जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, गडचिरोली.
ग्राहक तक्रार क्र. 51/2021 तक्रार नोंदणी दिनांकः- 24/12/2021
अंतिम आदेश दिनांकः- 10/06/2022
निर्णय कालाः- 5 म.17 दि.
अर्जदार/तक्रारकर्ताः- श्री. तानाजी जानकीराम भांडेकर,
वयः- 54 वर्ष व्यवसायः शिक्षक
रा. पो. कुनघाडा ता. चामोर्शी जि. गडचिरोली
:: विरूध्द ::
गैरअर्जदार/विरूध्दपक्षः- श्री. सुनिल केशवराव पोरेड्डीवार,
वयः- 54 वर्ष व्यवसायः शिक्षक
प्रोप्रा. संस्कृती सांस्कृतीक भवन,
रा. केमिस्ट भवनच्या मागे, चामोर्शी रोड,
गडचिरोली, ता.जि. गडचिरोली
अर्जदार/तक्रारकर्ताः- वकील श्री. अरूणकुमार रणदिवे
गैरअर्जदार/विरूध्दपक्षः- वकील श्री. विजय गोरे
गणपूर्तीः- श्री. अतुल डी. आळशी, मा. अध्यक्ष
श्रीमती. रोझा फु. खोब्रागडे, सदस्या
:: निकालपत्र ::
(आयोगाचे निर्णयान्वये, श्रीमती. रोझा फु. खोब्रागडे, सदस्या)
(आदेश पारीत दि. 10/06/2022)
तक्रारकर्ता प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कलम 35 अंतर्गत दाखल केलेली आहे. तक्रारीचा थोडक्यात आशय खालीलप्रमाणे-
- तक्रारकर्ता मौजा-कुनघाडा ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील रहिवासी असून त्यांच्या मुलीचे कु. हर्षाली हिचे लग्न चि. मंगेश देवरावजी नैताम यांच्याशी दि. 28/04/2021 रोजी संस्कृती सांस्कृतीक भवन आरमोरी रोड, गडचिरोली येथे करण्याचे ठरले. विरूध्द पक्ष हे संस्कृती सांस्कृतीक भवनचे मालक आहेत. तक्रारकर्त्याने दि. 03/02/2021 रोजी विरूध्द पक्षकारांची भेट घेऊन संस्कृती सांस्कृतीक भवन आरक्षीत करण्यासाठी रू. 70,000/-, चे अंदाजपत्रक असल्याने रू. 20,000/-, अग्रीम रक्कम देऊन दि. 28/04/2021 च्या लग्न कार्यालयाकरीता संस्कृती सांस्कृतीक भवन आरक्षीत केले. उर्वरीत रक्कम रू. 50,000/-, लग्न लागल्यानंतर देण्याचे ठरले. त्यानंतर कोवीड -19 चा प्रकोप वाढल्याने व दि. 22/04/2021 रोजी शासनाने टाळेबंदी जारी केल्यामुळे नियमानुसार 25 लोकांची उपस्थितीत लग्न लावण्याची परवानगी होती परंतु या काळात संस्कृती सांस्कृतीक भवन बंद ठेवले गेले होते. दि. 28/04/2021 रोजी लग्न करावयाचे असल्यास दुसरी व्यवस्था करावी कारण कोवीड-19 च्या टाळेबंदीमुळे संस्कृती सांस्कृतीक भवन बंद ठेवण्यात येत आहे असे विरूध्द पक्षाने सांगीतले त्यामुळे तक्रारकर्त्याने आपल्या मुलीचे कु. हर्षालीचे लग्न मार्कंडा देवस्थान येथे करावे लागले. तक्रारकर्त्याने दि. 01/05/2021, दि. 03/05/2021 व दि. 05/05/2021 रोजी वारंवार अग्रीम रक्कम रू. 20,000/-, ची मागणी केली परंतु विरूध्द पक्ष आज देतो उद्या देतो असे सांगुन तसेच फोनवर अपमानजनक बोलुन रक्कम परत न करण्याची धमकी दिली. विरूध्द पक्षाच्या वरील कृत्यामुळे तक्रारकर्त्यास मानसिक त्रास तसेच आर्थिक नुकसान झाले त्यामुळे तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षास दिलेली अग्रीम रक्कम रू. 20,000/-, मानसिक व शारीरीक त्रासापोटी रू. 20,000/-, तसेच तक्रारीचा खर्च रू. 10,000/-, विरूध्द पक्षाकडुन मिळण्यात यावे अशी प्रार्थना केली आहे.
- तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत 4 झेरॉक्स दस्तऐवज जोडलेले आहे. तक्रारकर्त्याची तक्रार नोंदणी करून विरूध्द पक्षास नोटीस पाठविण्यात आली. विरूध्द पक्ष यांनी नि.क्र. 10 नुसार लेखीउत्तर दाखल केले.
- विरूध्द पक्ष यांनी नि. क्र 10 नुसार दाखल केलेल्या लेखीउत्तरात नमुद केले आहे की, तक्रारकर्त्यानी केलेले सर्व आरोप त्यांना अमान्य आहेत. विरूध्द पक्ष पुढे नमुद करतात की, तक्रारकर्त्याने दि. 28/04/2021 ला होणा-या लग्नाकरीता संस्कृती सांस्कृतीक भवन दि. 03/02/2021 रोजी आरक्षीत करण्यासाठी रू. 20,000/-, अॅडव्हान्स जमा करून उर्वरीत रक्कम रू. 50,000/-, लवकरात लवकर देण्याचे ठरविले. नमूद इस्टीमेटनुसार तक्रारकर्ता यांचेवर पाळावयाचे नियम याबाबत सविस्तर माहिती तसेच नियम व अटी नमुद केल्या होत्या त्या अटीनुसार महाराष्ट्र शासन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांचे पत्र जिका/क्र.कार्या-3/अका.आव्यक/कावि370/2019दि.30/03/2021 आदेशातील शासन निर्देश क्र. 10 नुसार विवाह संबधीचे कार्यक्रमांना कमाल 50 लोकांच्या मर्यादेत परवानगी असेल तथापी याचे उल्लंघन केल्यास जागा ज्याचे मालकीचे असेल त्या लॉन/हॉल/सभागृह जागा मालकावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम भारतीय दंड संहिता व साथरोग अधिनियम अंतर्गंत कारवाई प्रस्तावित करण्यात येईल तसेच सदरची जागा ही राज्यात कोवीड-19 साथरोग म्हणुन घोषीत असेल त्या संदर्भात आवश्यक कार्यवाही महसुल/पोलीस/स्थानिक स्वराज्य संस्थानी करावे सदर अटीची माहिती तक्रारकर्त्यास दिली असता तक्रारकर्त्याने रू. 2,000/-,पेक्षा जास्त लोकसंख्या लग्न सोहळयासाठी उपस्थित राहतील यासाठी सहकार्य करावे अशी विनंती केली. विरूध्द पक्षाने शासनाने निर्धारीत करून दिलेल्या लोकसंस्थेच्या अधीन राहून लग्न करावे त्यासाठी सर्वतोपरी कायदेशीर मदत करण्याची हमी दिली. परंतु तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षास कोणत्याही प्रकारची माहिती न देता स्वतःच्या मुलीचे कु. हर्षालीचे लग्न मार्कंडा येथे लावले. तक्रारकर्ता त्याचे बेकायदेशीर कृत्यास समर्थन प्राप्त न झाल्यामुळे तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षास त्रास देण्याच्या हेतूने अर्ज दाखल केला असल्यामुळे तो अर्ज विरूध्द पक्षाची शिल्लक रक्कम रू. 50,000/-, शारिरिक व मानसिक त्रास रू. 1,00,000/-तक्रार खर्च रू. 20,000/-, असे एकुण रू. 1,70,000/-, तक्रारकर्त्यावर बसविण्यात यावे असा आदेश पारीत करून तक्रारकर्त्याचा अर्ज खारीज करावा अशी विनंती केली आहे.
- तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्तऐवज तसेच विरूध्द पक्षाने दाखल केलेले लेखीउत्तर व तोंडीयुक्तीवादावरून खालील मुद्दे निघतात.
अ.क्र. | मुद्दा | निःष्कर्ष |
1. | तक्रारकर्ता हा विरूध्द पक्ष यांचा ग्राहक आहे काय? | होय. |
2. | विरूध्द पक्षांनी लाभार्थ्याप्रती सेवेत न्युनतापूर्ण व्यवहार केला आहे काय ? | होय. |
3. | अंतिम आदेश काय ? | अंतिम आदेशाप्रमाणे |
:: कारणमिमांसा ::
मुद्दा क्र. 1 बाबतः- तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या नि.क्र. 10 वरील दस्तऐवजावरून तक्रारकर्ता हे विरूध्दपक्ष यांचे ग्राहक आहेत हे सिध्द होते तसेच विरूध्द पक्षकारांना सुध्दा ही बाब मान्य असल्यामुळे मुद्दा क्र 1 हे होकारार्थी दर्शविण्यात येते.
मुद्दा क्र. 2 बाबतः- तक्रारकर्त्याने स्वतःच्या मुलीच्या लग्नासाठी संस्कृती सांस्कृतीक भवन बुक केले त्यासाठी रू. 20,000/-, अग्रीम रक्कम विरूध्द पक्षास दि. 03/02/2021 रोजी दिली ही बाब विरूध्द पक्षांना मान्य आहे. कोवीड-19 च्या प्रकोपामुळे तसेच शासकीय नियमानुसार फक्त 50 लोकांची परवानगी असल्यामुळे त्या काळात हॉल बंद ठेवण्यात आले त्यामुळे तक्रारकर्त्यांला आपल्या मुलीचे लग्न दुसरीकडे करावे लागले. विरूध्द पक्षांनी आपल्या लेखीउत्तरात नमुद केले आहे की, महाराष्ट्र शासन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांचे पत्र जिका/क्र.कार्या-3/अका.आव्यक/कावि370/2019 दि. 30/03/2021 आदेशातील शासन निर्देश क्र 10 नुसार विवाह संबधीचे कार्यक्रमांना कमाल 50 लोकांच्या मर्यादेत परवानगी असेल व याचे उल्लंघन केल्यास जागा मालकावर अधिनियम, भारतीय दंडसंहिता व साथरोग अधिनियम कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे शासकीय नियम असल्यामुळे त्या कालावधीत बहुतांश सभागृह बंद ठेवण्यात आले होते. तक्रारकर्त्याच्या मुलीच्या लग्नाच्या दिवशी विरूध्द पक्षाने दिं. 28/04/2021 रोजी संस्कृती सांस्कृतीक भवन सुरू ठेवले होते. याबाबत कोणताही पुरावा आयोगासमक्ष दाखल केलेला नाही. तक्रारकर्त्यानी विरूध्द पक्षाला सभागृहाची अग्रीम रक्कम दिली परंतु सभागृहाचा उपयोग केला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाकडे दिलेली अग्रीम रक्कम परत न करून सेवेत न्युनतापूर्ण व्यवहार केला आहे असे आयोगाचे स्पष्ट मत असल्याने मुद्दा क्र 2 चे उत्तर होकारार्थी दर्शविण्यात येत आहे.
वरील विवेचनानुसार व निःष्कर्षावरून मा. आयोग खालील आदेश पारीत करीत आहोत.
अंतिम आदेश
- तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
- विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडून सभागृहासाठी घेतलेली अग्रीम रक्कम रू. 20,000/-, तक्रारकर्त्यास परत करावी.
- विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासाकरीता रू. 5,000/-, व तक्रारीचा खर्च रू. 5,000/- दयावे.
- उभयपक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
- प्रकरणामध्ये ‘ब’ व ‘क’ फाईल्स तक्रारकर्त्याला परत करण्यात यावी.
(श्रीमती. रोझा फु. खोब्रागडे) (श्री. अतुल डी. आळशी)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, गडचिरोली.