::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 30/06/2020)
1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्ती नागपूर येथे राहत असल्यामुळे तसेच कौटुंबिक कारणांमुळे तिला प्रत्येक तारखेला न्यायमंचा समक्ष येणे शक्य नसल्यामुळे तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार ही मुखत्यारा मार्फत दाखल केली आहे. विरुद्ध पक्ष क्रमांक 1 व 2विरुद्ध पक्ष क्रमांक 3ह्यांचे भागीदार आहेत. विरुद्ध पक्ष यांनी चंद्रपूर बिझनेस सेंटर या नावाने व्यापारी संकुलाचे बांधकाम करणार असल्याचे सांगितल्याने तक्रारकर्ती हीने विरुद्ध पक्षांचेकडून सदर संकुलामध्ये इन बेसमेंट मजल्यावरील गाळा क्रमांक 6,बांधकाम आराजी 178. 25 चौरस फुट, एकूण रक्कम रु. 17,50,000/- मध्ये विकत घेण्याकरिता तयार झाली व त्या करिता तक्रारकर्तिने दिनांक 27 /02 /2014 रोजी रुपये 4,37,500/- विरुद्ध पक्ष यांना दिले. विरुद्ध पक्षांनी तक्रारकर्तीला दिनांक 27/2/2014 रोजी विक्रीचा करारनामा करून दिला व 18 महिन्यात म्हणजे ऑगस्ट 2015 पर्यंत इमारतीचे बांधकाम पूर्ण करून विक्री करून देण्याचे कबूल केले.तक्रारकर्तीने विरुद्ध पक्षांचे मागणीनुसार त्यांना दिनांक 09/04/2014 रोजी कन्यका नागरी सहकारी बँक चंद्रपूर यांचेकडून कर्ज घेऊन सदर रु. 4,37, 500/- क्रमांक 002422 चा असलेला विरुद्ध पक्ष यांना दिला. असे तक्रारकर्तीने एप्रिल 2014 पर्यंत सदर गळ्याच्या मोबदल्यात रक्कम म्हणून रुपये 8,75000/- विरुद्ध पक्ष यांना दिली. तक्रारकर्ती ही उर्वरित मोबदला रक्कम देण्यास पूर्वीही तयार होती परंतु विरुद्ध पक्ष यांनी कराराप्रमाणे मुदतीत इमारतीचे बांधकाम केले नाही व आजही इमारतीचे बांधकाम अपूर्ण असून बंद असल्याने तक्रारकर्तीने उर्वरित मोबदल्याची रक्कम देण्याचे थांबविले. तक्रारकर्तीने विरुद्ध पक्ष क्रमांक 1व 2यांना गाळा क्रमांक 6 चे बांधकाम पूर्ण करून विक्रीपत्र करून देण्याची विनंती केली असता त्यांनी महानगरपालिका अडचणी, भागीदारांमध्ये भांडण सुरू आहेत, मार्केटमध्ये बंदी आहे इत्याथवदी अडचणीमुळे बांधकाम थांबले असून लवकरच बांधकाम पूर्ण करून विक्रीपत्र करून देऊ अशी हमी दिली. दिनांक 20/5/2018 रोजी तक्रारकर्ती विरुद्ध पक्ष क्रमांक 1व त्यांचा मुलगा रोहन यांना भेटले असताभागीदारांमध्ये भांडणे सुरू असल्याने विक्रीपत्र करून देणे शक्य नाही असे सांगितले. त्यामुळे तक्रारकर्तीने दिनांक 25.5.2018 रोजी अधिवक्ताश्री अमर बनकर यांचेमार्फत विरुद्ध पक्ष यांना नोटीस पाठवून बांधकाम पूर्ण करून गाळ क्रमांक 6 चे विक्रीपत्र करून देण्याची मागणी केली. विरुद्ध पक्ष यांना सदर नोटीस प्राप्त होऊन सुद्धा त्यांनी पूर्तता केली नाही. तक्रारकर्तीस माहिती पडले की विरुद्ध पक्ष यांनी सदर गाळा क्रमांक 6 हा दुसऱ्या ग्राहकाला विकलेला आहे. विरुद्ध पक्ष यांनी उर्वरित रक्कम स्वीकारून तक्रारकर्तीस विक्री पत्र करून दिले नाही. सबब विरुद्ध पक्ष यांचे विरुद्ध मंचासमक्ष तक्रार दाखल करून त्यामध्ये अशी मागणी केली की विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्तीस दिनांक 27/02/2014 रोजी च्या करारानुसार बेसमेंट मधील गाळा क्रमांक 6 बांधकाम आराजी 178.25 चौरस फूट चे विक्रीपत्र बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र सह करून द्यावे विरुद्ध पक्षांनी तक्रारकर्तीकडून दिनांक 01/04/2014 पासून घेतलेली मोबदला रक्कम रुपये 8,75,000/- चा वापर केला असल्यामुळे तक्रारकर्तीस विक्रीपत्र करून मिळेपर्यंत त्यावर 18 टक्के व्याज द्यावे नुकसान भरपाई दाखल रुपये 1 लाख व तक्रार खर्च रुपये 25000/- विरुद्ध पक्षांनी तक्रारकर्तीला द्यावा असे आदेश पारीत करण्यांत यावेत अशी विनंती केली.
3. तक्रारकर्तीची तक्रार स्विकृत करुन विरूद्धपक्षांविरुध्द नोटीस काढण्यात आले. मात्र विरुद्धध पक्ष क्रमांक 2यांना पाठविलेला नोटीस घेण्यास नकार या शेर्यासह परत आला. तर विरुद्ध पक्ष क्रमांक 1 व 3 यांना ट्रॅक रिपोर्टनुसार नोटीस प्राप्त झाली. मात्र अशा पद्धतीने नोटीस बजावण्यात येऊनही विरुद्ध पक्ष क्रमांक1 ते 3 हे मंचा समक्ष अनुपस्थित राहिले व त्यांनी कोणताही बचाव प्रस्तुत केला नाही. त्यामुळे मंचाने दिनांक 24/09/2019 रोजी निशाणी क्रमांक 1वर विरुद्ध पक्ष क्रमांक 1 ते 3 यांचेविरुद्ध प्रकरण एकतर्फा चालविण्यात यावे असा आदेश पारित केला.
4. तक्रारकर्तीची तक्रार, दस्तावेज, शपथपत्र, लेखी आणी तोंडी युक्तिवाद यावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ती विरूध्द पक्षांची ग्राहक आहे काय ? होय
2) विरूध्दपक्षांनी तक्रारकर्तीप्रती न्युनतापूर्ण सेवा दिली
आहे काय ? : होय
3) तक्रारकर्ती मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे
काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्र.1 बाबत :-
5. तक्राकर्तीने विरुद्ध पक्ष यांचे मालकीचे सर्वे क्रमांक 72/2 मौजे वडगाव तहसील व जिल्हा चंद्रपूर येथील मालमत्तेवर "चंद्रपूर बिझनेस सेंटर" या प्रस्तावित व्यापारी संकुलातील तळघर (basement floor) मधील गाळा क्रमांक6 आराजी 178.25 चौरस फूट एकूण रक्कम रुपये 17, 50,000/- मध्ये खरेदी करण्याचा विरुद्ध पक्षांच्या सोबत करार केल्याचे निशाणी क्रमांक 4 वरदस्त क्र.1वर दाखल उभय पक्षातील करारनाम्यारून सिद्ध होते. त्यामुळे तक्राकर्ती ही विरुद्ध पक्षांची ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 2(1)( डी) अन्वये ग्राहक आहे हि बाब सिद्ध होते. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्र.2 बाबत :-
6. तक्रारकर्ती व विरूध्द पक्षांमध्ये गाळा क्रमांक 6 चे विक्रीबाबत 27/2/2014 रोजी करारनामा झाला असून सदर करारनाम्यामध्ये अट क्रमांक 1 मध्ये तक्रारकर्ती कडून सदर गाळ्याच्या किमतीच्या रक्कमेपैकी इसाऱ्याची रक्कम रुपये 4,37,500/- विरुद्ध पक्षांना प्राप्त झाल्याचे नमूद आहे. तसेच तक्रारकर्तीने दिनांक 09/ 04/ 2014 रोजी श्री कन्यका नागरी बँकेच्या धनादेश क्रमांक 2422 द्वारे रुपये4,37,500/- विरुद्ध पक्ष क्रमांक 3यांना ट्रान्सफर केल्याची नोंद आहे. तक्रारकर्तीने सदर करारनाम्याची प्रत, बँकेच्या बचत खाते पुस्तिकेची नक्कल प्रत निशाणी क्रमांक 4वरील दस्त क्रमांक 1व 2वर दाखल केलेली आहेत. यावरून तक्रारकर्तीने विरुद्ध पक्षांकडे सदर गाळा क्रमांक 6 चे किमतीचे रकमे पैकी एकूण रक्कम रुपये 8,75,000/- जमा केल्याचे निदर्शनास येते. करारनाम्यानुसार विरुद्ध पक्षांनी उपरोक्त गाळा क्रमांक 6 चे विक्रीपत्र करारनामा झाल्यापासून 18 महिनेचे आत करण्याचे निश्चित केलेले आहे. विरुद्ध पक्षांना तक्रारकर्तीकडून सदर गाळ्याच्या किमती पोटी बहुतांश रक्कम मिळालेली सुद्धा आहे. विरुद्ध पक्षांमध्ये काही व्यवहारामुळे आपसी विवाद उत्पन्न झाले असले तरी देखील सदर विवादाचा प्रस्तुत व्यवहाराशी कोणताही प्रत्यक्ष संबंध नाही. तक्रारकर्तीने गाळा क्रमांक 6 चे एकूण किमती पैकी बहुतांश रक्कम चुकती केली परंतु विरुद्ध पक्ष यांनी करारनाम्यानुसार मुदतीत इमारतीचे बांधकाम केले नाही व बांधकाम न केल्याने तक्रारकर्तीने उर्वरित मोबदला रक्कम देण्याचे थांबविले. तक्रारकर्तीने सदर गाळ्याचे एकूण किमती पैकी काही रक्कम चुकती केली असून इमारतीचे बांधकाम 3महिन्याच्या आत पूर्ण करून विक्रीपत्र करून देण्याबाबत तिने विरुद्ध पक्षांना नोटीस देखील पाठविली. सदर नोटीस व पोस्टाच्या पावत्या दस्त क्रमांक अ-3 ते -7 वर दाखल आहेत असे असून सुद्धा विरुद्ध पक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी सदर गाळ्याचे विक्रीपत्र तक्रारकर्तीला करून न देऊन तक्रारकर्ती प्रति त्रुटीपूर्ण सेवा दिलेली आहे हे सिद्ध होते. याशिवाय विरुद्ध पक्षांनी तक्रारीत उपस्थित राहून आपले बचावा पुष्ट्यर्थ काही दाखल केलेले नाही व तक्रारकर्तीचे कथन सुद्धा खोडून काढले नाही.
7. अशा परिस्थितीत तक्रारकर्ती ही विरुद्ध पक्षांचेकडून तिने सदर गाळा क्रमांक 6करिता जमा केलेली रक्कम व्याजासह परत मिळण्यास तसेच झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क.2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्र. 3 बाबत :-
8. मुद्दा क्र. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्तीची तक्रार क्र.51/2019 अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरूध्द पक्ष 1 ते 3 यांनी वैयक्तिक वा संयुक्तरीत्या, तक्रारकर्तीला, तिने गाळा क्रमांक 6 चे किमती पोटी जमा केलेली रक्कम रू. 8,75,000/- त्यावर आदेशाचे दिनांक पासून रक्कम अदा होईपर्यंत द. सा. द. शे. 9% प्रमाणे व्याजासह परत करावी.
(3) विरूध्द पक्ष 1 ते 3 यांनी वैयक्तिक वा संयुक्तरीत्या, तक्रारकर्तीला शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रक्कम रू.10,000/- व तक्रार खर्च रू.5,000/ द्यावा.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. कीर्ती वैदय (गाडगीळ))(श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.