जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली
ग्राहक तक्रार क्रमांक :- 15/ 2016 तक्रार नोंदणी दि. :-23/2/2016
तक्रार निकाली दि. :- 28/7/2016
निकाल कालावधी:- 5 महीने 5 दिवस
अर्जदार/तक्रारकर्ता :- सौ.अस्मिता अरुण सिडाम,
वय – 38 वर्षे, व्यवसाय – गृहिणी ,
रा.रामनगर वार्ड नं.32, गडचिरोली,
तह.जिल्हा – गडचिरोली.
- विरुध्द -
गैरअर्जदार/विरुध्दपक्ष :- (1) श्री.सुनिल पुंडलिक खोब्रागडे,
मा.अध्यक्ष,
प्रियदर्शनी इंदिरा गांधी सहकारी पत संस्था मर्या.,
सर्वोदय वार्ड, तुळजाबाई शाळेच्या मागे, आरमोरी
रोड, गडचिरोली, ता.जि.गडचिरोली.
(2) श्री.विलास केशवराव दशमुखे,
मा.सचिव,
प्रियदर्शनी इंदिरा गांधी सहकारी पत संस्था मर्या.,
सर्वोदय वार्ड, राम मंदिराजवळ, गडचिरोली.
(3) श्री.चरणदास डोमुजी लाकडे,
मा.व्यवस्थापक,
प्रियदर्शनी इंदिरा गांधी सहकारी पत संस्था मर्या.,
राह.व्दारा-श्री.लाटेलवार,मु.पो.मुरखळा,
ता.जि.गडचिरोली.
(4) मा.प्रशासक,
प्रियदर्शनी इंदिरा गांधी सहकारी पत संस्था मर्या.,
सर्वोदय वार्ड, गडचिरोली, ता.जि.गडचिरोली.
(5) मा.सहायक निबंधक,
सहकारी संस्था, गडचिरोली.
अर्जदार तर्फे :- स्वतः
गैरअर्जदार क्र.1 व 3 :- अनुपस्थित
गैरअर्जदार क्र.2 तर्फे :- स्वतः
गैरअर्जदार क्र.4 व 5 तर्फे :- स्वतः
गणपूर्ती :- (1) श्री विजय चंद्रलाल प्रेमचंदानी, अध्यक्ष
(2) श्री सादिक मोहसिनभाई झवेरी, सदस्य
(3) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, सदस्या
- निकालपत्र -
(मंचाचे निर्णयान्वये,श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 28 जूलै 2016)
तक्रारकर्तीने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12
अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. तक्रारकर्तीने गैरअर्जदार क्र.1 ते 3 पत संस्थेमध्ये, दिनांक 15.2.2012 ला मुदतठेव प्रमाणपत्र क्र. 000726 अन्वये रुपये 50,000/- व दिनांक 12.6.2012 ला मुदतठेव प्रमाणपत्र क्र. 000727 अन्वये रुपये 50,000/- पुढील भविष्याकरीता गुंतविले आहेत. सरदर रक्कम गैरअर्जदार क्र.1 ते 3 पत संस्थेमध्ये गुंतवितांना गैरअर्जदार यांनी पुढील लाभ देण्यात येतील, असे अर्जदारास सांगितले होते व तशा अटी मुदत ठेव प्रमाणपत्राच्या मागे नमुद करण्यात आलेल्या आहेत.
5 ¼ YEAR PRIYA DARSHNI VIKAS PATRA |
Conditions :
Amount should be deposited compulsory for one year from the date of issue of this receipt.
If payment is claimed after one year. Payable amount is @ the interest of Rs. 12.5 % per annum.
If payment is claimed after Two years payable amount is @ the interest Rs. 13.5 % per annum.
If payment is claimed complete 3 years or above. The payment is @ the interest of Rs. 14 % per annum.
After 5 years and 3 month complete. Payable amount is double.
There is 75 % Loan facility the amount deposited.
Priya Darshini Indira
Urban Credit Co-Operative \ Society Ltd. Gadchiroli.
2. अर्जदारास आर्थिक अडचण असल्याने, अर्जदार रक्कम रुपये 1,00,000/- व्याजासह मागणीकरीता गैरअर्जदार पत संस्थेमध्ये गेले असता संस्था बंद झाल्याचे व सदर संस्थेवर प्रशासक नियुक्त झाले असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर, अर्जदाराने दिनांक 13.1.2016 ला लेखी विनंती अर्ज करुन रक्कम व्याजासह मागणी केली. परंतु, गैरअर्जदार यांनी रक्कम परत न केल्यामुळे विद्यमान मंचात तक्रार दाखल केली आहे. गैअर्जदार क्र.1 ते 5 यांनी अर्जदाराची मुदत ठेवीपोटी जमा असलेली रक्कम रुपये 1,00,00/- द.सा.द.शे. 14 टक्के दराने परत मिळण्यात यावी तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 50,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 5000/- मिळावे अशी प्रार्थना केली आहे.
2. अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 4 दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदारक्र.2 यांनी नि.क्र.8 नुसार लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 व 3 हे नोटीस प्राप्त होऊनही मंचासमोर हजर झाले नाही व उत्तरही दाखल केलेले नाही. त्यामुळे, दिनांक 4.4.2016 रोजी गैरअर्जदार क्र.1 व 3 विरुध्द लेखी उत्तराशिवाय प्रकरण पुढे चालविण्याचा आदेश नि.क्र.1 वर पारीत करण्यात आला.
3. गैरअर्जदाराने नि.क्र.8 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, अर्जदाराने गैरअर्जदार पत संस्थेमध्ये रुपये 50,000/- च्या प्रत्येकी दोन ठेवी साडेपाच वर्षाकरीता ठेवलेल्या आहेत. परंतु, काही संचालकांनी अचानक राजीनामा दिल्याने, पत संस्थेवर दिनांक 1.9.2013 पासून प्रशासक नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यामुळे, पत संस्थेच्या व्यवहाराविषयी काहीही माहिती नाही.
4. गैरअर्जदार क्र.4 यांनी नि.क्र.10 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमुद केले की, गैरअर्जदार पत संस्था ही नोंदणीकृत संस्था आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 78 (अ) अंतर्गत कार्यवाही करुन तत्कालीन मंडळ बरखास्त करुन त्रिसदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले. तत्कालीन संचालक मंडळ दिनांक 31.8.2013 पर्यंत कार्यान्वित होते, प्रतिवादी क्र.1 ते 3 हे या दरम्यान संस्थेचे कामकाज सांभाळत होते. अर्जदार यांनी मुदत ठेव पावती क्र. 000726 दिनांक 12.5.2012 अन्वये रक्कम रुपये 50,000/- व पावती क्र. 000727 दिनांक 12.6.2012 अन्वये रुपये 50,000/- पत संस्थेमध्ये गुंतविले आहेत, हे मान्य आहे. अर्जदाराने रकमेची मागणी केली हे मान्य परंतु, इतर ठेवीदारांच्या रक्कमा, कर्जदारादांकडून कर्जाची रक्कम प्राप्त होईल त्यानुसार टप्प्या-टप्प्याने परत करणे शक्य होईल, असे नमुद केले आहे. कर्जदाराकडून कर्जाची रक्कम परतफेड झाल्यास ठेवीदारांनी रुपये 5000/- व रुपये 10,000/- याप्रमाणे धनादेशाव्दारे परत करीत आहेत, त्यामुळे, अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात यावी, अशी विनंती केली.
5. गैरअर्जदार क्र.5 यांनी नि.क्र.10 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमुद केले की, गैरअर्जदार क्र.1 ते 3 ही नोंदणीकृत पत संस्था असून, संस्थेकडून होत असलेल्या प्रत्येक आर्थिक व्यवहाराची जबाबदारी ही संचालक मंडळाची असते. पत संस्थेत दोष निर्माण झा्ल्यास त्यावर कायदेशिर कार्यवाही करण्याचे अधिकार संस्थेचे निबंधक यांना आहेत सन 2013 मध्ये संस्थेच्या संचालक मंडळातील 13 संचालकांपैकी 7 संचालकांनी राजीनामा दिल्याने, तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त करुन संस्थेवर त्रिसदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले. संस्थेचे दप्तर पुर्ण करण्याचे काम सुरु असून शासकीय लेखापरिक्षकामार्फत लेखा परिक्षणाचे काम पुर्ण करण्यात येईल. कर्जवाटपात झालेल्या अनियमिततेबाबत सखोल चौकशी करुन लेखापरिक्षकामार्फत अहवाल तयार झाल्यानंतर तत्कालीन संचालक मंडळावर व्यक्तीशः जबाबदारी निश्चित करुन रकमेची वसुली करण्यात येऊन ठेवीदारांची रक्कम परत करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येईल.
4. अर्जदाराने तक्रारी कथना पृष्ठयर्थ नि.क्र.12 नुसार पुरावा शपथपञ दाखल केले. अर्जदार व गैरअर्जदार क्र.2, 4 व 5 यांनी दाखल केलेले लेखी बयान, दस्ताऐवज, तसेच अर्जदार व गैरअर्जदार यांनी केलेल्या तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 ते 3 चा ग्राहक आहे काय ? : होय
2) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.4 व 5 चा ग्राहक आहे काय ? : नाही
2) गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी अर्जदाराप्रती सेवेत न्युनतापूर्ण व्यवहार : होय
केला आहे काय ?
3) अंतीम आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :
तक्रारकर्तीने गैरअर्जदार क्र.1 ते 3 पत संस्थेमध्ये, दिनांक 15.2.2012 ला मुदतठेव प्रमाणपत्र क्र. 000726 अन्वये रुपये 50,000/- व दिनांक 12.6.2012 ला मुदतठेव प्रमाणपत्र क्र. 000727 अन्वये रुपये 50,000/- पुढील भविष्याकरीता गुंतविले आहेत. तक्रारकर्तीने नि.क्र.2 वर दाखल दस्त क्र.1 व 2 वरुन ही बाब सिध्द होत आहे. गैरअर्जदार क्र.1 व 3 सदर प्रकरणात हजर झालेले नाहीत व गैरअर्जदार क्र.2 यांनी नि.क्र.8 वर दाखल त्यांचे जबाबामध्ये अर्जदाराने उपरोक्त जमा रक्कम पत संस्थेत ठेवली होती, ही बाब मान्य असून अर्जदार ही गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांची ग्राहक आहे, असे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :
गैरअर्जदार क्र.4 व 5 पत संस्थेचे प्रशासक व सहायक निबंधक असल्याने, अर्जदाराने पत संस्थेत जमा केलेली रक्कम बाबत गैरअर्जदार क्र.4 व 5 यांचे कोणतीही जबाबदारी नसल्याने, व जमा झालेल्या रकमांचे व्यवहाबाबत गैरअर्जदार क्र.4 व 5 चे कोणतेही संबंध नसल्याने, अर्जदार ही गैरअर्जदार क्र.4 व 5 चा ग्राहक नाही, असे सिध्द होते. सबब, म़द्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 3 बाबत :
तक्रारकर्तीने गैरअर्जदार क्र.1 ते 3 पत संस्थेमध्ये, दिनांक 15.2.2012 ला मुदतठेव प्रमाणपत्र क्र. 000726 अन्वये रुपये 50,000/- व दिनांक 12.6.2012 ला मुदतठेव प्रमाणपत्र क्र. 000727 अन्वये रुपये 50,000/- पुढील भविष्याकरीता गुंतविले आहेत. तक्रारकर्तीने नि.क्र.2 वर दाखल दस्त क्र.1 व 2 वरुन ही बाब सिध्द होत आहे. गैरअर्जदार क्र.1 व 3 सदर प्रकरणात हजर झालेले नाहीत व गैरअर्जदार क्र.2 यांनी नि.क्र.8 वर दाखल त्यांचे जबाबामध्ये अर्जदाराने उपरोक्त जमा रक्कम पत संस्थेत ठेवली होती व अर्जदाराला सदर रक्कम तक्रार दाखल करेपर्यंत मिळाली नाही, ही बाब अर्जदाराने दाखल नि.क्र.2 वरील दस्तऐवजावरुन व गैरअर्जदार क्र.2, 4 व 5 नी दाखल उत्तरावरुन सिध्द होत आहे. सबब, गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी, अर्जदाराने पत संस्थेत जमा केलेली रक्कम मुदत संपल्यानंतर व्याजासह परत केली नाही हे सिध्द झाल्यावरुन गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी अर्जदाराप्रती न्युनतापुर्ण सेवा दर्शविलेली आहे, हे सिध्द झालेले आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 4 बाबत :
गैरअर्जदार क्र.4 व 5 यांनी, अर्जदाराची जमा असलेली रक्कम परत करण्याबाबत केलेली कारवाईच्या अतिरिक्त कलम 3 ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या अनुषंगाने, अर्जदाराला ग्राहक म्हणून गैरअर्जदाराकडून सदर रक्कम मागण्याचा अधिकार आहे व सदर तक्रार या मंचात दाखल करण्याचा अधिकार आहे. गैरअर्जदार क्र.4 व 5 हे अर्जदाराचे ग्राहक नसल्याने त्यांचेविरुध्द कोणतेही आदेश नाहीत. मुद्दा क्र.1 ते 4 चे विवेचनानुसार खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे.
अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
गैरअर्जदारक्र. 1 ते 3 यांनी व्यक्तिगत किंवा संयुक्त रितीने, अर्जदाराने पत संस्थेत जमा केलेली रक्कम व्याजासह आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाच्या आंत अर्जदाराला द्यावी.
गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी, अर्जदारास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रुपये 5000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 2500/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाच्या आंत अर्जदाराला द्यावी.
गैरअर्जदार क्र.4 व 5 विरुध्द कोणतेही आदेश नाहीत.
उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 28/7/2016.
(रोझा फु. खोब्रागडे) (सादीक मो. झवेरी) (विजय चं. प्रेमचंदानी)
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली.