Exh.No.30
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र.36/2013
तक्रार दाखल झाल्याचा दि .25/10/2013
तक्रार निकाल झाल्याचा दि. 31/01/2015
श्री सोमा चंद्रकांत गावडे
वय 43 वर्षे, धंदा- शेती,
राहाणार मु.पो.फणसखोल घर नं. 222
पो.वडखोल, गाव- आसोली,
ता.वेंगुर्ला, जि.सिंधुदुर्ग, पिन – 416518
मोबाईल - 9404396286 ... तक्रारदार
विरुध्द
प्रोप्रा. सुरेश तु. सावंत
भवानी क्लॉथ स्टोअर्स, शिरोडा,
ता.वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्यक्ष
2) श्रीमती वफा ज. खान, सदस्या.
तक्रारदारतर्फे - व्यक्तीशः
विरुद्धपक्षातर्फे विधिज्ञ – श्री बी. एन. प्रभू, श्री वाय आर. खानोलकर.
निकालपत्र
(दि.31/01/2015)
द्वारा : मा. सदस्य, श्री कमलाकांत धर्माजी कुबल.
1) प्रस्तुतच्या प्रकरणात विरुध्द पक्षाकडून तक्रारदार यांनी 100% कॉटनची म्हणून खरेदी केलेली दोन उपरणी ही कॉटनची नसून ती पॉलिस्टरची निघाली व ती विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारला बदलून देण्याची कोणतीही तजवीज केली नाही व ग्राहकांस देण्यात येणा-या सेवेत त्रुटी निर्माण केली म्हणून मंचात तक्रार दाखल केलेली आहे.
सदर प्रकरणाचा थोडक्यात गोषवारा असा –
2) तक्रारदारने दि.6/9/2013 रोजी 1 उपरणे रु.85/- व 2 गाऊन विरुध्द पक्षाच्या दुकानातून खरेदी केले सदर उपरणीवर 100% कॉटन असल्याचा शिक्का मारला होता. तक्रारदारला त्या उपरणीच्या दर्जाबद्दल मनात शंका निर्माण झाल्याने त्यांने तसे विरुध्द पक्षाला विचारले त्यांने कंपनीचा स्टँप आहे. घरी जाऊन वापरण्यापूर्वी धूऊन बघा खराब असल्यास किंवा कपडा कॉटन नसल्यास बदलून देऊ असे सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदारने घरी जाऊन उपरणे धुतले असता उपरण्याचा कपडा कॉटन नसून तो पॉलीस्टर असल्याचे तक्रारदाराला दिसून आले. दि.20/09/13 रोजी तक्रारदार विरुध्द पक्षाकडे गेले व वस्तुस्थिती सांगितली. मात्र विरुध्द पक्षाने वस्तुस्थिती समजून न घेता उपरणे बदलून देण्यास टाळाटाळ केली व कंपनीच्या मालकाशी फोनवर संपर्क करुन देतो असे सांगितले. प्रत्यक्षात तक्रारदार विरुध्द पक्षाच्या दुकानात गेले असता विरुध्द पक्षाने विसंगत उत्तरे देऊन उपरणी बदलून देणार नाही, काय करायचे ते करा अशी चिडून धमकीची भाषा वापरली. त्यानंतर तक्रारदाराने दि.02/10/2013 रोजी दुसरे उपरणे खरेदी केले ते ही रु.85/- किंमतीचे व 100% कॉटन असलेले होते. दोन्ही वेळा तक्रारदार यांना 100% कॉटनच्या नावाखाली पॉलिस्टरचे स्वस्त प्रतीचे कापड विक्री करुन विरुध्द पक्षाने फसवणूक केलेली आहे असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. तक्रारदार हा विरुध्द पक्षाचा ग्राहक असल्याने त्याला योग्य सेवा देणे हे विरुध्द पक्षाचे कर्तव्य होते. मात्र त्यांनी तसे न करता सेवेत त्रुटी निर्माण करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे असे तक्रारदाराचे म्हणणे असून – दोन्ही उपरणी खरेदीची रक्कम रु.170/-, प्रवास खर्च रु.500/- अशी एकूण रु.670/- रक्कम विरुध्द पक्षाकडून वसूल होऊन मिळावी तसेच मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.2,000/- तक्रारदाराला मिळावेत अशी मंचाला विनंती केली आहे.
3) आपले म्हणणेचे पुष्टयर्थ स्वतःचे शपथपत्रासह नि.3 वर एकूण 2 कागदपत्रे व नि.10 वर 2 कागदपत्रे दाखल केली आहेत.
4) पुराव्यादाखल युक्तीवादाच्यावेळी 2 उपरणी मंचात दाखल केली.
5) विरुध्द पक्षाने नि.8 वर आपले म्हणणे दाखल केले असून तक्रारदाराची तक्रार खोटी खोडसाळ लबाडीची असून ती आपल्याला मान्य नसल्याचे म्हटले आहे. मात्र तक्रारदारने दि.6/9/2013 रोजी उपरणे खरेदी केल्याचे मान्य केले आहे.
6) आपल्या म्हणण्याचे पुष्टयर्थ कोणतेही कागदपत्र मंचासमोर दाखल केलेले नाही.
7) तक्रारदाराची तक्रार, त्यासोबत दाखल केलेले कागदोपत्री पुरावे, प्रत्यक्षात वस्तुरुपी उपरणी, मंचासमोर केलेला युक्तीवाद तसेच विरुध्द पक्षाने प्रतिज्ञापत्राप्रमाणेच दाखल केलेला युक्तीवाद याचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आलेला आहे.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? | होय |
2 | विरुध्द पक्षाने तक्रारदारास दयावयाच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे काय ? | होय |
3 | आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
8) मुद्दा क्रमांक 1 - प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडे कपडयांची खरेदी केलेली होती त्याचा तपशील असणारे बील नि.3/1, 3/2 वर दाखल केलेले असून विरुध्द पक्षाने आपल्या म्हणण्यात मुद्दा क्र.2 मध्ये तक्रारदाराने सदर वस्तु खरेदी केल्याचे मान्य केलेले असल्यामुळे तक्रारदार हा विरुध्द पक्षाचा ग्राहक असल्याचे स्पष्ट होते.
9) मुद्दा क्रमांक 2 व 3 – तक्रारदारने खरेदी केलेल्या दोन्ही उपरण्यावर 100% कॉटन असल्याचा शिक्का होता. मात्र प्रत्यक्षात सदर उपरणी ही पॉलिस्टरची होती असे घरी नेऊन उपरणी धुतल्यानंतर तक्रारदाराच्या निदर्शनास आले. ही बाब तक्रारदारने विरुध्द पक्षाला उपरणी दुकानात नेऊन सांगितली व ती बदलून देण्याची विनंती केली मात्र विरुध्द पक्षाने ही बाब अमान्य करुन तक्रारदाराला विक्रीपश्चात सेवा देण्याचे नाकारले आणि ही तक्रारदारास दयावयाच्या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाला वाटते.
10) दि.16/01/2014 रोजी तक्रारदारने पुराव्यांच्या शपथपत्रासोबत दोन्ही उपरणी मंचासमोर दाखल केली होती. परंतू आवश्यकता भासल्यास उपरणी हजर करण्याचे निर्देश देण्यात येतील असे तक्रारदारला मंचातर्फे तोंडी सांगण्यात आले होते. तक्रारदाराने दोन्ही उपरणी युक्तीवादाच्यावेळी मंचासमोर पुराव्यादाखल जमा केली. त्याचे मंचाने निरीक्षण केल्यावर आणि तक्रारदारने कथन केल्याप्रमाणे उपरण्यातील धागा जाळला असता 100% कॉटन असल्यास त्याची राख होते व पॉलिस्टर असल्यास कपडा आकसतो किंवा धाग्याची गाठ होते या तक्रारदाराच्या म्हणण्याची खात्री मंचातर्फे करण्यात आली त्यामुळे तक्रारदाराचा युक्तीवाद मान्य करणे क्रमप्राप्त आहे.
11) वास्तविकतः विरुध्द पक्ष हा विक्रेता असून सदर उपरण्याचा उत्पादक नव्हता. त्यामुळे सदर उपरणी उत्पादकाकडे पाठवून किंवा ज्याच्याकडे खरेदी केली त्याचेकडे पाठवून त्याच्या दर्जाबाबत संबंधिताला कल्पना देता आली असती पण तसे न करता नि.14 वर त्या उपरण्याच्या विक्रीशी आपला कोणताही संबंध नसल्याचे कथन केले. नि.12 वरील मंचाच्या आदेशाप्रमाणे सदर उपरणे निर्मित कंपनी N.T.Mills चा पत्ता देण्याची पुर्तता विरुध्द पक्षाने केलेली नाही किंवा विक्री केलेली उपरणी कोठून खरेदी केली याची माहिती मंचासमोर दिली नाही. त्यामुळे तक्रारदाराने खरेदी केलेली उपरणी बदलून देण्याची पूर्णतः जबाबदारी विरुध्द पक्षाची आहे असे मंचाला वाटते.
12) 100% कॉटन असल्याचे भासवून ग्राहकाला दुय्यम दर्जाचा माल देणे ही अनुचित व्यापारी पध्दत असून विरुध्द पक्षाने ग्राहकाकडून वस्तुचे मुल्य घेतांना त्याला दर्जेदार आणि प्रमाणित वस्तु पुरवणे व्यवहार्य आहे. मात्र त्याप्रमाणे कृतीतून वागणे विरुध्द पक्षाने टाळलेले असून तक्रारदारने तक्रारीत विनंती केलेप्रमाणे केलेली मागणी अंशतः मान्य करण्यात येत आहे.
13) उपरोक्त सर्व बाबींचा विचार केल्यावर मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मान्य करण्यात येते.
2) विरुध्द पक्षाने दोन उपरणी खरेदीची रक्कम रु.170/- (रुपये एकशे सत्तर मात्र) तक्रारदाराला अदा करावेत.
3) विरुध्द पक्षाने मानसिक त्रासापोटी रु.1500/-(रुपये एक हजार पाचशे मात्र) व प्रकरण खर्चापोटी रु.2,000/-(रुपये दोन हजार मात्र) देणेचे आदेश पारीत करण्यात येतात.
4) विरुध्द पक्ष यांनी सदर आदेशाची पुर्तता 45 दिवसांचे आत न केल्यास तक्रारदार विरुध्द पक्ष यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 25 व 27 प्रमाणे कार्यवाही करु शकतील
5) उपरोक्त आदेशाची पुर्तता केल्यानंतर तक्रारदारतर्फे मंचात दाखल केलेली दोन उपरणी विरुध्द पक्ष यांनी मंचातून घेऊन जावीत.
6) मा.राज्य आयोग, मुंबई यांचे परिपत्रक्र क्र.राआ/महा/आस्था/-3/जि.मं.कामकाज/परिपत्रक/2014/3752 दि..05 जुलै 2014 नुसार उभय पक्षकारांनी 45 दिवसानंतर म्हणजेच दि.17/03/2015 रोजी आदेशाची पुर्तता झाली किंवा नाही ? हे कळवणेसाठी या मंचासमोर हजर रहावे असे आदेश देण्यात येतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 31/01/2015
(वफा ज. खान) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्या, प्रभारी अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.