Final Order / Judgement | ::: नि का ल प ञ ::: (आयोगाचे निर्णयान्वये, सौ. कल्पना जांगडे (कुटे), मा. सदस्या,) (पारीत दिनांक ०१/११/२०२२) - प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा, कलम १२ अन्वये दाखल केली असून तक्रारीचा थोडक्यात आशय खालिलप्रमाणे.
- तक्रारकर्ता हा चंद्रपूर येथील रहिवासी असून व्यवसायाने डॉक्टर आहे. विरुध्द पक्ष चंद्रपूर कार्यालयाव्दारे मालमत्ता विकत घेऊन फ्लॅट विक्रीचा व बांधून देण्याचा व्यवसाय करतो. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष यांचे कडून मौजा मानेवाडा, नागपूर सर्व्हे क्रमांक ६२/१, ६८/१, शिट क्रमांक ३९९/४४,४७९/४ सिटी सर्व्हे क्रमांक ५८९, एकूण आराजी ३७,७८९.०० चौरस मीटर पैकी प्लॉट क्रमांक २०-ऐ, क्षेञफळ २७० चौरस मीटर स्थित शांतीराज अपार्टमेंट मधील फ्लॅट क्रमांक ४०१ (चवथा माळा) बिल्टअप एरिया ७६.७६.४३४ चौरस मीटर, १४.३४ अविभक्त फ्लॅट मधिल मालकी हक्कसह ही मालमत्ता एकूण रुपये २५,००,०००/- मध्ये विकत घेण्याचा दिनांक १८/१२/२०१८ रोजी सौदा केला व करारापोटी मोबदला रक्कम रुपये १५,००,०००/- साक्षीदारासमक्ष विरुध्द पक्ष यांना नगदी दिले व विक्रीची तारीख दिनांक ०२/०३/२०१९ रोजी निश्चीत केली. करारनाम्याप्रमाणे तक्रारकर्त्यास निश्चीत तारखेला किंवा त्यापूर्वी उपरोक्त फ्लॅट क्रमांक ४०१ ची विक्री करुन देणार होते. त्यानंतर कराराप्रमाणे मुदत संपल्यानंतर तक्रारकर्ता यांनी पंजिबध्द विक्रीपञ करुण घेण्याकरिता वारंवार व्यक्तीशः व फोन व्दारे विरुध्द पक्ष यांना विनंती केली. करारनाम्यानुसार प्रमुख शर्ती व अटीपैकी प्रमुख अट ही होती की करारनामा झाल्यापासुन दिनांक २/३/२०१९ चे आत विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचे हक्कात व अधिकारात वरील उल्लेखीत फ्लॅटचे पंजिबध्द विक्रीपञ करुन फ्लॅटचा कब्जा द्यावयास पाहिजे होता. परंतु विरुध्द पक्ष यांनी वारंवार काहीना काही कारणे सांगून पंजिबध्द विक्रीपञ करण्याकरिता टाळाटाळ केली. त्यानंतर विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास विक्रीपञ एक- दोन महिण्यांत करुन देतो असे म्हटले व मे २०१९ मध्ये रुपये ४,००,०००/- ची मागणी केली. तक्रारकर्त्याने ही रक्कम सुध्दा विरुध्द पक्षास नगदी दिली परंतु विरुध्द पक्षाने रक्कम दिल्याबाबत पावती तक्रारकर्त्याला नंतर देतो असे सांगितले. तक्रारकर्ता हा वेळोवेळी विरुध्द पक्षाच्या कार्यालयात जाऊन विनंती करीत होता परंतु विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या विनंतीकडे लक्ष दिले नाही. विरुध्द पक्षाने कराराप्रमाणे फ्लॅटचे विक्री करण्यास जाणूनबुजून टाळाटाळ केली. विरुध्द पक्षाने कराराप्रमाणे तक्रारकर्त्यास फ्लॅट चा ताबा न देऊन व फ्लॅटचे पंजिबध्द विक्रीपञ न करुन सेवेत न्युनता निर्माण केली असल्यामुळे शेवटी तक्रारकर्त्याने वकीलामार्फत दिनांक १७/०६/२०१९ रोजी अधिवक्ता मार्फत नोंदणीकृत पंजिबध्द डाकव्दारे कायदेशीर नोटीस पाठविले परंतु विरुध्द पक्षाने नोटीसची दखल घेतली नाही. त्यानंतर तक्रारकर्त्याने पुन्हा अधिवक्ता मार्फत दिनांक १५/१२/२०२० रोजी विरुध्द पक्षास नोटीस पाठविली परंतु विरुध्द पक्षास नोटीस प्राप्त होऊन सुध्दा नोटीसचे पालन केले नाही व उत्तर सुध्दा दिले नाही त्यामुळे तक्रारकर्त्याने आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास कराराप्रमाणे फ्लॅट चे एक महिण्याच्या आंत पजीबध्द विक्रीपञ करुन द्यावे असा आदेश पारित करण्यात यावा अथवा यदाकदाचित काही कारणास्तव विरुध्द पक्ष कराराप्रमाणे फ्लॅटचे विक्रीपञ करुन देण्यास असमर्थ असणार तेव्हा विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडून फ्लॅटपोटी घेतलेली संपूर्ण रक्कम घेतलेल्या तारखेपासून ती अदा होईपावेतो त्यावर द.सा.द.शे. २४ टक्के प्रमाणे व्याज आकारुन तक्रारकर्त्यास परत करण्याचा आदेश पारित करण्यात यावा. तसेच झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी रक्कम रुपये ५०,०००/- व तक्रारीचा खर्च रक्कम रुपये १०,०००/- देण्याचे आदेशित व्हावे.
- तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन विरुध्द पक्ष यांना आयोगामार्फत नोटीस काढण्यात आले. विरुध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यावर त्यांचे मार्फत अधिवक्ता हजर होऊन त्यांनी लेखी उत्तर दाखल करण्यास वेळ देण्याबाबतचा अर्ज दाखल केला होता परंतु त्यानंतर विरुध्द पक्ष यांनी आयोगासमक्ष हजर होऊन त्यांचे लेखी उत्तर दाखल केले नाही करिता प्रकरण विरुध्द पक्ष यांचे लेखी उत्तराशिवाय पुढे चालविण्याचा आदेश दिनांक ४/८/२०२२ रोजी पारित करण्यात आला.
- तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार, दस्तावेज, तक्रार व दस्तावेज यांना तक्रारकर्त्याचे शपथपञ समजण्यात यावे अशी पुरसिस दाखल, तक्रारकर्त्याचा तोंडी युक्तीवाद यावरुन खालिल मुद्दे आयोगाच्या विचारार्थ घेण्यात आले व त्याबाबतची कारणमीमांसा आणि निष्कर्ष पुढीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे निष्कर्षे १. तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष यांचा ग्राहक आहे कायॽ होय २. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याप्रति न्युनतापूर्ण सेवा दिली होय आहे कायॽ ३. आदेश कायॽ अंतिम आदेशाप्रमाणे कारणमीमांसा मुद्दा क्रमांक १ बाबतः- - तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांचेकडून मौजा मानेवाडा, नागपूर सर्व्हे क्रमांक ६२/१, ६८/१, शिट क्रमांक ३९९/४४,४७९/४ सिटी सर्व्हे क्रमांक ५८९, एकूण आराजी ३७७८९.०० चौरस मीटर पैकी प्लॉट क्रमांक २०-ऐ, क्षेञफळ २७० चौरस मीटरवर स्थित शांतीराज अपार्टमेंट मधील फ्लॅट क्रमांक ४०१ (चवथा माळा) बिल्डअप एरिया ७६.७६.४३४ चौरस मीटर, १४.३४ अविभक्त प्लॉट मधील मालकी हक्कासह एकूण रक्कम रुपये २५,००,०००/- मध्ये खरेदी करण्याचा विरुध्द पक्षासोबत दिनांक १८/१२/२०१८ रोजी करार केला व कराराच्या दिवशी तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला फ्लॅट खरेदी किमंतीपोटी रक्कम रुपये १५,००,०००/- दिले. सदर करारनामा तक्रारकर्त्याने प्रकरणात निशानी क्रमांक ४ सोबत दस्त क्रमांक अ-१ वर दाखल केलेला आहे. यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे, हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक २ बाबतः- - उभयपक्षांमध्ये उपरोक्त शांतीराज अपार्टमेंट मधील अपार्टमेंट क्रमांक ४०१ (चवथा माळा) खरेदी करण्याकरिता दिनांक १८/१२/२०१८ रोजी झालेल्या करारनाम्यातील अट क्रमांक ३ मध्ये अपार्टमेंट चे पंजिबध्द विक्रीपञ करण्याची मुदत २/३/२०१९ ठरली व निश्चीत तारखेला किंवा त्यापूर्वी तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला विक्रीच्या ठरलेल्या मोबदला रकमेपैकी रुपये १०,००,०००/- देवून पंजिबध्द विक्रीपञ करुन घ्यावे असे नमूद आहे. तक्रारकर्त्याने आपले तक्रारीत कथन केले की, विरुध्द पक्षाचे मागणीनुसार तक्रारकर्त्याने मे २०१९ मध्ये रक्कम रुपये ४,००,०००/- त्यांना नगदी दिले व ती रक्कम बुलढाणा अर्बन बॅंक, चंद्रपूर मधून मुलाच्या व पत्नीच्या खात्यातून काढून विरुध्द पक्षास दिले व त्याबाबत पासबुकची नक्कल प्रत प्रकरणात दाखल केली परंतु यावरुन तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास रुपये ४,००,०००/- दिल्याचे स्पष्ट होत नाही. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास मे-२०१९ मध्ये रुपये ४,००,०००/- दिले होते ही बाब कोणताही दस्ताऐवज/पुरावा दाखल करुन सिध्द केली नाही त्यामुळे ग्राहय धरणे योग्य नाही. तक्रारकर्त्याने दिनांक १८/१२/२०१८ रोजी करारनाम्याचे दिवशी विरुध्द पक्षास रुपये १५,००,०००/- दिले होते व ते त्यांना मिळाल्याचे विसारपञामध्ये सुध्दा अट क्रमांक २ मध्ये नमूद आहे यावरुन तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास उपरोक्त फ्लॅटचे खरेदीपोटी मोबदला रक्कम फक्त रुपये १५,००,०००/-दिले होते हे स्पष्ट होते व उर्वरित मोबदला रक्कम देऊन पंजिबध्द विक्रीपञ करुन घेण्यास तयार होता हे सुध्दा दाखल नोटीस/दस्तऐवजावरुन स्पष्ट होते. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास उर्वरित मोबदला रक्कम घेऊन सदनिका क्रमांक ४०१ चे पंजिबध्द विक्रीपञ करुन दिले नाही त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास अनुक्रमे दिनांक १७/०६/२०१९ व दिनांक १५/१२/२०२० रोजी अधिवक्तामार्फत पंजिबध्द डाकेने पोचपावतीसह अशा दोन नोटीस पाठवून उपरोक्त सदनिका क्रमांक ४०१ चे उर्वरित मोबदला रक्कम घेऊन पंजिबध्द विक्रीपञ करुन देण्याची मागणी केली. परंतू नोटीस प्राप्त होऊन सुध्दा विरुध्द पक्षाने सदर नोटीसमधील मागणीची पुर्तता केली नाही तसेच नोटीसला उत्तर सुध्दा दिले नाही. तक्रारकर्त्याने सदर दोन्ही नोटीस, पोस्टाच्या पावत्या व पोच पावत्या प्रकरणात दस्त क्रमांक अ-३ ते अ-८ वर दाखल केलेल्या आहेत. यावरुन तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास मोबदला रक्कम रुपये १५,००,०००/- दिले व उर्वरित मोबदला रक्कम देण्यासही तयार होते व आहे परंतु विरुध्द पक्षाने उर्वरित मोबदला रक्कम घेऊन करारनाम्यानुसार तसेच नोटीसव्दारे विरुध्द पक्षाकडे पंजिबध्द विक्रीपञ करुन देण्याची मागणी केल्यानंतरही त्यांनी उपरोक्त सदनिका क्रमांक ४०१ चे पंजिबध्द विक्रीपञ तक्रारकर्त्यास करुन दिले नाही व विरुध्दपक्षाने उपरोक्त सदनिकाचे पंजिबध्द विक्रीपञ करुन न देऊन वा घेतलेली मोबदला रक्कमही परत न करुन तक्रारकर्त्याप्रति ञुटीपूर्ण सेवा दिलेली आहे हे सिध्द होते या निष्कर्षाप्रत आयोग आलेले आहे. याशिवाय विरुध्द पक्षाने तक्रारीत हजर होऊनही आपले बचावापुष्ठर्थ काही दाखल केले नाही व तक्रारकर्त्याचे तक्रारीतील कथन सुध्दा खोडून काढलेले नाही. अशा परिस्थीतीत तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षास उपरोक्त सदनिका चे उर्वरित मोबदला रक्कम रुपये १०,००,०००/- देऊन सदनिका क्रमांक ४०१ चे पंजिबध्द विक्रीपञ करुन मिळण्यास तसेच विक्रीपञ करुन देण्यात काही कायदेशीर अडचणी निर्माण झाल्यास विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडून सदनिकेचे किंमतीपोटी स्वीकारलेली रक्कम रुपये १५,००,०००/- व्याजासह तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम व तक्रार खर्च मिळण्यास पाञ आहे या निष्कर्षाप्रत आयोग आलेले आहे. सबब मुद्दा क्रमांक २ चे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक ३ बाबतः- - मुद्दा क्रमांक १ व २ च्या विवेचनावरुन आयोग खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार क्रमांक ४५/२०२१ अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास मौजा मानेवाडा, नागपूर सर्व्हे क्रमांक ६२/१, ६८/१, शिट क्रमांक ३९९/४४,४७९/४,सिटी सर्व्हे क्रमांक ५८९, यातील शांतीराज अपार्टमेंट मधील फ्लॅट क्रमांक ४०१ (चवथा माळा) चे किंमतीपोटी उर्वरित मोबदला रक्कम रुपये १०,००,०००/- स्वीकारुन तक्रारकर्त्याचे नावे उपरोक्त सदनिकेचे पंजिबध्द विक्रीपञ करुन द्यावे.
- वर नमूद क्रमांक २ ची पुर्तता करणे कायदेशीर/तांञिक अडचणी मुळे शक्य नसल्यास विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडून सदनिकेचे इसाराच्यावेळी स्वीकारलेली मोबदला रक्कम रुपये १५,००,०००/- व त्यावर तक्रार दाखल दिनांकापासून संपूर्ण रक्कम प्रत्यक्ष अदा करेपर्यंत द.सा.द.शे. १२ टक्के व्याजासह परत दयावी.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावे.
- उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावे.
| |