाल बंद झाल्यावरही तिचे हातपाय थंड पडू लागले, तरी औषधोउपचार न करता तिच्या हातपायात इंजेक्शन दिले.
या संदर्भात सामनेवाला यांनी वरील सर्व आक्षेप नाकारलेले आहेत.पुजा पेंशटला सामनेवाला यांनी त्यांचे अनुभवातून व कौशल्यातून योग्य उपचार केलेले आहेत. तसेच जेष्ठ वैद्य व्यावसायीक यांची मदत व सल्ला घेतलेला आहे. या संदर्भात साक्षीदार म्हणून सामनेवाला यांनी डॉ.रामप्रसाद कलंत्री यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे.
वरील सर्व आक्षेप व खुलासा विचारात घेता सामनेवाला यांनी त्यांचे खुलाशात त्यांचा अनुभवाप्रमाणे व कौशल्याप्रमाणे उपचार केल्याचे म्हटले आहे परंतु पेंशट पुजावर त्यांनी त्यांचे क्लिनिकमध्ये भरती केल्यापासून काय काय उपचार केले यांचा किंवा तपशिल नमुद केलेला नाही. तसेच खुलाशामध्ये जेष्ठ वैद्यकीय व्यावसायीक यांनी रात्री 1 वाजता बोलाविण्यात आले त्यांचा सल्ला घेण्यात आला असे विधान खुलाशात केलेले आहे व त्या सोबत वरीलप्रमाणे साक्षीदार म्हणून डॉ.कंलत्री यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे. परंतु सामनेवाला यांनी दाखल केलेल्या तथाकथित केस पेपरमध्ये डॉ. कंलत्री यांनी बोलावले बददलचा कोणतीही नोंद नाही. तसेच डॉ.कंलत्री यांना केव्हा बोलावण्यात आले व त्यांनी पेंशटला किती वाजता पाहिले या बाबत त्यांचे शपथपत्रात उल्लेख नाही. या संदर्भात त्यांचे शपथपत्र मोघम स्वरुपाचे आहे. त्यांचे शपथपत्रामध्ये डॉक्टरांनी काय काय उपचार केल्याचा खुलासा नाही. एक तज्ञ व अनुभवी डॉक्टर म्हणून त्यांचे शपथपत्रात वरील बाबी असणे आवश्यक आहे. परंतु या संदर्भात सदरचे शपथपत्र हे अत्यंत मोघम स्वरुपाचे आहे. सदर शपथपत्रामध्ये दिनांक नमूद केलेली आहे परंतु किती वाजता त्यांनी पेंशटला पाहिले किंवा त्यांचेवर उपचार केल्याचे कागदपत्र पाहिले या बाबतच्या नोंदी तथाकथित केस पेपर वरती नाही. तक्रारदार मुळातच सामनेवाला क्र.2 यांनी पेंशट पुजाचे कागदपत्र तिला मधल्या खोलीत नेले त्यावेळी मागून घेतल्याचे विधान करीत आहे.तसेच मागणी करुनही तक्रारदारांना उपचाराची कागदपत्र देण्यात आलेली नाहीत. सामनेवाला यांचे क्लिनिक असल्याकारणाने सामनेवाला यांनी पेंशटला भरती केल्यानंतर त्यांला डिसचार्ज होईपर्यतचे सर्व कागदपत्र पेंशंटला देण्याची त्यांची जबाबदारी असतानाही पेशंटचा तो हक्क अधिकार असताना सामनेवाला यांनी सदरची जबाबदारी त्यांचे वैद्यकीय कायदयातील तरतुदीनुसार पार पाडली नाही व तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब स्पस्ट होते.
तसेच पेंशट पुजावर निश्चितपणे सामनेवाला यांनी काय काय उपचार केले व ते वैद्यकीय दृष्टीकोनातून व सामनेवाला यांचे कौशल्यातून व अनुभवातून कसे योग्य होते हे सर्व सांगण्याची जबाबदारी उपचार करणारे डॉक्टर या नात्याने सामनेवाले यांची आहे परंतु या बाबत सामनेवाला यांनी खुलासा अत्यंत त्रोटक आहे. इंजेक्शन दिले, औषधोउपचार केले, कोणते इंजेक्शन किती प्रमाणात दिले या बाबतचा खुलासा उपचार करणारे डॉक्टर प्रथमतः सांगू शकतात व त्यांचे केलेले उपचार वैद्यक शास्त्राप्रमाणे योग्य आहे किंवा नाही या संदर्भात अथवा निष्काळजीपणाचे संदर्भात तक्रारदाराकडून तज्ञ डॉक्टरांचा पुरावा अपेक्षित असतो परंतु उपचार करणारे डॉक्टर स्वतःच सर्व बाबी उघड करीत नाहीत अशा परिस्थितीत तक्रारदाराकडून निष्काळजीपणावर तज्ञ पुराव्याची अपेक्षा करणे चूकीचे ठरते.
तसेच यां संदर्भात तक्रारदाराने वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय माजलगांव यांचा निष्कर्ष अहवाल दि.27.09.2006 रोजीचा दाखल केलेला आहे.सदरचा अहवाल डॉ.एस.ए.साबळे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय माजलगांव यांनी दिलेला आहे. सदरच्या अहवालाचे अवलोकन केले असता ते खालील प्रमाणे,
1. केस पेपर मृत्यूनंतर तयार केलेले वाटते.
2. योग्य वेळी रुग्णास बालरोग तज्ञाकडे पाठविले असते तर कदाचित प्राण वाचू शकले असते असे करण्यासाठी पुरेसा वेळ होता.
3. रुग्ण गंभीर असतांना देखील त्याला वाचविण्यासाठी योग्य ते प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही.
4. केस पेपरवर लिहीलेला औषधोपचार उदा. इंजेक्शन रुग्णास दिले किंवा कसे या बाबत शंका वाटते.
5. प्रकृती गंभीर असल्याबददल नातेवाईकांना लेखी माहीती दिली नाही तशी नोंद नाही.
6. एकंदरीत रुग्णाच्या उपचारामध्ये निष्काळजीपणा झाल्याचे वाटते.
वरील निष्कर्षाचे संदर्भात सामनेवाला यांनी त्यांचे लेखी यूक्तीवादात हरकती नोंदविल्या आहेत. सदरचा अहवाल हा व्यावसायीक आकसापोटी देण्यात आलेला आहे. त्यामुळे सदरचा अहवाल हा तज्ञाचा अहवाल होऊ शकत नाही तेव्हा त्यांस तज्ञाचा अहवाल म्हणता येणार नाही.
तसेच सदर प्रकरणात पेंशट पुजाचा मृत्यू झाल्यानंतर तिचे शवविच्छेदन झालेले आहे व शवविच्छेदन अहवालात तिच्या मृत्यूचे निदान हे राखीव ठेवण्यात आले व तिचा व्हिसेरा रासायनिक प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आला होता त्यांचा अहवाल दि.28.03.2005 रोजीचा सामनेवाला यांनी त्यांचे खुलाशा सोबत दाखल केलेला आहे. सदर अहवालानुसार नि.1,2,3,4 व 5 यामध्ये कोणतेही विष आढळून आले नाही.
यावरुन सामनेवाला यांनी सदर अहवालाचा हवाला देत त्यांचे उपचारात कोणताही निष्काळजीपणा त्यांनी केलेला नाही किंवा त्यांचेकडून झालेला नाही असे यूक्तीवादात नमूद केलेले आहे.
या संदर्भात सदरचा रासायनिक प्रयोगशाळेचा अहवाल हा केवळ वर नमूद केलेल्या निशान्यामध्ये विष नसल्या बाबतचा आहे, निश्चितपणे सामनेवाला यांनी दिलेल्या औषधेउपचारामुळे किंवा इंजेक्शनमुळे पेंशटला विषबाधा झाली अशी मुळात तक्रारदाराची तक्रार नाही किंवा विषामुळे पेंशटलचा मृत्यू झाला अशीही तक्रार नाही. सदर अहवालातील निष्कर्षाचा आणि पेंशटवरील उपचाराचे संदर्भात निष्काळजीपणा या दोन्ही बाबी स्वतंत्र आहे. त्यांचा एकमेकांशी दुरान्वये संबंध नाही. सदरचा अहवाल सामनेवाला यांचे फारसा फायदयाचा नाही. मुळात सामनेवाला यांनी केलेले उपचार हा स्पष्टपणे खुलाशात व शपथपत्रात नमूद करणे आवश्यक होते. वरीलप्रमाणे त्या संदर्भात नसल्याकारणाने सामनेवाला यांचा सदरचा मूददा याठिकाणी विचारात घेणे उचित होणार नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
सामनेवाला यांनी सदर अहवाल दाखल झाल्यानंतर संबंधीत डॉ.साबळे यांची उलटतपासणी घेतली नाही. त्यांनी निश्चितपणे सदरचा अहवाल हा खुलाशानंतर दाखल झाला असल्याने खुलाशात त्या संदर्भात काही हरकती नसल्या तरी त्यांना सदर अहवालास आव्हान देण्यासाठी उलट तपासणी करण्याची तरतुद किंवा या संदर्भात त्यांना प्रश्न उत्तरे स्वरुपात माहीती मागण्याची तरतुद कायदयात असतानाही त्याप्रमाणे सदर अहवालाला कोणतेही आव्हान दिलेले नाही. त्यामुळे सामनेवाला यांचे वरील हरकत याठिकाणी ग्राहय धरणे उचित होणार नाही असे न्यायमंचाचे मत आहे. वैद्यकीय आकसातून अहवाल दिलेला आहे. या संदर्भात सामनेवाला इतरही पुरावा देऊ शकत होते. परंतु त्या बाबतचा सामनेवाला यांच्या शब्दापलीकडे दूसरा पुरावा नाही. वरील सर्व कारणाचा गांभियपूर्व विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदारांना त्यांचे ज्ञानाचा, अनुभवाचा कौशल्याचा पुरेपूर वापर करुन उपचार केले ही बाब स्पष्ट होत नाही म्हणजेच सामनेवाला यांनी पेंशट पुजास उपचार करताना निष्काळजीपणा केला व त्यातूनच तिचा मृत्यू झाल्याची बाब स्पष्ट होते. मृत्यूच्या नूकसानीची व मानसिक त्रासाची एकत्रित रक्कम रु.1,00,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु.5,000/- सामनेवाला यांनी एकत्रित देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
तक्रारदारानी खालील न्यायनिवाडयाचा आधार घेतलेला आहे.
1. Supreme court, CJ-2010-2-1498, MINOR MARGHESH K. PARIKH Vs. DR.MAYUR H.MEHTA
Consumer Protection Act, 1986, S.19-In our view, the National Commission was duty bound to pay serious attention on the respondents failure to produce the case papers for 6 long years and called upon him to explain why the record pertaining to the treatment given to the appellant was held back from the State Commission till the complainants evidence was virtually over. Equally intriguing was respondents failure to file affidavit of Dr.Chaudasama to whom he claims to have taken the appellant for treatment. These omissions on the part of the National Commission are extremely serious and have resulted in failure of justice.
सामनेवाला यांनी खालील न्याय निर्णयाचा आधार घेतलेला आहे.
1. 2004 एनसीजे पेज क्रमांक 37 (एनसी) के.एस.भाटीया विरुध्द जीवन हॉस्पीटल यात मे.राष्ट्रीय आयोगाने नमूद केले आहे की,
In case of Medical Negligence, specific act of negligence has to be alleged and then proved as to how that amounts to negligence.
As per settled law on the subject complainant has to alleged which action of the opponent was not as per accepted medical practice. What was done which should not have been done and which has to be supported by expert evidence or medical literature on this subject.
2. 2004 एनसीजे पेज क्रमांक 595 (एनसी) इंद्रजीतसिंग विरुध्द डॉ.जगजीतसिंग
An ultrasound scan report by an M.B,B.S. Doctor cannot be treated as report of an expert.
3. 2004 एनसीजे पेज क्रमांक 27 (एनसी) मिसेस ओ. आयेश बी विरुध्द प्रोफेसर जे.आर. डॅनिअल
Medical Negligence : No report of any doctor or Medical Literature to substantiate the avernment of negligence filed when several opportunities given – complaint not admitted for hearing as Medical negligence- not proved – No deficiency.
वरील सर्व न्यायनिर्णयाचे सखोल वाचन केले असता सदरचा तक्रारदाराचा न्यायनिवाडा हा तक्रारदाराच्या म्हणण्याचे समर्थनार्थ लागू होतो व सामनेवाला यांचे न्यायनिवाडे हे निकालातील
विवेचनानुसार सामनेवाला यांचे समर्थनार्थ लागू होत नाही असे न्यायमंच नम्रपणे नमुद करीत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1. अर्जदाराचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. सामनेवाला क्र.1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदाराला मृत्यूच्या नूकसानीची व मानसिक त्रासाची एकत्रित रक्कम रु.1,00,000/-(अक्षरी रुपये एक लाख फक्त ) व त्यावर दि.04.06.2005 पासून निकाल तारीख 04.10.2011 पर्यत 7 टक्के व्याज आदेश प्राप्तीपासून 30 दिवसाचे आंत अदा करावेत.
3. सामनेवाला क्र.1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, वरील रक्कम वरील मूदतीत न दिल्यास द.सा.द.शे.7 टक्के व्याज प्रमाणे दयावेत.
4. सामनेवाला क्र.1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारीचा खर्च रु.5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त ) तक्रारदारांना आदेश प्राप्तीपासून 30 दिवसाचे आंत दयावेत.
5. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील
सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड