::: आ दे श :::
( पारीत दिनांक :13.07.2016 )
आदरणीय सदस्या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार
सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, दाखल करण्यात आली असून थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
विरुध्दपक्षाने दिलेल्या जाहीरातीवरुन तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाची भेट घेतली त्यावेळी विरुध्दपक्षा मार्फत द्रोण बनविण्याचा उद्योग विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास सुचविला व त्याकरिता लागणारे साहीत्य व मशिन देण्याचे, तसेच तयार केलेला माल विकत घेण्याचे आश्वासन विरुध्दपक्षाने दिले. त्यानुसार तक्रारकर्त्याने दि. 12/12/2013 रोजी ॲटोमेटीक डबल डायल मशिन बुक केली व त्यानंतर दि. 1/1/2014 रोजी रु. 30,000/- ॲडव्हाँस जमा केले. या बाबतची पावती विरुध्दपक्षाने देवून मशिन बुक केल्यापासून 11 दिवसात मिळेल, असे सांगितले. परंतु विरुध्दपक्षाने मशिन वेळेत दिली नाही. त्यानंतर दि. 22/1/2014 रोजी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे एकूण किंमत दोना पेपरसह रु. 67,000/- जमा केले व त्याची पावती विरुध्दपक्षाने दिली. त्यानंतर विरुध्दपक्षाने सदरहू मशिन तक्रारकर्त्याच्या घरी लावून दिली. सदर मशिन मधुन माल काढण्यास सुरुवात केली असता, सदर मशिन बंद पडली. त्यावेळेस विरुध्दपक्ष यांनी मशिन दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला,परंतु मशिन दुरुस्त झाली नाही. तक्रारकर्त्याच्या असे लक्षात आले की, सदर मशिन जुनाट आहे. अशा प्रकारे विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याची फसवणुक केली, विरुध्दपक्षाने सदर मशिन बदलून द्यावयास पाहीजे होती, किंवा त्याची किंमत परत करावयास पाहीजे होती, परंतु तसे न केल्यामुळे तक्रारकर्त्याच्या वडीलांनी जिल्हा पोलिस अधिक्षक अकोला यांच्याकडे दि. 14/7/2014 रोजी लेखी तक्रार दिली.त्यावेळी विरुध्दपक्ष व तक्रारकर्त्याचे वडील यांच्यामध्ये समझोता होऊन विरुध्दपक्षाने कबुल केले की, दिवाळी 2014 नंतर केवळ 60,000/- परत करतील.परंतु सदरहू रक्कम आजपर्यंत तक्रारकर्त्याला मिळालेली नाही. दि. 10/3/2015 रोजी तक्रारकर्त्याकडे असलेला माल व सदरहू मशिन दुरुस्तीसाठी विरुध्दपक्षाकडे दिलेली आहे. अशा प्रकारे विरुध्दपक्षाने सेवा देण्यास न्युनता दर्शविली व म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात यावी व मशिनची किंमत रु. 67,000/- व अग्रीम रक्कम रु. 30,000/- तक्रारकर्त्यास विरुध्दपक्षाकडून परत मिळावी, नुकसान भरपाईपोटी रु. 2,70,000/- मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु. 20,000/- नोटीसचा खर्च रु. 900/- व सदरहू तक्रारीचा खर्च रु. 10,000/- विरुध्दपक्षाकडून मिळावा.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 07 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष यांचा लेखीजवाब :-
2. विरुध्दपक्ष यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल केला, त्याचा थोडक्यात आशय असा…
विरुध्दपक्षांनी तक्रारीत केलेले आरोप नाकबुल करुन असे नमुद केले की, विरुध्दपक्ष व तक्रारर्ते यांच्यामध्ये समझोता होऊन तक्रारकर्त्यास रु. 60,000/- देण्याचे ठरले व त्या प्रमाणे विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास रु. 10,000/-, रु. 15,000/-, रु. 5,000/- व रु. 20,000/- अनुक्रमे दि. 12/1/2015, 24/1/2015, 27/1/2015, व दि. 10/3/2015 रोजी दिलेले आहेत. समझोता झाल्यानंतर तक्रारकर्त्यास सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करण्यास कोणतेही कारण नाही. मशिन परत घेऊन पैसे परत दिल्यानंतर तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांच्या मध्ये कुठलाही संबंध राहत नाही. तक्रारकर्त्याने जी वस्तु घेतली आहे ती स्वत:च्या उपयोगाकरिता न घेता ती व्यावहारीक उपयोगासाठी घेण्यात आली होती. त्यामुळे तक्रारकर्ता हा ग्राहकाच्या परिभाषे येत नाही. तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार चुकीची आहे. त्यामुळे ती खारीज करण्यात यावी.
3. त्यानंतर तक्रारकर्त्याने प्रतिउत्तर व लेखी युक्तीवाद दाखल केले तसेच विरुध्दपक्षाने शपथेवर साक्ष पुरावा व लेखी युक्तीवाद दाखल केला
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. सदर प्रकरणात उभय पक्षांनी दाखल केलेले दस्त, उभय पक्षांचा लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन करुन काढलेल्या निष्कर्षाचा अंतीम आदेशाचे वेळी विचार करण्यात आला.
- प्रकरणात दाखल दस्तांवरुन तक्रारकर्ते हे विरुध्दपक्षाचे ग्राहक असल्याचे दिसून येत असल्याने तक्रारकर्ते विरुध्दपक्षाचे ग्राहक असल्याचे ग्राह्य धरण्यात येते.
- दाखल दस्त व उभय पक्षांचा लेखी युक्तीवादाचे काळजीपुर्वक अवलोकन केल्यावर मंचाच्या असे निदर्शनास आले की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडून पेपर द्रोण बनवण्यासाठी मशीन दोन पेपरसह दि. 22/1/2014 रोजी रु. 67,000/- ला विकत घेतली. परंतु सदर मशीन नवीन असल्याचे भासवून विरुध्दपक्षाने जुनी मशीन तक्रारकर्त्याला विकली. त्यामुळे त्यात वारंवार बिघाड झाल्यामुळे तक्रारकर्त्याने ती मशीन विरुध्दपक्षाला दि. 11/6/2014 रोजी परत नेवून दिली. त्यामुळे तक्रारकर्त्याने सर्व नुकसान भरपाईसह मशिनची किंमत रु. 67,000/- व तक्रारकर्त्याने दिलेली अग्रीम रक्कम रु. 30,000:- ची मागणी केलेली आहे. परंतु सदर प्रकरणात नोटीस मिळाल्यावर विरुध्दपक्षाने हजर राहून जबाब दाखल केल्यावर काही गोष्टींचा, ज्या तक्रारकर्त्याने त्याच्या तक्रारीत नमुद केल्या नव्हत्या, त्याचा खुलासा झाला. तक्रारकर्त्याने पोलिस कम्प्लेंट केल्यावर विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला रु. 60,000/- सन 2014 च्या दिवाळीनंतर परत करतो असे लिहून दिल्यामळे, आपसी समझोत्यानुसार सदर तक्रार तक्रारकर्त्याने मागे घेतली (पृष्ठ क्र. 44) उभयपक्षात झालेल्या समझोत्यानुसार दि. 12/1/2015 ला रु. 10,000/-, दि. 24/1/2015 ला रु. 15,000/-, दि. 27/1/2015 ला रु. 5,000/- व दि. 10/3/2015 ला रु. 20,000/- विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला नगदी दिल्याचे व त्यावर तक्रारकर्त्याने स्वाक्षरी केल्याचे दिसून येते (पृष्ठ क्र. 45). सदर बाब तक्रारकर्त्याने प्रतिउत्तरात व लेखी युक्तीवादात केवळ नाकारली आहे. परंतु विरुध्दपक्षाचे कथन चुकीचे असल्याचे सबळ पुराव्यासह सिध्द केलेले नाही. त्यामुळे पृष्ठ क्र. 45 वरील दाखल नोंदीनुसार विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला रक्क्म दिल्याचे ग्राह्य धरण्यात येते. पृष्ठ क्र. 45 वरील नोंदीनुसार विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला केवळ रु.50,000/- दिल्याचे दिसून येते. परंतु दि. 2/9/2014 च्या उभय पक्षातील समझोत्यानुसार विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला रु. 60,000/- देण्याचे कबुल केले होते (पृष्ठ क्र.44) त्यामुळे विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला संपुर्ण रक्कम दिली आहे, असे विरुध्दपक्षाचे म्हणणे मंचाला ग्राह्य धरता येणार नाही. त्याच प्रमाणे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाशी व्यवहार केला, त्यावेळी विरुध्दपक्षाचे असलेले पार्टनर श्री कैलाश सोनाजी रायबोले व उमेश अनमोल यांचे विरुध्दही पोलिस कम्प्लेंट केली होती. झालेल्या समझोत्यानुसार श्री कैलाश रायबोले यांनी रु. 50,000/- स्वत:च्या जबाबदारीवर फेडल्याचे त्यांनी तक्रारकर्त्याने पाठवलेल्या नोटीसीला उत्तर देतांना स्पष्टपणे नमुद केले आहे. तसेच श्री रायबोले यांनी विरुध्दपक्षा बरोबरचा व्यवसाय दि. 1/6/2015 ला सोडून दिल्याचे व उर्वरित रक्कम रु. 10,000/- श्री महेश फुलचंद गुप्ता यांचेकडून घेण्याची माहीती तक्रारकर्त्याला ज्ञात असल्याचेही सदर नोटीसीच्या उत्तरात नमुद केलेले आहे (पृष्ठ क्र. 28) सदर नोटीसचे उत्तर दि. 7/8/2015 रोजी श्री रायबोले यांनी तकारकर्त्याला पाठविलेले दिसून येते. तरीही दि. 10/9/2015 रोजी तक्रारकर्त्याने श्री. रायाबोले यांच्या विरुध्द याच मंचासमोर तक्रार दाखल केली होती. सदर तक्रार प्राथमिक युक्तीवादाच्या वेळी तांत्रिक मुद्दयावर, तक्रारकर्त्याला सदर तक्रार पुनश्च सादर करण्याची मुभा देऊन निकाली काढण्यात आली होती. त्यानंतर दि. 1/10/2015 रोजी तक्रारकर्त्याने श्री महेश फुलचंद गुप्ता यांना संचालक या नात्याने प्रकरणात विरुध्दपक्ष केले व श्री रायबोले यांच्याशी झालेला संपुर्ण आर्थिक व्यवहार व पत्र व्यवहाराचा या तक्रारीत चकार उल्लेखही केला नाही, त्यामुळे तक्रारकर्ता सुध्दा मंचासमोर स्वच्छ हाताने आला नसल्याने तक्रारकर्त्याची उत्पन्नाच्या नुकसानीची मागणी व संपुर्ण रकमेवर 18 % व्याजाची मागणी मंचाला मान्य करता येणार नाही. मात्र विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला सन 2014 च्या दिवाळीनंतर संपुर्ण रक्कम रु. 60,000/- देण्याचे मान्य करुनही संपुर्ण रक्कम तक्रारकर्त्याला प्रकरण दाखल करेपर्यंत दिली नसल्याने तकारकर्ता विरुध्दपक्षाकडून उर्वरित रु. 10,000/- प्रकरण दाखल तारखेपासून प्रत्यक्ष अदाई तारखेपर्यंत द.सा.द.शे. 8 टक्के व्याजासह मिळण्यास तसेच शारीरिक, आर्थिक व मानसिक नुकसान भरपाईपोटी रु. 3000/- व प्रकरणाचा खर्च रु. 2000/- मिळण्यास पात्र असल्याच्या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे.
सबब अंतीम आदेश खालील प्रमाणे
- तक्रारकर्ता त्याची अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
- विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला आपसी समझोत्यातील उर्वरित रक्कम रु. 10,000/- ( रुपये दहा हजार ) प्रकरण दाखल तारखेपासून प्रत्यक्ष रक्कम अदाई तारखेपर्यंत द.सा.द.शे. 8 टक्के व्याजासह द्यावी.
- विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास मानसिक, आर्थिक व शारीरिक नुकसान भरपाईपोटी रु. 3000/- (रुपये तिन हजार) व प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 2000/- (रुपये दोन हजार) द्यावे.
- सदर आदेशाची पुर्तता निकालाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आंत करावी.
- सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या.